Login

आमचं वेगळं आहे.. भाग १४

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात
आमचं वेगळं आहे.. भाग १४


मागील भागात आपण पाहिले की सानवी आणि अनिरुद्ध मनाने जवळ आले आहेत. आता बघू पुढे काय होते ते.


" फायर ब्रिगेडला फोन करायचा का?" सानवीने गाडी चालवत असलेल्या अनिरुद्धला विचारले. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितले.

" नाही ती आग लागली आहे ना, कोणाच्यातरी डोक्यात?" सानवी हसत होती.

" हा हसण्याचा विषय नाही. मला नाही आवडलं ते तुमच्याबद्दल जे काही बोलले ते." अनिरुद्ध अजूनही तणतणत होता.

" हो.. पण ते चांगल्या भाषेत सांगता येतं की? मी नाही का त्यांना येताना सांगून आले." सानवी शांतपणे बोलली.

" तुम्ही बोललात त्यांच्याशी?" अनिरुद्धला आश्चर्य वाटले.

" हो.. आणि आपण निघताना ते दरवाजात उभेही होते. मला असं वाटतं त्यांना ना न्यूनगंड वाटत असावा, की तुम्ही घर चालवत आहात याचा."

" मग त्यांनी चालवावे ना.. आम्ही अडवले होते का? तेव्हा होतं नव्हतं ते दारूत घालवलं. आणि आता.."

" अच्छा म्हणून तुमची ती पहिली अट होती का?"

" मला चीड आहे दारूची."

" मग माझाही राग आला होता का?" सानवीने डोळ्यांची उघडझाप करत विचारले.

" हो.. खूप आला होता. पण कसंबसं सावरलं स्वतःला." अनिरुद्धला हसू येत होतं.

" काय बोलायचे होते तुम्हाला?" सानवीने अनिरुद्ध मूडमध्ये आला आहे हे बघून विचारले.

" तुम्हाला दिसली ना माझ्या घरची अवस्था? बाबांच्या दारूमुळे सगळीकडे नाचक्की झाली आहे आमची. तुमच्या घरचे संस्कार आणि आमच्या घरचे संस्कार खूप फरक आहे." अनिरुद्ध रस्त्याकडे बघून बोलत होता.

" बस्स.. तुमचे बाबा म्हणजे अख्खं घर? तुमच्या आईने मुलांना वाढविण्यासाठी केलेले कष्ट हे संस्कार नाहीत? गौरीचा निरागसपणा, प्रेम, राघवची मेहनत हे सगळे संस्कार नाहीत? तुमच्या वडिलांची तुम्हाला लाज वाटते हे समजू शकते पण त्यामुळे घरातल्या इतरांवर अन्याय होतो असं नाही का वाटत?" सानवी अनिरुद्धला समजावत होती. कधी नव्हे ते तो ऐकून घेत होता.

" आणि आईवर प्रेम आहे म्हणता मग तिच्या मनाचा विचार का नाही करत? त्यांच्यासाठी बाबांशी नीट बोलायला काय हरकत आहे? ऐकताय ना?" सानवीने खात्री करून घेतली.

" हो.. "

" नशीब माझं.. नाहीतर कोणता तरी अट नंबर सांगितला असता." सानवी हसत बोलली.

" सानवी.."

" बोला.."

" थॅंक यू.."

" तुम्ही एवढ्यासाठी मला नाही म्हणत होता?"

" नाही.. ही एक झलक होती."

"पण मला तर तुमचे कुटुंब आवडले. आता?"

" अजून खूप काही आहे." अनिरुद्ध समोर बघत होता.

"ते जरा पटापट सांगाल का? आणि त्याआधी मला ना बोलून बोलून तहान लागली आहे. काहीतरी प्यायला हवं आहे."

" आधी सांगायचं ना? आता हॉटेल दिसलं की लगेच थांबूया."

" आत्ता नको थांबायला. फक्त काही प्यायला मिळालं तरी चालेल. सगळीकडे थांबत बसलो तर उगाच घरी जायला उशीर होईल." लागलेल्या पहिल्या हॉटेलवर अनिरुद्धने गाडी थांबवली.

" उतरायचे का?"

" तुम्हीच आणू शकाल का? पाणी आणि एखादं कोल्ड्रिंक? तोपर्यंत मी आईला फोन करून सांगते आपण आज येतोय ते."

" आलोच.." म्हणत अनिरुद्ध खाली उतरला. गाणी ऐकण्यासाठी काढलेला त्याचा मोबाईल डॅशबोर्डवरच राहिला होता. सानवी आईला फोन लावणार तोच त्याचा फोन वाजला. सानवीने उत्सुकतेने फोन हातात घेतला. कोणाचातरी मेसेज होता. तिने सहज मोबाईल प्रेस केला तर लॉकस्क्रिन वर तिचा आणि अनिरुद्धचा पूजेच्या दिवशी काढलेला फोटो होता. तिने आपल्या नंबरवरून अनिरुद्धच्या मोबाईलवर फोन लावला. नऊवारी नेसलेल्या तिचाच फोटो समोर होता.

