मागील भागात आपण पाहिले की सानवी तिच्या कंपनीबद्दल अनिरुद्धला सांगते. सकाळी अचानक त्याला बाहेर जावे लागते. बघू आता पुढे काय होते ते.
" तुम्ही खरंच येणार आहात का?" बॅग भरता भरता अनिरुद्धने विचारले.
" आईबाबांना काय सांगू?" सानवीने विचारले.
" पण तुम्ही शहरात राहिलेल्या.. तुम्हाला आवडेल का गावात? आणि माझ्या गावातलं वातावरण थोडं सनातनी आहे. तिथे साड्या नेसाव्या लागतील."
" खरं सांगू?"
" खरंच सांगा.."
" जशी कंपनी चालवायला सुरूवात केली आहे ना तसं सुट्टी न घेता फक्त आणि फक्त काम केले आहे. मला मनापासून आवडेल चार दिवस बाहेर जायला. आणि साडीचा कशाला एवढा बाऊ करायचा? मला नऊवारी नेसता येत नाही. सहावारी येते." सानवी निर्धास्त होती.
" एका परपुरूषासोबत जायला भिती नाही वाटत?"
" परपुरूष?? कोण?कायदेशीर नवरा आहे माझा." सानवी हसत बोलली.
" एवढा विश्वास?" अनिरुद्धच्या कपाळावर आठ्या होत्या.
" आत्मविश्वास.. निघायचे? गाडीच घेऊन जाऊया." सानवीने सुचवले. "आता निघताना तरी तडकाफडकी निघायला काय झाले ते सांगणार का?"
" आईचा फोन आला होता. बाबा खूप आजारी आहेत. भेटून जा म्हणून."
"मग तुम्हाला टेन्शन नाही आले त्यांच्या तब्येतीचे?" काळजीने सानवीने विचारले.
" तो तिचा बहाणा आहे मला बोलावून घ्यायचा. गेलो नाही तर तिला वाटेल माझा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आणि मग ती उगाचच टेन्शन घेत बसेल."
" मला बघून आश्चर्य नाही वाटणार त्यांना?"
" खूप आनंद होईल. तिची एक तरी इच्छा पूर्ण झाली म्हणून."
" नक्की?"
"हो.. एवढी चौकशी करताय पण आपण कुठे जातो आहोत ते तरी माहिती आहे का?"
" हो.. तुमच्या घरी. आता सगळं इथेच बोलायचे की गाडीत बोलायला काही शिल्लक ठेवणार?" सानवीने बॅगेत साड्या भरत विचारले. दोघे बाहेर आले. आईने खूप तयारी करून ठेवली होती.
" हे काय?" अनिरुद्धने विचारले.
" तुमचे लग्न जरी रजिस्टर झाले तरी काही रिवाज असतात. हे थोडंसं आमच्याकडून. आधी माहित असतं तर तयारी करून ठेवता आली असती. काय म्हणतील तुमच्या घरातले आता?" शोभाताई काळजीत पडल्या होत्या.
" काकू.. असं काही नाही वाटणार त्यांना. हे सगळे.. याची काही गरज नाही."
" अनिरुद्ध तू लहान आहेस. नाही म्हणायचे नाही.. समजलं?" बाबांनी दम दिला.
" हो. येतो आम्ही." देवाला आणि आईबाबांना नमस्कार करून दोघे निघाले.
सानवी गाडी चालवत होती. अनिरुद्ध शांतपणे बाहेर बघत होता.
सानवी गाडी चालवत होती. अनिरुद्ध शांतपणे बाहेर बघत होता.
" तुमच्या कुटुंबाची थोडी माहिती द्याल का? म्हणजे कोण कोण असते वगैरे?" सानवीने अनिरुद्धच्या टोनमध्ये विचारले. अनिरुद्ध गालात हसला.
" घरी मी म्हटल्याप्रमाणे आईबाबा आणि भाऊच असतो. पण मी येतो आहे म्हटल्याबरोबर माझी बहिण, गौरीही येईल तिच्या लेकीला घेऊन."
