Login

आमचं वेगळं आहे.. भाग १७

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग १७


मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्ध आणि सानवीचे भांडण होते. आता बघू पुढे काय होते ते.


" मला माफ कर.. मी तुला समजून घ्यायला कमी पडलो." अनिरुद्ध सानवीशेजारी खाली बसत म्हणाला. सानवी त्याच्या कुशीत शिरून फक्त रडत होती. तिचं रडणं कमी झाल्यावर अनिरुद्धने तिचे डोळे पुसले.

" तू बस इथे शांतपणे. कपडे वगैरे बदलायचे असतील तर बदल. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करतो. घरातला पहिला दिवस आहे तुझा. उपाशी नको झोपूस.." बोलताना अनिरुद्धने आपल्या हा शब्द टाळला होता. सानवीने होकार दिला. अनिरुद्ध स्वयंपाकघरात गेला. सानवी अंघोळ करून अनिरुद्ध काय करतो आहे बघायला गेली. अनिरुद्ध खिचडी करत होता.

" मी काही मदत करू का?" सानवीने विचारले. अनिरुद्धने वर बघितले. मगाची रडकी सानवी जाऊन आधीची सानवी परत आल्यासारखे त्याला वाटले. तो पुढे काही बोलणार तोच त्याला तिची प्रतिक्रिया आठवली.

" नको.. झालंच माझं. दही नाहीये.. लोणचं आणि पापड चालेल का?" अनिरुद्ध वर न बघता बोलत होता.

" चालेल.. मी ताटं घेऊ?"

" नको.. मी वाढतो." अनिरुद्धने पाने वाढून घेतली. सानवी कोपर्‍यात उभी राहून बघत होती.

" माझ्याकडे डायनिंग टेबल नाहीये. बाहेर बसायचे का जेवायला?"

" मी घेते माझे ताट.." सानवी पुढे येत म्हणाली. अनिरुद्धने आपला स्पर्श होणार नाही या पद्धतीने तिच्या हातात तिचे ताट दिले.

" खिचडी छान झाली आहे." सानवी म्हणाली.

" थॅंक यू." अनिरुद्ध तिच्याकडे बघतही नव्हता.

" तू बोलणारच नाही का माझ्याशी?" सानवीने चिडून विचारले.

" बोलतो तर आहे."

" अनि.. प्लिज.."

" मला अनि म्हणून फक्त आई हाक मारते. ते ही आत्यंतिक प्रेमाने." अनिरुद्धच्या आवाजात परत तोच कडवटपणा आला होता. अनिरुद्धचं दुखावलं जाणं सानवीला समजत होतं पण तिला सुद्धा थोडा सावरायला वेळ हवा होता. कसंतरी सानवीने दोन घास पोटात ढकलले.

" आवडली नाही का?" अनिरुद्धचे तिच्या ताटाकडे लक्ष होते.

" भूक नाहीये." डोळ्यातलं पाणी लपवत सानवी म्हणाली. अनिरुद्धची चलबिचल झाली. शेवटी तो सानवीच्या जवळ आला आणि त्याने तिला चमच्याने खिचडी भरवायला सुरुवात केली. सानवीनेही मग ती खाऊन घेतली. तिचे खाऊन होताच अनिरुद्ध उठला.

" ही अशी चिटिंग नाही करायची. आता तू ही खाऊन घे." सानवी म्हणाली.

" माझं पोट भरलं आहे." सानवीने अनिरुद्धला खाली बसवले. आणि त्याला भरवायला सुरुवात केली.

" सानवी.. हे करायची गरज नाहीये."

" गरज आहे की नाही मी ठरवेन." जेवणं झाल्यावर अनिरुद्ध बाहेर सोफ्यावर झोपायची तयारी करू लागला.

" आत तुझे अंथरूण तयार करून ठेवले आहे."

" मी एकटी आत झोपू?"

" हो.. आतमध्ये कडीसुद्धा आहे." अनिरुद्धने डोक्यावरून पांघरूण ओढून घेतले.

" रूसतोस काय रे, लहान मुलांसारखा? तुझ्यापेक्षा ती परी बरी.. लगेच राग जातो तरी तिचा."

" मी चिडलो नाहीये.." ते पांघरूण तिच्या हातातून खेचत अनिरुद्ध म्हणाला.

" आई ग.." सानवी ओरडली.

" उगाचच खोटी नाटकं करू नका.. मला माहित आहे काही झालेलं नाहीये ते."

" बरं.." सानवीच्या आवाजातली वेदना अनिरुद्धला समजली. त्याने बघितले तर तिच्या जखमेवर बहुतेक त्याचे नख लागले होते. त्यातून रक्त येत होते.

" तू पण ना.. कशाला मस्ती करायची?" अनिरुद्ध चिडला होता.

" तू ऐकून घेत तरी होतास का? या नवीन ठिकाणी मला एकटीला आत झोपायला सांगत होतास."

" सानवी.. नको ना हे भावनिक हिंदोळे. कधी तू असं दाखवतेस की माझ्याशिवाय तुझे दुसरे जग नाही. आणि दुसर्‍याच क्षणी मला तिथून ढकलून देतेस. मी नाही हे सहन करू शकत."

" आपलं हे नातंच थोडं विचित्र आहे असं नाही वाटत? आपल्याला तुझ्या भूतकाळाला विसरून पुढे जायचे आहे. पण ते विसरायला थोडा वेळ लागेल ना? पटतं आहे का?"

