आमचं वेगळं आहे.. भाग ७

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग ७


मागील भागात आपण पाहिले की सानवी आणि अनिरुद्धचे रजिस्टर लग्न होते. आता बघू पुढे काय होते ते.


" सानवी, दरवाजा उघडाल का?" रात्री बाराच्या सुमारास अनिरुद्धचा मेसेज आला. पेंगत असलेली सानवी दचकून उठली. मेसेज वाचून तिने दरवाजा उघडला. समोर अनिरुद्ध उभा होता. थकलेला, कपड्यांवर रक्ताचे डाग पडलेला.

" हे काय झाले?" सानवीने घाबरून विचारले.

" मला काही नाही झाले. मी कपडे बदलून येतो. खूप उशीर झाला ना मला. झोपायचं कसं काय करायचं?" अनिरुद्ध हळू आवाजात बोलत होता.

" जेवायचं काय?" सानवीने विचारले.

" मला भूक नाही." हे बोलून अनिरुद्ध कपडे बदलायला निघाला. भुकेने आणि अनिरुद्धच्या वागण्याने सानवीच्या डोळ्यात पाणी आले. काहीतरी क्लिक होऊन अनिरुद्ध थांबला.

" तुम्ही जेवलात?" त्याने विचारले.

" आपल्या घरी कोणी आलं असेल तर त्याच्याशिवाय जेवत नाहीत आमच्याकडे. आईबाबाही थांबले होते. पण त्यांना औषध घ्यायचे असते म्हणून मी जेवायला सांगितले." रागानेच सानवी बोलली.

" तुम्ही माझ्यासाठी जेवायच्या थांबलात?" त्याने परत एकदा आश्चर्याने विचारले.

" नाही.. मला आवडतं भुतासारखं रात्री एकटं जेवायला. कपडे बदलून घ्या. मी हे आवरून येते. म्हणजे परत कोणी तुमच्याकडे कपडे बदलताना बघायला नको.." सानिकाच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता.

" मी हे मळके कपडे बदलून येतो. मग आपण जेवू. चालेल का?" अनिरुद्ध अपराधी स्वरात बोलला.

" उपकार नको आहेत मला. राहिन मी एक दिवस उपाशी." सानवीच्या डोळ्यात पाणी होते. ते बघून अनिरुद्ध पुढे झाला. त्याने तिचे डोळे पुसण्यासाठी हात वर केला तोच सानवी झटकन पाठी झाली.

" अट नंबर... कितीतरी.. माझ्या इच्छेविरुद्ध हात लावायचा नाही." नाक उडवत सानवी वळली. " भाजी गरम करते आहे. फक्त पाच मिनिटे वाट बघणार.." हात खाली घेत अनिरुद्ध बेडरूममध्ये गेला. तो कपडे बदलून येईपर्यंत सानवीने स्वयंपाक गरम केला होता.

" एक विचारू?" खुर्चीवर बसत अनिरुद्धने विचारले. सानवीने नजरेनेच होकार दिला.

" तुम्ही एवढी मोठी कंपनी चालवता. तरी ही घरातली कामे करता?"

" आईने सवय लावली आहे." सानवी तुटकपणे बोलली. तिने पाने वाढून घेतली होती. तिला खूपच भूक लागलेली दिसत होती. काहीच न बोलता ती जेवत होती.

" तुम्ही माझ्यासाठी का थांबलात?" अनिरुद्धने परत विचारले.

" कारण मगाशीच सांगितले." सानवी बेफिकीरपणे बोलली.

" मला नाही आवडलं हे."

" मग लवकर यायचे जेवायला." सानवीचा सूर तोच होता. जेवण होताच सानवी हात धुवायला गेली. ती येईपर्यंत अनिरुद्धने खरकटी भांडी सिंकमध्ये ठेवली होती. भाजीपोळीच्या भांड्यांकडे हात करत तो म्हणाला,

" हे कुठे ठेवायचे माहित नाही. दाखवून ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेस मी ठेवेन."

" आत्ताच तर आला आहात.. थोडा वेळ जाऊ दे. समजेल सगळं." स्वयंपाकघर आवरून दोघे बेडरूममध्ये गेले. आत जाताच सानवीने आधी बेडरूमचा दरवाजा लावला.

" मी खाली झोपते. तुम्ही बेडवर झोपा."

" मला नाही आवडणार." अनिरुद्ध पटकन बोलला. " मी झोपतो खाली."

" नको.. तुम्ही पाहुणे आहात." पाहुणे या शब्दावर जोर देत सानवी बोलली. तिला खाली झोपायचे होते म्हणजे तिला त्याच्याकडे बघता आले असते.

" पण हा पाहुणा वर्षाकरिता आहे.."
ते ऐकून सानवीचा चेहरा उतरला.