" एवढं प्रेम करतोस मग का घाबरतोस सांगायला?" सानवी हताश होऊन स्वतःशीच बोलली. तोपर्यंत अनिरुद्ध सरबत आणि पाणी घेऊन आला होता. डोळे बंद करून बसलेल्या सानवीला बघून त्याला आश्चर्य वाटले.

" काय झाले?"

" तुमचा फोन वाजला होता." सानवी त्याच्याकडे न बघता बोलली.

" तुम्ही उचललात का?" त्याच्या आवाजात भिती जाणवत होती.

" नाही.."

" मग काय झाले तुम्हाला?" अनिरुद्धच्या आवाजात राग, काळजी, चिंता सगळं होतं. सानवीने त्याच्या हातातले सरबत घेतले.

" तुम्ही सुद्धा पिऊन घ्या. मला इथून लगेच निघायचं आहे." सानवी त्याच्याकडे न बघता बोलत होती.

" सानवी.." अनिरुद्धने हाक मारली. सानवीने सरबत संपवले.

" गाडीच्या चाव्या द्या. मी चालवते आता."
अनिरुद्ध काचेचे ग्लास देऊन येईपर्यंत सानवीने स्टिअरिंग हातात घेतले होते. काहीच न बोलता ती गाडी चालवायला लागली.

" सानवी, बोलाना माझ्याशी. तुमचा शांतपणा अस्वस्थ करतो आहे मला." अनिरुद्ध काकुळतीला आला होता. पण सानवी गप्पपणे गाडी चालवत होती. अनिरुद्धने मोबाईल बघितला. साधा बँकेचा मेसेज होता.


" नको ना अंत बघूस माझा.." ब्रेकवर असलेल्या सानवीच्या हातावर हात ठेवत अनिरुद्ध बोलला. सानवीने जागा बघून गाडी थांबवली.

" गाडीमधून उतरा.."

" काय झालं तरी काय?"

सानवी गाडीमधून खाली उतरली. तिच्या मागोमाग अनिरुद्ध उतरला.

" आता तरी बोल."

" तुम्ही बरोबर बोलत होता. आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे. हे नातं पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही. मला माफ करा. मी भावनेच्या भरात वाहून चालले होते." सानवी अनिरुद्धकडे पाठ करुन बोलली.

" मला हे आधीच माहित होतं. माझ्यावर कोण आणि का प्रेम करेल? म्हणून मी तुमच्यापासून लांब रहात होतो. पण लांब राहता राहता कधी प्रेमात पडलो तेच समजलं नाही." अनिरुद्ध खिन्नपणे बोलून गेला.

" काय म्हणालात? परत सांगाल का? ऐकू नाही आले.." सानवीचा आवाज कापत होता.

" मी कधी तुझ्या प्रेमात पडलो मला समजलंच नाही.. मला माहित आहे ते अयोग्य आहे..पण..." अनिरुद्ध गाडीला टेकून उभा राहिला. अतिव दुःखाने त्याने डोळे बंद करून घेतले.

" मग हे सांगायला किती वेळ लावलास?" त्याच्या गालावर ओठ ठेवत सानवी म्हणाली.

" सानवी.. मला समजतच नाहीये काय खरं आणि काय खोटे?" अनिरुद्ध बोलत होता.

" काही गरज नाहीये विचार करायची.. फक्त एवढंच खरं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं माझ्यावर.." सानवी त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली.

" म्हणजे तू नाटक केलेस?"

" हो.. कारण तू प्रेमाची कबुली द्यायला तयार नव्हतास ना?"

" पण हे चुकीचे आहे."

" प्रेम कधीच चुकीचे नसते. मला दिसते आहे तुझ्या डोळ्यात तुझे माझ्यावर असलेले जीवापाड प्रेम. "

" सानवी.."

" काही बोलू नकोस.. मला अनुभवू दे माझ्या पहिल्या प्रेमातले नाजूक क्षण.." सानवी अनिरुद्धच्या मिठीत विरघळत म्हणाली. अनिरुद्धचा लटका विरोध गळून पडला आणि त्यानेही तिला आवेगाने जवळ घेतले.

दोघांचा प्रेमाचा आवेग ओसरल्यावर दोघे तिकडच्या एका झाडाखाली बसले. सानवी अनिरुद्धला चिकटून बसली होती जणू त्याला कोणीतरी पळवून घेऊन जाईल.

" आता चिडणार नसशील तर एका प्रश्नाचे उत्तर देशील?" अनिरुद्धच्या खांद्यावर डोके ठेवत सानवीने विचारले.

" काहिही विचार.. माझं पूर्ण आयुष्य आता तुझंच आहे." सानवीचा हात हातात घेत अनिरुद्ध म्हणाला.

" तू एवढ्या कष्टाने शिकलास. घरात सासूबाईंचे एवढे चांगले संस्कार. मग तू.. मग तू.. या चुकीच्या रस्त्यावर?" सानवीला पुढे बोलवेना.

" शोषक सगळीकडेच असतात. आणि शोषण फक्त स्त्रियांचेच होते असे नाही. ते पुरूषांचेही होते.." अनिरुद्ध बोलू लागला.


कोणी केले असेल अनिरुद्धचे शोषण? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all