Jan 28, 2022
प्रेम

अमर्याद:-भाग 6

Read Later
अमर्याद:-भाग 6

अमर्याद:- भाग 6


सकाळचा तो गार वारा तिला प्रसन्न अनुभूती देत होता आणि त्याचबरोबर नवीन उमेद जगण्याची. ती ज्या पद्धतीने स्वतःच्या निरागसता बाळगून वावरत होती ते फारच मनोहारी दृश्य होते ...
तिचे मोहक रूप बघत तो कितीतरी क्षण तसाच बसून होता तर आपल्याच नादात ती वावरत होती...
"चल, आपण इथून बाहेर पडू यात" तो म्हणाला तसे तिने मान डोलावली.
पुढे होत तिने त्याला आधार द्यायला हात पुढे केला असता पहिल्यांदा तिच्या मनात आले हा इथे कसा काय आला?

विचारला बगल देत तिने त्याला खांद्याला आणि हाताला आधार देत उभे केले. त्याला होणारी वेदना त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती पण आता त्याला मनाचा हिय्या करणे भागच होते.
हळूहळू पाऊल टाकत तो तिच्या आधाराने झोपडीच्या बाहेर आला.

बाहेरील ती प्रसन्न सकाळ, ते ताजेतवाने वातावरण बहुधा त्याने पहिल्यांदाच अनुभवले होते कारण त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी वेदना ही अचानक प्रसन्नतेमध्ये बदलली... तिला ही ते जाणवले तशी ती ही गोड हसली.
त्याच्या कारकडे बघितले तर ती पार कोळसा झाली होती. एक वेळची महागडी कार या क्षणी काळीठिक्कर दिसत होती. त्याने तिच्याकडून नजर वळवत नैना कडे बघितले. ती ही त्या गाडीकडे शांत पणे बघत होती...

तो उदास हसला तसे तिने त्याला त्यातुन बाहेर काढण्यासाठी समोरील दृष्याकडे नजर फिरवायला सांगितली....
ती उंच उंच हिरवीगार झाडं, निरभ्र आकाश, दूरवर दिसणारा डोंगराचा सुळका, अंगावर शहारा आणणारा पण तरी मोहून टाकणारा वारा...आणि आकाशातील पिवळसर नारंगी छटा जणू एका चित्रकाराने रेखाटलेले सुंदर दृश्य जे प्रत्यक्षात कोणीही आकारू शकणार नाही इतके मनमोहक दिसत होते...!

ते पाहून तो क्षणभर भारावला.
समोर बघितले तर रस्ता पूर्ण ओला गच्च झाला होता.
बाजूच्या खडकांवरून पाण्याचे छोटे छोटे ओघळ अजूनही वाहत होते. कोबी झाडे आजूबाजूला पडली होती...
हळूहळू ती दोघे रस्त्याकडे चालत जात होती... जितके प्रसन्न वाटत होते तितकेच तिच्या मनात या सकाळी त्याच्याबद्दल कुतूहल आणि प्रश्न दोन्ही निर्माण करत होते. हा कोण नक्की? कुठून इथे आला? त्याची गाडी आतल्या रस्त्यावर कशी पोचली?

या पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांनी ती शांत होती तर तो मनातून खूप सुखावला होता... का कळत नव्हते पण तरी त्याला हे सगळे आवडत होते.
दूरवर नजर गेली तरी चिटपाखरूही दिसत नव्हते. एका बाजूला डोंगर तर दुसरीकडे दरी!

तिने त्याला खडकावर वाहत असलेल्या मोठ्या धारेजवळ नेले. त्याने पाण्याखाली हात धारताच त्या गारव्याने तो शहारला. थोडे पाणी चेहऱ्यावर मारले,त्याच पाण्याने चूळ भरून थोडे पाणी प्यायले. तिनेसुद्धा चेहऱ्यावर पाण्याचा हात फिरवला तसे तिला उत्साही जाणवले.

कालपर्यंत एकमेकांना ओळखत नसलेले ती दोघे आज एकमेकांचा आधार बनत चालले होते.

चालत चालत ते एका खडकापाशी आले...तिथून पुढे रस्ता दिसत नव्हता ...

