आमचं वेगळं आहे

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे...


" कशी बाहेर पडू मी या सगळ्यातून? बाबांना किती समजावते आहे पण ते ऐकतच नाहीत. काय करू मी?" सानवी रडत बोलत होती.

" तुला हे रडणे शोभत नाही. एवढी मोठी कंपनी चालवणारी माझी मैत्रिण अशी रडकी?" पृथा सानवीला समजवण्याचा प्रयत्न करत होती.

" कंपनी चालवणं वेगळी गोष्ट आणि आईबाबांना सांभाळणं ही वेगळी. तिथे मी नाही बोलू शकत काही." हातातला ग्लास संपवत सानवी बोलत होती.

" अग पण किती पिणार आहेस तू? काकाकाकूंना समजलं तर?"

" मी सांगितलं आहे त्यांना आज मी घरी येणार नाही म्हणून. आपल्या कमावणाऱ्या मुलीचं त्यांना एवढं तर ऐकलं पाहिजे ना?"

" ते ऐकतातच.. तू ही ऐक ना कधीतरी. काय चुकीचं सांगत आहेत ते? लग्नच करायचं ना? मग कर ना. तसंही पार्थ मोठा झाला की तुमची कंपनी सांभाळणारच. तुझं काम कमी होईल. मग संसाराचा विचार करायला काय हरकत आहे?"

" त्याला अजून सात आठ वर्ष तरी आहेत." सानवी स्वतःची बाजू मांडू लागली.

" अग पण तोपर्यंत तुझे वय नाही का वाढणार? नंतर कोण लग्न करेल तुझ्याशी?"

" नंतरचं नंतर.. पण मी आता नाही लग्न करू शकत. बाबा असे आजारी. पार्थ अजून शिकतो आहे. मी माझं आयुष्य, माझं कुटुंब कोणाच्याही हातात नाही देऊ शकत. एकदा लग्न झालं की सगळं संपलंच. आईबाबा म्हणतात म्हणून मी लगेच लग्नाला उभी राहणार नाही. आणि हे आईबाबा आहेत की ऐकायला तयारच नाहीत. त्यांनाही दुखवायचे नाही." सानवी बोलत होती.

" मला समजत नाहीये.. एकदा म्हणतेस लग्न करायचे नाही एकदा म्हणतेस आईबाबांचे मन राखायचे आहे.. तुला नक्की हवंय तरी काय?"

" मला एक तात्पुरता नवरा हवा आहे. जो फक्त दाखवण्यापुरता माझा नवरा असेल. बाबा थोडे बरे झाले की मी त्याला टाटा बायबाय करून माझं आयुष्य जगायला मोकळी."

" तुला फक्त आईबाबांच्या समाधानासाठी हवं आहे तर आपल्या ग्रुपमध्ये कोणाला का नाही विचारत?"

" कोणाला विचारू? बाबांना सगळे मित्र माहित आहेत. आणि मला कोणी आवडत नाही हे सुद्धा." सानवी निराश झाली होती.

" माझ्याकडे एकजण आहे.. पण ते तुला पटेल की नाही माहित नाही."

" बाबांनी मला लग्नाला होकार द्यायला फक्त आठ दिवस दिले आहेत. त्याच्या आत मला हालचाल करायची आहे. पटेल, नाही पटणार तू हा विचार नको करूस."

" मी तुला एक नंबर देते. तू त्याच्याशी बोलून घेशील का?" नजर चुकवत पृथा बोलली.

" तू तर अशी नजर चोरते आहेस जशी तुझ्या बॉयफ्रेंडचा नंबर देते आहेस. जिजूंना माहित आहे का हे?" सानवीला पृथाकडे बघून हसू येत होते.

" त्याला बघितल्यावर समजेल तुला. तुला मदत करते आहे तर तू मलाच चिडवते आहेस.. काय करू ते तूच सांग?" पृथाने विचारले.

"मला नंबर देण्यापेक्षा तूच फोन कर बाई.. लवकर कर. ते म्हणतात ना.. अडला हरी.." सानवी पृथाची मस्करी करत होती.

पृथाने एक फोन फिरवला. बोलून तिने फोन ठेवला तेव्हा तिच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या होत्या.

" तो जवळच आहे.. येतो आहे इथे. मी त्याला तुझा फोटो पाठवते. म्हणजे तो ओळखेल तुला. तू बोलून घे त्याच्याशी. मी निघते." पृथा सानवीला बोलायची संधी न देता तिथून निघाली सुद्धा.

" चक्रमच आहे ही पण.." सानवीने अजून एक पेग मागवला.

" एक्सक्यूज मी.. तुम्हीच सानवी ना?" सानवीने समोर बघितले. तिच्या ह्रदयाचे ठोके चुकले. तिला आता समजलं की पृथाची ही अवस्था का झाली ते. अतिशय देखणा, काळ्याभोर डोळ्यांचा, उंचापुरा असा तो समोर उभा होता. एखाद्या पिक्चरचा हिरो शोभेल असा हा माझा तात्पुरता नवरा होईल? सानवी स्वतःशीच विचार करत होती.

" तुम्हाला बोलायचे नसेल तर मी जाऊ का परत?" तोच भारदस्त आवाज.

" अं.. बसा ना.. तुम्ही काय घेणार?" सानवीने क्षणात स्वतःला सावरले. आता तिच्यामध्ये तिची नेहमीची बिझनेसवुमन संचारली.

" मी ड्रिंक्स घेत नाही." तिच्या हातातल्या ग्लास कडे बघत तो म्हणाला. "मला फ्रुट ज्युस चालेल.."

आश्चर्यचकित होत सानवीने ऑर्डर दिली.

" कामाचे बोलायचे?" तो एकटक तिच्याकडे बघत होता.

" इथेच बोलायचे का?"

" तुमची इच्छा.. तसेही मला पृथाने फक्त तुमचं काम आहे असं सांगितलं. पण माझ्या कामाच्या गोष्टी मी अश्या गर्दीच्या ठिकाणी बोलत नाही. तुम्हाला हवं असेल तर या बारमधून बाहेर जाऊन शांतपणे बोलू." तो म्हणाला.

" तुमचा ज्यूस संपवा.. मग बाहेरच बोलू." सानवी हातातला पेग संपवत बोलली.

दोघे बाहेर आले. सानवी तिच्या गाडीकडे वळली.

" तुम्हाला चालणार असेल तर मी चालवतो गाडी." त्याने सानवीची परवानगी विचारली. आपण घेतलेले पेग आठवत सानवीने चावी त्याच्याकडे दिली. त्याने गाडी सुरू केली. गाडी समुद्रावर आणली.

" आता बोलायचे?" त्याने परत विचारले.

" अं.. हो.. त्याचं काय आहे, मला एका तात्पुरत्या नवर्‍याची गरज आहे." बोलताना सानवी अडखळत होती.

" नवरा.." त्याला धक्का बसला होता.

" काही महिन्यांपुरता किंवा वर्षाकरिता.." सानवी लगेच बोलली.

" तुम्हाला माहिती आहे का मी कोण, माझे काम?" तो खूपच गंभीर झाला होता.

" नाही.. मला काहीच माहित नाही तुमच्याबद्दल. "

त्याने एक दीर्घ श्वास घेतला.. आणि तो बोलला..


कोण आहे तो? काय असेल त्याचे काम? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all