आमचं वेगळं आहे.. भाग ११

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग ११


मागील भागात आपण पाहिले की सानवी अनिरुद्धसोबत त्याच्या घरी जायला निघते. आता बघू पुढे काय होते ते.


" अनिरुद्ध.. आलास तू?" आईच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.

" ही गाडी कोणाची? आणि गाडीच्या आत कोण आहे?" गौरीने विचारले.

" आई.. ही सानवी. सानवी माझी आई आणि बहिण गौरी." अनिरुद्धने ओळख करून दिली. सानवी पाया पडायला वाकली.

" अनिरुद्ध तू लग्न केलेस?" दोघींच्या नजरेत आश्चर्य आणि आनंद दिसून येत होता.

" आई.. ते.." अनिरुद्ध शब्द शोधत होता.

" काही बोलू नकोस.. गौरी जा.. पटकन औक्षणाचे ताट आणि मापटं तयार कर." गौरी आत पळाली. सानवी बघत होती.

" मी असंच आत येऊ देणार नाही. आधी नाव घ्यायला हवं." गौरी दरवाजा अडवून उभी राहिली.

" नाव?? मला नाही येत." सानवीने अनिरुद्धकडे बघितले.

" गौरी.. आम्ही दमलो आहोत प्रवासाने. येऊ देत ना आत.." अनिरुद्धचा आवाज चढला होता.

" मग मी काय करू? एकतर लपूनछपून लग्न करायचे आणि मी दरवाजाही अडवायचा नाही? चालणार नाही. आधी उखाणा घ्या दोघंही. तुमची लेक मला देणार म्हणा तरच घरात घेणार." अनिरुद्धवर आवाज चढवत गौरी म्हणाली. ते बघून सानवीला हसू आले.

" मी प्रयत्न करते..

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्माच्या गाठी..

अनिरुद्धची साथ मिळावी साता जन्मासाठी.." नाव घेणाऱ्या सानवीकडे अनिरुद्ध बघतच बसला.

" व्वा.. दादा आता तू.." गौरीने हट्ट केला.

" मला नाही हा येत.." अनिरुद्धने आढेवेढे घेतले.

" वहिनी सांग ना.."

" घ्या ना.." सानवी म्हणाली.

" सानवी.. बस्स.. झालं समाधान?" अनिरुद्धने नाव घेतले. ते ऐकून सानवी मोहरली.. काय नव्हते त्या उच्चारात? प्रेम, विश्वास, आपुलकी.. पहिल्यांदाच तिला तिचे नाव एवढे हवेहवेसे वाटले.

" आता हे माप ओलांडा आणि आत या." आई म्हणाली. सानवीने हसतच अनिरुद्धकडे बघितले आणि दोघांनी मिळून माप ओलांडले.

" तुम्ही हातपाय धुवून या.. मी चहापाण्याचे बघते. गौरी तिला दाखव आपलं घर." आईचा इशारा ओळखून गौरी सानवीला घेऊन आत गेली.

" अनिरुद्ध, आईला सांगावेसेही वाटले नाही?" आईच्या डोळ्यात पाणी होते.

" आई, तसं असतं तर आलो असतो का तिला घेऊन इथे? तुझ्यासाठीच आलो ना तिला घेऊन इथे.." अनिरुद्ध तिची समजूत काढत म्हणाला. "बरं मला सांग राघव कुठे आहे?"

" विषय नको बदलूस.. पण आवडली मला." आई हसलेली पाहून अनिरुद्ध आत जायला वळला.

" अनिरुद्ध, बाबांची चौकशी नाही करणार?"

" त्यांच्याबद्दल काय विचारायचे? ते खुश असतील त्यांच्या जगात.." अनिरुद्ध कडवटपणे बोलला आणि आई काही बोलायच्या आत तिथून निघाला. आईने सुस्कारा सोडला.

" ए वहिनी, कुठे भेटलात एकमेकांना? आणि थेट लग्न?" गौरी सानवीला त्रास देत होती. सानवीला काय सांगायचे ते समजत नव्हते.