"आता पुढे कसे ?" तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.
त्याने तिला थांबायला सांगितले... तो आजूबाजूला बारकाईने नजर फिरवत राहिला आणि त्याला लांबवर एक प्राणी चालताना दिसला....
एखादा प्राणी चालत आहे तर छोटा का होईना एक रस्ता तर असेलच हा विचार करत त्याने तिला त्याच्या मागे हळूहळू यायला सांगितले....
खरतंर ते दोघेही एकमेकांचा हात धरून एकत्रच चालत होते..

त्या उंच सखल भागातून चालताना बऱ्याच वेळेला त्यांचे पाय घसरत होते पण एकमेकांचा घट्ट हात पकडून त्यांचे चालणे सुरू होते..

थोडयावेळाने ते एका सपाट जागेवर आले..याच जागेवर जाताना त्याने त्या प्राण्याला पाहिले होते...आता तसेच ते पुढे जात राहिले...ते एक छोटे जंगल होते..
आजूबाजूला काही प्राण्यांचा वावर कळत होता...
चालून दोघांनाही सपाटून भूक लागली होती पण तिथे काहीच नव्हते..

आणि चालता चालता ती एकदम कोसळली...
ती खाली पडली तसे तो एकदम हादरला...
त्याने नैना नैना असे तिला हाका मारायला सुरुवात केली..पण काल पासून ती उपाशी होती त्यामुळे बऱ्याच प्रमाणात अशक्तपणा तिच्यात होता...

त्याला चालणे धड जमत नव्हते...आणि ती बेशुद्ध अवस्थेत.. समोर खायला काही नाही आणि रस्ता पण अजून दिसत नव्हता..तो ही मनातून ढासळला...
काय करावे हे कळेना तेवढ्यात त्याला कोणीतरी पाहात आहे असे वाटले... त्याने पाहिले तर त्याला आजूबाजूला काही दिसले नाही...
त्याने नजर तिच्याकडे फिरवली तर त्याला परत जाणवले की कोणीत आपल्याकडे पाहत आहे..
त्याने नीट लक्ष देऊन पाहिले तर त्याला दिसले की झाडाच्या मागून दोन हिरवे डोळे त्याच्याकडे पाहत आहेत...
हा त्या डोळ्यांकडे पाहत राहिला तेव्हा त्याला कळले की तो कोल्हा होता...आता हा घाबरला..
ही बेशुद्ध.. तो लंगडा आणि समोर कोल्हा...
काय करायचे त्याला कळेना...शेवटी त्याने जोरजोराने "नैना नैना\"\" अशी हाका मारायला सुरुवात केली..
तिच्या पाशी वाकून तिला तो हलवायला लागला..एकीकडे त्याच्या हाका आणि दुसरीकडे त्याचे तिला हलवणे यामुळे नैना ला जाग आली...

"नैना..उठ..पळ समोर कोल्हा आहे.."
त्याचे शब्द तिला कळेस्तोवर वेळ लागला...पण जसे कळले तसे अंगात असलेली उरलीसुरली सगळी शक्ती एकवटून ती उठली.
दोघेही हळूहळू त्या जागेपासून दूर जायला लागले...
मागे वळून पाहिले तर तो कोल्हा अंतर ठेवून त्यांच्या मागे मागे येत होता...
त्यांनी चालायचा स्पीड वाढवला...

हळूहळू ते त्या जंगलातून बाहेर पडत होते...आणि अचानक त्यांना एक पूल दिसला...तो पूल दोन डोंगराच्या मध्यातून गेला होता...त्या पुलावरून जायला रस्ता नव्हता पण त्याच्या कडेकडेने जाता येत होते...

ते दोघेही तसेच निघाले..पूल संपल्यावर तिथे एक चढण होती...ती चढण ते कसेतरी चढले आणि एकदम तिने जोरात ओरडायला सुरवात केली...
त्याने पाहिले तर 50 फुटांवर समोर घाटाचा वळण वाला रोड दिसत होता...
ते पाहून तो ही ओरडायला लागला...

फायनली त्या दोघांना रस्ता मिळाला होता..आता फक्त त्या रस्त्यावर त्यांना एक कुठलीतरी गाडी मिळायला हवी होती जी त्यांना शहरापर्यंत सोडू शकेल..
अर्थात रस्ता शोधायची मोहीम त्यांनी फत्ते केली होती...!

क्रमशः

©®अमित मेढेकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Amitt Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!