आमचं वेगळं आहे.. अंतिम भाग

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग २०


मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्धचे सत्य सानवीच्या आईबाबांना समजते. ते त्याला घराबाहेर काढतात. आता बघू पुढे काय होते ते.


" सानवी, नाश्ता करून जातेस ना?" शोभाताईंनी सानवीला आवाज दिला.

" मला भूक नाही." सानवीने तुटक उत्तर दिले.

" अग, काल रात्री पण जेवली नाहीस." शोभाताई काळजीने बोलल्या.

" मला भूक नाही."

" मग दूध तरी पी.. नाहीतर ज्यूस करून देते. "

" मला नको आहे. मी जाते ऑफिसमध्ये. भरपूर कामे आहेत." सानवी ऑफिसला जायला निघाली. ना तिने बाबांचा निरोप घेतला ना पार्थला बाय केले.

" काय अवस्था झाली आहे माझ्या लेकीची चार दिवसात. बघवत नाही तिच्याकडे." शोभाताईंना हुंदका फुटला.
प्रदीपरावांना पण सानवीकडे बघवत नव्हते. अनिरुद्ध घरातून गेल्यापासून सानवीने खाणेपिणे जवळपास बंद केल्यासारखे होते. घरी पण आपल्या खोलीत नुसती बसून असायची. ऑफिसला जाण्यापुरतीच ती बाहेर जायची. बोलत तर ती कोणाशीच नव्हती.

" काय मेल्याने जाताना जादू केली काय माहित? माझी सोन्यासारखी पोर अगदी सुकून गेली." शोभाताई परत रडू लागल्या.

" आई, जादू नाही केली. प्रेम केले दोघांनी एकमेकांवर. जे तुम्हाला समजले नाही. जोपर्यंत जिजू परदेशी जाऊन आले होते तोपर्यंत ते चांगले होते आणि ती बाई बोलून गेली तर लगेच वाईट झाले?" पार्थ चिडून बोलला.

" पार्थ, लहान आहेस तू? तुला काय समजतं?" आईने त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला.

" लहान असलो तरी कोण चांगलं कोण वाईट एवढं नक्की समजतं. तुम्ही ताईशी बोलायचे नाही म्हणालात म्हणून जिजू रोज मला मेसेज करून तिची तब्येत विचारतात. तुमची चौकशी करतात. अजून काय पाहिजे?" पार्थ पोटतिडीकेने बोलत होता.

" ते तू लहान आहेस म्हणून तुला त्याच्या जाळ्यात ओढतो आहे. " बाबा गुळमुळीतपणे बोलले.

" मी लहान, ताई लहान.. फक्त तुम्हीच मोठे आणि समजदार." पार्थही रागाने काहीच न खाता पिता तिथून निघून गेला. शोभाताई आणि प्रदीपराव एकमेकांकडे फक्त बघत बसले. न राहवून शोभाताईंनी एक फोन केला.

ऑफिसमध्ये सानवी नुसती बसून होती. ती एकतर तिच्या अंगठीकडे बघत असायची नाहीतर मोबाईल मधले तिचे आणि अनिरुद्धचे फोटो बघत असायची. तिने एकदोनदा अनिरुद्धला फोन करायचा प्रयत्नही केला. पण त्याने नाहीतर नाही फोन उचलला. ते आठवूनही सानवीला रडू आले.

" मॅम, आत येऊ का?" तिच्या सेक्रेटरीने विचारले.

" हो.. ये ना." डोळे पुसत सानवी म्हणाली.

" मॅम, एक पार्सल आलं आहे." सेक्रेटरी अडखळत बोलली.

" अग मग उघड ना." आवाजात सहजपणा आणण्याचा प्रयत्न करत सानवी बोलली.

" मॅम, कोणीतरी पालकसूप आणि कोल्डकॉफी विथ आईस्क्रीम पाठवलं आहे. ते स्पेशली तुम्हाला द्यायला सांगितले आहे. कोणी पाठवले आहे हे माहीत नाही.. काय करू?"

हे ऐकून सानवीच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पसरले.

" मला माहित आहे, कोणी पाठवलं ते. दे आणून."

" सानवी, आज भेटायचे का?" पृथाचा मेसेज आला.

" घरी काय सांगू?" सानवीने रिप्लाय केला.

