अमर्याद:- भाग 22

Raj Tells Naina That They Have To Leave This Place

अमर्याद :- भाग 22


तिचा असे अचानक तोंडावर हात ठेवून त्याला गप्प करणे त्याला आतून खूप सुखावुन गेले.. तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत राहिला आणि तीही नकळत त्याच्या डोळ्यात बघत राहिली... हलकेच त्याने तिचा हात आपल्या हातात घेत तोंडावरून बाजूला घेतला.
"राज पून्हा असे बोलू नका! तुम्हाला काहीही होता कामा नये" आवेशाने ती म्हणाली.
तो फक्त हसला.
"नैना काका मुळे मला फार काळ कुठे थांबता येत नाही, त्याचे लोक सतत मला शोधत असतात"
"राज भोपाळ चे हे घर त्यांना माहिती आहे का?"
"नाही!"
"राज मला सांगा विदिशा चे रस्ते, सगळी ठिकाणे तुम्हाला कसे माहीती होते?"
"नैना तू विसरते आहेस का की मी तुला सांगितले की तिथेही माझे एक घर आहे पण फक्त ते अजून ताब्यात आले नाही आणि मी गेली 4 वर्षे सतत इथून तिथे फिरतो आहे त्यामुळे रस्ते काय आणि ठिकाण काय मला सगळंच माहीती आहे"

"राज इथली नोकर माणसे अचानक कुठे गेली?"
"मीच त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवले कारण इथे जास्ती वर्दळ दिसणे हे घातक होते आणि झालेही बघ तसेच"

" म्हणजे? राज ती लोक जी तुमच्या मागे जीप घेऊन येत होती ती?"
"ही तीच...आणि एक गोष्ट मी चुकलो जे मला आत्ता लक्षात आले.."
"काय..?"
"नैना, माझे बाईकवर बाहेर जाणे माझ्यासाठी खूप धोकादायक आहे. आजवर कार किंवा कॅब मुळे मी लपलो होतो त्यांना दिसलो नाही. पण आपण बाईकवर गेल्या मुळेलल त्यांना कळले आहे की मी इथे आहे"

त्याला मध्येच थांबवत ती म्हणाली " राज आजपासून तुम्ही बाईक चालवणार नाही" म्हणत तिने त्याच्याकडील बाईक ची किल्ली घ्यायला हात पुढे केला तसे त्याच्याही नकळतपणे त्याने पटकन किल्ली तिच्या हाती दिली.

"नैना आता आपल्याला लवकरच हे घर सोडून दुसरीकडे जावे लागेल. त्यांना कळले आहे की आपण इथे आहोत"
ती चकित नजरेने त्याच्याकडे बघत होती. तिच्या नजरेत राज बद्दल काळजी आणि थोडी भीती असे संमिश्र भाव होते.

"घाबरू नकोस नैना, आपण जिथंही जाऊ ती अपलीच जागा असेल. आता आपण इथून राजस्थान ला जाणार आहोत"
"राजस्थान?"तिने मोठे डोळे करत त्याच्याकडे बघितले.

"हो...राजस्थान.... तिथे जैसलमेर ला! वाळवंटात..."
" राज आपण कधीतरी महाराष्ट्रात पुन्हा येऊ ना?"

तो हसला आणि म्हणाला, "हो नक्की येऊ पण काही काळानंतर. जैसलमेर पासून जवळच एक गाव आहे..तिथे आपले घर आहे... जिथे आपण असू तिथे सगळं वाळूच साम्राज्य आहे...तिथल्या एका बंकर मध्ये आपण राहू"

हे सगळं तिच्या आकलन शक्तीपलिकडे होते ती फक्त त्याच्याकडे बघत होती.

"राज पण आपण तिथे का चाललो आहे? काय होईल तिथे गेल्याने ? आणि तुमचे ते काम? त्या रशियन भाषेतील लोक ज्यांच्याशी तुम्ही बोलत असता त्याचे काय?"

नैना त्यांच्यासाठीच आपण तिथे जातोय..मी त्यांना आता डायरेक्ट तिथेच बोलावले आहे...जोधपूर एअरपोर्ट ला ते परवा संध्याकाळी सहा वाजता पोचतील तिथून पुढे जैसलमेर... माझ्या बाबतींत त्यांना तिथे येणेच जास्त सोईस्कर पडेल.

आता तिचे डोकं थोडे गरगरायला लागले होते. तिचे ते वागणे बघुन राज तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून नजरेने "रिलॅक्स नैना...तुला हे सगळे नवीन आहे मला माहिती आहे...पण माझ्यासाठी हे नवीन नाही..." डोळ्यानेच शांत राहा असे तिला खुणावले. तिला पाणी प्यायला देत म्हणाल " मी आहे नैना सोबत,काळजी करू नकोस"

त्याचा तो स्पर्श तिला खूप आधार देत होता. तिच्या आयुष्यात अचानक प्रचंड वावटळ आली होती ज्याच्यात ती झाडाच्या पानासारखी इकडून तिकडे भरकटत होती आणि अचानक राज नावाचा आधार तिला मिळाला होता.

"राज मला तुमची खूप काळजी वाटते आहे" ती त्याच्या नजरेत हरवून बघत असताना पटकन बोलून गेली.
तिचे ते शब्द,ती नजर त्याला खूप आवडली होती. ती भावना छान होती की आपली कोणी इतकी काळजी करत आहे ...तो खूप काळाने ही भावना अनुभवत होता.

