अमर्याद :- भाग 14

Raj Tries To Normal Naina By Telling Her A Different Incidence
अमर्याद :- भाग 14

त्याने फुटपाथच्या बाजूला गाडी लावली आणि तिला फुटपाथ वर घेऊन उभा राहिला...तिच्या त्या अवस्थेकडे पाहून राज थोडासा विचलित झाला..त्याला कळत होते की जे झाले ते तिच्या समोर व्हायला नको होते..असे भर रस्त्यात कोणीतरी येते.. त्याला सुरा दाखवते आणि वॉर्निंग देऊन निघून जाते यामुळे ती घाबरणारच....! त्याला नैना ला नॉर्मल करायचे मोठे काम होते...

नैना थरथरत उभी होती...तिला पूर्ण चेहऱ्यावर घाम आला होता..ती प्रचंड घाबरलेली होती.
"नैना...नैना इकडे बघ..." तो तिला नीट धरत म्हणाला...
ती प्रचंड शॉक मध्ये होती...त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोचत होता ही आणि नव्हता ही...
"नैना...." तो तिला हलवत म्हणाला..
ती तशीच स्तब्ध होती...
"नैना..." आता तो मोठ्याने ओरडत म्हणाला..
तसे तिने त्याच्याकडे पाहिले आणि ती जोरजोरात रडायला लागली...
त्याने तिला घट्ट पकडले तसे ती त्याच्या कुशीत शिरली आणि मोठ्याने हुंदके द्यायला लागली..

तो हलकेच तिच्या पाठीला थोपटत होता..बऱ्याच वेळ ती त्याच्या कुशीत त्याला पकडून रडत होती...ती शांत व्हायची तो वाट पाहत होता....

काही क्षणानंतर तिचा रडायचा आवेग कमी झाला तसे उसळत ती म्हणाली.." राज, कोण होते ते लोक..? का असे आले आपल्या वाटेत? का त्यांनी सुरा दाखवला?

तो फक्त मान हलवत होता आणि नाही नाही म्हणत होता पण ती काही ऐकायच्या स्थितीत नव्हती...
शेवटी तो तिच्या हाताला ओढत फुटपाथ वरून समोरच्या कॉफी शॉप कडे घेऊन गेला...तिथे बसल्यावर पण तिचे स्वतःशीच मोठमोठ्या आवाजात बोलणे सुरू होते..

"दोन स्ट्रॉंग कॉफी..." त्याने वेटरला ऑर्डर दिली...
"मला नकोय कॉफी..." नैना ठसक्यात बोलली...
राज नुसताच हसला...
"तुम्ही हसत आहात राज..?" ती चिडून ओरडत म्हणाली..
"अगं हसू नको तर काय करू...?" तो हसत म्हणाला..
"हे सगळे हसण्यासारखे झाले का..?" ती चेहरा कोरा ठेवत म्हणाली..
"पूर्ण हसण्यासारखे..." तो मिश्कीलपणे म्हणाला.
"कसे काय...?" तिच्या आवाजात एक आव्हान होते...
"मी सिद्ध करून दाखवू..?"
"लगेच..." तिचा आव्हानात्मक आवाज कायम होता...

त्याने त्याच्या शर्टाच्या बाह्या वरती केल्या, एक पॉज घेतला आणि मोठ्याने हसत म्हणाला,
"अगं वेडे, हा एक प्रांक होता..."
"काय होता.....?" तिने न समजून विचारले..
"प्रांक..प्रांक..." तो थोडे स्पष्टपणे म्हणाला..
"म्हणजे...?" तिचे प्रश्नचिन्ह कायम होते..
प्रांक ...म्हणजे...खोटा खोटा ड्रामा... नाटक..."
".......?" तिच्या चेहऱ्यावर काहीही न समजल्या सारखे भाव होते...

