May 24, 2022
प्रेम

अमरप्रेम (मृत्यूशी झुंजणारी प्रेमकथा)

Read Later
अमरप्रेम (मृत्यूशी झुंजणारी प्रेमकथा)
आशुतोषला पाऊस खूप आवडायचा.

पावसाळा आला रे आला, की काय करू नि काय नको असं व्हायचं त्याला. ढगांना हात लावायला पहाडावर ट्रेकिंगला जायचा, भर पावसात बाईकवर लॉन्ग ड्राईव्हला निघायचा.

कधी झरझर वाहणारा झरा, कधी बेभानपणे खळखळणारा धबधबा, कधी धरणाच्या दारांतून कोसळणाऱ्या दुग्धधारा; हे सगळं तो मंत्रमुग्ध होऊन त्याच्या पाणीदार डोळ्यांनी टिपत राहायचा. ते बघतांना त्याच्या डोळ्यांत एक वेगळीचं चमक असायची; एखाद्या निरागस बाळाच्या डोळ्यांसारखी.

तो मूळचा नागपूरचा. पावसावरच्या प्रेमापायी त्याने नागपूर सोडून मुंबई गाठलं आणि इथेच नोकरी मिळविली. ह्याउलट मी, मूळची भरभरून पावसाची देणगी मिळालेल्या कोकणची, पण मला पाऊस म्हणजे वैताग वाटायचा. पाऊस म्हणजे सगळीकडे चिखलचं चिखल, ओले कपडे, छत्रीचे ओझे, दमट वातावरण, मरगळ आणि दिवसभर काळ्याकुट्ट ढगांनी पसरवलेला रात्रीसमं अंधार.

आशुतोष आणि मी एका कॉमन फ्रेंडच्या घरी अश्याच एका पावसाच्या दिवशीचं भेटलो आणि मग भेटतंच गेलो. त्याची आणि माझी मैत्री कधी आणि कशी झाली हे कळलंच नाही.

अश्याच एका पावसात भिजलेल्या रविवारी तो घरी आला नि आपल्या नागपुरी शैलीत म्हणाला, "चल वं पोट्टे, आज तुले वर स्वर्गात नेतो."

त्याच्यातला विदर्भवासी अधूनमधून वऱ्हाडी बोलून जागा व्हायचा.

"अरे बापरे! डायरेक्ट स्वर्गात. तू बाजीगर मधला शाहरुख तर नाही ना? आपली काही खानदानी दुश्मनी वगैरे आहे की काय; ज्यामुळे शिल्पा शेट्टीप्रमाणे मला तू स्वर्गात पाठवण्याचा प्लॅन बनवतो आहेस."

"हट्ट! स्वर्ग आणि तू? स्वतःच्या कर्माचा पाढा वाचलाय कधी? अगं तुला शंभर टक्के नरकचं मिळणार आहे ह्याची गॅरन्टी देतो मी. मेल्यावर तर नरकातच जाशील म्हणून आता जिवंतपणी तरी एकदा स्वर्ग बघून घे."

"नालायका! मेल्या! गाढवा! मुर्खा!" मी रागाचा आव आणून त्याला शिव्या मारल्या.

"खतरनाक! खतरनाक दिसतेस तू गौरी रागात."

"काय?" मी एवढी वाईट का दिसतेय हे आरश्यात बघायला गेले.

"अव्व माय! खतरनाक म्हणजे लय भारी, किलर, टप्पा, झकास म्हणजेच तुमच्या भाषेत अतिसुंदर. आम्ही नागपुरवाले त्याला खतरनाक म्हणतो." शेवटी त्याने माझ्याकडे बघून त्याचा उजवा डोळा मारला.

मी लाजून मान खाली घातली.

आशुतोष म्हणायचा तुम्हा कोकणवाल्यांच्या शिव्याही स्तुतीसुमनांचा वर्षाव वाटतात आणि आम्हां विदर्भवासियांची स्तुतीही शिव्यांसम भासते. हे मात्र खरं होतं.

अखेर मी त्या भर पावसात ट्रेकिंगला जायला तयार झाले. शेवटी आशुतोष होता तो; माझा नकार होकारात कसा बदलायचा हे त्याला बरोबर ठाऊक होतं.

