अमर्याद:- भाग 32

Naina Gets To Know Many Things Related To Raj's People
अमर्याद:- भाग 32

नैना चे आयुष्य प्रचंड वेगात वळणे घेत होते. तिचे तिलाच कळत नव्हते की काय सुरू आहे. सिन्नर जवळ राहत असलेली नैना आज जैसलमेर मधील एक बंकर च्या आत आपले आयुष्य सर्वार्थाने वेगळ्या पद्धतीने जगत होती आणि याला कारणीभूत असलेला "राज" आज आतल्या खोलीत निवांत पणे पहुडला होता. मगाशी शुद्धीवर येत त्याने "काश्मीर" हा शब्द उच्चरला आणि ग्लानी मध्ये असल्याने लगेच झोपी गेला. त्याच्या या बोलण्याने नैना अक्षरशः वेडी झाली..
जगावेगळा प्रवास करून ती जैसलमेरला पोहचली होती. इथे चार महिने राहण्याचा प्रोग्रॅम होता आणि आता 4 दिवसाच्या आतच राज ने "काश्मीर" हे नविन नाव डिक्लेयर करून टाकले होते.

तिने चक्रावून बिंदीया दीदी कडे पाहिले तर ती हसायला लागली.
"दीदी..तुम्ही हसतांय.."
"हसू नको तर काय करू..तुझा चेहरा बघ..." दीदी नैना कडे पाहत हसत म्हणाली.
"चेहरा काय बघू दीदी...इथे ह्या राज चे बोलणे बघ..आता झोपेतून उठून डायरेक्ट काश्मीर म्हणाला आणि झोपून गेला...याला काय चेष्टा वाटते का एका गावातून दुसरे गाव..एका शहरातून दुसरे शहर...दोन दिवस सुद्धा एका ठिकाणी नीट राहणे नाही..फक्त पळायचे...लपून राहायचे...हे असे कधीपर्यंत चालणार? "

"जोपर्यंत काका मरत नाही तोपर्यंत..." दीदी ठाम आवाजात म्हणाली.

"दीदी..." तिच्या आवाजातील राग पाहून ती दचकून म्हणाली.

"त्या हलकट हरामखोर व्यक्तीला भर चौकात हत्तीच्या पायाखाली दिले पाहिजे..."

"दीदी..एवढा राग?"

"त्याचे तुकडे करून कुत्र्यांना खायला दिले पाहिजेत... त्या लायकीचा पण तो नाही.. " दीदी चे शब्द आग ओकत होते.

नैना धावत दीदी पाशी गेली आणि तिला घट्ट पकडत म्हणाली, "दीदी..एवढा राग तुम्हाला येतो..? काय झालंय एवढे..? एवढ्या चिडलेल्या मी तुम्हाला पाहू शकत नाही.."

तिच्या बोलण्याने दीदी थोडी शांत झाली पण आतून ती धुमसत होती.

"काय झाले दीदी..मला सांगणार का...?" तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत नैना म्हणाली.

दीदी 2 क्षण शांत बसून होती मग तिने बोलायला सुरुवात केली.

"अंदाजे 3 वर्षांपूर्वी ची गोष्ट! मी आणि माझा नवरा इथे जैसलमेर ला एक ढाबा चालवायचो. आमचा ढाबा खूप फेमस होता कारण माझ्या हाताला असलेली चव. तू जेवली आहेसच त्यामुळे तुला माहिती आहे. आम्ही नवरा बायको खूप आनंदाने राहायचो. आम्हाला मुलं बाळ नव्हते पण तरी आम्ही खूष होतो. लोकांच्या वर्दळीत आम्हाला कळायचे नाही की आम्ही दोघेच असतो.
ढाब्याच्या मागे लागूनच आमचे घर होते त्यामुळे आम्ही कायम तिथेच असायचो.
जैसलमेर वरून पाकिस्तान बॉर्डर खूप जवळ, त्यामुळे स्मगलिंग खूप केले जायचे. मी आणि माझा नवरा यापासून कायम लांब राहायचो. आमच्या दृष्टीने आमचा ढाबा हेच खूपच आनंदाने राहायचे ठिकाण होते.

त्या दिवशी रात्री 11च्या सुमारास आम्ही ढाबा बंद केला आणि मागे घरी जाणार तेवढ्यात एक मोठी गाडी आमच्या समोर येऊन थांबली. अशी गाडी मी त्या आधी बघितली नव्हती. त्यातून २ लोक उतरले.
ते आमच्या जवळ आले आणि म्हणाले, आमच्या साहेबांना जेवण हवे आहे ते मागे बसले आहेत."

मागे एका काळ्या काचेच्या आत एक माणूस बसलेला दिसत होता. डोळ्यावर गॉगल आणि हातात सिगार. जरी तो माणूस नीट दिसत नव्हता तरी त्या माणसाकडे पाहून मला क्षणभर भीती वाटली. माझा नवरा त्यांना खूप नम्रपणे म्हणाला,"ढाबा बंद झाला आहे..आता उद्या सकाळी उघडेल.." यावर त्यांनी लगेच एक बंदूक काढली आणि माझ्या नवऱ्याला धमकावले आणि सांगितले की पुढच्या 20 मिनिटात जेवण नाही मिळाले तर तुला गोळी मारू असे.
त्या माणसाकडे पाहून मला आधीच भीती वाटली होती आणि आता तर त्या लोकांच्या धमकीने मी घाबरले होते.
माझ्या नवऱ्याला मी सांगितले की मी करते स्वयंपाक म्हणून... परत ढाबा उघडला...एकदा बंद केलेली भट्टी आता परत पेटणार नव्हती..मी छोटीशी चूल पेटवली आणि स्वयंपाक करायला घेतला. माझ्या नवऱ्याने सुद्धा लगेच भाजी चिरली आणि मला जी लागेल ती मदत करत होता. त्या चुलीवर मला स्वयंपाक करायला वेळ लागत होता. तोपर्यंत ती माणसे माझ्या नवऱ्याला आणि मला त्रास द्यायला लागली होती.
मी जवळपास अर्ध्या तासात स्वयंपाक केला तर तोपर्यंत त्या लोकांनी नको नको ते बोलून मला खूप हैराण करून ठेवले होते.
जेवण जेवायला होते फक्त 3 लोक पण जवळपास 8 लोकांचे जेवण ते जेवले. त्यातून काही नॉन व्हेज नसल्याने त्यांनी खूप आरडाओरडा केली.