" मी बोलते काकाकाकूंशी. तू ये आपल्या नेहमीच्या ठिकाणी." पृथाचा परत मेसेज आला. सानवीने काही न बोलता फोन ठेवला. ठेवताना तिने परत एकदा फोनकडे बघितले. तिचा आणि अनिरुद्धचा डोंगर चढताना राघवने काढलेला फोटो होता. सगळ्यांसमोर उचलून घेतल्याने थोडी लाजलेली तर थोडी घाबरलेली ती आणि तिच्याकडे प्रेमाने बघणारा तिचा अनि.

" कुठे आहेस रे तू? इतका कसा निष्ठूर झालास? साधं फोनवरही बोलायला महाग झालास?" सानवीचे मन आक्रंदले. तिने परत कसेबसे कामात लक्ष देण्याचा प्रयत्न केला.

" सानवी.. तूच आहेस ना ही?" पृथाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
सानवीने उगाच हसल्यासारखे केले.

" बोल, काय घेणार? तुझे नेहमीचे मागवू?" पृथाने विचारले. सानवी हो म्हणणार तोच तिला पहिली अट आठवली. तिचे डोळे पाणावले.

" नको.. मला ज्यूसच मागव."

" काय झालं आहे सांगशील का?"

" काही नाही सांगण्यासारखे. माझे आयुष्यच संपले आहे ग. ज्या आईवडीलांसाठी हे केलं त्यांना पसंत नाही. आणि ज्याला जीव लावला तो दिसतही नाही. कशी बाहेर पडू मी या सगळ्यातून? काय करू मी?" सानवी रडत बोलत होती.

" सानवी, तूच का नाही मग अनिरुद्धला भेटत?"

" साधा फोन उचलत नाहीये तो माझा. ना मेसेजला काही रिप्लाय देतो आहे. मला तर वाटते मी त्याच्यासाठी झुरूनच मरणार आहे." सानवी म्हणाली.

" मी मरू दिलं तर ना.." पाठून आवाज आला. विश्वास न बसून सानवीने पाठी बघितले. पाठी तो होता. अनिरुद्ध.. तिचा अनि.. तिला त्याचा खूप राग आला होता. तिला त्याला खूप मारायचे होते, खूप बोलायचे होते. पण ते काही न करता ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तो ही तिला थोपटू लागला.

" रडण्याचा कार्यक्रम इथेच पूर्ण करणार की बाहेर जाऊन उरलेला पार पाडणार?" अनिरुद्धने हसत विचारले.

" बाहेरच जाऊ. पृथा थँक्स अ टन." सानवी पृथाला मिठी मारत म्हणाली. " तुझ्याशी बोलते नंतर."

" चार दिवस फोनही उचलला नाहीस माझा आणि आज इथे?" सानवीने रागातच विचारले.

"काकाकाकूंनी तुझ्यापासून दूर रहायला सांगितले होते ना.. मग कसा उचलणार होतो फोन?" अनिरुद्धच्या आवाजातलं दुःख जाणवत होतं.

" मग आज अचानक?" सानवीने आश्चर्याने विचारले.

" समोर बघ.." समोर सानवीचे आईबाबा आणि पार्थ उभे होते.

" तुम्ही इथे?" सानवीला आश्चर्य वाटले.

" हो.. आम्हाला नाही बघवले तुझे हाल. तुझं ते अनिरुद्धसाठी झुरणं. समजलं आम्हाला तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते. आणि तो ही तुझ्यावर किती प्रेम करतो ते. आमची चूक झाली." शोभाताई बोलल्या.

" काकू , चूक झाली कसं म्हणताय? कोणत्या आईवडिलांना आपल्या मुलीचे लग्न अशा मुलाशी व्हावे असे वाटेल?" अनिरुद्ध खिन्नपणे बोलला.

" अनिरुद्ध खरंच नको तो विषय आता. तुम्ही दोघं एकमेकांसोबत सुखी असणं आम्हाला जास्त महत्तवाचे वाटतं." प्रदीपराव बोलत होते.

" हो.. चला आता घरी. माझी लेक चार दिवसांची उपाशी आहे. काही खाल्लेलं नाही तिने." शोभाताईंच्या डोळ्यात पाणी होते.

" आई, आम्ही घरी नाही येणार." सानवी ठामपणे बोलली.

