अमर्याद :- भाग 26

Raj And Naina Enters Into The City Of Jaisalmer
अमर्याद:- भाग 26

जैसलमेर! वाळवंटात वसलेली सुवर्ण नगरी. छोटेसे शहर पण अनेक गोष्टीने युक्त.. एका बाजूला सोनार किल्ला आणि दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेले वाळवंट. जवळच असलेली पाकिस्तान बॉर्डर आणि अनेक प्रकारचे लोक.... हा प्रदेश इतका सुंदर की कोणीही याच्या प्रेमात पडावे..कधी कधी दिवसभर तापून वातावरण 50 डिग्री होईल तर रात्रीच्या वेळेस थंडीने कुडकुडायला लागेल. इथे खास बांधलेले तंबू आणि मुबलक प्रमाणात दिसत असलेले उंट याची रेलचेल सगळीकडे पाहायला मिळते.

त्यांची जीप निघाली तसे मिनिटांच्या आत कसलाही विचार न करता सुखी ने जवळ असलेल्या घासीराम च्या कचोडी सेंटर वर गाडी थांबवली. त्याने गाडी थांबवली तसे राज खदखदून हसायला लागला. त्याच्या हसण्याने समशेर पण हसायला लागला. तसे सुखी पण त्या हसण्यात सामील झाला..
नैना ला काहीच कळत नव्हते..त्या लोकांचे हसणे काही थांबत नव्हते तसे ती फक्त त्याच्या हसण्याकडे थक्क होऊन पाहत होती.

शेवटी हसणे आवरून राज तिला म्हणाला, " नैना, हा सुखी पक्का खादाड आहे..याला सारखे खायला लागते..आपण काल त्याला ढाब्यावर भेटलो तेव्हा सुद्धा हा भरपेट खाऊन बाहेर येत होता. आता याला इतका वेळ खायला मिळाले नाही म्हणून बघ कसा आता कचोरी सेंटरकडे आलाय..तू फक्त गंमत पहा आता..."

"राज, हा आपल्यासाठी कुठेही न थांबता नॉन स्टॉप गाडी चालवत आला आहे..याला भूक लागणार च! त्यातून तो एवढा उंच, धिप्पाड..कमीत कमी साडे सहा फूट असेलच..असे दुसऱ्याच्या भुकेला हसू नये..उगाच का हसता तुम्ही त्याला..?"

"उगाच का हसतो ना...कळेल तुला आता..!" राज तिला चिडवत म्हणाला.

तोपर्यंत घासीराम च्या ठेल्या पाशी सुखी पोचला होता. घासीराम च्या दुकानाबाहेर 2 मोठे काऊंटर लावले होते. एका काउंटरवर एक मोठी कढई होती त्यात एक माणूस गरमागरम कचोरी तळत होता तर दुसऱ्या काऊंटर वर अजून एक माणूस जिलबी तळत होता. त्याचा वास इतका खमंग होता की कोणाच्याही पोटातले कावळे ओरडायला लागले असते. कचोरीचा घमघमाट तर पूर्ण जैसलमेर मध्ये घमघमत होता.

सुखीने तिथे ठेवलेली कचोरी ची अख्खी टोपली उचलली आणि तो एका पाठोपाठ एक कचोरी डायरेक्ट तोंडात टाकायला लागला. त्याचा खाण्याचा स्पीड इतका जबरदस्त होता की तो एक महिन्याच्या उपाशी आहे असे पाहणाऱ्याला वाटले असते.
जवळपास 25 कचोऱ्यांची टोपली त्याने म्हणता म्हणता संपवली..त्याचे ते राक्षसी खाणे पाहून नैना हबकली तर राज आणि फक्त समशेर हसत होते..
पुढच्या कचोऱ्या तळेस्तोवर त्याने आपला मोर्चा गरमागरम जिलब्या कडे वळवला होता. ईथल्या जिलब्या म्हणजे पूर्ण साजूक तुपात तळलेल्या, पिवळ्या धमक, गोड आणि कुरकुरीत कडक जिलब्या..! आकाराने छोट्या पण चवीने मोठ्या..सुखी ने तयार असलेल्या जिलब्या बकाबका खायला सुरुवात केली..जिलब्या कश्या संपल्या हे कोणालाही कळले नव्हते आणि ते पाहून नैना ने कपाळाला हात लावला..