तसे तो सावरत बसत म्हणाला, "अगं मोठ्या शहरात असे प्रांक करतात रस्त्यावर... मुर्गा बनवतात..मराठीत आपण म्हणतो ना.. पोपट केला "

तिचे भाव अविश्वसनीय होते..
"तू कॅमेरा नाही पाहिला का जो रस्त्याच्या दुसऱ्या साइड ला एक माणूस घेऊन उभा होता.."
"नाही..."
"ते रु पाहिला असता तर तू घाबरली नसती अजिबात..."
"खरं का....?" तिने एकदम भोळे पणाने विचारले...

"म्हणजे काय...आपल्याला कोण कशाला येऊन असे बोलेल...आपल्याला तर 2 दिवस झाले इथे येऊन...तुला कोणी ओळखते का तरी...?"

तसे तिने नाही अशी मान हलवली...
"मग मला वाटले की तुला कळले असेल..उगाचच घाबरली तू..."

तेवढ्यात कॉफी टेबलावर आली..
"ओह असे आहे का.." ती रिलॅक्स होत म्हणाली...
"अगदी असेच आहे..." तो हसत म्हणाला.
तसे तिने एकदा त्याच्याकडे बारीक नजरेने पाहिले आणि मग जोरजोराने हसायला लागली..
तिच्या हसण्यात तोही सामील झाला..

दोघेही मोठ्याने हसताना पाहून आजूबाजूला असलेली लोकांनी त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली तसे त्याने त्याला आवाज हळू हळू असे सांगितले.

तिला कॉफीची चव आवडली...आता मनावरचे प्रेशर कमी झाल्याने तिला मस्त भूक लागली होती ...
"राज.. मला काहीतरी खायचे आहे...मागवायचे का..." तिने त्याला विचारले..
"नक्की..का नाही..."तो तिला म्हणाला आणि त्याने वेटर ला हाक मारली...
वेटर आल्यावर तो म्हणाला.."वेटर..मॅडम साठी \"काहीतरी\" आण.."
तसे तिने चमकून त्याच्याकडे पाहिले...
वेटरला काही न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला...

राज मोठ्याने हसला आणि म्हणाला, "अरे भाई..मॅडम को भूक लगी है..कुछ भी अच्छी डिशेस लेके आओ" वेटर मान डोलवत गेला आणि तिने डोळे मोठे केले तसे राज ने मेनू कार्ड उचलले आणि त्याच्या आडून खुसखुसत राहिला.."

नैना ला कळले की तो आपल्याला हसत आहे तसे तिने त्याच्या चेहऱ्यावर असलेले मेनू कार्ड बाजूला घेतले...तसे तो परत ते ओढून त्याच्या आत हसायला लागला..
तशी ती उठली आणि त्याच्याकडे असलेले मेनू कार्ड घेऊन ते दुसऱ्या रिकाम्या टेबलावर नेऊन ठेवले...
तोपर्यंत त्याने तिथे असलेला एक रुमाल त्याने चेहऱ्यावर ठेवला आणि त्याच्या आडून तो हसायला लागला...

तिने तो रुमाल बाजूला घेतला आणि लटक्या रागाने म्हणाली, " राज..मला कळत नाही असे प्रांक वगैरे म्हणून का...? मी छोट्या गावातून आले ना, आता नाही माहिती मला असे प्रांक मोठ्या शहराचे...शिकेन हळूहळू...हसू नका मला..."

तो म्हणाला..."ओके नाही हसत आता..."

"प्रॉमिस.." तिने भाबडेपणाने विचारले..
"पक्का प्रॉमिस..." तो शांतपणे म्हणाला.

2 क्षण असेच गेले आणि तीच जोरात हसली तसे तोही हसायला लागला....
आज त्या कॉफी शॉप मध्ये दोघांचे हसणे सुरू होते...
वेटर ने डिश आणल्या तसे दोघेही त्यावर तुटून पडले..

दोघांच्या खाण्यावर तुटून पडण्याची कारणे वेगवेगळी होती...ती तिचे मनावरचे प्रेशर कमी झाले म्हणून मस्तपैकी खात होती तर तो, आपण आजची वेळ काहीतरी सांगून भागवून नेली या विचारात खात होता...!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all