अमर्याद:- भाग 28

Naina Got Stunned After Knowing There Are Many Things In That Bunker

अमर्याद:- भाग 28


त्या रात्री रूम मध्ये ते दोघेही झोपले. दोघांचे बेड वेगवेगळे होते पण दोघांची नजर एकमेकांना चाचपडत होती. रात्री रूम चा दिवा चालू ठेवून ते दोघेही एकमेकांकडे पाहत होते.झोप येत असूनही न झोपायचा प्रयत्न त्यांचा चालू होता. मध्येच नैना उठून बसली आणि त्याला म्हणाली, "राज, तुम्हाला गाणी म्हणता येतात का..?"
"गाणी..?"
"हो म्हणजे आपण अंताक्षरी खेळलो असतो..."
"आत्ता...?" राज अक्षरशः किंचाळत म्हणाला.
"हो त्याला काय झाले..? अंताक्षरी रात्री च खेळतात.
"तुला वेड लागले आहे नैना..." तो हात डोक्यावर लावत म्हणाला.
"राज प्लिज..."
"नाही.." तो ठामपणे म्हणाला.
तशी ती हिरमुसली. तिने तिकडे तोंड केले आणि त्याला पाठ दाखवून झोपायला लागली.
तिचे तसे वागणे पाहून त्याला हसायला आले. अगदी अल्लड होती ती.
"नैना.." त्याने हाक मारली.
अपेक्षेप्रमाणे त्याला उत्तर मिळाले नाही.
त्याने परत आवाज दिला...
त्याला उत्तर न देण्याचा तिचा निर्धार ठाम होता.
शेवटी तो उठला आणि तिच्या जवळ गेला..तिचा हात त्याने हातात घेऊन तिला त्याच्याकडे वळवायचा प्रयत्न केला पण तिने तिचा हात जोरात ओढला...

त्याने खांद्याला धरून तिला वळवायचा प्रयत्न केला पण तिने जोरात धक्का दिला त्याला..

शेवटी तो शांतपणे त्याच्या बेड वर जाऊन बसला...
राज हा खूप परिपक्व होता. त्याला नैना एवढे लहान होता येत नव्हते. गाणी त्याने ऐकली होती पण गेल्या चार वर्षात पिक्चर, गाणी यापासून तो बराच लांब होता. काही जोक्स त्याला येत होते पण गाणी कशी म्हणायची असा प्रश्न त्याला पडला.

नैना खूपच साधी होती. 18 वर्षाच्या त्या मुलीला अजून जग कळायचे होते. पण राज ला तिला कुठल्याही परिस्थितीत दुखवायचे नव्हते म्हणून तिला तो कशालाही नाही म्हणू शकायचा नाही. तिचे हट्ट तो सर्वार्थाने पुरवायचा. नैना तिकडे तोंड करून फुरंगटून बसली होती. त्याला आता कळेना की नक्की काय करावे?

नैना ला सुध्दा त्यावेळेस त्याचा खूप राग आला होता. तिचे मनातल्या मनात विचार सुरू होते. तो माझ्यासाठी एक गाणे म्हणू शकत नाही..एवढा कसा शिष्ठ तो...आता मी सुद्धा बोलणार नाही ...कळेलच त्याला ही नैना कशी वागू शकते त्याच्याशी... आणि त्याच क्षणाला एक भसाडा आवाज ऐकू आला..

"ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा...."

नैना ताडकन उठून बसली आणि तिने त्याच्याकडे पाहिले.

तो आपला घसा खाकरून ठीक करत होता..बिचाऱ्याच्या चेहऱ्यावर इतके केविलवाणे भाव होते की ते पाहून कुणालाही वाटले असते त्याला कोणीतरी शिक्षा दिली आहे...

त्याने पुढे म्हणायला सुरुवात केली,
"कहा दो दिलों ने के मिलकर कभी हम न होंगे जुदा...
ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा "

त्याचे म्हणून झाल्यावर तिने टाळ्या वाजवून त्याला समर्थन दिले. तिच्या डोळ्यात एक अभूतपूर्व चमक होती.
तिने "व" या अक्षरा वरून जोरात गाणे म्हणायला सुरुवात केली..

