आमचं वेगळं आहे.. भाग १३

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग १३


मागील भागात आपण पाहिले की सानवी आणि अनिरुद्ध दोघे मंदिरात जातात. तिथे अनिरुद्ध सानवीला उचलून पायर्‍या चढतो. आता बघू पुढे काय होते ते.


" हे काय? आज गाद्यांच्या मध्ये या उश्या का ठेवल्या आहेत?" खोलीत आलेल्या अनिरुद्धने गाद्यांकडे बघत विचारले.

" ते उगाचच मला रात्री बाजूला सरकवायचा त्रास नको ना." बांगड्यांशी खेळत सानवी उत्तरली.

" तुम्ही अजूनही चिडला आहात का?" अनिरुद्ध अजूनही अस्वस्थ होता.

" ना.. बाबा.. मी कशाला चिडू? आणि कोणावर? आपण तर आपल्याच माणसांवर चिडतो ना?" सानवी अजूनही अनिरुद्धकडे बघत नव्हती.

" तुम्ही मुद्दाम करताय का हे?"

" मी काय केले?"

" माझ्याकडे दुर्लक्ष.." सानवीने वर बघितले. तिला अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला.

" मी आणि दुर्लक्ष? एकतर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचे नसते, मला काही सांगायचे नसते. मग मी काय करायचे? नशीब इथे गौरी होती, नाहीतर माझे काय झाले असते. देवालाच माहित."

" माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखे काहीच नाही." अनिरुद्ध म्हणाला.

" असे तुम्हाला वाटते. गौरीने सांगितले थोडेफार मला."

" ही गौरी पण ना.." अनिरुद्ध डोक्यावर हात चोळत म्हणाला.

" काय हरकत आहे तिने मला सांगितले तर? मी नाही तुम्हाला माझ्या घरातल्या गोष्टी सांगितल्या?" सानवी उठून अनिरुद्ध जवळ आली.

" ते तुम्ही भावनेच्या भरात सांगितले." अनिरुद्ध सानवीच्या डोळ्यात बघत बोलला.

" मग त्याच भावना तुमच्याकडे नाहीत का?" सानवीच्या डोळ्यात अनिरुद्धसाठी आव्हान होते.

" सानवी, हे जे काही चालू आहे. ते.. ते.. चांगलं नाहीये.. आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे." अनिरुद्ध तिच्यापासून दूर होत होता.

" कॉन्ट्रॅक्ट जरी असले तरी कायदेशीर लग्न तर झाले आहे ना.. मग काय हरकत आहे?" सानवीची निराशा लपत नव्हती. अनिरुद्धला तिचा निराश चेहरा बघवला नाही. त्याने तिचा चेहरा हातात धरला,

" मी तुझ्या योग्य नाही.."

" मला नाही वाटत.." सानवीचे ओठ आसुसले होते. अनिरुद्धने तिच्या डोळ्यात पाहिले.. तो त्याचा चेहरा तिच्याजवळ आणू लागला. सानवीने डोळे मिटून घेतले. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकले.

" तुला माझ्याबद्दल काहीच माहित नाही. नको हा वेडेपणा करू." त्याच्या डोळ्यातले तप्त अश्रू सानवीच्या चेहर्‍यावर पडले.

" मला माहित करून घ्यायचे आहे." त्याला मिठी मारत सानवी म्हणाली.

" उद्या जाताना बोलू." अनिरुद्ध मिठी घट्ट करत म्हणाला, जणू त्याला तिला गमवायचे नव्हते.

" उद्या लगेच निघणार आपण?" सानवी मिठीतून दूर होत बोलली. "पण आपण चार दिवसांसाठी आलो होतो ना? मला परीसोबत रहायचे होते."

" माझ्या बाबांना भेटल्यावर तुम्ही स्वतःच इथून निघण्याचा हट्ट कराल." अनिरुद्ध कडवटपणे बोलला. "आणि त्यांना उद्या भेटावेच लागेल."

" ते पण असेच आहेत का? रागीट, गंभीर. तुमच्यासारखे?"

" मी रागीट आणि गंभीर आहे?" सानवीचा हात पकडत अनिरुद्धने विचारले.

" फक्त रागीट आणि गंभीरच नाही तर अगदी कडू आहात.. कारल्यासारखे." सानवी हसत आपला हात सोडवून घेत होती.

"येता जाता मला कडू म्हणत असता.. काय वागलो आहे मी असे?" अनिरुद्ध हात अजिबात सोडत नव्हता.

" आई ग.." सानवी जोरात ओरडली.

" काय झाले?" अनिरुद्धने घाबरून हात सोडला.

" काही नाही.. हात सोडवून घ्यायचा होता." हसत सानवी म्हणाली.

" तुम्ही ना.. टोटल फिल्मी आहात.." अनिरुद्धही हसू लागला.

" आणि तुम्ही नाटकी." सानवी त्याला चिडवत म्हणाली. तिच्या हाताची जखम बघून अनिरुद्धला कसंतरी झाले. त्याने तिचा तो हात हातात घेतला. हळूवारपणे कुरवळला.

" परत कधीच बांगड्या भरू नका."

" ते सौभाग्याचे वाण होते. देवीचा आशीर्वाद. सुखी संसारासाठी. कसं नाही म्हणणार होते?"
सानवी हात सोडवून घेत म्हणाली. आणि गादीवर जाऊन झोपली. अनिरुद्धही त्याच्या गादीवर गेला पण झोपायच्या आधी मधल्या उश्या काढून ठेवायला विसरला नाही. सानवी हसली आणि अनिरुद्धला बिलगली.


" काकू, तुमच्या डोळ्यात पाणी?" स्वयंपाकघरात चहा करत असलेल्या सुलभाताईंना सानवीने विचारले.