"आता बोल.." राज ने तिला विचारले, तसे तिने कोपरापासून सुखी ला नमस्कार केला. तिच्या हसण्याच्या स्टाईल मुळे आता सगळेच हसायला लागले.

सुखीचे पूर्ण पोट भरल्यानंतरच राज ने त्याच्यासाठी आणि नैना साठी 2-2 कचोऱ्या आणि पाव किलो जिलेबी बांधून घेतली.

तिकडे असलेल्या वॉशरूम वर जाऊन फ्रेश झाल्यावर सगळे परत जीप मध्ये येऊन बसले. सुखी ने गाडी चालवायला घेतली तसे राज ने बोलायला सुरुवात केली.

"नैना, आमच्या अनेक घरांपैकी एक घर इथे जैसलमेरला आहे..इथल्या घराबद्दल कोणालाच माहिती नाही कारण मी जेव्हाही इथे आलो आहे ते रूप बदलून आणि अनेक वेगवेगळ्या मार्गांनी आलो आहे. ह्या घराचे एक वैशिष्ट्य आहे ते तुला दिसेलच..महत्वाचे म्हणजे, आपल्याला हे घर लगेच सोडायचे नाही आहे. इथून आपल्याला बरेंच काही डावपेच आखायचे आहेत.कदाचित आपण इथे 2 महिने असू किंवा 6 महिने..पण निर्धास्त राहा कारण हा समशेर सगळ्यांना पुरुन उरेल"
नैना ने सगळे समजले अशी मान डोलावली. जीप जशी पुढे पुढे जात होती तशी ती खिडकीतून बाहेर बघत होती.

जैसलमेर तिला खूप शांत शहर वाटले. रस्ते बरेंच सुनसान होते. कसलीही घाई, गर्दी, गोंधळ इथे दिसत नव्हते. बऱ्याच लोकांनी इथे डोक्यावर मुंडासे बांधलेले दिसत होते. अनेक जण आपल्याच नादात आणि कामात जाताना दिसत होते. यांची जीप शहरातून बाहेर पडली आणि सुरू झाला सुनसान रस्त्याचा प्रवास. लांबच्या लांब पसरलेला रोड आणि दोन्ही बाजूला वाळवंट..रस्त्यावर दूरवर कोणी नाही..नैना ने वाळवंटाबद्दल बऱ्याच पुस्तकांमधून वाचले होते पण प्रत्यक्षात ती आजच पाहात होती.

राज जैसलमेर ला पोचून खूपच रिलॅक्स वाटत होता. जीप च्या सीट वर मान टेकवून तो डोळे बंद करून निवांत पणे हलकेच गाणे गुणगुणत होता. सुखी चे पोट भरल्याने तो खुष होता. त्याला आता जिथे थांबणार तिथे भरपूर झोप घ्यायची होती. समशेर चा काही प्रश्नच नव्हता तो ईथलाच होता.

नैना क्षणभर विचारात पडली.. कोण कुठले लोक हे..यांची काही ओळख पण नाही..काही दिवसांपर्यंत राज ची पण ओळख नव्हती. पण राज भेटतो काय आणि आपले आयुष्य एकदम बदलते काय..सिन्नर ते कसारा घाट. तिथून इंदोर नंतर भोपाळ आणि आता एकदम राजस्थान.. जैसलमेर च्या भूमीवर आपण पाय ठेवले आहेत..तिचे तिलाच नवल वाटले आणि हसायला पण आले.

आणि काही क्षणांत जीप ने रस्ता सोडला आणि एका हमरस्त्यावरून ती आत जायला लागली. नैना पाहत असतानाच जीप एका भल्या मोठ्या पडक्या घरापाशी आली. घर बाहेरून भग्नावस्थेत होते. त्या घराला पाहून असे वाटले असते की अनेक वर्षे घर बंद आहे.

सुखी ने गाडी थांबवली आणि सगळे जण उतरले. राज स्वतः त्या घराच्या तीन पायऱ्या चढत आतमध्ये गेला. नैना त्याच्या मागोमाग होतीच. आत एक मोकळी जागा होती. राज ने तिला पॅसेज मध्येच थांबायला सांगून तो एका कॉर्नर ला गेला. तिथल्या बाजूच्या कोनाड्यात जाऊन राज ने एक लिव्हर पूल केली आणि त्या मोकळ्या जागेतील जमीन सरसर करत बाजूला झाली...आतमध्ये एक गोलाकार जिना गेला होता आणि खाली काही लोक त्यांच्याकडे पाहत होती.
नैना डोळे विस्फारून त्या गोष्टीकडे पाहत होती.

