अंबा

Story Of A Unfortunate Woman


अंबा

जलद लेखन 

विषय भूतकाळात डोकवताना.



घनघोर महायुद्ध! भयाण शंखनाद, भेदक रणवाद्ये! बाणांचा वर्षाव, शस्त्रांचा लखलखाट, रथांचा खडखडाट, तलवारी, गदा, भाले,बाणांचा जागोजागी पडलेला खच, जखमी सैनिकांच्या आरोळ्या आणि हृदय भेदक किंकाळ्यांनी आकाशाच्या हृदयालाही चरे पडले होते. हत्तींचा चित्कार,रथांच्या चाकांचा आवाज, रणनौबतींच्या आवाजाने पृथ्वी धुंद होऊन गेल्याचा भास होत होता.


भीष्म कौरव सेनापती श्वेत वस्त्र, श्वेत अश्वंच्या रथांवर आरुढ होऊन तुटून पडले शत्रूंवर आणि उडाला एकच हाहाकार! साक्षात प्रलयकाळ युद्धभूमीवर अवतरला होता. दुर्योधनाच्या अपमानास्पद उद्गारांचे प्रत्युत्तर भीष्मांनी प्रतिदिनी दहा हजार सैनिक मारून दिले होते.

तिकडे पांडव शिबिर घोर चिंतेच्या गर्तेत बुडून गेले होते. अखेर कृष्णानं युधिष्ठराला पितामहांच्या शिबिरात पाठवलं.

युधिष्ठीराने समयीकडे एकटक, स्तब्ध पणे बघणाऱ्या त्या वयोवृद्ध तापसाला वंदन केलं. साक्षात धर्म म्हणून भारतभूमीवर युधिष्ठिराचा लौकिक होता, त्याला बघून पितामहांनी आपले सुरकुतलेले दोन्ही हात वर केले. युधिष्ठिराची चिंता पितामहान पासून लपली नव्हती. त्यांनी एक गंभीर स्मित केले आणि एवढेच म्हणाले…


पितामह -"हे धर्मराजा मी युद्धात कुठल्याही स्त्रीवर कधीही शस्त्र उगारणार नाही. रात्रफार झाली आहे जा! तू स्वतःच्या शिबिरात आराम कर. पुन्हा भेट उद्या रणभूमीवर".

झालेला संवाद युधिष्ठिराने मधुसूदनास सांगितला. कृष्णाने मंद स्मित केले. दुसऱ्या दिवशीची रणनीती मनात ठरवून कृष्ण स्वतःच्या शिबिराकडे परतला.


दुसऱ्या दिवशी परत घनघोर संग्राम सुरू झाला आणि अचानक पितामहान समोर शिखंडी आला. दोन जन्मांच्या तपाचे तेज घेऊन. त्याच्या डोक्यात सुडाचा आणि डोळ्यात अपमानाचा अंगार होता. शिखंडीला बघून भीष्मांचे हात एक क्षण थरथरले आणि त्यांनी शस्त्र संन्यास घेतला. स्वतःची शस्त्र खाली ठेवली आणि विनाअट समर्पण केले.

त्याच क्षणी अर्जुनाच्या बाणांनी पितामह घायाळ झाले. हात, पाय, छाती, भाळ सुसाट बाण छेदात राहिले. पितामह विद्ध झाले. सहस्त्र बाणानांच्या शरशैयेवर त्यांचा देह विसावला. शिखंडीचे मात्र मुख कमल फुलल होतं. त्याला वाटलं त्याच्या जन्माचं सार्थक झालं. प्रतिज्ञापूर्तीचा आनंद शिखंडीच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. त्याला तर मुक्तीचाच परमानंद झाला होता.

भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या शिखंडीला म्हणजेच पूर्वजन्मीच्या अंबेला मनात आपल्या स्वप्नांच्या, प्रेमकोषाचा विध्वंस करणाऱ्या भीष्माचा तिला सूड घ्यायचा होता. भीष्माच्या मृत्यूसाठी कठोर तपश्चर्या करून तिने शंकराकडून वरदान मिळवले होते. प्रतिज्ञा पूर्तीसाठी आपली दोन जन्म तिने खर्ची घातले होते. महाभारतातल्या या छोट्या काळात तिने दोन जन्मांचा प्रवास केला होता.या दोन जन्मांचे प्रयोजन काय? ध्येय काय? आणि फलश्रुती काय?


खरंतर अंबा विद्युल्लते सारखी प्रखर तेजाने सळसळणारी स्त्री. प्रस्थापित व्यवस्था, समाज मान्यता,धारणा या विरोधात तिने बंड केले. हा केवळ मूक निषेध नव्हता. तो कृती प्रमाण होता. आपल्या स्वातंत्र्य व अधिकारापोटी तिने फार मोठी किंमत चुकवली होती. ही अंबेच्या अस्मितेची आणि न्यायाची लढाई होती. जे प्रेम आणि सुख तिच्या हक्काचे होते ते हिरावून घेतले गेले. अंबेच्या बाबत ज्या घटना घडल्या त्या तत्कालीन काळात कितीतरी राजकन्यांसोबत घडल्या असतील, अनेक राजकन्यांचे हरणही झाले असेल किंवा वीर्य शुल्क देऊन त्यांच्याशी विवाह करणे या गोष्टीमुळे त्या वेळेच्या परंपरेला छेद देणाऱ्या त्या नव्हत्याच आणि त्यात काही गैरही नव्हते. अशा कितीतरी स्त्रियांच्या मनाविरुद्ध जेत्यांनी त्यांना जिंकून घेतले असेल पण त्यातील एक ही अंबा झाली नाही. इतिहास जेत्यांचाच असतो. अंबेला न्याय हवा होता. तो तिला मिळाला नाही दुसऱ्या जन्मात तरी तो तिला मिळाला का?



©® राखी भावसार भांडेकर.


🎭 Series Post

View all