आमचा चैत्र आणि मी...

Amacha Chaitra Ani Mi
         शार्वरी नाम संवत्सर (सन 2020) चैत्र पौर्णिमेची ती सुवर्ण पहाट पण तरीही सगळीकडे शुकशुकाट ,कोविड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरे बंद करण्याचे आदेश दिले गेलेले अत्यंत साधेपणाने हनुमान जयंती आयोजित केली गेली होती, मंदिराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या दरवाज्यांना कुलूप लावणेत आलेलं. ब्राम्ही मुहूर्तावरचं पूजा आटोपली होती मंदिरात फक्त 5 माणसं मी, विणेकरी, वंदूर गावचे खातेदार सर्जेराव सरकार, एक वारकरी संप्रदायातील व्यक्ती आणि स्वामी.
मनातून फार खचलो होतो, कारण पहिल्यांदाच हे अनुभवत होतो , दरवर्षी गजबजून जाणाऱ्या परिसरात स्मशान शांतता होती, अतिशय चैतन्यमय वातावरण, भक्तिमय असणार वातावरणाची जागा थोड्या भीतीने घेतली होती. मंदिराजवळील लोक फार मोठ्या आशेने बाहेर थांबले, श्रींचा जन्मकाळ पाहण्यासाठी. ते बाहेरच्या कठड्यावरूनचं त्यांना दर्शनाची आस होती. श्रींचा पाळणा बांधला होता आणि धार्मिक विधी सुरू झाले, मला शब्दचं स्फुरत न्हवते , मन भरून आलं होतं, मनात भाबडेपणानं म्हणलंच देवा काय ही वेळ आलीय.
आणि अखेर मुख्य पूजेला सुरवात झाली ओम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः .... माझी पुढची चोवीस नाव कधी झाली कळलीच नाहीत. यानंतरच्या या ओव्या.

पिंड घारीने झडपिला | अंजनीने तो सेविला ॥१॥
अंजनीच्या तपासाठीं | महारुद्र आले पोटी ॥2॥
चैत्र शुध्द पौर्णिमेसी | सूर्योदय समयासी ॥3॥
महारुद्र प्रगटला | नामा म्हणे म्या वंदिला ॥4॥

हे म्हणताना तर अक्षरशः माझ्या सर्वांगातून रोमांच होते,हात माझा थरथर कापत होता कंठ दाटून आलेला, डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या...

जन्मकाळ झाला आणि आम्ही मंदिर बंद करून घरी गेलो ते डोळ्यातली अश्रू पुसत ...
#आठवण #2020चैत्र