" ओह्ह.. बाळ पण आहे तिला?" सानवीला आश्चर्य वाटले.
" हो.. अठरा वर्षाची होताच तिचे लग्न झाले. वयाने लहान आहे पण वागते आजीबाईसारखी. आणि भाऊ राघव म्हणजे समजूतदारपणाचा अर्क आहे. जीवतोड मेहनत करतो आहे. " अनिरुद्ध बोलत होता. सानवी फक्त ऐकत होती. दोघेही जेवायला एका हॉटेलमध्ये थांबले.
" तुम्ही ऑर्डर द्या.. मी येतोच." अनिरुद्ध वॉशरूमच्या दिशेने गेला. सानवी मेनूकार्ड बघत होती. तेवढ्यात तिला पृथाचा फोन आला. फोनवर बोलत असतानाच अनिरुद्ध तिथे आला. सानवीने ऑर्डर दिलेली नाही हे बघून त्याने ऑर्डर दिली. तो आला हे बघून सानवीने लगेच फोन ठेवला.
" ते पृथाचा फोन आला होता.." सानवी स्पष्टीकरण देऊ लागली.
" मी विचारले?" त्याने आपले डोके मोबाईलमध्ये घातले.
" मी वैतागले आहे.."
" दोनच मिनिटं.. झालंच." म्हणत अनिरुद्धने वर बघितले. सानवीच्या पाठीमागे आरसा होता.
" तुम्ही इथे बसा.. मी तुमच्या जागेवर बसतो."
" पण का?"
" मी सांगतो आहे ना.." त्याचा आवाज थोडा चढला होता. सानवी गुपचूप उठली. तेव्हा तिची नजर समोरच्या टेबलवर पडली. समोर मुलांचा एक ग्रुप बसला होता. ती मुले तिच्याकडेच बघत होती.
" प्रोटेक्शन का?" सानवीने हसत विचारले. " ते ही जागा बदलून.. व्वा."
" आपण इथे जेवायला थांबलो आहोत. मारामारी करायला नाही." त्या मुलांकडे दुर्लक्ष करत अनिरुद्ध बोलला.
" ते ही आहेच.. अशीही मी कोण लागते तुमची?" बोलता बोलता सानवीने गळ्यातले छोटे मंगळसूत्र बाहेर काढले. अनिरुद्ध बघतच बसला.
" हे काय?"
" मारामारी टाळण्याचा दुसरा सुरक्षित उपाय.." सानवी हसत बोलली. तोपर्यंत अनिरुद्धने सांगितलेले सूप आले होते.
" तुम्हाला कसं माहीत मला पालक सूप आवडतं ते?" सानवीला आश्चर्य वाटले.
" ते मी हेल्थ कॉन्शिअस आहे ना म्हणून." त्याने वर न बघता उत्तर दिले.
" नवरे असे वागतात ना म्हणून बायका बाहेर बघतात." नाटकी सुस्कारा सोडत सानवी बोलली. तिचे बोलणे ऐकून अनिरुद्ध गालातल्या गालात हसला.
" जेवायला मजा आली.. आवडतं जेवण आणि सोबत न बोलणारी कंपनी." सानवीची बडबड सुरू होती.
" तुम्ही ऑफिसमध्ये पण एवढंच बोलता का?" अनिरुद्धने विचारले.
"बोलल्याशिवाय माझा वेळ जात नाही."
" तुमचे क्लायंट्स मिटींग्स लवकर संपवत असतील ना?" अनिरुद्ध काय बोलतो आहे हे समजायला सानवीला वेळ लागला.
" तुम्ही पण ना.." ती खाता खाता बोलायला गेली आणि अचानक घास घश्यात अडकला. अनिरुद्ध पटकन उठून तिच्याजवळ बसला. तिला पाणी दिले.
