अमर्याद :- भाग 15

Naina Tries To Find Out What Exactly Going With Raj

अमर्याद:- भाग 15


खाणे संपले तशी नैना म्हणाली, " राज मला विदिशा ला घेऊन जा ना..."
तिने आज परत विदिशा नाव घेतले होते..आज राज ने त्याच्या कसल्याही भावना चेहऱ्यावर न दाखवता तो शांतपणे तिला म्हणाला, "जाऊयात ना...तू सांग कधी जायचे आहे..?"
"उद्या सकाळी जायचे...?" तिने अधीर होत विचारले.
"नक्की जाऊयात..." तो उसने हसत तिच्याकडे पाहत म्हणाला...

ते तिथून बाहेर आले आणि बाईक वर बसून निघाले..आता ती एका साईड ला बसली होती आणि पकडण्यासाठी तिने तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला होता... तिच्या त्या हात ठेवण्याने त्याला थोड्या गुदगुल्या होत होत्या पण तो काहीच न बोलता गाडी चालवत होता...

ती या सगळ्याच्या पलीकडे सहजपणे आपल्याच विचारात भोपाळ मधील रस्ते आणि त्यावरील गंमत पाहत होती..

"आपण भोपाळ कधी पाहणार..?" तिने एकदम विचारले तसे त्याने आरशातुन तिच्याकडे पाहिले...तिचे लक्ष रोडवर होते...

तिच्या त्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपण या मुलीला का एवढे जीवापाड सांभाळत आहोत असा प्रश्न त्याला क्षणभर पडला...तिला का नाही जाऊन देत आहे तिच्या मार्गाने..? तो स्वतःवर चिडला...त्याचे त्यालाच कळत नव्हते की तो काय करत होता...

आज झालेला इंसिडन्स त्याने कसा तरी, काही तरी कारण सांगून निभावून नेला होता पण त्याला माहिती होते की हे फार काळ असे लपवता येणार नव्हते....तिला आता कुठेतरी पाठवायला हवे होते...त्याच्या मनात एकदम विचार आला की घरातील कामवाली बाई आणि नैना या दोघींना एकत्र विदिशा ला पाठवूयात... तिला तिथे जो काही जॉब करायचा आहे तो करु देत आणि तिथेच राहुदेत..काही दिवस तिथे राहिली की इथल्या गोष्टी आपल्याला सहज सांभाळता येतील...

विचाराच्या नादात ते दोघे हवेली पाशी पोचले...
तेवढ्यात तिथला सिक्युरिटी गार्ड त्याच्यापाशी धावत आला आणि म्हणाला,
"राज साहेब..दोन माणसे आली होती ..सांगत होती की गावाकडची आहेत म्हणून..आपल्या दोन्ही कामवाल्या बाई आणि माळी बाबा यांच्या बरोबर ते काही बोलले आणि ते सगळे त्या लोकांसमोर गेले..."

"गेले..? कुठे गेले..?" राज एकदम ओरडत म्हणाला.
"नाही माहिती साहेब.." तो गार्ड हळू आवाजात म्हणाला.

त्याने डोक्याला हात लावला...तेवढ्यात मागून नैना आली आणि म्हणाली, "राज तुम्ही का चिडताय...मी आहे ना...घरातील कामे आणि स्वयंपाक सगळे मी करेन..."

राज ने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या रागाला कंट्रोल केले..तो हसला आणि आत गेला..
नैना सुद्धा त्याच्या मागे आत गेली आणि घरातील कामे आवरायला सुरुवात केली...

राज चे फोन परत सुरू झाले...एका वेगळ्या भाषेत तो फोनवर बोलत होता...ती भाषा तिने राज च्या तोंडुनच आधी ऐकली होती...ह्या भाषेत राज बोलायला लागला की त्याला डिस्टर्ब करायचे नसते हे तिला आता माहिती झाले होते..राज बोलता बोलता आऊट हाऊस मध्ये गेला..

दोन तास राबून तिने घर पूर्ण आवरले आणि दमून थकून बाहेरच्या सोफ्यावर येऊन बसली..तिने पाहिले तर राजच्या आऊट हाऊस च्या रूम मधून आवाज येत नव्हता म्हणून तिने थोडासा कानोसा घ्यायचा प्रयत्न केला..
दरवाजा नुसताच लोटला होता आणि आतमध्ये शांतता होती...तिने हलकेच दरवाजा उघडला…
दबक्या पावलांनी ती आत शिरली तर आतल्या खुर्चीवर कोणीच बसले नव्हते...जागा रिकामी होती...आज पहिल्यांदाच ती इथे येत होती...तिने पूर्ण खोलीत फिरून बघितले..टेबलाच्या मागे तिथे काही कपाटे होती..वॉर्ड रोब सारखे एक स्ट्रक्चर होते आणि बाजूला एक पुस्तकांचे कपाट होते..समोर बसायला एक सीट आऊट होते...राज तिथे दिसत नव्हता... आता तिथे कोणीही नव्हते...
ती बाहेर आली आणि तिने आऊट हाऊस चा दरवाजा बाहेरून बंद केला..

