आमचं वेगळं आहे.. भाग १९

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग १९


मागील भागात आपण पाहिले की शेवटी सानवी आणि अनिरुद्ध मनाने आणि शरीराने एकरूप होतात. आता बघू पुढे काय होते ते.


" अनिरुद्ध.. उठ ना. तू ना आळशी होत चालला आहेस गेले काही दिवस. ना लवकर उठतोस ना वर्क आऊट करतोस." सानवी अनिरुद्धला उठवत म्हणाली.

" तू रात्री एवढा त्रास देतेस की सकाळी उठणं मुश्किल होऊन जाते." डोळे न उघडता अनिरुद्ध म्हणाला.

" मोजून आठ दिवस झाले आहेत आपल्या लग्नाला आणि मी त्रास देते तुला?" आपल्या केसांनी अनिरुद्धला गुदगुल्या करत सानवीने विचारले.

" मग काय. परवा रात्री रडारड आणि काल.." सानवीला जवळ ओढत अनिरुद्ध म्हणाला. सानवीचा चेहरा लाल झाला.

" मी छळले तुला?"

" भयंकर. रात्री स्वप्नातही तूच दिसत होतीस. लाटणे घेऊन उभी असलेली." अनिरुद्ध मिस्किलपणे बोलला.

" अनिरुद्ध.. तू ना. जा. मी बोलणारच नाही तुझ्याशी. मी इथे तुला प्रेमाने उठवायला आले होते तर तू?" सानवी फुरंगटून बोलली.

" अग ए. चिडू नकोस ना. मला खूप छान वाटलं तू उठवायला आलीस म्हणून. गेले काही दिवस खूप ताण होता म्हणून झोप झाली नव्हती. आज तो ताण गेला आहे तर." अनिरुद्ध म्हणाला.

" झालेल्या गोष्टींचा विचार नको करूस. आवर लवकर. आईने लाडक्या जावयासाठी डोसे केले आहेत." अनिरुद्धच्या केसांतून हात फिरवत सानवी म्हणाली.

" आणि बायकोने काय केले आहे?"

" बायकोने केले आहेत धम्मकलाडू , चापट पोळी आणि असेच काही काही."

" हे बरं आहे. नवऱ्याकडून काय काय घ्यायचे आणि द्यायचे काय?" अनिरुद्ध मिस्किल हसत म्हणाला.

" तू पण ना.. अतीच आहेस." सानवी उठत म्हणाली. "बरं. आठदहा दिवस कंपनीकडे खूप दुर्लक्ष झाले आहे. आज मला जायला लागेल. येशील माझ्यासोबत?"

" ओके. येतो. पण.." अनिरुद्ध थांबला.

" पण नाही आणि बिण नाही. मला तू तिथे हवा आहेस." सानवी दम देत म्हणाली.

" घरी पण तूच बॉस, ऑफिसमध्ये पण तूच.. देवा वाचव रे."

" नाटकं बंद कर ही. आवर.. आपण निघू. आणि हो , महत्वाचे राहिलेच."

" काय?\"

" लव्ह यू.." सानवी बाहेर पळत म्हणाली.
अनिरुद्ध हसत उठला. आवरून बाहेर आला तेव्हा सगळे डायनिंग टेबलवर बसले होते.

" सॉरी. मला उशीर झाला." अनिरुद्ध खुर्चीवर बसत म्हणाला.

" चालतं रे.." बाबा म्हणाले.

" बाबा, मी आणि अनिरुद्ध आज कंपनीत जातो. त्याला सगळं दाखवते. चालेल ना?"

" मी तर आधीच म्हणालो होतो." सगळ्यांचा नाश्ता चालू असतानाच बेल वाजली.

" मी उघडते." सानवी दरवाजा उघडायला उठली.

" आपण???" समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे ती बघतच बसली. सानवीची नजर तिच्या हाताला असलेल्या बँडेजकडे गेली.

" मी.."

" शनाया?" सानवीच्या तोंडातून निघून गेले. सानवीचे शब्द ऐकून अनिरुद्ध ताडकन उठला.

" अरे व्वा. ओळखलंस सुद्धा मला. तूच आहेस ना अनिरुद्धची तात्पुरती बायको? आत यायला सांगणार नाहीस का?" शनायाने विखारी आवाजात विचारले. तोपर्यंत अनिरुद्ध दरवाजात आला होता.

" तुम्ही इथे काय करताय? कोणी दिला तुम्हाला इकडचा पत्ता? मी येतो तुमच्या ऑफिसमध्ये. आता इथून जा." अनिरुद्ध हळू आवाजात पण रागाने बोलला.

" इट्स ओके अनिरुद्ध. तू माझ्याकडे आलास काय आणि मी इथे आले काय? सारखंच नाही का? काल त्या कॅफेमध्ये तुम्हा दोघांना बघितले. तुझे घर तर बंद होते. मग हिचा फोटो काढून, तो सर्च करून पत्ता मिळवला. आणि आले इथे. किती त्रास झाला सांगू?"
छद्मी हसत ती आत आली. सानवी सुन्न होऊन बघत राहिली होती.

" या कोण?" आईबाबांनी आश्चर्याने विचारले.