" ओ गौराक्का.. जरा भावाकडे पण बघा की? आणि आमची परी कुठे आहे?" अनिरुद्ध सानवीची गौरीच्या तावडीतून सुटका करत म्हणाला.

" ती गेली आहे तिच्या लाडक्या मामासोबत.. तिचं काय.. जो मामा दिसतो तोच लाडका. तुला तर मीच कधी बघितले मला आठवत नाही. येता येत नाही का रे, घरी तुला? ती आई डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते. मागचे चार दिवस तर तिला एवढं तुला भेटावसं वाटत होतं की रोज रडायची.. आणि तू तिथे लग्नात रमला होतास." गौरीने मनातले बोलून घेतले.

" सॉरी ग.. पण कामच एवढं होतं."

" कसलं एवढं जगावेगळं काम करतोस तुलाच माहित." गौरीचे ते शब्द ऐकून सानवीने चमकून अनिरुद्धकडे बघितले. त्याची दुखरी नजर बघून तिला पुढे बोलावेसे वाटले नाही.

" गौरी.." अनिरुद्धने तिला सानवी तिथे असल्याची जाणीव करून दिली. गौरी सावरली.

"तुम्ही कपडे बदलून घ्या. मी आईला मदत करते." डोळे पुसत ती तिथून निघाली.

" तुम्ही घरातल्यांशी पण असेच वागता?" गौरी तिथून गेली हे बघून सानवीने विचारले.

" असेच म्हणजे?" अनिरुद्धच्या कपाळावर परत आठ्या आल्या.

" कडू कारल्यासारखे.." सानवी हसत बोलली.

"मी कडू कारले?? "

" हो.. नाहीतर काय. सांगा ना.. घरातल्यांशीही असेच बोलता?"

"अट नंबर तीन." अनिरुद्धने आठवण करून दिली पण त्याच्या बोलण्यात नसलेला जोर दोघांनाही जाणवला.

" चहा झाला आहे.." गौरीचा आवाज आला.

" चला.." अनिरुद्ध म्हणाला. सानवी पुढे झाली पण तिथे सांडलेल्या पाण्यावरून तिचा पाय घसरला आणि ती पडणार तोच अनिरुद्धने तिला धरले. आपल्याला आता जोरात लागणार या भितीने सानवीने डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिचा तो आविर्भाव बघून अनिरुद्धला आधी हसू आले. पण त्याची नजर मात्र तिच्यावरून हलेना.

"तुमचा बाथरूम बाहेरचा रोमान्स झाला असेल तर चहा घ्यायला येणार का?" कंबरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या गौरीने विचारले.. तिचा आवाज ऐकून अनिरुद्ध दचकला, सानवीने डोळे उघडले. दचकलेल्या अनिरुद्धने सानवीला सोडले. आणि ती जमिनीवर पडणार तोच तिला परत झेलले.

" मी सांगते आईला.. हे दोघे इथेच बसले आहेत म्हणून." गौरी हसत बोलली. अनिरुद्धने सानवीला नीट उभे केले.

" आता तिचा हात घट्ट धर.. म्हणजे ती पडणार नाही." गौरी बोललीच. तीच संधी साधून सानवीने अनिरुद्धचा हात घट्ट पकडला. अनिरुद्ध काही बोलला नाही पण त्याला हे आवडलेलं दिसत होतं.
दोघं स्वयंपाकघरात गेले. अजूनही जुन्या पद्धतीचेच होते ते. गौरीने तिथे पाट मांडून ठेवले होते.

" बसा.." तिने चहाचे कप हातात दिले. चहा घेताच सानवीला काहीतरी आठवले. ती पटकन उठली.

" मी आलेच हं.." असं म्हणत बाहेर गेली. ती बाहेर का गेली हे न समजून अनिरुद्ध बेचैन झाला. चहाचा कप तसाच खाली ठेवत तो म्हणाला,

" काय झाले बघून येतो." त्याला असं लगबगीने जाताना बघून गौरी हसली.

" आई, तुझा लेक प्रेमात पडला आहे ग."

