आमचं वेगळं आहे.. भाग १२

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग १२


मागील भागात आपण पाहिले की सानवी अनिरुद्धसोबत त्याच्या घरी आली आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" सानवी.. मी खरंच नाही राहू शकत तुझ्याशिवाय." अनिरुद्ध मिठी घट्ट करत म्हणाला.

" किती रे उशीर केलास हे सांगायला.. मी तर तुला बघताच तुझ्या प्रेमात पडले होते. आता मला सोडून कुठेच जाऊ नकोस."


" जाऊ नकोस काय? उठा.. आपल्याला मंदिरात जायचे आहे ना?" अनिरुद्ध सानवीला उठवत होता.

" अनिरुद्ध.. तुम्ही आता.. मी तुमच्या.." सानवी झोपेतून जागी होत म्हणाली.

" तुम्हाला स्वप्न पडले असेल. उठा." सानवीने त्याच्याकडे बघितले. त्याचे आवरून झालेले दिसत होते. सानवीची झोप उडाली होती. तिला रात्रीच्या घटना आठवल्या.

" मी रात्रभर तुमच्या शेजारी झोपले होते?" सानवीचे गाल लाल झाले होते.

" नाही.. तुम्ही झोपल्यावर लगेचच मी तुम्हाला बाजूला सरकवले होते." अनिरुद्ध त्याच रुक्षपणे बोलला.

" तो रात्री कसला आवाज होता? आणि तुम्ही तर म्हणाला होतात तुमचे वडील अंथरूणाला खिळलेले वगैरे आहेत. मग ?" सानवीने त्याला विचारले.

" त्या बाबतीत मी तुमच्याशी खोटं बोललो. मला खरंच माफ करा. पण ते जे वागतात ते सांगण्यासारखं नसतं म्हणूनच." अनिरुद्धचा तो अपराधी चेहरा सानवीला बघवला नाही.

" मी आवरून येते." सानवी तिथून जाऊ लागली. पहिल्यांदाच स्वतःहून अनिरुद्धने तिचा हात पकडला.

" चिडलात?"

" त्याने काही फरक पडतो?"

" खूप.."

" हात सोडा माझा. मला आवरायचे आहे."

अनिरुद्धने सानवीचा हात सोडला. चहानाश्ता झाल्यावर सुलभाताई सोडून सगळे मंदिरात जायला निघाले. अनिरुद्धचे बाबा झोपले होते म्हणून त्या येणार नव्हत्या. अनिरुद्ध ड्रायव्हिंग करायला बसला. सानवी त्याच्या शेजारी बसायचे सोडून पाठी गौरी आणि परीसोबत बसली. राघव मग पुढे जाऊन बसला. काल सानवीला बघून रडणारी परी आज मात्र तिच्यासोबत छान खेळत होती. अनिरुद्धने गाडी सुरू केली. सानवी पाठी बसल्यामुळे तो नाराज झाला होता. त्याने गाडीमधला आरसा सानवीचा चेहरा दिसेल असा ॲडजस्ट करून घेतला. सानवीला ते समजले. तो तिला सॉरी म्हणायचा प्रयत्न करत होता तर ती आज त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. गाडी मंदिरापाशी पोहोचली. गर्द वनराईत दडलेले मंदिर छोट्याश्या टेकडीवर होते.
ते बघून सानवी खुश झाली.

" करायची का सुरुवात डोंगर चढायला?" सानवीकडे बघत अनिरुद्धने विचारले. ती मान फिरवून तिकडच्या दुकानात ओटीचं सामान घ्यायला गेली. तिची मेंदी आणि उलटं मंगळसूत्र बघून ओटी विकणाऱ्या मावशींनी चौकशी सुरू केली.

" नवीन लग्न झालेलं दिसतंय.."

" हो.."

" मग तुम्हाला माहित नाही का?"

" काय?"

" अकरा पायर्‍या तरी नवर्‍याने बायकोला उचलून घ्यायचे असते." त्या मावशी सांगत होत्या.

" जाऊ दे ना मावशी.. असं काही नसतं." असं म्हणत त्यांना पैसे देऊन सानवी वळली. पाठी उभ्या असलेल्या अनिरुद्धने हे ऐकले होते. त्याने तिच्या हातातली ओटीचे ताट राघवच्या हातात दिले. आणि पटकन तिला उचलून घेतले.

" अनिरुद्ध, प्लिज मला सोडा." सानवी बोलत होती.

" अट नंबर कितीतरी.. माझ्यामध्ये बोललेलं मला आवडत नाही." तिच्या कानात कुजबुजत अनिरुद्ध बोलला आणि पायर्‍या चढू लागला. सानवी पायर्‍या मोजू लागली. अकरा पायर्‍या होताच सानवीने अनिरुद्धला तिला खाली ठेवायला सांगितले.

" आता तरी विश्वास आहे का, की असं काही असतं म्हणून?" सानवीला खाली ठेवत अनिरुद्ध बोलला आणि पुढे चालू लागला.

" आमचा दादा पण ग्रेट आहे.. आमच्या यांनी तर पहिल्याच पायरीवर मला खाली उतरवले होते." दादाचं कौतुक करत गौरी बोलली.

मंदिरात अनिरुद्ध आणि सानवीने देवीची ओटी भरली. त्यानंतर राघव जेवणाची व्यवस्था करायला गेला तर अनिरुद्ध परीसोबत खेळत होता. सानवी आणि गौरी एका झाडाखाली बसल्या.

" माझ्या दादाला सांभाळ हं.." सानवीचा हात हातात घेऊन गौरी बोलली.

" त्याला काय सांभाळायचे?" सानवी हसत बोलली.

