अमर्याद:- भाग 27

Raj Explains Naina, All Things Related To Bunker

अमर्याद:- भाग 27


"राज आपण नक्की कुठे आहोत आणि हे काय आहे सगळे?" रूम मध्ये येताच नैना ने अपेक्षेप्रमाणे विचारले.
राज तिच्यासमोर स्वस्थ बसला आणि म्हणाला, "नैना, तुला मी सांगितले होते ना की आपण बंकर मध्ये राहणार आहोत, तसा हा बंकरच आहे. जमिनीपासून 30 फूट खाली. हा बंकर मी खास बनवून घेतला आहे.
तुला आठवत असेल की मी हे सुद्धा सांगितले होते की, माझे 2 -2 विश्वासू लोक देशाच्या चारही बाजूला आहेत.
सुखी आणि समशेर त्यातलेच. त्यांनी खास त्यांच्या नजरेखाली हा बंकर बनवून घेतला आहे. भंवर हा त्यांचा माणूस. तो इथली देखरेख करतो.

हा बंकर प्रचंड सुरक्षित आहे. इथल्या खोल्या या सुद्धा साऊंडप्रूफ आहेत. इथे कोणी येण्याआधी त्याला अनेक दिव्यातून पार व्हावे लागेल.
न दिसणारे सिक्युरिटी कॅमेरा इथे आहेत. सगळे कॅमेरे येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे नजर ठेवून असतात. कोण काय करतो हे सगळे टिपले जाते. इथे येण्यासाठी फक्त एकच रोड आहे पण इथून इमर्जन्सी साठी बाहेर पडण्यासाठी 4 रस्ते आहेत.
इथून एक भुयार 15 किमी चे आहे जे डायरेक्ट जैसलमेर शहराच्या जवळ जाते.

इथे सगळे अन्न आत बनवले जाते. अन्न बनवायला खास आचारी ठेवले आहेत. स्वयंपाकाचा यातून निघणारा धूर हा एका पाईप मधून सहजपणे वाळवंटात सोडला जातो.
कोणीही माणूस कुणालाही न कळता आपल्या कामासाठी हवे तेवढे दिवस राहू शकतो.

या रूम मध्ये मोठे वॉशरूम आहे. बाजूला किचन आहे. या किचन मध्ये फ्रीज पासून ते मायक्रोवेव्ह पर्यंत सगळे आहे.

हा बंकर बनवायला मला अडीच वर्षे लागली. त्यावेळेस मी फक्त सूचना द्यायला आलो होतो, बाकी सगळे काम ह्या दोघांनी केले. हां ही गोष्ट वेगळी की हा बंकर बनल्यावर मी इथे आत्तापर्यंत 12 वेळा येऊन गेलो आहे.

तुला अजून गंमत दाखवतो...असे म्हणून त्याने बाजूचे एक बटण दाबले. तशी त्या खोलीच्या प्रवेशाची एक भिंत सरसर वर गेली आणि तरीही तिथे अनेक भिंत होती. आता त्यांना बाहेर बसलेले भंवर, सुखी आणि समशेर दिसत होते. त्यांचे लक्ष दुसरीकडे होते.

"नैना, आपण त्यांना पाहू शकत आहोत पण ते आपल्याला नाही पाहू शकणार ना की आपला आवाज ऐकू शकणार"

"काय...?" नैना किंचाळत म्हणाली.

"तुला विश्वास नसेल तर तू हाका मारून बघ काय होतो आहे ते..?"

नैना ने पडत्या फळाची आज्ञा मानून हाका मारायला सुरुवात केली, " सुखी भैया, ओ सुखी भैय्या..."

सुखी निवांत आळोखे पिळोखे देत बाहेर बसला होता. नैना च्या कुठल्याही हाकेने तो इकडचा तिकडे झाला नाही...

नैना ने राज कडे पाहिले तसा राज हलकेच हसला.
"असे कसे शक्य आहे...?" ती चकित होत म्हणाली.

"का शक्य नाही..? ही खास सोय मी बंकर बांधताना करून घेतली होती. इथे काहीही करणे शक्य आहे..आणि या रुम मध्ये सुद्धा काहीही करणे शक्य आहे..इथे तू मला मारले तरी कोणाला दिसणार नाही आणि तू मला येऊन घट्ट हग केले तरी कळणार नाही..."