" हो.. आता झोपूयात का? मी थकलो आहे गाडी चालवून." अनिरुद्ध म्हणाला.

" हो.. पण मी एकटी आत नाही झोपणार." हट्टाने सानवी म्हणाली.

" सानवी..."

" अनिरुद्ध...."

" म्हणून लोकं लग्न न करता सुखी असतात. चल आत."

" असं नाही.. तू मला उचलून ने आत."

" हे अति होते आहे." अनिरुद्ध वैतागला होता.

" आपल्या घरातली ही आपली पहिली रात्र आहे. नवरे बायकांना कायकाय गिफ्ट देतात या दिवशी. आणि तू.. " सानवी सुस्कारा सोडत म्हणाली.

" तू का छळते आहेस मला अशी?"

" लग्न केलं आहे तर बायकोची कर्तव्य तर करावी लागतीलच ना.." सानवी ऐकत नाही हे बघून अनिरुद्ध तिला उचलून खोलीत घेऊन गेला.

" झालं समाधान?"

" नाही.. तू पण झोप इथेच."

" सानवी.. आज नको."

" प्लिज ना.." सानवीच्या त्या प्लिजला अनिरुद्ध नाकारूच शकला नाही. पण झोपताना त्याने लोड आणून मध्ये ठेवला.

" आता हे काय?"

" भांडणं होऊ नये याची खबरदारी."

" तू असाच वागणार आहेस का माझ्याशी?" सानवीच्या डोळ्यात पाणी होते. " याच्यापेक्षा तुझे आधीचे टोमणे परवडले."

" सानवी.. रडू नकोस. मी नाही बघू शकत तुझ्या डोळ्यातलं पाणी. मी माझ्यापरीने नीट वागेन. ठिक आहे?" अनिरुद्ध सानवीचे डोळे पुसत म्हणाला. " आणि उद्या सकाळी तुझ्या घरी जाऊयात."

" का? भिती वाटते माझी?"

" हो.. खूप.."

" अनि..." सानवीने तो लोड काढून फेकला. आणि ती अनिरुद्धच्या मिठीत विसावली. " मला तू खरंच खूप हवा आहेस. पण थोडा वेळ दे." त्याच्या कानात कुजबुजत सानवी म्हणाली.

" आय प्रॉमीस.. जोपर्यंत तुझ्या मनातल्या सगळ्या शंका दूर होत नाहीत. तोपर्यंत मी तुझ्या जवळ येणार नाही." अनिरुद्ध आश्वासक स्वरात बोलला.


" गुड मॉर्निंग.. चहासोबत काय खायला आवडेल?" अनिरुद्धला उठलेलं पाहून सानवीने विचारले.

" तू आज लवकर उठलीस की मला उशीर झाला? की हे स्वप्न आहे?" अनिरुद्ध डोळे चोळत म्हणाला.

" मी उठले आहे लवकर. चहा किंवा कॉफी करायला मला दूध मिळाले नाही. पण म्हटलं विचारायला काय हरकत आहे?"

" ते मी इथे रहात नव्हतो.. म्हणून. मी आणतो पटकन खालून." अनिरुद्ध उठत म्हणाला.

" तुला खायला काय आवडेल?"

" मी बघतो काय आहे ते.. आणि करतो."

" नाही.. आज मी करणार. खाऊन झालं की आपण निघू."

" तू म्हणशील तसं."

" मी मागच्या जन्मी बहुतेक खूप व्रत केले असतील त्यामुळे एवढा आज्ञाधारक नवरा मिळाला आहे मला." सानवी हसत म्हणाली. तिचा तो टोन ऐकून नकळत अनिरुद्धच्या चेहर्‍यावर सुद्धा हसू फुलले.

" आलोच आवरून."

" अनिरुद्ध.. तू कंपनी जॉईन करशील ना?" नाश्ता करताना सानवीने विचारले.

"घाई होते आहे असं नाही वाटत तुला? काल म्हणालीस नात्याला वेळ हवा आहे म्हणून. आणि आज परत कंपनी जॉईन कर. उद्या जर तुला असं वाटलं की तू नाही राहू शकत माझ्यासोबत तर मी काय करायचे?" अनिरुद्ध गंभीरपणे बोलत होता.

" तुला बोलवते तरी कसे हे?" सानवी हळवी झाली होती.

" आयुष्यात एवढे अनुभव आले आहेत की सगळ्या बाजूने विचार करावा लागतो. आपण थोडं हळू जाऊ या. मी कंपनीत येईन. काम बघेन.. पण लगेच जॉईन नाही करणार."

" आणि मग बाबांना काय सांगू?" सानवीने हिरमुसल्या आवाजात विचारले.

" हेच.. की मी आधी काम जमतंय का बघतो. नंतर जॉईन करतो. आता निघायचं? माझं थोडं काम आहे बाहेर."

" तू मला सोडून जाणार?" सानवीने डोळे मोठे करत विचारले.

" तुला हवं तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस. तुला आवडेल का?"

"त्याचं काय आहे मिस्टर नवरा.. मी तुमच्याजवळ येण्यासाठी वेळ मागितला आहे. तुम्हाला सोडून राहण्यासाठी नाही. आणि सात फेरे जरी घेतले नाहीत ना तरी आपले साता जन्माचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे मला सोडून कुठेही जाणं विसरा आता.. समजलं? मी येतेच माझं आवरून." सानवी अनिरुद्धच्या गालावर ओठ ठेवत म्हणाली..


काय काम असेल अनिरुद्धचे? सानवी आणि त्याचा संसार होईल का सुरू? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all