" त्यालाच खूप सांभाळायचे आहे. खूप खूप त्रास सहन केला आहे त्याने. बोलून नाही दाखवत कधी पण आतून खूप तुटलेला आहे ग. तुला तर दिसले असेलच ना." गौरी बोलत होती.

" म्हणजे?" समोर परीसोबत लपाछपी खेळत असलेल्या अनिरुद्धकडे बघत सानवीने विचारले.

" काल आवाज ऐकला असशीलच ना? ते आमचे बाबा होते. दिवसभर झोपणं आणि रात्री असा त्रास देणं. जसं आठवतं आहे तसं आम्ही हेच जगतो आहोत. आईने खूप कष्ट करून आम्हाला वाढवलं. दादाने सुद्धा शाळेत असल्यापासून कामे करून हातभार लावला."

" मग आई वेगळ्या का नाही झाल्या?"

" वेगळं होऊन कुठे जाणार? हे गाव आहे. इथे हे असंच चालतं. म्हणून संधी मिळताच दादा शहरात गेला. तिथे कामं करून पैसे पाठवू लागला. त्याला आईला आणि राघवला वेगळं घर घेऊन द्यायचे होते पण आई ऐकायला तयार नाही. मग त्यानेच आधीचे घर हे असे छान, नेटके बांधून घेतले. तो नेहमी म्हणायचा..?"

" काय?"

" आई जशी बाबांचे सगळे गुन्हे माफ करून त्यांच्यावर प्रेम करते तसं जोपर्यंत कोणी भेटत नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. पण तू त्याला भेटलीस. तुमचं लग्न कसं ठरलं आता मी विचारणार नाही. पण त्याला सुखी ठेव.. बस.. मी पहिल्यांदा त्याला एवढं आनंदी बघते आहे." गौरीने डोळ्यातले पाणी पुसले.

" तुमच्या गप्पा झाल्या असतील तर जेवण तयार आहे. जायचे का जेवायला?" राघवने विचारले.

" चला.." दोघी उठल्या. जेवणं झाली. थोडंफार इथेतिथे फिरणं झालं. अनिरुद्ध सानवीच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करत होता पण सानवी गौरीला सोडतच नव्हती. शेवटी वैतागून तो म्हणाला,

" झालं असेल फिरून तर घरी जायचे का?"

सानवी परत गौरीसोबत पाठी बसते आहे हे बघून तर अजूनच चिडला.

" माझं डोकं दुखायला लागलं आहे. सानवी गाडी चालवाल का?"

"दादा, मी चालवू? मी शिकलो आहे गाडी." राघव उत्साहाने बोलला.

" नको.. ठोकली बिकलीस तर." अनिरुद्ध सानवीकडे बघत होता.

" मी चालवली असती पण.. " सानवीने हाताला झालेली जखम दाखवली.

" हे काय? आणि कधी लागलं?" अनिरुद्धने घाबरून विचारलं.

" अरे ते मगाशी आम्ही बांगड्या भरायला गेलो तेव्हा बांगडी फुटून त्याची काच घुसली तिच्या हातात." गौरी अपराधीपणे बोलली.

" तेव्हा का नाही सांगितलं?" अनिरुद्धच्या आवाजात काळजी आणि राग दोन्ही होतं.

" वहिनीच म्हणाली सांगू नको म्हणून."

" कळली अक्कल.. डॉक्टर कडून ड्रेसिंग करून घेतलं पाहिजे."

" एवढं काही झालेलं नाही. हळद लावली आहे. होईल बरं." असं म्हणत सानवी मुद्दाम पाठी जाऊन बसली. अनिरुद्ध रागाने गाडी चालवू लागला. घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. परी तर दमून गाडीतच झोपली होती.

" आई, मला आयोडीन दे.." घरात येताच अनिरुद्ध म्हणाला.

" का रे, काय झाले? कोणाला लागले का?" सुलभाताईंनी काळजीने विचारले.

" अग वहिनीला बांगडी लागली." गौरी हसू दाबत म्हणाली. आईने आयोडीन आणून दिले.

" चला.." अनिरुद्ध सानवीला म्हणाला.
सानवीने जखम पाण्याने धुतली. अनिरुद्धने ती जखम बघितली. त्यावर आयोडीन लावले. सानवीने हात पटकन मागे घेतला. अनिरुद्धने परत हात हातात घेतला आणि त्यावर मलम लावू लागला.

" कोणी सांगितलं होतं बांगड्या वगैरे भरायला?"

" त्या मावशी म्हणाल्या देवीला आल्यावर चारतरी बांगड्या भरायला पाहिजे म्हणून भरल्या. आणि तसेही मी परत इकडे थोडीच येणार आहे." सानवी बोलली. अस्वस्थ होत अनिरुद्ध तिथून निघून गेला.

" अनिरुद्ध, बाबा आहेत घरात. बोलणार त्यांच्याशी?" अनिरुद्धला एकटं बघून सुलभाताई म्हणाल्या.

" नको.. उगाच तोंडातून बरावाईट शब्द जायचा.. सानवीसमोर तमाशा नको. उद्या निघताना नमस्कार करून निघू. त्यांना शुद्धीवर रहायला सांग."

" तू उद्या लगेच निघणार?" आईने आश्चर्याने विचारले.

" हो.. जे दाखवायचे होते ते दाखवले सानवीला. आता जातो. कामेही आहेत."

" तुझी इच्छा. जिथे असशील तिथे सुखी रहा म्हणजे झाले." सुलभाताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या.


असं नक्की काय दाखवायचं होतं अनिरुद्धला ज्यासाठी तो सानवीला घेऊन घरी आला होता. सानवीबद्दल त्याला वाटणारी ही फक्त काळजी आहे की अजून काही? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all