राज कुठे गेला असेल या विचारात ती हॉल मध्ये बसली..आता पूर्ण हवेलीत ती एकटी होती..सिक्युरिटी गार्ड हवेलीच्या बाहेर होता..तिला क्षणभर भीती वाटली..या वेळेस राज ला फोन करायची तीव्र ईच्छा झाली पण तिच्या स्वतःकडे मोबाईल सुद्धा नव्हता...हवेलीत फोन होता पण फोन करायला त्याचा मोबाईल नंबर नव्हता आणि कोणाला फोन करायचा हे तिच्या लक्षात येत नव्हते..तिने घरातील सगळे दिवे लावून ठेवले आणि हॉल मधील TV चालू केला..

थोडा वेळ तसाच गेला...TV च्या आवाजात ती गुंगली होती तेवढ्यात तिला काहीतरी आवाज ऐकू आले..काहीतरी खडखड करत असल्याचा...काहीतरी आपटत असल्याचा...पहिल्यांदा तिला ते आवाज TV मधले आहेत असे वाटले पण नंतर तिला ऐकू आले की कोणीतरी नैना नैना हाका मारत होते..ती अलगद उठली आणि आवाजाच्या दिशेने हळूहळू जायला लागली..
काहीतरी थपटा मारल्याचा आवाज आता वाढला होता..तिने डोकावून पाहिले तर आऊट हाऊस मधून तो आवाज येत होता...ती दचकत दचकत तिथे गेली तर कोणीतरी आतून दरवाज्याला धडका मारत होते...तिने बाहेर लावलेली कडी जाऊन उघडली तर आतून कोणीतरी एकदम तिच्या अंगावर येऊन धडकले आणि ती खालती पडली. ती जोरजोराने ओरडायला लागली तसे कोणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला...तिने हात बाजूला करून पाहिले तर तो राज होता...

"राज...तुम्ही...?" तिचा श्वास जोरजोराने चालत होता..
"मग अजून कोण असेल...?"
"पण तुम्ही आत कसे गेला...?"
"मी आतच होतो...बाहेरून कोणीतरी वेड्याने कडी लावली..."
"ती वेडी मीच.."
"तू? ...पण का?" तो थोडे ओरडत म्हणाला.
"तुम्ही आत नव्हता..मी आले होते आत ..कोणी नव्हते आतमध्ये.. म्हणून मी बाहेरून कडी लावली.."

"मी आतच होतो नैना..."
"मग मला कसे नाही दिसला तुम्ही..?"
"कारण..." तो बोलता बोलता थांबला...
"काय...?" तिने त्याच्याकडे रोखून पाहत विचारले.
"काही नाही...."
"नाही राज..मला सांगाल का..काय आहे नक्की..."
"अगं काही नाही...चल घरात..." तो थोडे चाचपडत म्हणाला..
पण ती तिथून हलली नाही...
"राज मला सांगा काय आहे ते नक्की..."
तिच्या हट्टा पुढे राज चे काही चालले नाही...तो तसाच उभा राहिला...
ती त्याची वाट पाहत तशीच उभी राहिली...त्याला हवेलीत जायचे होते तर तिला आऊट हाऊस मध्ये...

शेवटी ती आऊट हाऊस मध्ये शिरली..राज तिच्या बरोबर आत आला...
"कुठे होता तुम्ही राज? मला का दिसला नाहीत?"
राज ने नजर इकडे तिकडे फिरवली तसे ती त्याच्या पाशी आली आणि त्याच्या हाताला पकडले आणि परत विचारले, "राज कुठे होता तुम्ही..?"

राज ने तिच्या हातातून त्याचा हात काढून घेतला आणि तिथल्या एका कपाटपाशी गेला..त्याने ते कपाट उघडले आणि डाव्या बाजूला असलेल्या कप्प्यात एक बटन दाबले तसे त्या कपाटाच्या आत मध्ये एक ऑटोमॅटिक दार उघडले...
नैना आश्चर्यचकित होऊन पाहात होती कारण त्या दरवाज्यातून आतमध्ये एक पूर्ण खोली दिसत होती ज्याच्या बाजूला एक जिना होता जो खालती तळघरात जात होता...!

क्रमशः

©®अमित मेढेकर


🎭 Series Post

View all