आमचं वेगळं आहे.. भाग १८

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग १८


मागील भागात आपण पाहिले की सानवी आणि अनिरुद्ध दोघेही नात्याला वेळ द्यायची गरज आहे या मतावर येतात. आता बघू पुढे काय होते ते.


" इथे बाजारात काय काम आहे तुझे?" सानवीने आश्चर्याने विचारले.

" आहे थोडं. मी गाडी पार्क करतो. तिथून माझं काम करून येतो. तोपर्यंत तू काय करशील?"

" मी का नाही यायचं तुझ्यासोबत?" सानवीने तोंड फुगवत विचारले.

" अट नंबर कितीतरी.. माझ्या भानगडीत पडायचे नाही." अनिरुद्ध म्हणाला.

" आताही तुझ्या अटी आहेतच?" आश्चर्याने सानवीने विचारले.

" हो.. आपलं वेगळं आहे ना. अग मस्करी करतो आहे." सानवीचा उतरलेला चेहरा बघून अनिरुद्ध पुढे म्हणाला.

" तू कॅफेटेरियात थांबतेस?"

" मी का नाही येऊ शकत तुझ्यासोबत?"

" काम खाजगी आहे. सॉरी.. मी बरोबर अर्ध्या तासात येतो." सानवीच्या रागाची पर्वा न करता अनिरुद्ध तिथून निघाला.

" गेलास उडत.." सानवी फणकार्‍याने बोलली आणि तिकडच्या एका दुकानात गेली.

" अर्धा तास झाला. आता तरी तू येणार आहेस की मी घरी जाऊ एकटी?" सानवीने अनिरुद्धला मेसेज केला.

" कशी जाणार पण तू घरी? गाडीची चावी तर माझ्याकडे आहे." चावी सानवीसमोर धरत अनिरुद्ध म्हणाला.

" झालं का तुझं काम?" सानवीने विचारले.

" हो.. "

" सांगणार नसशीलच.."

" नाही.." अनिरुद्ध मिस्किलपणे म्हणाला.

" कॉफी घेणार आहेस?"

" चालेल.." सानवीने कॉफीची ऑर्डर दिली आणि तोंड फुगवून बसली.

" सानवी.."

" काय?"

"हे माझ्याकडून लग्नाचे गिफ्ट.. आता देणारच नव्हतो पण तुझ्या चेहर्‍याकडे बघवलं नाही.." अनिरुद्धने सानवीसमोर हात धरला. सानवीने बघितलं. हातात एक डबी होती. सानवीने डबी उघडली. आत एक चेन होती. म्हटलं तर चेन म्हटलं तर मंगळसूत्र. दोन छोट्या वाट्या असलेलं.

" हे माझ्यासाठी?" सानवीचा आनंद चेहर्‍यावर दिसत होता.

" नाही.. मी घालून फिरतो." सानवीने अनिरुद्धच्या टोमण्याकडे दुर्लक्ष केले.

"खूप छान आहे हे.."

" आवडलं?" अनिरुद्ध तिच्या चेहऱ्यावरचे भाव निरखत होता.

" खूप.."

" घालणार आहेस?"

" घरी गेल्यावर तू घाल.." सानवीच्या गालावर गुलाब फुलले होते. कॉफी पिऊन दोघेही घरी गेले. काल झालेल्या भांडणाचा लवलेशही दोघांच्या वागण्यात दिसत नव्हता. दोघांना बघून आईबाबा आणि पार्थ खुश झाले.

" सांगितले सुद्धा नाहीस येणार ते.." शोभाताई म्हणाल्या.

" अग आई, ते अचानक ठरले ना. तुला आवडले नाही का मी आलेले?" लटक्या रागाने सानवी म्हणाली.

" जिभेला हाड आहे का ग तुझ्या? उलट तू नव्हतीस तर करमत नव्हते आम्हाला." शोभाताई सानवीला चापट मारत म्हणाल्या.

" मग जिजू, काय केलेत गावी?"