" तुम्हाला चालणार असेल तर बेडच्या या बाजूला मी झोपते, दुसर्‍या बाजूला तुम्ही झोपा." अनिरुद्धने खांदे उडवले. दोघेही पलंगाच्या दोन बाजूंना तोंड करून झोपले. पहिल्यांदाच कोणा पुरूषासोबत आपल्या पलंगावर झोपल्यामुळे सानवी थोडी अवघडली होती.

"नेहमी तुम्ही मला प्रश्न विचारता. आता मी विचारू?" सानवीने चुळबुळत विचारले.

" हूं.. " पलीकडून हुंकार आला.

" तुम्ही नक्की कुठे गेला होता? म्हणजे ते रक्त वगैरे?"

" झोपा लवकर.. उद्या पूजा आहे. लवकर उठायचे आहे." आणि लवकरच त्या बाजूने मंद घोरण्याचा आवाज येऊ लागला. सानवीने त्याच्या बाजुला तोंड केले. अनिरुद्ध गाढ झोपला होता तिची झोप उडवून.


" सानवी.. ए सानवी.. उठ लवकर. गुरूजी येतील पूजेसाठी." शोभाताई सानवीला उठवत बोलल्या.

" आई.. प्लिज.. फक्त दहा मिनिटे.. रात्री खूप वेळ जागी होते." कूस बदलत सानवी बोलली.

" ह्यांचं ना सगळं वेगळंच आहे.. तो अनिरुद्ध तिथे स्वयंपाकाला लागला सुद्धा. आणि आमची ही नवरी लोळती आहे अंथरूणात अजूनही." शोभाताई बोलल्या. ते ऐकून सानवी ताडकन उठली.

" अनिरुद्ध उठले??"

" उठला, त्याची अंघोळ झाली. माझी पूजेची तयारी होईपर्यंत त्याने प्रसादाचा शिराही केला. आता स्वयंपाक करतो आहे. मी करते म्हटलं तर हातही लावून देत नाही. त्याच्या नादाने तुझे बाबा आणि पार्थ पण तिथेच आहेत. " शोभाताई लाडिक तक्रार करत होत्या.

" खरंच?" सानवीचा विश्वास बसत नव्हता.

" लव्ह मॅरेज ना तुमचं? आणि तुला माहित नाही?" आईने संशयाने विचारले.

" आई ते तिथे चार वर्ष होते. मला कसं सगळं माहित असणार. चल, मला आवरू दे. नाहीतर परत चिडशील." सानवी आवरू लागली.

" सानवी.. एक ऐकशील?"

" बोल." ब्रश करत सानवीने विचारले.

" नऊवारी नेसशील आज? माझे दागिने घालशील? माझी खूप इच्छा होती, तुला नटलेलं बघायची.." आईने सानवीला विचारले.

" पण मला नेसता कुठे येते?"

" मी नेसवते ना.. नेसशील?"

" हो.."

"आवर मग पटापट.. मी आलेच घेऊन."

आईने सानवीला साडी नेसवली. तिला सगळे दागिने घातले. केसांचा खोपा बांधला.

" आता हे सगळे दागिने तुझेच.. " आई म्हणाली.

" हो का? तो पार्थ येईल मग भांडायला. माझ्या बायकोला काय देणार म्हणून. " सानवी हसत बोलली.

" नाही बोलणार. तो बघतो आहे ना, तू काय काय करते आहेस घरासाठी.. तुझ्या बाबांची खूप इच्छा होती, तुझे लग्न धूमधडाक्यात करायची. पण.." आईचे डोळे पाणावले.

" बरं.. हे सगळं माझं. आता झालं समाधान?" सानवी आईला हसवत म्हणाली.

" काकू.. हा पार्थ बघा पुर्‍या करायला जातो आहे." बेडरूममध्ये येत अनिरुद्ध बोलला आणि बघतच बसला. चिंतामणी रंगाची नऊवारी, घातलेले दागिने, नाकातली पाणीदार नथ, कपाळावरची चंद्रकोर, गळ्यातले ते मंगळसूत्र..

" कसं सजलं आहे आमचं ध्यान?" शोभाताईंनी विचारले.

" छान.. मी आहे बाहेर.. तुमचं होऊ दे.." गडबडलेला अनिरुद्ध बोलला.

" झाले आहे. आता तू ही आवरून घे. पूजेला बसायचं आहे ना? फक्त तो गजरा तेवढा माळायचा राहिला आहे. तो जरा माळ. मी बघते त्या पार्थकडे." शोभाताई बाहेर गेल्या. सानवी आरशाकडे तोंड करून हातात गजरे घेऊन उभी राहिली.

" मला नाही माळता येत गजरे.. सॉरी." स्वतःचे कपडे घेऊन अनिरुद्ध बाथरूममध्ये गेला.

" इतरांच्या पुढेपुढे करतो.. आणि माझ्यासोबत... खडूस.." मनातल्यामनात सानवीने बोलून घेतले.


काय होईल या दोघांचे , बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all