अमर्याद:- भाग 33

And The Bunker Left By All Of Them To Proceed For New Destination

अमर्याद:- भाग 33


बिंदीया दीदी ची गोष्ट ऐकून नैना पूर्णपणे हबकली होती. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. ते 12 दिवस दीदी ने वाळवंटात कसे काढले असतील हा विचार नैना ला राहून राहून येत होता. पण हे ही नक्की होते की
बिंदीया दिदीच्या सांगितलेल्या गोष्टींमुळे नैनाचा राज बद्दल असलेला अभिमान अजून वाढला होता.
राज हा काहीही करू शकतो यांवर तिचा विश्वास पूर्ण होता.

तिने क्षणभर राज कडे पाहिले तर तो अजून ही ग्लानीत होता. तिने हळूच त्याच्या केसांमधून हात फिरवला, आणि त्याचे केस लाडाने अस्ताव्यस्त केले. तेवढ्यात काहीतरी आवाज आला तसे तिने मागे वळून बघितले, तर त्या भुयारातून सुखी आत मधे शिरत होता.
त्याने नैना कडे पाहत विचारले\" "साहेब अजून शुद्धीवर नाही आले का?"
"मी त्याच गोष्टीची वाट पाहत आहे भैया..मगाशी शुद्धीवर आला होता,पण परत झोपला आहे.कदाचित डॉक्टरांच्या औषधांमुळे असेल."

सुखी काहीच न बोलता तसाच बसून राहिला.बिंदीया ने त्याला पाणी आणून दिले ते ही त्याने घेतले नाही.
नैनाने त्याचा चेहऱ्याकडे पाहिले..त्याच्या चेहऱ्यावरून तो थोडासा चिडलेला दिसत होता.हाताच्या मुठी थोड्या वळलेल्या होत्या,आणि कपाळावरची नस थोडी फुगली होती.या सगळ्या आविर्भावावरून तो राज उठायची वाट बघत आहे हे लगेच लक्षात येत होते.

नैनाला क्षणभर त्याची भीतीचं वाटली.ती काहीचं न बोलता राज कधी शुद्धीवर येतो यावर लक्ष देत बसली. सुखीची अस्वस्थता वाढत होती..तो उठला आणि तिथेच फेऱ्या मारत बसलो. त्याला फेऱ्या मारताना पाहून नैनाला वाटले की राज ला उठवावे पण ती तशीच बसून राहिली.

आता बाहेर अंधार पडला होता. राजची बऱ्याच वेळ झोप झाली होती...कुठल्याही क्षणाला तो शुध्दीवर आला असता...आणि झाले ही तसेच! काही वेळाने राज शुद्धीवर आला आणि सुखी कडे पाहत त्याने पहिला प्रश्न विचारला\" "सापडला?"

"हो"
"कोण?"
यावर सुखी काहीच बोलला नाही.
"सुखी मी तुला काही विचारत आहे."
"साहेब तुम्ही बरे व्हा, मी तुम्हाला सगळे सांगतो."

"मी बराच आहे सुखी, मला नाव हवे आहे." राज च्या विचारण्यात खूप ताठपणा होता.

सुखीने हळूच नाव सांगितले तसा राज च्या डोळ्यात अंगार फुलला.क्षण भर कोणीच काही बोलले नाही.
दोन मिनिटांनंतर राजने परत त्याला विचारले,"कारण?"

"पैसा. "सुखी हळूच उत्तरला.
राज खिन्न हसला.

नैना ही सगळं स्थित्यंतरे नीट पाहत होती.तिला कळत काहीच नव्हते, पण ह्यावेळी काही बोलणे योग्य नाही म्हणून ती शांतच बसली.

राजने बिंदीया ला हाका मारली. दीदी,इतक्या वर्षात तू बंकर मधून बाहेर नाही पडलीस, पण आता माझी ईच्छा आहे की तू नैना बरोबर राहावेस. आपण काश्मीर ला चाललो आहोत. तर तुझेही सामान तू बांधायला घे. पुढच्या एका तासात आपल्याला हा बंकर सोडायचा आहे.
बिंदीया ने मान डोलावली आणि कामाला लागली.
सुखी सुद्धा आवराला निघून गेला.
नैना राज च्या उशाशी बसून राहिली.
तसे राज ने तिचा हात त्याच्या हातात घेतला आणि म्हणाला, " तुला हे सगळं खूप विचित्र वाटत असेल ना नैना!"

" नाही राज! तुम्ही जे करता ते योग्यच करता ही माझी खात्री आहे. "

"अगं, मगाशी तर तू मला अरे-तुरे करत होतीस.. आता परत तू अहो-जाहो करायला लागलीस"

तशी ती खुदकन हसली आणि म्हणाली," तुम्ही बेशुद्ध होता ना तेव्हा म्हणाले होते,आता तुम्ही शुद्धीत असताना कसे म्हणणार?"