" काही नाही. तिथे फक्त आमच्या कुलदैवतेला जाऊन आलो. घरातल्यांना भेटलो."

" ते एक बरं झालं हो.. तू तुझ्या घरातल्यांना भेटून आलास ते. माझ्या मनाला नाहीतर नुसती रुखरुख लागली होती." शोभाताई बोलत होत्या.

" तुझी रुखरुख संपली असेल तर पोरांना काहीतरी खायला दे.. दमून आले असतील दोघे." बाबा म्हणाले.

"काही नको ग आई.. आम्ही कॉफी घेऊन आलो आहोत. हो की नाही अनिरुद्ध? मी तर त्याला म्हटलं आपण बाहेरच जेवूयात. पण त्याला बाहेरचं जेवण आवडत नाही."

सानवी आपल्याच नादात बोलत होती. शोभाताईंनी चमकून प्रदीपरावांकडे बघितले. ते ही हसले.

" बरं चहा कॉफी नको. मी स्वयंपाकाचे बघते काहीतरी."

" आई, तू नको ना करूस. आज आम्ही दोघे करतो स्वयंपाक. चालेल का अनिरुद्ध?"

" मी तयार आहे."

" बरं.. आता माझा अर्धा स्वयंपाक झाला आहे. संध्याकाळचे तुम्ही करा." शोभाताई समाधानाने दोघांकडे बघत म्हणाल्या. सगळे जेवायला बसले. सानवी, अनिरुद्ध आणि पार्थच्या गावाकडच्या गप्पा चालू होत्या. सानवी त्याला मंदिराबद्दल सांगत होती. अनिरुद्ध तिला उचलून पायर्‍या चढला हे ऐकून पार्थ थक्क झाला.

" जिजू, मानलं तुम्हाला."

" का रे?" अनिरुद्धने आश्चर्याने विचारले.

" या जाडीला उचलून अकरा पायर्‍या चढायच्या म्हणजे काय खाऊ आहे?" पार्थ अनिरुद्धला डोळा मारत म्हणाला. हसता हसता अनिरुद्धला ठसका लागला. अनिरुद्ध हसतो आहे हे बघून सानवी चिडली.

" मी जाडी आहे का? आणि तू काय हसतोस?" ती दोघांना दम देत म्हणाली.

" पार्थ नको मस्करी करूस जास्त. तू बोलून जाशील आणि मग माझ्या डोक्यात लाटणं पडेल." गंभीरपणे अनिरुद्ध बोलला आणि सगळे हसू लागले.

जेवणं झाल्यावर सानवीने घरातल्यांसाठी विकत घेतलेल्या गोष्टी दिल्या. पार्थ आणि अनिरुद्ध दोघे बुद्धिबळ खेळत बसले. आईबाबा आराम करायला गेले. सानवी मात्र अस्वस्थ दिसत होती. अनिरुद्ध तिच्याकडे दुर्लक्ष करत पार्थसोबत रमला होता.

" आता वाटते हो सानवीचे लग्न झाले म्हणून." शोभाताई खुश होत्या.

" मी तर तुला आधीच सांगत होतो. पण तुझा स्वभाव. " प्रदीपराव म्हणाले.

" गावी जायच्या आधी बघितलेत कसे बोलायचे.. अहोजाहो.. आणि आता? ए अनिरुद्ध. " शोभाताई हसत होत्या.

" असेल त्यांचे काहीतरी. पण दोघांची जोडी शोभून दिसते. सानवीने मुलगा खूप छान शोधला आहे." बाबा अनिरुद्धवर खुश होते. "फक्त एकदा त्याने आपली कंपनी जॉईन केली ना की बस. मला कसलेच टेन्शन नाही."

" हो. सोसायटीतल्या बायका पण म्हणत होत्या, जावई अगदी रूबाबदार आहे म्हणून. एवढा अभिमान वाटला म्हणून सांगू." शोभाताई सांगत होत्या.