" म्हणजे?" सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

" आईबाबा, तुमचा लग्नाचा आग्रह होता फक्त आणि फक्त म्हणूनच मला अनिरुद्धसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचे होते. पण हे नाटक सुरू व्हायच्या आधीच त्याच्या प्रेमात कशी पडले ते माझे मलाच समजले नाही. तुम्हाला सत्य स्थिती समजल्यावर आमचा राग येणे स्वाभाविकच होते. त्यामुळे तुम्ही चिडलात याचं वाईट नाही वाटलं मला. पण मला असं वाटतं आपण एकत्र राहिलो तर ही गोष्ट सतत आपल्याला त्रास देईल. त्यापेक्षा आम्ही अनिरुद्धच्या घरी राहिलो तर बरं पडेल."

" सानवी, आपण यांना सोडून का रहायचे?" अनिरुद्धने विचारले.

" उद्या पार्थचं लग्न झाल्यावर रहायला लागलंच असते ना? मग आज का नको? तसंही मी कंपनी, आईबाबा यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, करू शकणारही नाही. पण कुठेतरी मला तुझ्यासोबतही जगायचे आहे. ते ही तुझा मान राखून."

" अग पण." अनिरुद्धने बोलायचा प्रयत्न केला.

" बरोबर आहे तिचे. जवळ राहून मनं दुखावण्यापेक्षा थोडे लांब राहून प्रेम वाढलेलं काय वाईट?" डोळे पुसत प्रदीपराव बोलले.

" अहो." शोभाताई बोलू लागल्या.

" मुलगी सासरी गेली असं समज. तसेही ती म्हणते आहे ना येऊनजाऊन असणार आहे. मग ठेव की विश्वास. अनिरुद्ध , सानवी जिथे रहाल तिथे सुखी रहा म्हणजे झालं."


काही वर्षानंतर..

" अनि.. ऐक ना माझं. घे ना कपडे घालून." सानवी ओरडत होती.

" सानू, असा नको ना त्रास देऊस." अनिरुद्ध दमला होता.

" तू आणि तुझी मुलं.." अनिरुद्ध आणि सानवी दोघेही एकमेकांवर वैतागले होते. आणि त्यांची जुळी मुलं अनिकेत आणि सानिका या दोघांचंही न ऐकता मस्ती करत होते.

" या दोघांना सांभाळण्यापेक्षा आपल्या दोन कंपन्या सांभाळणं सोपं वाटतं रे." दमलेली सानवी अनिरुद्धच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

" नशीब समज, आपल्याला फक्त सुट्टीच्या दिवशी सांभाळावे लागते. इतर वेळेस तुझी आणि माझी आई कसे करत असतील त्यांनाच माहीत." अनिरुद्ध सुस्कारा सोडत म्हणाला.

" ती एकच गोष्ट तू चांगली केलीस, आईबाबा आणि राघवलाही इथेच आणलंस. आईच्या घराजवळच त्यांना घर बघून दिलेस. नाहीतर या दोघांचं काय झालं असतं?"

" मी एकच चांगली गोष्ट केली का? म्हणजे तुझ्याशी लग्न ही वाईट गोष्ट होती का?" खोडकरपणे अनिरुद्ध बोलला. "पण खरं चांगलं काम तू केलंस. माझ्या बाबांना आपल्या जगात आणलंस ते. आई तुझे खूप कौतुक करत असते." अनिरुद्ध सानवीला जवळ घेत म्हणाला.

" माझ्या एवढ्या कष्टाने मिळवलेल्या नवर्‍यासाठी एवढं तर करायलाच हवं ना?" सानवी त्याच्या जवळ जात होती तोच रडण्याचा आवाज आला.

" आई, हिने मला मारले.."

" बाबा, याने आधी माझी खोडी काढली."

अनिरुद्ध आणि सानवी आपला प्रेमालाप सोडून मुलांचे भांडण सोडवायला गेले.

आमचं वेगळं आहे म्हणणारे हे जोडपं आता मात्र संसारात रमलं होतं.


आमचं वेगळं आहे या कथेच्या निमित्ताने दोन शब्द.

कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि जिगेलो हे दोन शब्द बरेच दिवस मनात रेंगाळत होते. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यावर लिहावेसे वाटले. अनिरुद्ध आणि सानवी या दोघांच्या प्रेमकथेला एवढा प्रतिसाद मिळेल ही खरंच अपेक्षा नव्हती. पण सर्व वाचकांनी त्यांच्यावर प्रेम केले यासाठी खूप आभार. असेच प्रेम बाकीच्या कथांवर पण कराल अशी आशा करते. परत भेटूच एका नव्या कथेसोबत.
कळावे, लोभ असावा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all