आम्ही गडावर पोहोचलो तेव्हा सगळीकडे ढगंच ढग, धुकेच धुके. खरंच तो स्वर्गचं भासत होता. स्वप्नंच जणू. धूसर धूसर ओले वातावरण, बाजूला कोसळणाऱ्या धबधब्याचा सतत येणारा आवाज, वरून कोसळणाऱ्या अमृतसरी. थोड्या अंतरावरचे ही दिसत नव्हते. धबधब्याच्या आवाजाशिवाय दुसरे काही ऐकू येत नव्हते.

आशुतोष वेड्यासारखा त्या ढगांना हातात पकडून बघत होता.

आशुतोष बेधुंद होऊन त्या पावसाच्या सरी बघत होता तर मी आशुतोषला.

असं वाटलं जणू त्या क्षणी, त्या मऊ ढगांच्या चादरीत; फक्त तो, मी आणि आमच्या भावना आहेत, इतर काहीही नाही. त्याच्या विखुरलेल्या केसांच्या कुरळ्या बटांवरचा, एक एक पावसाचा मोती टिपत, माझे मन नागमोळी वळणं घेत; त्याच्या गहिऱ्या, पाणीदार, चमकणाऱ्या डोळ्यांच्या खोल डोहात जाऊन बुडत होते. हा सुंदर प्रवास कधीच संपू नये असे वाटत होते. त्या डोहातून मी कधीच बाहेर पडू नये असे वाटत होते.

तेवढ्यात त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. मी कावरीबावरी झाले आणि मान खाली घातली. दुसऱ्याचं क्षणी वर बघितले तेव्हा आशुतोष माझ्या अगदी जवळ आला होता. मी पुन्हा त्याच्या मोहिनी घालणाऱ्या डोळ्यांत हरवले. असं वाटलं त्या क्षणी ते दोन डोळेचं तेवढे आहे ह्या जगात, बाकी काहीही नाही आणि मग अजान वेळी त्याने माझ्या ओठांवरचे पाण्याचे थेंब टिपले आणि मी त्याच्या ओठांवरचे अमृत.

त्या आधी मला पाऊस इतका कधीच भावला नव्हता. तेव्हापासून मी प्रेमात पडले आशुतोष आणि त्याचा पाऊस, ह्या दोघांच्याही. त्यानंतर एका वर्षानी आम्ही लग्नबंधनात अडकलो. सगळं कसं एखाद्या परिकथेप्रमाणे घडत होतं. आशुतोष मला अगदी फुलाप्रमाणे जपत होता. बाहेरची कुठलीही कामं, बँकेचे व्यवहार वगैरे वगैरे त्याने माझ्यावर कधीचं येऊ दिले नाही. तो तिथे मी आणि मी तिथे तो. त्यामुळे कुठेही त्याच्यासोबतचं जायचे. कार चालवणं शिकण्याची सुद्धा गरज भासली नाही. फक्त ऑफिसमध्येचं तेवढं मी लोकलने जायचे. प्रत्येक गोष्टीसाठी मी आशुतोषवर अवलंबून राहायचे.

मी खूप सुखात होते आणि ह्या सुखाला माझीच नजर लागेल की काय? असं वाटायचं कधी कधी, शेवटी लग्नाच्या दोन वर्षांनी तो दिवस उजाळलाचं.

तारीख होती २६ जुलै २००५.

मी त्या दिवशी दादरमध्ये असलेल्या माझ्या ऑफिसमध्ये होते तर आशुतोषने पाठदुखीमुळे सुट्टी टाकली होती. त्यामुळे तो कांदिवलीला म्हणजे आमच्या घरी आराम करत होता.

दुपारी दोन वाजतापासून मुसळधार पाऊस सुरु झाला तो वाढतच गेला. मुंबई पाण्याखाली बुडू लागली होती. ट्रेन्स, टॅक्सी सगळं ट्रान्सपोर्ट बंद, फोन लाईन्स बंद. रात्र होऊ लागली.

ऑफिसमधले आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघत होतो. मला आशुतोष कसा असेल, ही काळजी वाटत होती. रस्त्यावरचं पाणी ऑफिसमध्ये शिरू लागलं. पाऊस अजूनच रौद्ररूप धारण करत होता. आम्ही सगळे खुर्च्यांवर पाय जवळ घेऊन बसलो. नंतर टेबलं वर बसलो. पाणी गळ्यापर्यंत येऊ लागलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. पाणी नाकापर्यंत आलं. मरण डोळ्यांसमोर दिसत होतं. मला फक्त एकदाचं शेवटचं आशुतोषला बघावंसं वाटत होतं. मी डोळे बंद केले; त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आला.

