अमर्याद :- भाग 17

Naina Visits Vidisha With Raaj To See New Job Opportunity

अमर्याद:- भाग 17


"राज मग आपण उद्या जायचे का?"
"कुठे?"
"कुठे काय विचारता? विदिशा ला!" जेवताना तिने विषय काढलाच.
"हो जाऊ सकाळी" इतकेच तो बोलला पण त्यानंतर तो एकदम शांत झालेला तिला जाणवला.
"भाजी आवडली का?" काहीतरी विषय काढायचा म्हणून तिने विचारले.
"छान झाली आहे. मला मेथी ची अशी केलेली भाजी आवडतेच" तो म्हणाला तसे ती मोठ्याने हसायला लागली.
"काय झाले नैना हसायला?"
तरी ती हसतच होती...

"अगं सांग ना...काय झाले...?"
शेवटी म्हणाली " राज तुम्हाला भाज्या मधील खरंच काही कळत नाही"
तसा भाजीकडे बघत तो म्हणाला " का मला तर आवडली ही हिरवी भाजी"
"अहो तसे नाही, ही हिरवी दिसली म्हणून काय मेथीचं असेल का? अहो ही ताज्या कोथिंबीरीची भाजी आहे...आणि ती सुद्धा या गार्डन मधल्या."

त्याने डोळे थोडे मोठे करत पुन्हा ताटात पाहिले मग एकदा तिच्याकडे आणि तो ही हसायला लागला.
त्याला असे हसताना तिने पाहिल्यांदा पाहिले होते त्यामुळे ती एकटक त्याच्याकडे बघत होती. जेव्हा त्याच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने तिच्या नजरेत पाहिले.काही क्षण असेच गेले तेवढ्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि ह्यांची तंद्री भंगली तसे तो म्हणाला, "नक्की मांजर असेल..."
हिने आत जाऊन पाहिले तर खरंच मांजरीने दूध सांडवले होते.

जेवणे आटोपली तसे तिने पाठचे आवरायला घेतले तेव्हा तोही तिला मदत करू लागला. नोकर गेल्यापासून सगळे तीच करत होती त्यामुळे तिची दमणूक होते हे त्याला जाणवले होतेच.
दोघांनी एकमेकांच्या मदतीने सगळे आवरले. दोघेही दमले होते त्यामुळे लवकरच झोपायला गेले.

तिला सगळे आपुलकीने करताना , निरागसपणे वागताना पाहून राजला तिच्या वागण्याचे नवल वाटत होते. कोणी कोणावर इतक्या पटकन कसा विश्वास ठेवू शकेल?

तर एकीकडे तिच्या ह्याच वागण्याने तो तिच्याकडे खेचला सुद्धा जात होता. तिचे असणे त्याला आवडायला लागले होते, एक अनामिक ओढ त्याला जाणवत होती पण ती काय हे कळत नव्हते.

सकाळी लवकर उठून नैना ने स्वतःचे आवरले आणि खाली जाऊन ब्रेकफास्ट ची तयारी केली. राज उठून खाली येऊन बघतो तर हॉल एकदम चकाचक झाला होता. टेबलवर कढईत काहीतरी होते ज्याचा खमंग वास दरवळत होता बाजूला दोन डिश अन्नाची वाट पहात तयार होत्या.
तो आलेला कळताच तिने पटकन डिश मध्ये ब्रेकफास्ट सर्व केला आणि लगेच किचन मध्ये जाऊन चहा सुद्धा कप घेऊन आली.
तिची ती चुणचुणीत धावपळ त्याला फार छान वाटत होती. ती अगदी सराईतपणे वावरत होती आणि सगळे करत होती.

"राज पटकन आवरा, आपल्याला जायचे आहे ना? आणि हो मी दुपारच्या साठी जवळ खायचे ठेवत आहे म्हणजे तुमची गैरसोय नाही होणार "
तिची तयारी पाहून तो चकित झाला आणि त्याने ही स्वतःचे आवरायचा स्पीड पकडला.
पुढच्या अर्ध्या तासात ती दोघे मस्त आवरून खाली आली. तिने छानसा जांभळा रंगाचा टॉप आणि काळी जीन्स घातली होती तर त्याने त्याच रंगाचा शर्ट घातला होता...
ते बघून आधी तर दोघेही एकमेकांकडे पाहत होते तसे ती पटकन लहान मुलासारखी धावत जाऊन त्याला चिमटा काढत म्हणाली " सेम पिंच"
तो तिचा अल्लडपणा पाहून राज ला हसणे काही आवरेना...तसे ती ही मोठमोठ्या आवाजात हसत राहिली..यावेळेस तिचे हसणे तो बघताच राहिला.