" राज मला तुमचा स्ट्रॉंग सपोर्ट व्हायचे आहे.. ना की तुमची जवाबदारी. तुम्ही मला सगळे शिकवा जी काम तुम्ही करता ती सगळी. मी सगळं शिकेन, मला गाडी चालवायला शिकवाल का?"

तो कौतुकाने तिच्याकडे बघत होता आणि त्याने हो म्हणून मान डोलावली. आयुष्यात पहिल्यांदा त्याला कोणी मनापासून सपोर्ट करायला बघत होते,कोणी आपलेसे असे फीलिंग त्याला देत होते जे त्याला सगळे नवीन असले तरी मनापासून आवडत होते.

"नैना पुढचा काही काळ खूप महत्त्वाचा आहे, पुढील किमान सहा महिने आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल"
"म्हणजे?"
"काका खूप चिडलेला असणार त्यामुळे ह्या ना त्या मार्गाने तो माझा पत्ता शोधून काढेल"
"मग पत्ता शोधला तर काय त्यात..तुम्ही त्यांना पुरून उरणार आहात..."

"एवढे सोपे नाही आहे नैना...त्याने त्याच्या माणसांना माझ्या मागावर पाठवले आहे..त्याला मला कायमस्वरूपी उडवून लावायचे आहे..तो संधी मिळाली की सोडणार नाही..त्याच्यासाठी मी आता सगळ्यात मोठा काटा झालो आहे..जो त्याला काढून टाकायचा आहे यासाठी तो काहीही करेल..."

"राज असे बोलू नका. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. नक्की काय उद्योग आहे काकाचे?"

"अगं एक असेल तर सांगेल मी. तो काळ्या साम्राज्याचा खूप मोठा भाग आहे. त्याचे काही उद्योग तर मी सांगूही शकत नाही...आता एकच गोष्ट त्याच्या मनात असेल की मला कसे दूर करायचे... "

"असे कधींच होणार नाही राज कारण तुमच्या बरोबर तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत.."

"ते तर आहेतच गं म्हणून तर मी अजून सुखरूप आहे..पण एक लक्षात घे की काका या काळ्या साम्राज्याचा बेताज बादशाह आहे..."

"असेल! पण तुम्ही आता त्याला शह देत आहात आणि तुमचे हे सगळे करणे एक चांगला उद्देश आहे तर मग कधीच घाबरू नका आणि पाऊलही मागे घेऊ नका. मला हवेय की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करावे"

"नैना तुझे शिक्षण पूर्ण कर मी तुला मदत करेन,पण थोडा वेळ दे मला. एकदा का हे थोडं स्थिर झालं की तुझी ऍडमिशन करू आपण इथेच भोपाळ च्या कॉलेजमध्ये जिथे मी तुला घेऊन गेलो होतो.."

"राज.. मला भोपाळ चे काही आकर्षण नाही..आता मी ठरवले आहे की जिथे तुम्ही असाल तिथे मी असेल..त्यामुळे शिक्षण पुढे ठरवूयात.."

त्याने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला तसे पटकन तिने खाली पाहिले, तिचे गाल आरक्त झाले होते आणि ती गोड हसत होती त्याच्याही गालावर मिश्किल हसू आले.

तेवढ्यात त्याच्या मोबाईल वर काहीतरी मेसेज आला, तो थोडा गंभीर झाला. वेळ फार वेगळी होती

त्याच्यातील बदल टिपत नैना म्हणाली," काय झाले राज..?"
" नैना आपल्याला लगेच निघावे लागेल. तू जा पटकन सगळे आवर तुझे.थोड्याच वेळात आपण इथून निघू. आपल्याला जाताना एका ट्रक मधून जायचे आहे जेणेकरून कोणाला संशय येणार नाही" तो तिला सूचना देत होता

त्याचे मनोमन काही प्लॅनिंग सुरू होते तर ती अजूनही कसल्याशा विचारात गढून गेली होती.

"राज एक बोलू?"
"हम्मम" मोबाईल मध्ये काहीतरी करत तो बोलला.
"ते तळघर! तिथे तुम्ही काम करत असतात ते काय? " जरा चाचरत ती बोलली.

तसे राज ने पटकन तिच्याकडे पाहिले आणि बोलला "नैना काही गोष्टी तिची योग्य वेळ आल्यावरच समजल्या पाहिजेत. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना?"

तिने त्याच्या हातावर हात ठेवत "पूर्ण" म्हणत त्याला स्माईल दिली...

"मी सांगेन तुला नैना काही गोष्टी..पण थोडा धीर धरावा लागेल तुला.."

"तुमच्या शब्दासाठी मी आयुष्यभर धीर धरायला तयार आहे राज..." ती असे बोलली आणि राज ने एकदम तिच्याकडे पाहिले...
आपण काय बोलून गेलो ह्याची जाणीव होताच ती स्वतःची जीभ चावत आपले सामान आवरायला रूम कडे पळत गेली..राज ला तिचे बोलणे फार आवडले होते आता कधी एकदा तिच्या सोबत प्रवास करतो असे त्यालाही झाले होते...!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all