नंतर श्वास घेण्यासाठी त्या पाण्यात मी धडपडू लागले, वर राहण्यासाठी हातपाय मारू लागले. त्यानंतरचं मात्र काहीच आठवत नाही…

एकदम जीव गुदमरून आला नि मी श्वास घेण्यास तोंड उघडले. मला जाग आली. मी एका हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या डोळ्यांसमोर नखशिखांत भिजलेला आशुतोष होता.

कांदिवली ते दादर तो न जाणे कसा, काय काय सहन करून रात्रभर चालत, पोहत मला शोधायला आला होता. त्याचे केस, कपडे ओलेचिंब झालेले. कुठे कुठे शर्ट मळलेला तर फाटलेलाही होता. डोळ्यांत थकवा, झोप स्पष्ट दिसत होती.

मला शुद्धीवर आलेलं बघून, तो त्याच्या केविलवाण्या अवस्थेतही हसला आणि दुसऱ्याच क्षणी त्याचे डोळे भरून आले. त्याने समोर झुकून माझ्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा त्याचे अश्रू प्रेमाचा वर्षाव करत माझ्या चेहऱ्यावर पडत राहिले, किती तरी वेळ...

त्यानंतर काही दिवसांनी..

मुंबई हळूहळू पुन्हा रुळावर आली. त्या पुराचं वादळ शमलं होतं पण आमच्या आयुष्यात मात्र नवीन वादळाने थैमान घातलं होतं.

त्या पुरानंतर आशुतोष अधूनमधून आजारी पडू लागला. माझ्यासोबत खूप विचित्र पद्धतीने वागू लागला. लहानसहान गोष्टींवरून त्याची चिडचिड होऊ लागली. मला बाहेरच्या कामात मदत करणेही त्याने सोडले होते.

कुठे बाहेर जाऊ म्हटलं की "ट्रॅफिक मुळे गाडी चालवावीशी वाटत नाही. तूच का गाडी शिकून घेत नाहीस?" असं म्हणायचा. शेवटी एक दिवस चिडून मी ड्राइविंग क्लास सुरु केला. हळूहळू बँकेची कामं, विजेचं बिल, टेलिफोन बिल, गॅस सिलेंडर आणणे; ही सगळी कामं मीच करू लागले. मी बऱ्यापैकी स्वावलंबी झाले.

ह्या सगळ्या कामांपेक्षाही सगळ्यात जास्त खटकायला लागलं, ते आशुतोषने मला दूर करणं. तो मला त्याच्या जवळही येऊ देत नव्हता; जणू त्याचा माझ्यातला इन्टरेस्टच संपला होता. मला त्याच्यावर शंका यायला लागली तेव्हा मी त्याचा मोबाईल चेक करणं सुरु केलं. त्यातून लक्षात आलं की तो सतत एका नर्सच्या, रेश्माच्या संपर्कात होता.

रेश्मा, आम्हाला मुंबईत आलेल्या पुरानंतर मी ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, तिथेच भेटलेली. दिसायला ती माझ्यापेक्षा सुंदर होती.

ते दिवस मन गुदमरुन टाकणारे होते.

आशुतोष असं काही करेल असं स्वप्नातही मला कधी वाटलं नव्हतं. पण मला काहीही करून आशुतोषला परत मिळवायचं होतं, म्हणून मी धडपडू लागले. त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू लागले पण सगळं व्यर्थ वाटत होतं.

असंच एक वर्ष गेलं. पुन्हा पावसाळा आला.

एके दिवशी, मी आशुतोषला ट्रेकिंगला चलण्याचा आग्रह करू लागले.

"नाही म्हणजे नाही. मला कुठेच यायचं नाही आहे." तो ठामपणे म्हणाला.

"आशु, प्लीज चल ना. अरे, तुलाचं आवडायचा ना पाऊस. चल ना, तुझा मूड फ्रेश होईल; ढगात गेल्यावर, स्वर्गात गेल्यावर." मी हसत म्हणाले.

