अमरत्व

This article is about what immoratlity is due to the greatest work.

अमरत्व !

"किशोर कुमार हा त्याच्या आवाजाने कायम अमर आहे!" आपण अगदी सहज म्हणतो.

"छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे किर्तीरूपी सदैव अमर आहेत" आदराने,  भक्तीने आपण कायम उच्चारतो.

अमरत्व हे नक्की काय आहे हे आज मी थोडे माझ्या पद्धतीने बोलतो.

महाभारतातील द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा हा चिरंजीवी आहे आणि आजही तो लोकांना दिसतो. त्याच्या मणी काढल्याने कपाळावरून भळभळणारी जखम ही कायम ओली राहील हा त्याला श्राप आहे त्यामुळे त्या जखमेला औषध म्हणून तो लोकांना तेल मागतो असे म्हणतात. तो दिसल्याचे  आणि प्रत्यक्ष भेटल्याचे अनुभव काही लोकांनी सांगितले आहेत.

पवन पुत्र भगवान हनुमान- मारुती हे सुद्धा अमर आहेत असे म्हणले जाते.

राजा बळी, ऋषी परशुराम, महाराज विभीषण, ऋषि व्यास, ऋषीकृपाचार्य हे भारतीय इतिहासातील अशी काही नावे आहेत ज्यांना अमर म्हणले जाते.

तर हे झाले आयुष्याने मिळालेले अमरत्व!

आपल्या सारख्या सामान्य मनुष्याच्या जीवनात हे शक्य नाही पण असे काही आपण नक्कीच करू शकतो की आपले नाव आपले अस्तित्व हे अमरत्वाला जाऊ शकते.

आता हेच बघा वरील उदाहरण... प्रसिद्ध गायक किशोर कुमार त्यांच्या आवाजाने कायम अस्तित्वात असणार ते त्यांनी गायलेल्या सदाबहार गाण्याने!

मदर तेरेसा ह्या त्यांच्या समाजकार्याने कायम लोकांच्या मनात घर करून राहतील.... हे पण अमरत्व जे कार्याने मिळाले.

असे अनेक खेळाडू कलाकार  आहेत की जे त्यांच्या कलेने गुणाने कायम लोकांच्या मनात आणि इतिहासात आपले नाव कोरून राहतील.

जेव्हा स्त्री शिक्षण हा विषय उच्चारला जाईल तेव्हा कायम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावे घेतली जातील कारण स्त्री शिक्षणाचा पाया हा त्यांनी घातला.

झाशीची राणी लक्ष्मीबाई , महाराणा प्रताप, भगतसिंग, सुखदेव,राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस असे अनेक व्यक्ती आहेत जे त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने, बाणेदारपणाने आणि बहादुरीने अमर झाली आहेत.

आपल्या आजूबाजूला अनेक संस्था आहेत ज्या आपल्यापैकी कोणी लोक चालवतात..या संस्था आपल्या कार्याने लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात, अंधश्रद्धा निर्मूलन करतात, स्त्रियांना समाजात स्थान मिळवून देतात, अनाथ आणि वृद्धांना आधार मिळवून देतात मग त्यांचे हे काम सतत पुढे चालवणे हे अमरत्व नाही का?

अमरत्व हे फक्त आयुष्य मिळण्याने किंवा भरपूर आयुष्य मिळाल्यानेच होते असे नाही तर ते आपले नाव कार्यरूपाने जिवंत  ठेवण्याने सुद्धा मिळते.

काही महापुरुष आपल्या कार्याने अमर आहेत. कितीही काळ पुढे गेला अगदी पिढ्या बदलल्या म्हणालेत तरी त्यांचे अस्तित्व हे अमर असेलच.

देव असे ज्याला आपण म्हणतो तो पूजेचा भुकेला किंवा नैवेद्याचा भुकेला नाही तर तो आहे तुमच्या भावनेचा भुकेला. चांगले वागा, चांगले चिंता, चांगले करा तो तुम्हाला आशीर्वाद देईल हे नक्कीच.

आपल्या मिळकतीच्या साहाय्याने आपण जर आपण आपल्या आई असो अथवा वडील यांच्या नावाने जर काही चांगले कार्य आरंभ केले आणि त्याला पुढे नेण्याची वृत्ती आपल्या पुढच्या पिढीत निर्माण केली तर आपण आपल्या आईवडिलांचे नाव सुद्धा अमरच करतो.

कार्याने, कृतीने, वागण्याने असंख्य लोक कायम आपली छाप सोडून गेले आहेत जे पिढी दरपिढी आजही जगात लक्षात आहेत.
आपला भारत देश हा तर खूप प्रगल्भ आहे आणि इतिहासातील अश्या अनेक घटना, लोक आहेत जे कायम अमर आहेत.
त्यांच्या कार्याने ते अमर झालेच ना!

मी तर म्हणेन आयुष्य मोठे का छोटे हे महत्वाचे नाही पण ते जगले कसे आणि इतरांना जगवले कसे हे महत्वाचे ते महत्वाचे.

मला कायम वाटते की जे अमरत्व हे कार्याने मिळाले तर ते आयुष्य असलेल्या अमरत्वापेक्षा काही वेगळे नाही.

काय पटतंय का..?

©®अमित मेढेकर