" चला.. डोळ्यासमोर सानवीचा संसार सुरू झाला हे छान झाले." दोघेही एकदम बोलले आणि हसू लागले.

संध्याकाळी सानवीने अनिरुद्धच्या मदतीने स्वयंपाक केला. पार्थही मध्येमध्ये लुडबुड करत होता. आणि आईबाबा हे सगळं समाधानाने बघत होते. जेवणं झाल्यावर मात्र शोभाताई म्हणाल्या,

" आता हे उरलेलं मी आवरते. तुम्ही जा आराम करायला. जावयाला जास्त कामाला लावणं मला बरं दिसत नाही."

सानवी आणि अनिरुद्ध खोलीत आले. बोलू की नको सानवी विचार करत होती.

" काही बोलायचे आहे?" अनिरुद्धने विचारले.

" हो.."

" मग बोल ना. लाटण्याने मारायचा विचार आहे का मला?"

" अनि..."

" बोल काय झाले ते." अनिरुद्ध सानवीशेजारी बसला. त्याने नजरेने तिचा हात हातात घेण्याची परवानगी मागितली. सानवीने त्याचा हात घट्ट पकडला.

" सांग आता." अनिरुद्ध हात कुरवाळत म्हणाला.

" ते मंगळसूत्र घालून देशील?"

" बस्स एवढंच?" अनिरुद्ध हसला.
" दे इथे."

" मी आलेच." सानवी तिथून उठली. तिच्या शॉवर घेण्याचा आवाज अनिरुद्धला आला. अस्वस्थ होऊन अनिरुद्ध उठला. खिडकीत जाऊन उभा राहिला. सानवीच्या मनात नक्की काय सुरू आहे ते त्याला समजेना. काल जे झालं तेच जर आज झालं तर? काल तरी तिथे कोणीच नव्हते. इथे घरात सगळेच आहेत.


" अनिरुद्ध.." सानवीची हाक आली. त्याने बघितले तर शॉवर घेऊन नवीन नाईटी घालून ती आली होती. अनिरुद्ध बघतच राहिला. सानवी पुढे आली. टेबलवर ठेवलेलं मंगळसूत्र तिने हातात घेतलं.

" हे घालून देतोस ना?" ती पाठी वळली. अनिरुद्धने हलक्या हाताने तिचे केस बाजूला केले. तिच्या मानेवर ओठ टेकायची इच्छा त्याने दाबली. कसातरी त्या मंगळसूत्राचा फासा त्याने लावला आणि तो बाजूला झाला.

" आता माझे गिफ्ट.." सानवीने पर्स उघडली. त्यात दोन अंगठ्या होत्या.

" ही माझी आठवण तुझ्यासोबत नेहमीच असेल." सानवीने ती अंगठी अनिरुद्धच्या बोटात घातली. "आणि ही अगदी तुझ्या अंगठीसारखीच असणारी माझ्यासाठी." सानवीने ती अंगठी अनिरुद्धला दाखवली.
सानवीने अपेक्षेने अनिरुद्धकडे बघितले. त्याने ती अंगठी तिच्या बोटात घातली.

" आता जाऊया झोपायला?" हुश्श करत अनिरुद्ध म्हणाला.

" नाही.. अजून एक गोष्ट राहिली आहे." सानवी अनिरुद्धच्या डोळ्यात बघत म्हणाली.

" आता काय द्यायचे राहिले?"

" मी स्वतः.. अनि, मी खूप विचार केला. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मला नको आहे हे कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही. मला तुझ्यासोबत हे आयुष्य जगायचे आहे. कारण तू जेवढे माझ्यावर प्रेम करतोस तेवढे कोणीच करू शकत नाही. मी ही तेवढेच प्रेम करते तुझ्यावर. अनि प्लिज मला जवळ घे आणि मिटवून टाक आपल्यातलं सगळं अंतर."

" सानवी.." अनिरुद्धने बोलायचा प्रयत्न केला.

" आता शब्द नाही. फक्त तू आणि मी.."



सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all