" पडू दे ग.. इतक्या वर्षांची माझी इच्छा पूर्ण होते आहे. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो ना?"

" तुम्ही इथे काय करताय?" गाडीबाहेर उभ्या असलेल्या अनिरुद्धला बघून सानवीने विचारले.

" मी माझी बॅग घ्यायला आलो आहे. तुम्ही का निघून आलात?"

" घरी फोन केला नव्हता पोहोचल्याचा. ते लक्षात आले.. आणि आपण मगाशी हे गिफ्ट्स पण नेले नाहीत. ते घेत होते."

" तसं सांगून यायचं ना.. मी घेतो हे सगळं." अनिरुद्ध तिच्या हातातलं सामान घेऊ लागला.

" ए दादा.. तू आहेस ना?" बाहेरून एक हाक आली.

" राघव.."

" तू कधी आलास? मी इतका वेळ घरी होतो. ही रडायला लागली म्हणून बाहेर गेलो.. तर तू आलास पण. आणि या कोण?" राघवला खूप आनंद झाला होता. पण अनोळखी माणसांना बघून परी मात्र घाबरून रडायला लागली. सगळे आत गेले. सानवीने आईने पाठवलेल्या सगळ्या भेटवस्तू दिल्या.

" बाबा कुठे आहात? त्यांच्यासाठी हे होतं." सानवीने विचारले. अनिरुद्धने सांगितलेलं, बाबा अंथरूणात असतात. ते कुठेच दिसत नव्हते. सानवीला प्रश्न पडला होता. पण तिचा प्रश्न ऐकून बाकीच्यांचे चेहरे उतरले.

" ते येतील. तुम्ही बसा बाहेर. मी स्वयंपाकाला लागते. आणि सूनबाई माझं एक ऐकशील?" सानवीने मान हलवली.

" उद्या फक्त कुलदैवताला जाऊन याल का?"

" आई पण.." अनिरुद्ध बोलत होता.

" तुम्हाला हवं आहे ना? मग नक्की जाईन." सानवी असं म्हटल्यावर अनिरुद्ध गप्प बसला. सगळ्यांची जेवणं झाली तरी अनिरुद्धच्या बाबांचा काही पत्ता नव्हता. शेवटी सानवी जांभया देऊ लागली. सुलभाताईंनी ते बघितले.

" तुम्ही दिवसभर प्रवास करून थकला असाल. जा झोपायला." सानवीने अनिरुद्धकडे बघितले.

" जा तू सुद्धा.." सुलभाताई म्हणाल्या.
गौरीने खोली छान आवरून ठेवली होती. कोपर्‍यात ठेवलेल्या मोगर्याचा सुगंध खोलीत दरवळत होता. खालीच गाद्या टाकल्या होत्या. त्याच्याकडे बघत अनिरुद्धने विचारले,

" येईल ना इथे झोप?" सानवी काहीच न बोलता झोपूनही गेली. दरवाजाला कडी लावून अनिरुद्ध झोपलेल्या तिच्याकडे फक्त बघत राहिला.

मध्यरात्री कधीतरी दरवाजा जोरात वाजला. कोणीतरी ओरडत होतं. तो आवाज ऐकून आजूबाजूची कुत्री भुंकू लागली. त्यावर शिव्यांचा भडीमार झाला. झोपेत असलेली सानवी दचकून उठली आणि बाजूला असलेल्या अनिरुद्धला बिलगली. अनिरुद्धचा चेहरा जणू दगडी झाला होता. सुलभाताईंचा हळू बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आणि तो आवाज बंद झाला. अनिरुद्धच्या शरीरावरचा कमी होत असलेला ताण सानवीला जाणवला. पण तरिही ती त्याच्यापासून दूर झाली नाही. त्यानेही तिला दूर केले नाही. दोघेही तसेच पडून राहिले.


कोणाचा होता तो आवाज? फक्त सानवीच आपले प्रेम शोधते आहे की अनिरुद्धला सुद्धा प्रेमाची गरज आहे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all