"नाही म्हटलं ना एकदा. मला कंटाळा आलायं आता पावसाचा.." तो चिडून म्हणाला.

"कंटाळा! हो रे..बरोबर आहे. तुला खरंच कंटाळा आलायं, पावसाचा आणि माझाही." मी कसेतरी अश्रू रोखून बोलले आणि दुसऱ्या रूममध्ये निघून गेले.

एके दिवशी, मनात विचार आला की, रेश्माला जाऊन भेटावं. "आशुतोषला सोडून दे" असं मागणं तिच्याकडे मागावं. खरंच, जावं का मी तिच्याकडे? ती ऐकेल का माझं? दुसरं मन म्हणालं, सेल्फ रिस्पेक्ट नावाची काही गोष्ट आहे की नाही. असं कसं मी कुणाच्या गयावया करायला जाऊ शकते?

पण माणसाला मरण डोळ्यांसमोर दिसू लागलं की तो प्रत्येक श्वासासाठी धडपड करू लागतो. जमेल ते प्रयत्न करू लागतो. तसंच माझं त्यावेळी झालं होतं.

आशुतोष म्हणजे माझं जीवन आणि त्याच्यासोबत प्रत्येक क्षण जगण्यासाठी मी जमेल ते करू लागले. त्यातला शेवटचा प्रयत्न मी त्या दिवशी करायचे ठरवले. मी रेश्माला भेटायचे ठरवले.

मी आशुतोषच्या मोबाईल मधून तिचा नंबर घेतला. सगळी हिम्मत एकवटून तिला कॉल केला. तिने फोन उचलला. थोडा वेळ काय बोलावे कळतंच नव्हते. दुःखाचा आवंढा गिळून, कसंबसं स्वतःला सावरून, मी तिला भेटायचं आहे असं सांगितलं. तिनेही जसे काही तिला अपेक्षितच होते की मी फोन करणार, अश्याप्रकारे उत्तर दिले. लगेच भेटायलाही तयार झाली. तिने मी आशुतोषची बायको म्हटल्यावर लगेच मला ओळखले. म्हणजे मी जो विचार करत होते ते खरं निघालं. असं वाटलं होतं की हा फक्त माझा गैरसमज निघावा, भ्रम निघावा पण...

मी सगळं बळ एकवटून, मनाला सावरून तिला एका कॅफेमध्ये भेटले. दुपारची वेळ असल्यामुळे तिथे दोन तीन लोकं होते. त्यांचं भान न ठेवता, तिला विनवण्या करू लागले, रडू लागले, हात जोडू लागले. ती मात्र जसं काही झालंच नाही, तिला काहीच समजतच नाही आहे असं दाखवत होती. शेवटी मी शांत झाले; तेव्हा तिने मला पाण्याचा ग्लास दिला.

"तुम्ही जे काही समजताय तसं काहीच नाही. तुम्ही जेव्हा मला फोन केला होता; तेव्हा मला वाटलं होतं की, आशुतोष सरांच्या तब्येतीबद्दल तुम्हाला विचारायचं असेल."

"काय झालंय आशुतोषच्या तब्येतीला?"

"म्हणजे आशुतोष सरांनी तुम्हाला काहीच सांगितले नाही. आशुतोष सर माझ्यासाठी फक्त एक पेशंट आहेत आणि मी त्यांच्यासाठी एक नर्स. ते अपॉइंटमेंट घेण्यासाठी मला फोन करतात. बाकी कशाचंसाठी नाही."

"कसली अपॉइंटमेंट? काय झालंय त्याला. म्हणजे ताप, खोकला वगैरे असतो त्याला नेहमी, पण त्यासाठी कुणी सतत डॉक्टरकडे जात नाही."

ती काहीच बोलली नाही आणि मग म्हणाली,

"मी जे सांगतेय ते शांतपणे, मन खंबीर करून ऐका मॅडम. मुंबई पाण्यात बुडाली होती तेव्हा, तुम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतात. त्याच दिवशी पूल कोसळल्यामुळे खूप लोक गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते, ते आठवतंय का?"