"वादा रहा सनम...होंगे जुदा न हम..चाहे न चाहे जमाना.."

आणि नंतर त्यांची जी अंताक्षरी रंगली ती डायरेक्ट पहाटेचे चार वाजेपर्यंत. तोपर्यंत राज ला हा नवीन शोध लागला होता की तो सुद्धा अनेक वेगवेगळी गाणी म्हणू शकतो आणि त्याला अनेक गाणी आठवू पण शकतात.

नैना च्या साथीने त्याने आज अतीव समाधान मिळवले होते. त्याला हे कळले की गाणी म्हणून आणि ताल सूर लय यांची साथ ठेऊन आपण अनेक काळज्या चिंता यांना दूर सारू शकतो. त्याला गाणी म्हणून खूप हलके वाटत होते. गाणी अत्यंत भसाड्या आवाजात म्हणून सुद्धा त्याला काहीतरी अचीव्ह केल्याचे समाधान होते.

"कभी अलविदा ना कहना" हे गाणे म्हणून दोघेही झोपले तेव्हा घड्याळाचा काटा बरोबर 4 वाजून 15 मिनिटे ही वेळ दाखवत होता.
राज झोपताना एका असीम समाधानात झोपला त्याच्या चेहऱ्यावर एक हसू होते.

जेव्हा त्याला जाग आली तर समोरच्या बेड वर नैना अजूनही झोपली होती. तिच्या मोहक चेहऱ्याकडे तो तसाच बघत राहिला. नंतर हळूच उठून तिच्यापाशी गेला आणि गालावर आलेली बट त्याने हाताने अलगद हाताने करून हळूच तिच्या गालावर त्याचे ओठ टेकवले. तिच्या कानापशी जाऊन तो अगदी हळू आवाजात पुटपुटला, "नैना......झोपेत तू किती सुंदर दिसतेस ग..."

कानापाशी झालेल्या गुदगुल्या मुळे नैना ताडकन उठून बसली ज्यामुळे तिचा चेहरा त्याच्या नाकाला आपटला. तो जोरात "ओययोयोयो" असे ओरडला तसे नैना सुद्धा एकदम ओरडायला लागली.."चोर चोर..."

राज नाक चोळत म्हणाला, "चोर...कुठे आहे चोर...?"
"अहो तुम्ही नाही का ओरडला एकदम..? मला वाटले चोर आहे म्हणून... " तिच्या सरळ आवाजात ती म्हणाली.

"ते मी तुझ्या कानापाशी आलो होतो आणि तू धाडकन उठलीस.. त्यामुळे माझ्या नाकाला लागले म्हणून मी ओरडलो... "

"हो हो..मला नाकाला गुदगुल्या झाल्या..असे वाटले की मुंग्या फिरत आहेत.. म्हणून मी उठले.."

"मुंग्या नव्हत्या त्या..मी होतो तो..." अजूनही नाक चोळत तो म्हणाला.

"पण तुम्ही माझ्या कानापाशी काय करत होता..?"

"ते मी ...ते ...हां ते तुला सांगत होतो की, सूर्य उगवला आहे केव्हाच...तर तू पण उठ..." तो चाचपडत म्हणाला.

"अय्या....मला तर कळलंच नाही ते कधी सूर्य उगवला ते......" ती हसत म्हणाली.

तिला काही कळले नाही म्हणून तो खूष झाला. त्याने घड्याळात बघितले तर सकाळचे साडे अकरा वाजले होते.

दोघेही रूम च्या बाहेर आले तर सुखी मस्तपैकी घोरत होता.
त्याला तसे घोरताना पाहून नैना ला हसायला यायला लागले...

त्याच्याकडे पाहत राज म्हणाला, "हा काही संध्याकाळ शिवाय उठणार नाही..रात्री जेवेल आणि मग परत झोपेल...की पुढचे 3 ते 4 दिवस त्याला न झोपता गाडी चालवायला सांग..पठ्या तयार!"
त्याला कोपऱ्यापासून नमस्कार करत ती तिचे आवरायला गेली.

