आमचं वेगळं आहे.. भाग ३

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की अनिरुद्ध हा पुरूष वेश्या असतो. सानवी करेल का त्याला तात्पुरता नवरा? बघू काय होते ते.


" नाश्ता ठेवला आहे. खाऊन घे." सानवीसमोर बशी ठेवून आई जाऊ लागली. सानवीने आईचा हात धरून तिला थांबवले.

" काय झालं आहे? तू का नाही बोलत माझ्याशी? आज बाबाही बाहेर आले नाहीत. पार्थ ही कॉलेजला जाताना न सांगता गेला. का वागता आहात असे?" सानवीचे डोळे पाण्याने डबडबले.

" ते स्वतःला विचार.. पंचविशीला आलीस तू, तरिही लग्नाचा विचार करत नाहीस. का तर म्हणे, आईबाबांचे घर चालवायचे आहे. पण त्याचा तुझ्या आईबाबांना किती त्रास होतो ते समजत नाही का तुला? कोणत्या आईबाबांना आपली तरूण मुलगी आपल्यासाठी लग्न करत नाही ही गोष्ट आवडेल? पण तुला बोलणार कोण? तू घरातली कर्ती आहेस ना.. आता कालचा तो मुलगा. किती सालस आणि अदबशीर वाटला. तुझे बाबा तर किती खुश झाले. पण तू? लगेच सांगून मोकळी. आमचं काही नाही म्हणून." आईने डोळ्याला पदर लावला.

" आई.. प्लिज रडू नकोस ना.. तू रडलीस की माझा पूर्ण दिवस खराब जातो. आज कंपनीमध्ये माझे खूप मोठे काम आहे. नको ना रडूस." सानवी हट्ट करत होती.

" नाही रडत.. झालं समाधान? आवर आणि जा ऑफिसला. तुझे बाबा पण थांबले आहेत नाश्ता करायचे." आई डोळे पुसत बोलली. ते ऐकून सानवी खुदकन हसली. हे म्हणजे बाबा तिच्यावर चिडले नाहीत याचे लक्षण होते. तिने पटापट स्वतःचे आवरले. आणि ती दोघांना बाय करून ऑफिसला निघाली.

कारमध्ये बसल्यावर तिने पृथाला फोन केला.

"हाय.. तुलाच फोन करणार होते. कशी झाली कालची मिटिंग?" पृथाने विचारले. तिचा वाढलेला श्वास सानवीला ऐकू येत होता.

" सांगते.. पण मला सांग आधी.. तू याला कशी ओळखतेस? आणि तुला याचा व्यवसाय माहित होता?" सानवीने आवाजात कडकपणा आणण्याचा प्रयत्न केला.

" माझी उलट तपासणी नको करूस. मला माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीकडून त्याचा नंबर मिळाला. मिळाला म्हणजे मी मिळवला. योगायोगानेच त्याच्याशी ओळख झाली. ती त्याला जिथे भेटणार होती तिथेच मी टपकले आणि मग तिला जबरदस्ती माझ्याशी ओळख करून द्यावी लागली. मला तो आवडतो हे बघून तिने त्याचा व्यवसाय सांगितला. तेव्हापासून मी त्याच्यापासून लांब राहते पण त्याला बघितले की माझी विकेट पडते एवढं मात्र खरं. मग कधीतरी फोन लावून बोलते त्याच्याशी. तेवढाच चेंज." पृथा खिदळत बोलली.

" अग पण तो.. त्याला कोणी ओळखलं तर? आणि तो पैसे किती घेईल?"

" त्याला खूप जण ओळखत असतील असं मला नाही वाटत. आणि जरी कोणी ओळखत असेल तरी समोरून कोणी सांगेल का? पण एक सांगू, मला तो स्वभावाने खूप चांगला वाटला. त्याला माहिती आहे मला तो आवडतो. पण त्याने कधी गैरफायदा नाही घेतला. म्हणून तर तुला त्याचा नंबर दिला. मला ना आतून असं वाटलं की हाच तुला मदत करू शकेल." पृथा आता गंभीरपणे बोलत होती.

" पण मग त्याचे चार्जेस? पृथा तुला तर सगळंच माहित आहे."

" तू एकदा त्याच्याशी बोलून तर घे. बघ काय म्हणतो ते." पृथा सानवीला समजावत बोलली. ऑफिसमध्ये पोहोचायच्या आधी सानवीने अनिरुद्धला फोन लावला. त्याला फोन लावताना तिला धडधडत होते. दुसऱ्या रिंगला समोरून फोन उचलला गेला.

" हॅलो.."

" मी सानवी.. आपण काल रात्री भेटलो होतो." सानवी बोलताना अडखळत होती.

"बोला.." समोरचा आवाज अचानक बदलल्यासारखा वाटला. आपल्याला कदाचित भास झाला असावा, सानवीने स्वतःची समजूत काढली.

" तुम्हाला आज संध्याकाळी भेटायला जमेल का?"

" तुमचा आजही दारू प्यायचा विचार आहे का?" त्याच्या या प्रश्नावर द्यायला एक सणसणीत उत्तर सानवी शोधत होती. पण तिला काय बोलावे तेच सुचेना.

" कुठे आणि किती वाजता?" समोरून आवाज आला.

" माझं ठरलं की नक्की कळवते." रागानेच सानवीने फोन कट केला. समजतो कोण हा स्वतःला? मला गरज आहे म्हणून.. सानवी स्वतःची समजूत काढत होती. ऑफिसला गेल्या गेल्या तिने आपले शेड्युल बघितले. शेवटच्या दोन मिटींग्स कॅन्सल केल्या असत्या तरी चालले असते. तिने लगेचच अनिरुद्धला वेळ आणि ठिकाण मेसेज करून सांगितले. आताही ती त्याच्या वेगळ्या मेसेजची वाट बघत होती. पण त्याने फक्त अंगठा पाठवला. ती थोडी निराश झाली. तिच्या सेक्रेटरीने समोर कामे आणून ठेवल्यावर नाईलाजाने मनातून अनिरुद्धला काढून तिने कामावर लक्ष केंद्रित केले. संध्याकाळी त्याला भेटायला जायचे म्हणून फ्रेश होऊन ती निघाली. कधी नव्हे ते तिने घरी जाताना कपडे बदललेले बघून तिच्या ऑफिसमधले सगळे बघतच राहिले.

" मॅम, डेटवर जाताय का?" हिंमत करून तिच्या असिस्टंटने विचारलेच. यावर काहीच न बोलता फक्त हसून सानवी तिथून निघाली. ती समुद्रावर पोहोचली तेव्हा तो तिथे आलेलाच होता. खडकावर बसून एकटक उसळणाऱ्या लाटांकडे बघत बसला होता. निळा डेनिमचा शर्ट, जीन्स, डोळ्याला गॉगल.. ती कितीही वेळ त्याच्याकडे बघू शकणार होती. तिच्या येण्याची चाहूल लागताच तो वळला.

" सॉरी, तुम्हाला परत बोलावल्याबद्दल." सानवी बोलली.

" कामाचे बोलूयात?" चेहर्‍यावर तेच गंभीर भाव.. याला कधी हसता येत नाही का? सानवीने मनात विचार केला.

" ते मला काही दिवसांसाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचे होते. हे फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. म्हणजे पृथाने तुमचा नंबर दिला आहे म्हटल्यावर तिला माहित आहेच." सानवी बोलत होती.

" किती दिवसांकरता असेल हे?"

" माझे वडिल आजारी आहेत. ते बरे होईपर्यंत."

" या गोष्टीला चारपाच वर्षेही लागू शकतात."

" पण हे लग्न जास्तीत जास्त वर्षभरासाठी असेल." सानवी बोलत होती. याच्या समोर माझी बोलती का बंद होते?

" ओके.."

" तुमचे चार्जेस काय असतील? म्हणजे दिवसाप्रमाणे की ...." सानवीला पुढे काय बोलायचे ते सुचेना.

" ते आपण नंतर बघू. पण हे जर लग्न झालं तर माझ्याही काही अटी आहेत." अनिरुद्ध बोलला.


काय असतील अनिरुद्धच्या अटी? सानवीला त्या मान्य होतील का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all