Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

आमचं वेगळं आहे.. भाग १५

Read Later
आमचं वेगळं आहे.. भाग १५


आमचं वेगळं आहे.. भाग १५

मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्ध सानवीला आपल्या प्रेमाची कबुली देतो. आता बघू पुढे काय होते ते." तुझे शोषण झाले? कधी आणि कुठे?" सानवीने तोंडावर हात ठेवत विचारले.

" मी एमबीए पूर्ण केलं. लवकरच मला एका छोट्या कंपनीत काम मिळाले सुद्धा. घरी पैशांची गरज होतीच. म्हणूनच मिळेल ती नोकरी पकडली होती. नोकरी छान सुरू होती. नवीन नवीन शिकायला मिळत होतं. असं वाटत होतं आपलं एक छान नवीन आयुष्य सुरू होणार आहे. आणि तेवढ्यात तिथे ती आली." अनिरुद्ध सांगत होता.

" ती?? ती कोण?" सानवीने विचारले.


" शनाया.. माझ्या बॉसची बायको. मी जेव्हा कंपनीत कामाला लागलो तेव्हा ती कुठे बाहेर गावी गेली होती. पण जशी आली तशी तिची नजर मला टोचत होती. येताजाता न्याहाळणे. काहीतरी बोलणे. जशी बायकांना पुरूषांची नजर समजते तशी पुरुषांनाही बायकांची नजर समजते. मी प्रयत्न करायचो तिच्यापासून लांब राहण्याचा. तिच्याजवळ न जाण्याचा. पण काही ना काही बहाणे काढून ती तिच्या केबिनमध्ये बोलवायचीच."

" मग तू दुसरीकडे नोकरी का नाही बघितलीस?" सानवीने विचारले.

" एकाबाजूला प्रयत्न चालू होते. पण इंटरव्हयूला जायचे म्हणजे ऑफिसला दांडी मारायला लागायची. आणि एका दिवसाचा पगार बुडवणे माझ्यासाठी थोडे अवघड होते. गौरीच्या लग्नाच्या वेळेस आईने थोडेफार कर्ज काढले होते. गौरीचे वर्षाचे सण चालू होते. तिच्या सासरची माणसे कितीही चांगली असली तरिही हे सगळं करावंच लागत होतं. त्यात बाबांकडे दुर्लक्ष करून त्यांनी गौरीला होकार दिला हे उपकाराचे ओझेही होतेच आमच्या डोक्यावर. त्यात तिचे बाळंतपणही आमच्याकडे होणार होते. इकडे आड आणि तिकडे विहीर झाले होते माझ्यासाठी. मग मी पण ठरवले होते की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. कामाशी काम ठेवायचे बस्स."

" मग?" सानवीला उत्सुकता होती पुढचं ऐकण्याची.

" तो देव सगळं कसं व्यवस्थित होऊ देईल? गौरी बाळंतपणासाठी म्हणून सातव्या महिन्यातच आली होती. हलके पोटात दुखते म्हणून आई तिला घेऊन डॉक्टरकडे गेली. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सोनोग्राफी करून घेतली. सोनोग्राफीत दिसून आले की बाळाची नाळ त्याच्या गळ्याभोवती अडकली आहे. ताबडतोब ऑपरेशन केले तरच दोघं वाचण्याची शक्यता होती."

" बापरे.." सानवीचे डोळे विस्फारले होते.

" मला आणि आईला वाटत होते की गौरीच्या डिलीव्हरीला अजून एकदोन महिने अवकाश आहे. म्हणून आम्ही नुकतीच राघवची कॉलेजची वर्षाची फी भरली होती. ऑपरेशनचे पैसे भरायचे होते. ते ही एकहाती. माझे डोकेच चालेना. माझा बॉस चांगला होता. विचार केला त्यांच्याकडून काही मदत होते का बघूयात. नंतर पगारातून ती रक्कम त्यांनी कापून घेतली असती तरी चाललं असतं. मी हिंमत करून बॉसच्या केबिनमध्ये शिरलो. तिथे ती शनाया बसली होती. बॉस नेमके दुसरीकडे मिटिंगला गेले होते.

" अरे अनिरुद्ध, ये बस ना."

" सर आहेत का? माझं त्यांच्याकडे काम होतं."

" मला सांगितलंस तरी चालेल."

" ते मला थोडी पैशांची गरज आहे."

" किती ?"

" साधारण एक लाख.." गौरीच्या ऑपरेशनचा, बाळंतपणा नंतरचा, बारशाचा खर्च सगळाच होता.

" बस्स?" शनायाने बँक डिटेल्स विचारून बाकी काहीच न विचारता रक्कम माझ्या अकाउंटला जमा केली. मोबाईलवर आलेला मेसेज बघून मी हरखलो.

" थॅंक यू सो मच मॅम.. मी माझ्या पगारातून ही सगळी रक्कम परत करेन किंवा तुम्ही माझ्या पगारातून कापून घेतली तरी चालेल."

" अनिरुद्ध.. हे पैसे मी माझ्या पर्सनल अकाउंटमधून तुला दिले आहेत. हे पैसे तुला परत द्यायची ही गरज नाही. फक्त तुला माझे एक काम करावे लागेल. " शनायाची नजर मला अस्वस्थ करत होती.

" काय काम करावे लागेल?"

" पुरूष असून सांगायला पाहिजे?" ती माझ्यावरची नजर न हलवता बोलत होती.