" आता ओके का?" सानवीने मान हलवली. तो परत त्याच्या जागेवर जाणार तोच सानवीने त्याचा हात घट्ट पकडला. तिने त्याला नजरेने बाजूला बसायला सांगितले. अनिरुद्ध अवघडून बसला. त्यानंतरचे दोघांचे जेवण शांततेतच झाले.
" निघायचे?" सानवीने विचारले.
" एकच मिनिट.." अनिरुद्धने वेटरला काहीतरी सांगितले. त्यानंतर आलेली कोल्डकॉफी विथ आईस्क्रीम बघून सानवी हरखली.
" कोणी सांगितलं हे सगळं? पार्थ की पृथा?"
" कोणी कशाला सांगितलं पाहिजे? मला जे आवडतं ते मी मागवलं." अनिरुद्ध मोबाईलमध्ये बघत होता.
" खडूस.."
" काही बोललात का?"
" नाही.. निघायचे इथून? आणि आता मी गाडी नाही चालवू शकणार. तसेही मला रस्ता माहित नाही.. आणि एवढं छान जेवण झाल्यावर मी मस्त झोप काढणार आहे."
वेटर येऊन बिल ठेवून गेला. सानवीने बिल द्यायला पर्स काढली. अनिरुद्धने हाताने नकार दिला.
" जुनी माणसे असं म्हणतात की नवरा जवळ असताना बायकोने पैसे द्यायचे नसतात." त्याने पैसे दिले आणि तिचा हात मागितला. सानवीने त्याच्या हातात हात दिला आणि दोघे बाहेर आले.
" हा होता मारामारी टाळण्याचा तिसरा सुरक्षित उपाय." अनिरुद्ध परत हसत बोलला. थक्क होऊन सानवी तशीच उभी राहिली.
" बसणार ना गाडीत?" ड्रायव्हिंग सीटवर बसत त्याने विचारले. सानवी बाजूच्या सीटवर बसली. आणि गाडी सुरू झाली तशी खरंच झोपूनही गेली. अनिरुद्धचा एक डोळा तिच्याकडे तर एक रस्त्याकडे होता. एका बाजूला रस्त्यावरची वळणे तर दुसरीकडे तिच्या चेहर्यावर रुळणार्या बटांची. असह्य होऊन त्याने गाडी एका बाजूला थांबवली. त्यामुळे सानवीला जाग आली.
" आलो का आपण?" तिने विचारले.
" नाही.." स्टिअरिंगवर डोकं ठेवून अनिरुद्ध बोलला.
" मग काय झालं? आपण असेच का थांबलो आहोत?"
" ते तुम्ही झोपलात मग मलाही थोडी झोप येऊ लागली.."
" म्हणून प्रवास करताना गाणी म्हणतात किंवा ऐकतात.. लावू का गाणी?" सानवीने विचारले. अनिरुद्धने होकार दिला.
" कहना ही क्या ये नैन इक अन्जानसे जो मिले..
चलने लगे मोहब्बत के जैसे यह सिलसिले..
अरमां नये ऐसे दिलमें खिले, जिनको कभी मैं ना जाँनू..
वो हमसे, हम उनसे कभी ना मिले कैसे मिले दिल ना जाँनू..
अब क्या करे, क्या नाम लें कैसे उन्हें मैं पुकारू??" एका बाजूला चित्रा गात होती. दुसरीकडे हे दोघेही त्या गाण्याच्या अर्थात हरवून जात होते.
अनिरुद्धने गाडी थांबवली.
" परत झोप आली? आता तर मी जागी होते." सानवी तक्रार करत बोलली.
" नाही.. माझे घर आले." समोर हात करत अनिरुद्ध बोलला. सानवीने समोर बघितले. समोर एक छोटेसे पण सुबक घर होते. गाडीचा आवाज ऐकून आतून दोघीजणी बाहेर आल्या.
" माझी आई आणि गौरी.." अनिरुद्ध आनंदाने गाडीबाहेर पडला.
सानवी आली तर आहे अनिरुद्धच्या घरी.. कसे होईल तिचे इथे स्वागत बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा