आमचं वेगळं आहे.. भाग ५

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग ५


मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्ध सानवीच्या घरी येतो आणि तिचे बाबा नाही म्हणतात. का ते बघू आता.


" चालणार नाही म्हणजे?" सानवीला धक्का बसला होता. अनिरुद्ध तिच्याकडे बघत होता.

" चालणार नाही म्हणजे नाही. आम्हाला लग्न करायचे आहे म्हणजे काय? मी याच्याशी लग्न करू का असं विचारता येत नाही का?" बाबा हसत बोलले.

" बाबा, तुम्ही पण ना.." सानवीच्या चेहर्‍यावर सुटकेचे भाव होते.

" तुम्ही बसा.. मी उपमा करून आणते." शोभाताई, सानवीच्या आई म्हणाल्या.

" काकू, मी आणलं आहे खायला. तुम्ही नका त्रास करून घेऊ." अनिरुद्ध पटकन बोलला. तेव्हा कुठे त्याच्याकडच्या सामानाचे गुपीत सानवीला समजले.

" ते असू देत. बाहेरचं ते बाहेरचं आणि घरचं ते घरचं." असं म्हणत त्या स्वयंपाकघरात गेल्या. सानवीही त्यांना मदत करायला म्हणून गेली.

" छुपी रूस्तम आहेस तू. इतके दिवस सुगावा लागू दिला नाहीस. पण हा आहे कोण, काय करतो, आईवडील कुठे असतात.. काहीतरी सांग.." शोभाताई विचारू लागल्या.

" आई.. प्रश्नांची सरबत्तीच करते आहेस. चहा घेताना सगळंच सांगते." सानवी विषय टाळत बोलली. आपल्या आईसमोर आपली ही अवस्था बाहेर त्या अनिरुद्धचे बाबांसमोर काय झाले असेल, या विचाराने सानवीला हसू आले. पण ते दाबत तिने पटापट आईला मदत केली. दोघी चहानाश्ता घेऊन बाहेर आल्या तेव्हा अनिरुद्ध आणि बाबा, प्रदीपराव हसत होते. आज खूप दिवसांनी बाबांना असं मनमोकळेपणाने बोलताना बघून सानवीला बरे वाटले.

" बापरे, अनिरुद्ध.. तू पण ग्रेट आहेस. कसले कसले जुने किस्से माहित आहेत तुला." प्रदीपराव बोलत होते.

"वाचलेले, ऐकलेले असतात कधीतरी." अनिरुद्ध नम्रपणे बोलला.

" काहिही म्हण, खूप मजा आली तुझ्याशी बोलून. कितीतरी दिवसांनी मित्राशी बोलल्यासारखे वाटले."

" तुमचा मित्रांचा ग्रुप असेल ना?" अनिरुद्धने विचारले. वाक्य ऐकू न आल्यासारखं प्रदीपरावांनी दाखवलं.

" शोभा, अग दे ना खायला..मुलं भुकेली असतील."

" मी घेतो काकू.. द्या इथे.." अनिरुद्ध बोलला.

" आता महत्त्वाचं बोलूयात का? तुम्ही खरंच लग्न करणार आहात?" बाबांनी गंभीरपणे विचारले. सानवीने अनिरुद्धकडे बघितले.

" हो.. तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच." अनिरुद्ध बोलला.

" मग मला सांग तू काय करतोस? तुझ्या घरातले कुठे राहतात? त्यांना पसंत आहे का?"

" मी शिक्षण झाल्यावर परदेशात होतो. पंधरा दिवसांपूर्वीच आलो आहे. तिकडच्या अनुभवावर इथे नोकरी मिळते का बघणार आहे."

" मग सानवी कुठे भेटली?" आईने विचारले.

"कॉलेज.."

" फ्रेंड.." सानवी आणि अनिरुद्ध एकदम बोलले.

" म्हणजे आमच्या कॉलेजच्या कॉमनफ्रेंड च्या ओळखीने.." सानवीने स्पष्टीकरण दिले.

"माझ्या घरातलं म्हणाल तर, माझे आईबाबा गावी असतात. बाबा अंथरूणाला खिळले आहेत. आई सतत त्यांच्यासोबत असते. बहिणीचे मागच्या वर्षी लग्न झाले आणि भाऊ शिकतो आहे. कोणीही माझ्या पसंतीवर आक्षेप घेणार नाही." अनिरुद्ध बोलत होता.

" मग लग्न कसं करणार?"

" बाबा रजिस्टर लग्न करू. आणि लग्नानंतर हे आपल्याकडेच रहायला येतील."

" मला तुझ्या आईबाबांना लग्नाआधी भेटावेसे वाटते आहे."

" बाबा, तुम्हाला जमणार आहे का प्रवास?" सानवी घाबरून मध्ये बोलली.

" अग पण.. त्यांना काय वाटेल?"

" काहिही वाटणार नाही.." अनिरुद्ध गंभीर झाला होता.

" वडील आजारी आहेत म्हणतोस, मग तुझं शिक्षण वगैरे?" शोभाताईंनी विचारले.

" मी सगळं स्कॉलरशिपवर केले." अनिरुद्धने विषय संपवला.

" असं.. माझी काहीच हरकत नाही लग्नाला. आमचा आमच्या सानवीवर विश्वास आहे. तिची निवड चुकणार नाही." बाबा बोलले. पण त्या वाक्याने सानवी अवघडली.

" मी निघू आता काका?"

" हो.. तुम्ही रजिस्टर लग्न करायचे म्हणत आहात मग बघा कधी करायचे ते."

" मला नोकरी लागली की लगेच करू."

" मी एक सुचवू का?" बाबा म्हणाले.

" बोला ना.."

" तुझे क्वालिफिकेशन सानवीला माहितीच आहे. तुझे फिल्ड आमच्या कंपनीच्या दृष्टीने पूरक आहे. मग तू आमचीच कंपनी का नाही जॉईन करत?"

बाबांचे बोलणे सानवी आणि अनिरुद्धसाठी अनपेक्षित होते.

" मी विचार करून सांगतो." असे म्हणत अनिरुद्ध उठला.

" मी यांना सोडून आलेच." सानवीही उठली. निघताना अनिरुद्धने आईबाबांना नमस्कार केला.

" तू योग्य तो निर्णय घेशील अशी अपेक्षा करतो." निघताना बाबा बोलले.

सानवी आणि अनिरुद्ध गाडीपाशी आले. दोघांनाही काय बोलावे ते सुचत नव्हते.

" बाबांनी अडचणीत टाकलं आहे." डोक्यावर हात चोळत अनिरुद्ध बोलला.


" तुम्हाला आवडेल का आमच्या कंपनीत काम करायला?" सानवीने विचारताच तो आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला.

" खूप मोठी कंपनी नाहीये पृथाला वाटते तशी.. पण मी परत उभी करते आहे. तुमचा खरा रिझ्युमे पाठवलात तर आपण नक्की विचार करू. म्हणजे परदेशी शिक्षण सोडा, साधे शिक्षण तरी झाले आहे ना? " सानवी मस्करी करत बोलली.

" माझं एम.बी.ए. झाले आहे." त्याच्या मस्तकावरची शीर उडत होती.

" तरी या फिल्डमध्ये?"

" माझी तिसरी अट.. माझ्या भानगडीत पडायचे नाही." त्याच्या आवाजात राग जाणवत होता.

" ओके.. ओके.. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही रिझ्युमे पाठवा. मी बघते. अर्थात तुम्हाला बायकोच्या हाताखाली काम करायला आवडत असेल तर.."

अनिरुद्धने दुखावलेल्या नजरेने तिच्याकडे बघितले.

" मूड चांगला व्हावा म्हणून मस्करी केली." सानवी उदासपणे बोलली.
" तुम्ही कधीच हसत नाही का?" तिने पुढे विचारले.

" हसतो ना.. चांगल्या विनोदावर." तो त्याच गंभीरपणे बोलला. " मी निघतो." अनिरुद्ध वळला. सानवीने त्याला वेडावून दाखवायला आणि त्याने पाठी बघायला एकच गाठ पडली. तिला चिडवून दाखवताना बघून त्याला हसू आले.

" मी पाठवतो रिझ्युमे." तो हसत बोलला. त्याला हसताना बघून सानवीच्या चेहर्‍यावर सुद्धा हसू आले. ती वर आली. आईबाबा बोलत होते.

" मला मुलगा चांगला वाटला, पण काहीतरी खटकते आहे." आई बोलत होती.

" नका जास्त विचार करू. माझ्या या अवस्थेमुळे आपली मुलगी तिच्या आयुष्याचे मातेरे करायला निघाली होती. ते न होता गाडी रूळावर येते आहे हे काय कमी आहे? लग्न न करता रहायचं म्हणत होती. पण आपल्या नंतर कोणी नको का? माझ्या तब्येतीचा काही भरोसा नाही आणि जवळची म्हणवणारी माणसं कशी फसवतात आपण बघितले ना?" बाबा बोलत होते. आपणही बाबांना फसवत आहोत हा विचार मनात येताच सानवीला वाईट वाटले. पण तिच्याकडे दुसरा उपाय नव्हता. ती आत आली.

" सानवी, आम्हाला आवडला अनिरुद्ध. नोकरीची जास्त वाट न बघता तुम्ही लग्न करावे असे मला वाटते. आणि तू त्याच्यासोबत इथे रहायचे म्हणतेस, त्याच्या आईवडिलांना चालेल का?" बाबांनी विचारले.

" बाबा तसेही ते इथे कुठे आईवडीलांसोबत राहतात? मग आपल्यासोबत राहिले तर काय बिघडलं? माझंही तुमच्याकडे लक्ष राहिल." सानवी लाडीगोडी लावत म्हणाली.

" असं आहे तर मग नोकरीची तरी का वाट बघता? माझ्या डोळ्यासमोर तुझे लग्न होऊ दे ना लवकरात लवकर. आणि मुलगा मेहनती वाटतो. त्याला आपल्या कंपनीत सामावून घेता आलं तर बघ. याबाबतीत माझा अंदाज चुकायचा नाही."

" बघते बाबा."

" आणि अजून एक.. तुम्ही दोघं एकमेकांना अहोजाहो करता? आजच्या काळात?" आईने विचारले.

" ते... त्यांना सवय आहे.. मग मी ही बोलू लागले." सानवी सावरत बोलली.

" हो का? मला आवडलं पण हे.. काढा आता लवकर लग्नाचा मुहूर्त.. रजिस्टरच करा पण मुहूर्तावर करा." आई हसत बोलली. सानवी आईच्या गळ्यात पडत लाजली.


कसं होईल या दोघांचे लग्न, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all