मी त्यादिवशीचा सगळा घटनाक्रम आठवू लागले. त्यादिवशी पूर्ण हॉस्पिटलमध्ये गोंधळच गोंधळ होता. जखमी झालेली लहान मुलं, मोठी माणसं आणल्या जात होती. बेड कमी पडत होते. जिथे जागा मिळेल तिथे जखमींना टाकल्या जात होते. सगळीकडे आरडाओरडा, रडण्याचे विव्हळण्याचे आवाज ऐकू येत होते.

“हो. आठवतंय मला, पण त्या गोष्टीचा आता काय संबंध?”

"सांगते. ऐन त्याच वेळी हॉस्पिटलमधल्या ब्लड बँक मधले रक्त संपल्यामुळे, आम्ही चांगल्या अवस्थेत असलेल्या लोकांना रक्तदान करण्यासाठी विचारू लागलो. त्यावेळी आशुतोष सरांनी पण ब्लड डोनेट केले होते."

"केलं असेल. मग त्यात काय झालं?"

“त्यावेळी त्यांचं रक्त तपासण्यासाठी आमच्यातल्याच एका स्टाफ मेंबरच्या निष्काळजीपणामुळे आशुतोष सरांना एचआयव्ही संक्रमित सुई टोचण्यात आली. त्यानंतर ते वारंवार आजारी पडायला लागले. त्यामुळे त्यांच्या ब्लड टेस्ट केल्या गेल्या आणि त्यात त्यांना एड्स झाल्याचं लक्षात आलं. ते चिडून आमच्या हॉस्पिटलमध्ये आले. ओरडू लागले, रडू लागले. मीच त्यावेळी त्यांना शांत केलं. "माझ्या गौरीचं आता काय होईल? ती आता माझ्याशिवाय कशी राहिलं?" अशी सतत तुमची आठवण करू लागले.

मला त्यांच्याबद्दल खूपच सहानुभूती वाटू लागली; म्हणून मी त्यांच्या संपर्कात राहू लागले. ते तुमच्यावर खूप प्रेम करतात हो मॅडम. आपण स्वतः आता जास्त जगणार नाही ह्यापेक्षाही जास्त दुःख, ते गेल्यावर तुमचं काय होईल? ह्याचं त्यांना आहे. त्यांच्याकडे आता जास्तीत जास्त एक वर्ष आहे." रेश्माचा आवाज हे सांगतांना थरथरत होता.

मी सुन्न झाले. पूर्ण शरीर, मन, हृदय बधीर झाल्यासारखे वाटत होते. रस्त्याने सर्व प्रसंग आठवत गेले. त्याने मला बँकेचे, बाहेरचे व्यवहार करण्यास भाग पाडले होते; ते मला त्याच्याशिवाय जगण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी. गाडी शिकण्यास भाग पाडले ते मला तो नसतांनाही स्वावलंबी बनवण्यासाठी. मी मात्र त्याच्यावर, त्याच्या प्रेमावर अविश्वास दाखवला, संशय घेतला. तो गेल्या एका वर्षात कशाकशातून गेला असेल तरिही त्याने मला हे सगळं कधीच जाणवू दिलं नाही.

तश्याच सुन्न अवस्थेत घरी गेले, तेव्हा आशुतोष किचनमध्ये पाणी पित होता. मी त्याला जाऊन बिलगले. त्याला माझ्या मिठीत घट्ट बांधून घेतले. "का? आशु का? का लपवलंस माझ्यापासून?" आणि त्या क्षणी इतका वेळ रोखून ठेवलेले मन, दुःखाने भरून आले आणि डोळ्यांतून बरसू लागले. आशुतोषही त्याचे अश्रू आवरू शकला नाही. आम्ही दोघेही आमच्या दोघांच्या अश्रूंच्या पावसात भिजत राहिलो, किती तरी वेळ..

पुढे एका वर्षाने, जुन महिन्यात आशुतोष खूपच आजारी पडला म्हणून त्याला ऍडमिट करावे लागले. सुट्या मिळत नव्हत्या म्हणून मी ऑफिसच्या आधी आणि नंतर हॉस्पिटलमध्येच रहायला लागले.

आशुतोष दिवसेंदिवस खूपच कृश दिसायला लागला होता. हातपाय बारीक झाले होते, शरीरात त्राण उरला नव्हता. डोळे थकलेले दिसत होते. मी त्याच्या रूममध्ये गेले की, त्याच्या डोळ्यांत चमक यायची, ओठांवर सतत हास्य असायचे. एक दिवस ऑफिसमधून निघतांना अचानक पाऊस आला नि मी त्या पावसात ओलीचिंब झाले. तशीच हॉस्पिटलला गेले.