" मी तसा नाहीये ओ.. प्लिज.. मी नोकरी करून तुमचे सगळे पैसे परत करीन. पण असं काही मला नका सांगू." मी तिची विनवणी केली.

" तुला एक सांगू अनिरुद्ध.. तुला बघितल्यापासून तू मला हवा आहेस. आता जर तू हे नाही केलेस तर हा पदर मी खाली टाकणार आणि जोरात ओरडणार तू माझा विनयभंग केलास म्हणून. आणि माझे ऐकलेस तर पैसेही तुझे आणि मी ही."

मी नाही म्हणून तिथून निघणार तोच राघवचा फोन आला बाळाचा श्वास मंद होऊ लागला होता. तो ही पैशाची सोय बघत होता पण काहीच होत नव्हते. माझ्यापुढे दोनच पर्याय होते गौरी आणि बाळाचा जीव किंवा माझे शील. मी गौरीचा जीव निवडला." अनिरुद्ध बोलता बोलता थांबला. सानवीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात होत्या.

" एवढी निष्ठूर होती ती?" सानवीने अनिरुद्धला घट्ट पकडत विचारले.

" होती? आहे.. नरक बनवून टाकला तिने माझ्या आयुष्याचा. तिने स्वतः तर उपभोग घेतलाच त्याचबरोबर तिच्या क्लायंट्सना खुश करण्यासाठी ती माझा उपयोग करून घेऊ लागली. मला स्वतःची किळस वाटू लागली. दोनदा आत्महत्या करायला गेलो होतो. पण घरातल्यांचा चेहरा डोळ्यासमोर आला की खूप अपराधी वाटायचे. असं वाटायचे की आपल्या आयुष्याचा त्यांना निदान असा तरी फायदा व्हावा." अनिरुद्धच्या डोळ्यातही पाणी होते.

" मग यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न नाही केलास?\"

" सुरूवातीला केला. पण तिच्याकडे माझे फोटो आहेत. ते फोटो घरी पाठवण्याची ती मला धमकी द्यायची. मी घाबरलो होतो. बावीस, तेवीस वर्षाचे वय होते माझे. कोणाची आणि काय मदत घेणार होतो मी? कसं बाहेर पडणार होतो मी यातून? आणि आता तर शक्यच नव्हते. फक्त जगायचे म्हणून जगत होतो." अनिरुद्ध डोके धरून बसला होता.


" आता अजिबात काही विचार करू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत? हे सगळं बंद करून आपण आपलं नवीन आयुष्य सुरू करू." सानवी बोलत होती.

" मी नवीन आयुष्याची आशाच सोडली होती . लहानपणी जेव्हा बाबा आईशी भांडायचे तेव्हा मी नेहमी ठरवायचो की आपल्या बायकोला जराही त्रास होऊ द्यायचा नाही. तिला फुलासारखे जपायचे. पण नाहीच.. या पार्श्‍वभूमीवर जेव्हा तू म्हणालीस की तुला तात्पुरता नवरा हवा आहे तेव्हा माझ्या सुप्त भावना जाग्या झाल्या. असं वाटलं जे नशिबात नाही ते अश्या पद्धतीने मिळते आहे. म्हणून आतुरतेने तुझ्या फोनची वाट बघत होतो."

" मग त्या अटी का घातल्यास?" तोंड फुगवून सानवीने विचारले.

" मला ना स्पर्शाची घृणा वाटायला लागली होती. तो वासनेने बरबटलेला स्पर्श नको नको वाटायचा.. पण तुझा हात पहिल्यांदाच हातात आला आणि जाणवला एक नवीन स्पर्श.. प्रेमाचा. आपल्या शरीराखेरीज सुद्धा आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी आहे ही जाणीव सुखावणारी होती. तुझे ते बोलणे, वागणे मनात घर करून जात होतं आणि मी नकळत तुझ्यात गुंतत होतो."

" खोटं बोलतो आहेस तू?" सानवी म्हणाली.

"काय?"

" तू आधीच माझ्या प्रेमात पडला होतास. लग्नाच्या दिवशी हार घालताना, पूजेच्या दिवशी मला ते जाणवत होतं.. पण तुलाच समजत नव्हतं ना.. " सानवी अनिरुद्धला कोपरखळी मारत म्हणाली.

" आई ग.. लागलं ना." अनिरुद्ध ओरडला.

" लागू दे.. बायकोच्या हातून मार खायला खूप पुण्य करावे लागते." सानवी हसत होती.

" सानवी मला भिती वाटते.."

" माझ्या माराची? घाबरू नकोस.. मी लाटणं वगैरे नाही वापरणार."

" नाही.. हे सुख माझ्या आयुष्यात राहील की नाही याची." अनिरुद्ध गंभीर झाला.

" का विचार करतोस एवढा? सोड ना." सानवी परत त्याच्या जवळ जात म्हणाली.

" कारण शनाया मला अशी सोडणार नाही."

" मग तसं सोडायला लावू." सानवी हसत होती.

" तुला मी एक गोष्ट नाही सांगितली. आपले लग्न झाले त्या दिवशी शनायाने हाताची नस कापून घेतली होती. मला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी." हे ऐकून सानवी हतबुद्ध झाली.


अनिरुद्धच्या आयुष्याला लागलेलं शनाया नावाचे ग्रहण सुटेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//