राज ला राजस्थान मध्ये येऊन बऱ्याच महत्वाच्या गोष्टी करायच्या होत्या. तिथे असलेल्या एका खोलीत तो शिरला. त्याने फोन फिरवायला सुरुवात केली.
आज संध्याकाळी 6 वाजता त्याने काही लोकांना भेटायला जैसलमेर मधील "ओऍसिस" रेस्टॉरंटमध्ये बोलावले. त्याच्या लॅपटॉपवर त्याने मॅप उघडला आणि काही लोकेशन्स चेक करायला सुरुवात केली. बाडमेर, बालोतरा, जोधपूर, रामदेवरा आणि जैसलमेर हा भाग त्याने स्क्रिन वर सर्कल काढून नोट केला. त्याने त्याच्या साम, लोंजेवाला आणि मोहनगड वाल्या स्पेशल कॉन्टॅक्टस बरोबर कॉन्फरन्स कॉल केला आणि त्यांना काही सूचना देऊन संध्याकाळी जैसलमेर ला बोलावले.

एवढे करून त्याने काही ऑफिशियल कॉल्स करायला सुरुवात केली. सगळे झाल्यावर तो निर्धास्त झाला.
जवळजवळ 1 वाजायला आला होता. त्याला भुकेची जाणीव झाली.
नैना चा विचार आला तसे त्याने बघितले तर तिचे अजून आवरणेच सुरू होते.
तो किचन मध्ये गेला आणि तिथे तळून तयार असलेले बिकानेरी पापड खायला सुरुवात केली.
तो तिथे बसून निवांत खात असताना त्याला मागे चाहुल लागली तसे त्याने पाहिले तर नुकतीच न्हाऊन आलेली नैना त्याच्याकडे येत होती. तिचे ओले केस तिने एका खांद्यावरुन सोडले होते. तिचा मूळचा गोरा चेहरा अजूनच टवटवीत वाटत होता.

तो तिच्याकडे बघत आहे हे पाहून ती लाजली आणि तिने नजर दुसरीकडे करत विचारले, " आपण आपले सगळे सामान आणले बरे झाले ना! नाहीतर इथे या बंकर मध्ये आपल्याला आहे त्या कपड्यांमध्ये राहावे लागले असते.."

यावर तो हसला आणि म्हणाला,"ये माझ्या सोबत.."
तिला घेऊन तो एक रूम पार करून दुसऱ्या रूम मध्ये गेला. त्या रूम मध्ये भिंतीला काही कपाटे लावली होती. त्यातील एका कपाटाच्या बाजुला असलेले डोअर तिने स्लाईड केले आणि ते पाहून नैना थक्क झाली.

आतमध्ये असंख्य ड्रेस आणि साड्या होत्या. त्याच्या खालच्या बाजूला शूज आणि पर्सेस होत्या. ती त्या गोष्टींकडे पाहत असताना तो तिला म्हणाला, "यातले जे तुला हवे ते तू कधीही घाल...या समोरच्या भिंतीवर माझ्यासाठी कपडे आहे..आणि यातल्या बाजूच्या भिंतीवर असलेल्या वार्डरोब मध्ये 1000 पुस्तके आहेत..तुला हवी ती पुस्तके तू वाच.."

नैना ने फक्त मान डोलावली. तेवढ्यात राजचा फोन वाजला तसे तिला तिथेच सोडून तो बाहेर आला...महत्वाचा फोन होता त्यामुळे त्याचे फोनवर काही बोलणे बराच वेळ सुरू होते..एवढ्या वेळात नैना त्यातील एक ड्रेस चेंज करून आली होती. त्याला मागून हाताने पाठीवर खुणावत तिने त्याला बोलावले.. त्याने वळून पाहिले आणि तो थक्क झाला. मगाची न्हाऊन आलेली नैना पूर्णपणे बदलली होती. आत्ता या क्षणाला ती 100 टक्के राजस्थानी मुलगी दिसत होती.

क्रमशः

©®अमित मेढेकर


🎭 Series Post

View all