" काही नाही ग.. डोळ्यात काहीतरी गेले. आणि तू मला काकू का म्हणतेस? आई म्हण किंवा सासूबाई तरी.." सुलभाताई डोळ्यातले पाणी पुसत म्हणाल्या.

" काही डोळ्यात गेले नाही. दादा आज बाबांना भेटणार आहे ना, म्हणून तिची रडारड सुरू आहे." गौरी परीला खाली ठेवत म्हणाली. सुलभाताई तिला गप्प राहण्यासाठी खुणावत होत्या पण गौरी पुढे बोलू लागली.

" आई, आता ती घरातलीच एक आहे. किती दिवस लपवणार हे सगळे? कधी ना कधी तिला समजणारच ना?"

" सानवी.. तिच्याकडे लक्ष नको देऊस. पण मला ना तुझे खूप कौतुक वाटतंय.. तू एवढी शहरातली श्रीमंताची पोर, पण आमच्या घरात दोनच दिवसांत छान रूळलीस ग. साडी नेसून वगैरे. खूप बरं वाटलं. मला ना सतत वाटायचं माझ्या अनिरुद्धचं कसं होईल, काय होईल? पण तुला बघून चिंता मिटली. मी जास्त काही नाही केलं पण माझ्या सुनेसाठी पै पै साठवून या बांगड्या केल्या आहेत. आवडल्या तर ठेव नाहीतर मोडून हवं ते कर. मला वाईट नाही वाटणार." सुलभाताई एका डब्यातल्या बांगड्या सानवीच्या हातात देत म्हणाल्या.

" एवढ्या छान बांगड्या मी का मोडू? खरंतर माझ्या नवर्‍याने मला लग्नाचे काहीच गिफ्ट दिलं नाही. या बांगड्या मी नेहमी घालून त्याला आठवण करून देईन की सासूबाईंनी हे दिलं तू काय देणार?" सानवीचे बोलणे ऐकून सुलभाताईंच्या चेहर्‍यावर हसू आले.

" अशीच आनंदी रहा आणि त्यालाही ठेव." तिची अलाबला काढत त्या म्हणाल्या.

" याच का आमच्या सूनबाई?" स्वयंपाकघराच्या दरवाजातून आवाज आला. सुलभाताई आणि गौरी चपापल्या.

" तुम्ही इथे? मी आणतच होते चहा." सुलभाताई अनिरुद्धच्या बाबांना म्हणाल्या.

" कधीतरी आम्ही इथे आलो तर काय हरकत आहे?" बाबा पाटावर बसत म्हणाले. सानवी पटकन त्यांच्यासमोर वाकली. तिला आशीर्वाद म्हणून ते तोंडातल्या तोंडात पुटपुटले.

" चिरंजीव दिसत नाहीत ते.. की पळाले ते आम्हाला बघून?"

" असा कसा पळेन मी? पळपुटा थोडाच आहे तुमच्यासारखा?" स्वयंपाकघरात येत अनिरुद्ध बोलला. त्याला बघून त्याचे बाबा सावरून बसले. पुढे काय होणार या भितीने सुलभाताई देवाचे नाव घेऊ लागल्या

" ते लग्नाला बोलावले नाही त्यावरून समजले. लग्नाआधीच काही भानगड?" छद्मी हसत ते बोलले.

" श्शी.. कसं बोलवतं ओ बाबा तुम्हाला हे सगळं ? ते ही दादाबद्दल?" गौरी मध्ये बोलली.

" ज्यांच्या मनात घाण भरलेली असते ते चांगलं बघूच शकत नाही. तुम्ही जर शुद्धीवर असता ना तर लग्नाला नक्कीच बोलावले असते. पण वरातीसमोर तुमचा तमाशा नको म्हणून टाळले. सानवी चल. आपण निघूया. आई, गौरी येतो आम्ही. आपण फोनवर बोलूयातच. राघव..." रागाने परीला उचलून बाहेर नेत अनिरुद्ध बोलला.

" बाबा.. निघतो आम्ही. आरोप करण्याआधी कारण विचारले असते तरी चालले असते. मी तसंही सांगितलं असते. माझ्या बाबांची तब्येत बरी नाही म्हणून आम्हाला तातडीने लग्न करावे लागले. बाकी तुम्ही समजता तसे काहीच नाही." हळू आवाजात पण ठामपणे सानवी बोलली.

"सासूबाई, येते मी. गौरी ताई लक्ष ठेवा. आपण बोलूच फोनवर." सुलभाताईंना नमस्कार करत सानवी बोलली. त्या तिला सोडायला बाहेर आल्या. अनिरुद्ध ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. राघवने परीला घेतले होते.

" अनि.. राग नको रे ठेवू मनात. त्यांचं फार प्रेम आहे तुझ्यावर. " सुलभाताई अनिरुद्धला समजावत म्हणाल्या.

" ते दिसलं प्रेम.. आपल्या सुनेबद्दल बोलताना तरी विचार करायचा." अनिरुद्ध रागाने धुमसत होता.

"आम्ही निघतो आता. पोहोचल्यावर फोन करते." सानवी गाडीत बसत म्हणाली. कोणाशीही न बोलता अनिरुद्धने गाडी सुरू केली. पाठीमागे वळून बघताना सानवीला दिसले सगळ्यांचे डोळ्यात पाणी असलेले चेहरे आणि घराच्या दरवाजात उभे असलेले अनिरुद्धचे बाबा.


अनिरुद्ध परतीच्या प्रवासात सांगेल का त्याचा भूतकाळ सानवीला? तो ऐकून सानवी करेल का त्याचा स्वीकार? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all