"नैना, मला फक्त राज च म्हण!तुझ्या तोंडून माझा हा एकेरी उल्लेख मला खूप छान वाटला."

त्याच्या शब्दाने ती मोहरली, लाजून उठुन जाऊ लागली, तसे त्याने तिचा हात पकडला.

"नैना, मगाशी तू माझ्या चेहऱ्याला जे काही केले, ते मला बेहद्द आवडले बर का!"

तसे नैनाने चटकन आपला हात सोडवून घेतला आणि प्रचंड लाजत आतमध्ये निघून गेली.

राज हसला. त्याने सुखी ला आवाज दिला ..
"सुखी, सगळ्यांसाठी राजस्थानी कपडे अरेंज कर.."
"तयारी आधीच करून ठेवली आहे साहेब.."
तसे राज म्हणाला, "सुखी...आपली जीप काढ...आज प्रवास वाळवंटाच्या बाजूने करायचा आहे..."
सुखी हो म्हणून निघून गेला.

बरोबर तासाभराने त्या बंकरमध्ये कोणीच नव्हते. रात्रीच्या अंधारात वाळवंटात एक थर-जीप जात होती. त्यात सुखी व राज पुढे तर नैना आणि बिंदीया मागे बसले होते.
जर बाहेर च्या कुठल्याही माणसाने गाडीतल्या लोकांकडे पाहिले असते तर असे वाटले असते, एक राजस्थानी फॅमिली कुठे ट्रिपला चालली आहे. सगळ्यांचे कपडे हे राजने मुद्दामूनच स्थानिक राजस्थानी लोकांप्रमाणे ठेवले होते जेणे करून कोणालाही संशय येणार नाही.

वाळवंटाच्या वाळू मधून जीप जाऊ शकते याचे नैनाला अतोनात आश्चर्य वाटले.
"दीदी, वाळवंटातून जीप कशी चालली आहे..?"

तसे बिंदीया तिला म्हणाली,"राज साहेबांनी ही जीप खास बनवून घेतली आहे नैना, जी वाळवंटामध्ये पण जाऊ शकते. सुखी आणि साहेबांची ही कल्पना खूप आधीची...ही जीप बनवायला 6 महिने लागले"

तिने सुखी कडे कौतुकाने पाहिले.
सुखी हा तिला कमालीचा माणूस वाटत होता.तो कुठलीही गाडी अत्यंत शिताफी ने चालवायचा. बऱ्याच वेळेला पोटातले पाणी सुद्धा हालायचे नाही.

सुखी ने वाळवंतांचा रस्ता का पकडला होता हे नैनाला थोड्या वेळातच लक्षात आले. मागे दुरवर कुठल्या तरी गावाचे लाईटस दिसत होते..

नैनाने राज ला विचारले,"ते कुठले गाव आहे?"
राज हसत म्हणाला, "जैसलमेर ला मागे सोडले आहे आपण. आता प्रत्येक गाव आपल्याला लांबूनच दिसेल कारण कुठल्याच गावातून आपण जाणार नाही."

"आणि पुढे आपण कसे जाणार आहोत..?" तिने कुतूहलाने प्रश्न विचारला.

"आपण उद्या सकाळी हरियाणा, दुपारी पंजाब आणि रात्री काश्मीर मधे असू. तू जागी राहिलीस तर रस्ता कळेल.."

नैना फक्त ऐकत होती. शेवटी न राहवून ती म्हणाली, "राज एक विचारू का?"

राज म्हणाला, "विचार ना"

"हे सुखी भैया एवढी नॉन स्टॉप गाडी चालवतात, ते दमत थकत नाही का?"

तिच्या प्रश्नावरती ते तिघे ही जण मोठ्याने हसायला लागले.

"काय झालं आहे? तुम्ही सगळे का हसत आहात?" तिने चकित होत विचारले.

"तसे बिंदीया म्हणाली, "सुखीचा सगळे असेच आहे. झोपेल तर कुंभकर्णा सारखा. खाईल तर बकासुरा सारखा, आणि काम करेल तर एका प्रचंड कष्टाळू माणसा सारखा!"

नैना कमालीच्या आदराने सुखी कडे पाहत होती. सुखी भैय्या काय, बिंदीया दिदी काय..राज ने जमवलेली माणसे खरोखरच रत्ने होती हे नैनाला कळले होते.राज हा सर्वात मोठा रत्नपारखी होता आणि त्या रत्नाच्या कोंदणामधे त्याने नैनाला एक अनोखे स्थान दिले होते.

क्रमशः

©® अमित मेढेकर

🎭 Series Post

View all