" या माझ्या आधीच्या बॉस." शनाया काही बोलायच्या आत अनिरुद्ध बोलला. "ते मी लग्नाला बोलावले नाही ना म्हणून आल्या आहेत. त्यांनी मेसेज केला होता. मी सांगायचे विसरलो."

" या. बसा ना. सानवी कुठे गेली?" शोभाताई म्हणाल्या. शनाया बसली नाही.

" मी बघतो सानवीला. " अनिरुद्ध दरवाजात उभ्या असलेल्या सानवीकडे गेला.

" चलतेस ना आत?" आर्जवी स्वरात त्याने विचारले. सानवीला हाताशी धरून तो आत आला. अनिरुद्ध आणि सानवीला एकत्र बघून शनाया विचित्र हसली. हातातल्या बँडेजवर हात फिरवत तिने बोलायला सुरुवात केली.

" किती खोटं बोलशील अनिरुद्ध? तुझ्या बायकोला तरी खरं माहित आहे का?" तिचे बोलणे ऐकून सानवी आणि अनिरुद्ध घाबरले. आई, बाबा संभ्रमात पडले.

" काय खोटं बोलला अनिरुद्ध?" बाबांनी चिंतातुर आवाजात विचारले.

" अनिरुद्ध, मला माफ कर हं. मला ना खोटं बोलता येत नाही. त्याचे काय आहे, हा जो तुमचा अनिरुद्ध आहे ना, तो एक जिगेलो आहे. जो माझ्यासाठी काम करायचा. आता त्याने म्हणे काहीतरी लग्न केले आहे. मला ते पटले नाही. म्हटलं ती जर सभ्य मुलगी असेल तर तिच्या घरी जाऊन सांगायला नको का? म्हणून मी इथे आले आहे. बरोबर केलं ना मी?" शनायाचे शब्द वितळलेल्या शिशासारखे आईबाबांच्या कानावर पडले. सानवीने पुढे येऊन शनायाच्या एक सणसणीत कानाखाली दिली.

" अनिरुद्ध, माझा नवरा आहे. आम्ही कायदेशीर लग्न केलं आहे. माझा नवरा काय आहे हे मला माहित आहे. तू मध्ये पडायची गरज नाही. खरंतर तुझ्यासारख्या बायकांकडे त्याने बघावं इतकीही तुझी लायकी नाही. त्यामुळे इथून निघायला बघायचे. आणि यापुढे माझ्या नवर्‍याच्या आजूबाजूला जरी दिसलीस ना तरी काय करीन माहिती नाही. अजून एक त्या दिवशी हात कापून घेतलास, आता गळा जरी कापलास तरी तो येणार नाही. समजलं?"

सानवी रागाने वेडीपिसी झाली होती. तिचा अवतार बघून सगळेच चाट पडले होते. शनाया मान खाली घालून निघाली. निघताना ती अनिरुद्धला बोललीच,

" तुला वाटत असेल की मी तुला सुखाने जगू देईन तर विसर."

शनाया जाताच शोभाताई अंगातलं त्राण गेल्यासारखं जागेवरच बसल्या.

" ती बाई जे बोलली ते खरं आहे का?" बाबांचा आवाज चढला होता.

" बाबा.. मी तुम्हाला सगळं सांगते." सानवी पुढे झाली.

" अजिबात जवळ येऊ नकोस. फक्त हो की नाही तेवढंच सांग."

" बाबा, ऐका ना. तिने सांगितले तसं नाहीये. ती बाई विश्वास ठेवण्यासारखी नाहीये."

" हो की नाही?"

" बाबा.." अनिरुद्ध बोलू लागला.

" तू तर बोलूच नकोस. मुलासारखं समजलो मी तुला. म्हटलं की आता मला माझ्या घराची चिंता नाही. पण तू? श्शी. मला बोलायलाही लाज वाटते. माझ्या मुलीला फसवलंस तू."

" बाबा, त्याने मला नाही फसवलं." सानवी रडवेली झाली होती.

" शोभा.. बघितलंस का? आपल्या मुलीला सगळं माहित होतं. तरिही तिने कोणाशी लग्न केलं? हे असं पांग फेडलेस तू?"

" बाबा, तुमचा लग्नाचा आग्रह होता म्हणूनच तिने हे पाऊल उचलले." अनिरुद्ध बोलू लागला.

" लग्नाचा आग्रह होता. आयुष्याचा उकिरडा करायचा नाही. लाज वाटते मला." बाबा निराश झाले होते.
"शोभा, आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जायला सांग याला. "

" बाबा, मी नाही राहू शकत अनिरुद्ध शिवाय. प्लिज." सानवी रडत होती.

" मग तसं असेल तर मी हे घर सोडतो."

" सानवी, माझ्यामुळे हे प्रॉब्लेम होत आहेत. मीच जातो इथून." अनिरुद्ध म्हणाला.

" अनि.."

" यापुढे माझ्या मुलीला भेटायचेही नाही." शोभाताई म्हणाल्या. अनिरुद्ध मान खाली घालून आपली बॅग भरायला गेला. सानवी तिथेच रडत उभी राहिली.


आईबाबांना अनिरुद्धचे सत्य पचले नाही. काय होईल आता, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all