त्याला फोन आला तसा तो बाहेर जाऊन उभा राहून काही बोलत होता तेवढ्यात ही त्याच्या बाईकची किल्ली घेऊन आली आणि त्याच्या हातात दिली...

हे मात्र अगदी त्याच्या मनासारखे झाले होते त्यामुळे त्याने तिला एक मिश्किल लूक दिला आणि एकदम स्टाईल मध्ये बाईक काढली ती स्टार्ट केली,हेल्मेट घातले आणि तिला नजरेनेच "चल बस"खुणावले.
तिचे पण अवघडलेपण आता गेले होते आणि ती पण नवीन लाईफ स्टाईल ला अवगत होत होती. तिने पण यावेळी पटकन त्याच्या खांद्याला धरून एक पाय पटकन टाकून व्यवस्थित बसली.

तिच्या हाताचा त्याच्या खांद्याला तर मध्येच कमरेला होणारा स्पर्श त्याला सुखवत होता तर त्याची कंपनी, त्याचे वागणे, त्याचे दिसणे तिला आणखी भूल पाडत होते.

तो मध्येच काहीतरी खोडकरपणा करायला मुद्दाम बाईक वेडी वाकडी चालवत होता तेव्हा ती त्याला हलकेच खांद्याला घट्ट पकडत होती...ती पकडत आहे म्हणल्यावर तो अजून स्टाईल मध्ये गाडी चालवत होता.. दोघांचे एकमेकांशी वागणे खूप जवळीक निर्माण करत होते.

मध्येच एक ठिकाणी त्याने बाईक थांबवली, ते ठिकाण खूपच छान होते... तिथले निसर्ग सौंदर्य भान हरपून ती बघत होती. तेव्हा तिचे ते भाव, तो आनंद मध्येच चेहऱ्यावर रुळणारे केस बघत तो स्वतःला हरवून बसला होता.
त्याला तसे बघताना बघून ती लाजली आणि अलगद हसली... त्या क्षणी तिच्या गालावर पडलेली खळी तो बघतच राहिला
ते नकळत एकमेकांच्या जवळ येत होते. विदिशा ला जाणे जरी तिला महत्त्वाचे वाटत असले तरी हा प्रवास कधी संपूच नाही असे तिला मनोमन वाटत होते. त्यालाही आज हे क्षण ही वेळ अशीच थांबून राहावी असेच वाटत होते.
एक अतूट बंध जुळत होता ज्याची प्रत्यक्ष जाणीव तर होत होती पण तरीही कळत नव्हते की नक्की काय?

थोड्या वेळाने गाडी विदिशा ला पोचली...त्याने तिला पत्ता एकदा विचारून घेतला आणि न चुकता तिथे आणले..

"याला विदिशा चे रस्ते कसे माहिती...?" हा विचार मनात करत ती त्या पत्त्यावर पोचली...पाटी वाचून ती तिथे आत शिरली..राज बाहेरच थांबला होता.

आत पाहिले तर ती एक मोठी फॅक्टरी होती आणि पॅकेजिंग चे काम सुरू होते...तिथल्या सुपरवाईझर सोबत तिचा इंटरव्ह्यू होता..

जुजबी माहिती विचारून त्याने तिला 9 ते 6 या वेळेत उद्यापासून कामाला बोलावले...8000 रुपये महिना तिला मिळणार होते...

अंदाजे अर्ध्या तासात ती बाहेर आली तर राज कुठे दिसंत नव्हता...ती तिथेच उभी राहिली...तिच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते.."9 ते 6 काम म्हणजे इथेच राहावे लागेल...भोपाळला जाता येणार नाही..म्हणजे राज तिकडे असेल आणि आपण इकडे..तो कधी भेटेल ते सांगता येणार नाही...काय करावे?"

तिचे विचार थांबत नव्हते तेवढ्यात तिने कसला तरी आवाज ऐकला... थोडे बाजूला काही तरी गोंधळ सुरू होता...नीट पाहिले तर दोन जीप मधून काही लोक कुणाच्या मागे जोरात गाडी चालवत नेत होते आणि समोर कुणीतरी रक्तबंबाळ अवस्थेत गाडी चालवत होता...आणि एकदम तिला कळले की दुसरा तिसरा कुणी नसून राज होता...

ती एकदम \"राज राज\" असे धावत पळत ओरडत पळाली तसे ती गाडी एकदम तिथून निघून गेली आणि तिच्या मागोमाग त्या दोन जीप पण निघून गेल्या...

दूर जाणाऱ्या गाडींमुळे मातीच्या उडणाऱ्या धुराळ्याकडे हताशपणे पाहत नैना तशीच उभी होती...!

क्रमश:-

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all