आमचं वेगळं आहे.. भाग ९

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग ९

मागील भागात आपण पाहिले की सानवी आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाची पूजा होते. आता बघू पुढे काय होते ते.


" फ्रेंड्स?" सानवीने हात पुढे केला.

" मी कोणाशी मैत्री करत नाही." तो रुक्षपणे बोलला. सानवीचा चेहरा उतरला.

" हो.. मैत्री नसेलच आवडत करायला. तुमची आवड वेगळीच असेल ना. मी नाही बोलत तुमच्याशी. जाते झोपायला. यायचा तो येऊ दे संशय आईबाबांना.." सानवी उठू लागली. अनिरुद्धने पटकन तिचा हात धरला. सानवीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचा हात असाच हाती रहावा असे वाटत होते.

" सॉरी." अनिरुद्ध आर्जवी स्वरात बोलला.
राग आलेला असूनही मनाविरुद्ध सानवी खाली बसली.

" एक विचारू?" अनिरुद्धने विचारले. सानवीने मान हलवली.

" हा नाकाचा शेंडा नेहमीच लाल असतो का?" अनिरुद्धच्या चेहर्‍यावर भाव गंभीर असले तरी आवाजात खट्याळपणा जाणवत होता.

" हो.. समोर कारल्यासारखी कडू माणसे असली की नेहमीच." सानवीने टोला दिला.

" मी कारल्यासारखा कडू?"

" त्याच्यापेक्षाही जास्त.. का मी तुम्हाला लग्नाचे विचारले माझे मलाच समजत नाही." सानवी मस्करीच्या मूडमध्ये होती.

" तुम्हाला पश्चाताप होतोय का?" अनिरुद्ध गंभीर झाला.

" ए प्लीज यार.. एकतर तू गंभीर असतोस नाहीतर चिडलेला.. सॉरी.." सानवीने जीभ चावली.

" अरेतुरे चालेल मला." अनिरुद्ध म्हणाला.
" आता चिडचिड खूप झाली. आपण थोडं शांतपणे बोलूयात का? नाहीतर रात्र अशीच भांडणात निघून जायची."

" बोला.."

" मला सांगा.. बाबांना नक्की काय झाले आहे? आणि कंपनी तुम्ही का चालवता आहात?"

सानवी थोडी चुळबुळली. तिची अस्वस्थता बघून अनिरुद्धला कसेतरी वाटले.

" अवघड वाटत असेल तर नका सांगू." तो म्हणाला.

" सांगते.. तसेही तुम्ही घरी राहणार म्हणजे तुम्हाला माहित हवेच. ही कंपनी म्हणजे बाबांचे मोठे मूल म्हणूनच आई बोलायची. प्रतिकूल परिस्थितीतून बाबांनी ही कंपनी उभी केली. खूप छान चालू लागली कंपनी. त्यातूनच बाबांनी हे घर घेतले. खूप छान आयुष्य सुरू होते आमचे.. आणि.." सानवीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

" आणि काय?" अनिरुद्धने विचारले. सानवी जुन्या आठवणीत एवढी गुंतली होती की अनिरुद्धने तिचे कधी डोळे पुसले हे ही तिला समजले नाही.

" आणि बाबांच्या हातून ती चूक घडली. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते. बाबांचा खूप जवळचा मित्र होता. कंपनी अजून मोठी करू असं सांगून त्याने बाबांना भूल पाडली. सचोटीने व्यवसाय करणारे माझे बाबा त्याच्या बोलण्यात कसे आले समजलेच नाही. त्याने कंपनीमध्ये खूप घोटाळे केले. कंपनी आणि घर आईच्या नावावर असल्यामुळे तो तिथे काही करू शकला नाही. भरपूर देणी करून तो पळून गेला. हा सगळा धक्का बाबा सहन करू शकले नाही. आमच्यापेक्षा जास्त प्रेम होतं त्यांचं या कंपनीवर.. ती अक्षरशः विकण्याची वेळ आली होती. ज्यांना आम्ही आपले समजत होती ती सगळी जवळची माणसे आपल्याला त्रास नको म्हणून आधीच दूर झाली. बाबांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना हा ताण सहन नाही झाला. डॉक्टरांनी तर त्यांची आशाच सोडली होती. आई कोलमडून गेली होती. पार्थ शाळेत होता. तो ही घाबरला होता. मग मीच हिंमत केली. काल जे आले होते ते सगळे बाबांचे सहकारी होते. त्यांनी मला खूप मदत केली. त्यांच्या मदतीने मी कंपनीला वर आणण्याचा प्रयत्न केला. आता हे जे काही दिसतं आहे, ते फक्त त्यांच्या मदतीमुळे. पृथा सोडली तर माझ्या जवळचे असे कोणीच नाही. एकटे एकटे पडलो आहोत आम्ही सगळेच." बोलता बोलता सानवी कधी अनिरुद्धच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली तिला समजलेच नाही. त्याने तिला रडू दिले. हळूच त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला. सानवी भानावर आली. त्याच्यापासून दूर झाली.

" सॉरी..."

" कशासाठी?"

" मी तुमचा खांदा ओला केला. पण हा विषय घरात कोणीच काढत नाही. पृथाचं लग्न झाल्यानंतर आमचं भेटणंच कमी झालं आहे..खूप दिवसांनी कोणीतरी हा विषय काढला तर मी स्वतःला आवरू शकले नाही." सानवी डोळे पुसत बोलली.

" दिसते आहे ना?" अनिरुद्धने विचारले.