"अरे वा! आज पाऊस आणला आहेस तू माझ्यासाठी." मी नुसतीच हसले.

"गौरी, मला एकदा दे ना पाऊस परत. मला दाखव ना तो ढगातला स्वर्ग पुन्हा एकदा."

मला ह्यावर काय बोलावे सुचलेच नाही. मी निःशब्द राहिले, कारण आशुतोषला त्या अवस्थेत बाहेर नेणे शक्य नव्हते. मी त्याच्याजवळ गेले नि त्याच्या चेहऱ्यावर थोडी झुकले. माझे चिंब ओले केस त्याच्या चेहऱ्यावर नेले. त्याच्या चेहऱ्यावर अंधार पडला नि मग मी माझे केस थोडे झटकले. माझ्या केसांतील पाऊस त्याच्या कुरळ्या केसांवर, चेहऱ्यावर, ओठांवर एकदम बरसला आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलले.

मी समोर झुकून त्याच्या ओठांवरचे ते अमृताचे थेंब टिपले. त्या क्षणी तिथे फक्त तो, मी आणि आमचे दोन धडधडणारे हृदय, एवढेच अस्तित्वात आहेत असेच वाटत होते. त्याच रात्री आशुतोष हे जग कायमचं सोडून गेला पण माझ्या मनात कायम जिवंत राहिला.

तो गेल्यावर नर्स रेश्मा ह्यांनी मला एक चिठ्ठी आणून दिली.

"अय पोट्टे, जास्त रडायचं नाही आता. आता पोहोचलो मी स्वर्गात. तुले स्वर्ग मिळणार नाहीच पण फिकीर नॉट. मी शिफारस करतो तुह्यासाठी इथं. तुह्याही पत्ता एक दिवस कट होणारच आहे. तोपर्यंत मजा करून घे. मग भेटीनच मी.. इथं स्वर्गात.

फक्त येतांना थोडा पाऊस घेऊन येशील माझ्यासाठी, तुझ्या केसांत बांधून. तिकडे कधी पाऊस आला तर समजून जाशील मी आलोय म्हणून, तुला भेटायला. काळजी घे..

तुझाच आशु.."

गौरीचे डोळे भरून आले.

तेव्हाच गॅलरीत अचानक पाऊस पडू लागला. गौरी पावसाच्या रूपात आलेल्या आशुतोषच्या प्रेमात स्वतःभोवती, गिरक्या घेत, नखशिखांत ओली होत राहिली, कितीतरी वेळ....
समाप्त.
-निशा अडगोकर रसे
अश्याच प्रेमाच्या वेगवेगळ्या रंगात रंगलेल्या कथा वाचण्यासाठी ईरा मार्केट प्लेसवर माझं "दुनिया प्रेमाची" हे पुस्तक नक्की घ्या आणि वाचा. हे पुस्तक ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरही उपलब्ध आहे.

प्रेम काय असतं?

कुणासाठी कधीही न संपणारी वाट..

तर कुणासाठी आयुष्यभराची साथ..

कुणासाठी प्रेम असतं जगण्याचं कारण..

तर कुणाला कबूल असतं प्रेमासाठी मरण..

कुणाला प्रेमात सुकून सापडतं..

तर कुणाला ते बैचैन करून सोडतं..

कुणाला ते अनुभवता येतं दुराव्यातही..

तर कुणाला दिसत नाही ते जवळ असूनही..

कुणाचं प्रेम असतं अल्लड, अवखळ नदीसारखं..

तर कुणाचं असतं शांत, गहिऱ्या तळ्यासारखं..

प्रेम अनुभवायचं असतं, कधी शब्दांतून, कधी नजरेतून, कधी स्पर्शातून, कधी दुराव्यातून..

प्रेमाच्या अश्याच वेगवेगळ्या छटांचा अनुभव देईल ही “दुनिया प्रेमाची”..ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Nisha Adgokar Rase

Writer, Blogger, Poetess, Teacher

Award winning blogger, Published my first book "दुनिया प्रेमाची"