त्याच्या या बोलण्यावर ती धावत राजच्या गळ्यात येऊन पडली..

"अगं-अगं हे काय.."

"का काय झाले...?आपल्याला कुणी पहात नाही आहे.." नैना हसत म्हणाली.

तसे राज थोड्या गंभीर आवाजात म्हणाला, "नैना मी सांगितले आणि तुला खरंच वाटले का..? अशी भिंत कुठे असते का...आणि इथले कॅमेरे..ते तर सगळे टिपत आहेत ना..."

असे म्हणल्यावर नैना लगेच बाजूला झाली.."राज, तुम्ही मजा केली माझी..अशी मजा करते का कुणी..आता ते लोक माझ्याबद्दल काय विचार करतील ...? आता माझे कसे होणार...?" नैना घाबरत म्हणाली.

तसे राज जोरजोरात हसायला लागला..त्याचे हसणे पाहून नैना चिडली..तसे राज ने तिला स्वतःकडे ओढले आणि म्हणाला, "किती भोळी भाबडी ग तू....तुझा लगेच सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतो..मी मजा केली तरी आणि नाही केली तरी..."

"म्हणजे..?" नैना साधेपणाने म्हणाली.

"म्हणजे हे की मी मजा केली..तू मला येऊन हग केलेले कोणालाही कळलेले नाही..ह्या रूम मधले कोणालाही दिसत नाही..इथे कुठलेही कॅमेरे नाहीत..." तो हसत मिश्कीलपणे म्हणाला.

तसे नैना सात्विक संतापाने त्याला मारायला लागली..."माझी मजा करता..मला त्रास देता..." असे म्हणून ती त्याला थोडे थोडे मारायला लागली.."

तिच्या सात्विक संतापाने तो अजून हसायला लागला.. त्याच्या हसण्याने ती अजून त्याला मारायला लागली आणि ते सावरता सावरता त्याचा तोल जाऊन तो बाजूला असणाऱ्या दिवाणाच्या गादीवर पडला आणि त्याच्या अंगावर ती पडली...
क्षणभर ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे पाहत राहिले. दोघांचे श्वास आता एकमेकांना जाणवत होते आणि अलगदपणे राज चे ओठ तिच्या ओठांवर टेकले. दोघेही एकमेकांच्या असे किती जवळ होते ते दोघांनाही नाही कळले..

थोड्या वेळाने बाहेरून दरवाज्यापाशी सुखीचा आवाज आला तशी ती एकदम बाजूला झाली आणि तिने आपले तोंड दोन्ही हातांनी झाकून घेतले.

"नैना.." त्याने हळुवार हाक मारली..
नैना तिच्या तोंडावर हात ठेवून तशीच होती...

"नैना..."राज ने परत आवाज दिला तसे नैना ने त्याला घट्ट पकडले आणि म्हणाली, "राज..मला सोडणार नाही ना कधी...? कायम माझ्याबरोबर राहा..."

"कायम राहीन..." तो अलगद तिचा चेहरा पकडत म्हणाला..

तसे त्याचे हात पकडत ती त्या हातांना तिच्या चेहऱ्याजवळ ठेऊन त्यावर आपले गाल घासायला लागली.

बाहेरून सुखी परत दरवाजा वाजवायला लागला तसे तो तिला थांब असे दर्शवत उठला..

त्याने दरवाजा उघडला तसे सुखी त्याला म्हणाला, " साहेब मी आता झोपायला जात आहे, पण रात्री हा भंवर बिकानेर ला जाईल.. खबर आहे की , काकांनी काही सामान अफगाणिस्तान वरून मागवले आहे..ते आज बिकानेर ला येणार आहे तिथून ते पुढे जयपूर आणि नंतर दिल्ली ला जाणार आहे.. भंवर साठी काय आज्ञा आहे? "

"समशेर आणि भंवर दोघांना बोलाव.."