" म्हणजे?" सानवीला आश्चर्य वाटले.

" आधीच चष्मा. त्यात हे एवढं रडणं.. मग दिसतं आहे ना?"

" अनिरुद्ध.. तुम्ही पण.." सानवीने त्याला मारायला हात उचलला. त्याने तो वरचेवर धरला. या सगळ्यात दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले होते. दोघांचाही श्वास वाढला होता.

" झोपा आता.. शांत.." सानवीचा हात सोडत हळूवार आवाजात अनिरुद्ध बोलला. सानवीही पाठी झाली आणि झोपायला गेली.


सानवीने डोळे उघडले. बाजूला बघितले तर अनिरुद्ध नव्हता.

" हा झोपतो कधी आणि उठतो तरी कधी?" सानवी विचार करत असतानाच अनिरुद्ध आत आला.

" सकाळी लवकर उठून कुठे जाता, विचारू का?" सानवीने विचारले.

" वर्क आऊट केल्याशिवाय मला चैन पडत नाही." घाम पुसत अनिरुद्ध बोलला.

" तरीच.." त्याच्या बिल्डकडे बघत सानवी बोलली.

" तरीच काय??"

" काही नाही.. मी आवरते.." सानवी उठू लागली.

"अनिरुद्ध.." बाहेरून शोभाताईंचा आवाज आला.

" पटकन उठा.." घाई करत अनिरुद्ध सानवीला बोलला. त्याने पटापट पलंगावरची फुले विस्कटली.. अंथरूण पसरवून ठेवली.

" आलोच काकू.." दरवाजा उघडत अनिरुद्ध म्हणाला.

" अरे, चहा देईपर्यंत तू आलास सुद्धा. उठली का सानवी?" शोभाताई शोधक नजरेने बघत होत्या.

" हो आई.. जस्ट उठतेच आहे."

" बरं.. आवरा लवकर. नाश्त्यासाठी बाबा थांबले आहेत. आणि अनिरुद्ध थँक यू.. कांदा चिरून देण्यासाठी. मी घेते पोहे करायला." शोभाताई हसत बोलल्या. त्या बाहेर जाताच दोघांनी सुटकेचा श्वास सोडला.

" ही आई पण.. कशी बघत होती." सानवी तक्रार करत पुटपुटली.

" ती चादर धुवायला टाका.." अनिरुद्ध बोलला.

" कालच तर नवीन टाकली आहे." सानवी बोलली. अनिरुद्धने डोक्यावर हात मारून घेतला.

" सांगतो ते ऐका.. पण तुम्हाला ऐकायची सवय नसेल ना कोणाची.. कंपनीची मालकीण आहात तुम्ही. तुम्हाला खरंच समजत नाही की न समजण्याचे नाटक करता आहात?"

" मी ना आताच झोपेतून उठले आहे.. काहिही समजण्याच्या मूडमध्ये नाही. तर या मूढ बालिकेला समजावण्याचे कष्ट घ्याल का?"

" काकू बघत होत्या की काल आपण नवराबायकोसारखे वागलो का?" अनिरुद्धचे बोलणे ऐकून मस्करीच्या मूडमध्ये असलेली सानवी लाजली.

" आई पण.."

" तुम्ही उठा.. मी आवरतो पटकन." अनिरुद्ध पलंगाजवळ येत म्हणाला.

" अनिरुद्ध.. "

" काय?"

" थॅंक यू.."

" इट्स ओके.."

आवरून सानवी आणि अनिरुद्ध बाहेर आले. बाहेर आईबाबा आणि पार्थ त्यांची वाट बघत होते.

" मग आजचा काय प्लॅन?" बाबांनी विचारले.

"आवरून झाले की ऑफिस.." सानवी पोह्याचा घास घेत म्हणाली.

" नक्की लग्न केलं ना तुम्ही?" आईने विचारले.

" आई परत परत त्याच झाडावर काय? म्हणजे एकच प्रश्न कितीवेळा?" सानवी वैतागली होती.

" चिडू नकोस.. पण लग्नानंतर नवीन जोडपे हनिमूनला वगैरे जाते. म्हणून ती बोलली." बाबा समजावत बोलले. ते ऐकून अनिरुद्धला ठसका लागला.

" त्याची काय गरज आहे. आधीच माझ्या सुट्टया झाल्या  आहेत. मीच अश्या दांड्या मारायला लागले तर कंपनी..."

" सानवी.. नाही.." बाबा थरथरत होते.
" ते शब्द तोंडातून काढू नकोस."

" बाबा.. हो.. नाही बोलत." सानवी अपराधीपणे बोलली.

"मी बोललो आहे सतीशशी.. तो म्हणाला सगळा स्टाफ करणार आहे ॲडजस्ट." बाबा बोलले. सानवी त्यावर काही बोलणार तोच अनिरुद्धचा फोन वाजला.

" हा आणि याचा ऐनवेळी वाजणारा फोन." सानवी मनात वैतागली.

" माझा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. मला अचानक गावी जायला लागते आहे." फोनवर बोलून झाल्यावर अनिरुद्ध अपराधी स्वरात बोलला.

" अरे मग चांगलं आहे की.. दोघेही तुझ्या घरच्यांना भेटून याल." आई आनंदाने बोलली.

" येताना फोटो काढून आणा. मला सुट्टी असती तर मी ही आलो असतो." पार्थ बोलला. अनिरुद्धने सानवीला विचारले. तिने खांदे उडवत होकार दिला.

काय असेल नक्की अनिरुद्धचे गावाला काम, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all