राज फक्त हसला आणि तिच्या हाताला धरून त्या जिन्यावरून खाली गेला. खाली गेल्यावर नैना ला दिसले जेवढी जागा वर आहे तेवढीच जागा ही त्या जमिनीखाली आहे.
तिथे चार लोक काही काम करत होते..
राज सगळ्यांचा सलाम स्वीकारत आत शिरला. खाली एक भला मोठा हॉल होता. सूर्याचा प्रकाश वाटावा एवढा प्रकाश तिथे होता. प्रचंड गार हवा तिथे होती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या हॉल पासून पुढे एका तळघरातील मोठ्या घराला सुरुवात होत होती.

लहान गावातून आलेली नैना, ह्या सगळ्याची स्वप्नातही कल्पना करू शकली नसती. राज हा प्रचंड हुशार आणि सामर्थ्यवान तिला त्या क्षणाला भासला.

हॉल मध्ये ठेवलेल्या एका मोठ्या बैठकीवर राज बसला. नैना त्याच्या बाजूला बसली..समोर सुखी आणि समशेर बसले. तिथे घराची राखण करणारा भवरलाल, राज च्या बाजूला उभा होता.

शेवटी ना राहवून नैना ने विचारलेच, "राज, हे काय आहे सगळे..?"

"नैना, हा माझा गुप्त अड्डा...इथे प्रवेश फक्त माझ्या विश्वासू लोकांना.. काका काय करेल हे माहिती नसल्याने मी माझ्या विश्वासू लोकांसोबत काही जागा निश्चित केल्या. जैसलमेर ही त्यातलीच एक..!
भवर इथली सगळी काळजी घेतो. इथे काही लोक कामाला आहेत ते आपल्या कामा संदर्भात असलेल्या गोष्टी इथून निर्यात करतात. ही बॉर्डर ला लागून असलेली जागा आहे त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी लपूनछपून कराव्या लागतात. भवरलाल इथला स्थानिक माणूस आहे. पोलीस पासून गुंडा पर्यंत सगळे तो मॅनेज करतो. "

"राज हे सगळे काल्पनिक आहे असे मला वाटते...! खरतरं अनाकलनीय आणि अविश्वसनीय आहे असे वाटते..."

"तुझे म्हणणे खरं आहे नैना..पण मला पण अशी जागा निवडणे क्रमप्राप्त होते जिथे कमीत कमी लोक येऊ शकतात..हा धंदा, हे लोक आणि काकाच्या काळ्या कारवाया या पासून सरंक्षण हवे असेल तर या गोष्टींचा विचार हा करावाच लागतो. "

"पण राज, आपण जमिनीखाली अंदाजे 30 फूट आहोत, मग इथे हवा कुठून येते? हा प्रकाश आहे तो कसा येतो? इथे इलेक्ट्रिसिटी कशी येते..?"

तिच्या प्रश्नावर राज कौतुकाने हसला. तिला घेऊन तो हॉल च्या बाहेर असलेल्या विहिरीपाशी आला. त्या विहिरीकडे बोट दाखवत तो म्हणाला, "नैना इथल्या विहिरीला 12 ही महीने पाणी आहे..या पाण्याचा उपयोग करूनच आपण अनेक गोष्टी केल्या आहेत. या मागे अभियांत्रिकी कल्पकता आहे आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टी.."

नैना चे डोके आता गरगरायला लागले होते. तिने राज ला घट्ट पकडले. राज च्या लक्षात आले की जेवढी साधी नैना आहे त्या मानाने तिला अनेक नव्या गोष्टी कळत आहे..अजून गोष्टी जर तिला आत्ताच कळल्या तर हे धक्के ती पचवू नाही शकणार.

"चल नैना, तुला मी तुझी रुम दाखवतो.."
"राज..." नैना थोडी घाबरत म्हणाली.
"काय गं..?"
"राज प्लिज, मी तुमच्याच रूम मध्ये झोपेन..मो इथे एकटे नाही झोपू शकणार...मला खूप भीती वाटेल एकटीला इथे..."

राज ने तिच्याकडे क्षणभर पाहिले आणि त्याने भवर ला इशारा केला... तसे भवर ने जाऊन राजच्या रूम मध्ये अजून एक बेड तिथे लावला. राज सुद्धा तिला एकटीला सोडायला आता अजिबात तयार नव्हता!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all