तसे त्याने दोघांना हाक मारली.
ते दोघे आल्यावर राज त्यांना म्हणाला, " भंवर आणि समशेर तुम्ही बिकानेर ला जा..सुखी इथे आहे माझ्याबरोबर... बिकानेर ला गेल्यावर तिथे बद्री आहे त्याला भेटा..त्याची 8 माणसे घेऊन त्या मालाला पकडवून द्या आणि हे लक्षात असुदे की कुठल्याही परिस्थितीत मला माणसे मेलेली नकोत.."

दोघेही त्याला नमस्कार करून निघून गेले. सुखीने तोपर्यंत जेवण आणले होते. त्यातले एक ताट त्याने राज आणि नैना साठी दिले. त्या ताटावर अजून एक ताट झाकून ठेवले होते. अजून एक ताट त्याने स्वतःसाठी ठेवले. ते जेवण जेऊन सुखी आता उद्या दुपारपर्यंत उठणार नव्हता हे नक्की..

राज ने दरवाजा बंद केला तसे नैना लाजली.. तिला स्वतःला काही वेगळे फिलिंग येत होते.
राज तिच्यापाशी गेला तसे तिने स्वतःला थोडे आखडून घेतले...तो तिच्या शेजारी बसला आणि तिच्या कानापाशी हळूच म्हणाला, "नैना..." त्याच्या आवजातील वेगळे पण पाहून ती मनोमन शहारली..

त्याने परत आवाज दिला, "नैना..."

"काय.." हळूच ती म्हणाली

"सुखी ने खायला दिले आहे आहे आपल्यासाठी.. आपण खाऊन घ्यायचे का..?"

त्याच्या बोलण्यावर तिला हसावे का रडावे हे कळेना.. ती फक्त स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहायला लागली..

राज ने तिच्याकडे पाहत परत हातांची ऍक्शन करून दाखवली आणि विचारले की "जेवायचे का..?"

तिने काहीच न बोलता मान डोलावली. तिला काय बोलावे आणि काय वागावे हे कळेना...

राज ने ताट उघडले त्यात त्याचे आवडता मेनू होता.
झाकून ठेवलेले एक ताट त्याने घेतले आणि त्यात त्याने अन्न काढायला सुरुवात केली.

फुलके, पचकुटा ची सब्जी, राबुडी ची भाजी, गट्टा ची भाजी, कढी, पापड, दाल बाटी चुरमा आणि पंचररत्न पुलाव असा मेनू होता.

ते जेवण पाहून नैनाला पण जाणवले की तिला भूक लागली आहे. दोघेही जेवायला लागले.
पहिला घास खाल्यावर नैना म्हणाली, "लाजवाब...!"
राज हसला आणि म्हणाला, "मला मारवाडी जेवण खूप आवडते नैना.. "

"मी शिकेन ना तुमच्यासाठी बनवायला..." ती हळूच म्हणाली तसे तो मनापासून खुष झाला. एक घास त्याने दाल बाटी चुरमा चा स्वतःच्या हातून तिला भरवला आणि तिने सुद्धा तो आवडीने खाल्ला.

आता तिने एक हात त्याला भरवला. नंतर त्याने परत भरवला. मग तिने परत भरवला. असे त्यांचे सुरू झाले आणि मग त्या दोघांनी एकाच ताटातून खायला सुरुवात केली. आजचे जेवण त्यांचे एकमेकांना भरवण्यात चालले होते त्यामुळे त्यांचे पोट हे भरतच नव्हते.

शेवटी अन्न संपले आणि तसे ते दोघे एकमेकांना भरवायचे थांबले. जमिनीखाली 30 फूट त्या बंकर मध्ये बसून आज त्या दोघांनी जेवण जे केले होते त्याची काहीच तोड नव्हती.

राज 25 वर्षाचा होता तर ती 18 वर्षाची. दोघांच्या मध्ये 7 वर्षाचे अंतर होते. पण राज ला खात्री होती की त्याच्या सोबत राहून ते अंतर कमी होणार होते कारण नैना मुळातच समजूतदार होती. त्यांच्या एकमेकांवरील असलेल्या विश्वासाच्या भावना अफाट होत्या आणि अजूनही व्यक्त न केलेले प्रेम अमर्याद होते!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all