जेवण झाले आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे पैसे न देता निघाले. माझा नवरा त्यांना पैसे मागायला गेला तर त्याला लाथ मारून खालती पाडले. मी त्याला उचलायला गेले तर त्याला बाजूला केले आणि मला उचलून गाडीत घालून घेऊन गेले." दीदी हुंदका देत म्हणाली.

नैना ने तिच्या पाठीवर हात फिरवून तिला शांत केले.
"त्या रात्री मला पळवून नेले आणि नंतर के झाले ते मला माहिती नाही...पण मला सकाळी जेव्हा परत ढाब्यावर सोडले तेव्हा तिथे ढाबा नव्हता..सगळा ढाबा पूर्णपणे उध्वस्त केला होता आणि घराच्या आतमध्ये पंख्याला माझा नवरा लटकत होता." दिदी रडत रडत म्हणाली.

नैना डोळे मोठे करून ते ऐकत होती.
"त्या 3 लोकांनी रात्रभर माझ्यावर रेप केला नैना, अनेक वेळा..माझ्या नवऱ्याला मारले आणि आमचा ढाबा उध्वस्त केला ...कारण केवळ एकच! आमच्याकडे जेवायला द्यायला नॉन व्हेज नव्हते आणि जेवण 20 मिनिटांत तयार नव्हते.."

नैना थक्क होऊन ऐकत होती. तिच्याकडे बोलायचे काही शब्द नव्हते.

"तो मागे बसलेला माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून राज साहेबांचा काका होता...! "

आता नैना च्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.

"नैना, 12 दिवस मी न खाता पिता त्या वाळवंटात अंगावरच्या कपड्याने फिरत होते. कुणाला दया आली नाही..त्यावेळेस राज साहेबांनी मला पाहिले. ते या बंकर च्या कामा निमित्ताने आले होते. माझ्यात त्यांना काय विश्वास वाटला कुणास ठाऊक पण त्यांनी मला त्यांच्या बरोबर घेतले. तेव्हा सुखी भैय्या आणि भंवर भैय्या हे दोघेही या बंकर मध्ये होते. खूप गुप्त काम चालू होते पण साहेबांनी सांगितले आहे म्हणल्यावर त्यांनी एकही शब्द न बोलता मला या बंकर मध्ये ठेवले.

तो माणूस हा राज साहेबांचा काका आहे हे मला साहेबांनी कधीच नाही सांगितले. हे बोलता बोलता सुखी भैय्या एकदा बोलून गेले की, साहेबांना कळले होते की काकांनी काय केले तुझ्यासोबत... तेव्हा मला कळले की तो नीच माणूस काका होता...

तुला आश्चर्य वाटेल नैना, "गेल्या 3 वर्षांत मी एकदाही बंकर च्या बाहेर गेले नाही आहे. हां म्हणायला या भुयारातून जैसलमेर च्या त्या वाड्यापर्यंत पोचले आहे पण तेवढंच! तिथून मी मागे फिरले आहे. मला जे हवे आहे हे न मागता इथे मिळते... जेवण खाण, पैसे, कपडे कशालाही कमी नाही पण याही पेक्षा महत्वाचे आहे ते म्हणजे इथे मिळणारा सन्मान! "

"नैना, राज साहेब हे खूप चांगले आहेत. असा माणूस शोधून सापडणार नाही. माणसे जपणे, माणसे सांभाळणे आणि आपल्या माणसासाठी काही करणे यात साहेबांचा कोणी हात धरू शकत नाही. सुखी आणि भंवर तर साहेबांचे डावे उजवे हात आहेत. त्यांच्या साठी साहेब जीवाचे रान करतात.
हा सुखी रूप बदलण्यात माहीर आहे.
कधी हा ड्रायव्हर असतो तर कधी रस्ता दाखवणारा वाटसरू. कधी बिझनेसमन असतो तर कधी गरीब...
ह्या लोकांत मी खूष आहे नैना, फक्त माझा नवरा माझ्या बरोबर नाही आहे ह्याचे मला खूप दुःख होते..."

नैना मन लावून ऐकत होती. बिंदी दीदी च्या मागे एक मोठा भूतकाळ होता जो तिला आज कळत होता.

तिने दीदी चा हात घट्ट पकडला तसे दीदी तिच्या गळ्यात पडून रडायला लागली. नैना पण तिच्या सोबत रडायला लागली. बऱ्याच वेळ त्या दोघी एकमेकांना सोबत करत होत्या. दोघींचे भूतकाळ वेगळे होते..एकीच्या आयुष्यात खूप काही घडून गेले होते तर दुसरीच्या आयुष्यात खूप काही घडले असते.

एक मात्र नक्की होते..राज प्रत्येक ठिकाणी प्रत्येकालाच वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोचला होता. अगदी देवदूत असल्यासारखा..त्याचे जीवनकार्य आता कदाचित तेच होते!

क्रमशः

©®अमित मेढेकर

🎭 Series Post

View all