आमचं वेगळं आहे.. भाग २

काही प्रेमकथा लग्नानंतर सुरू होतात


आमचं वेगळं आहे... भाग २


मागील भागात आपण पाहिले की सानवीचे आईबाबा तिने लग्न करावे असा आग्रह करत आहेत. पण सानवीला लग्न करायचे नाहीये. आता बघू पुढे काय होते ते..


" माझे नाव अनिरुद्ध.. माझे काम म्हणाल तर मी जिगेलो आहे.." तो बोलून मोकळा झाला. सानवीचा वासलेला आ तसाच राहिला. तिने या सगळ्याबद्दल ऐकले असले तरी तिच्या संस्कारात हे बसत नव्हते. तिची जास्तीत जास्त मजल म्हणजे जेव्हा आईबाबा लग्नावरून जास्त बोलतील किंवा ऑफिसमध्ये जास्त ताण असेल तेव्हा बारमध्ये बसून एखाददुसरं ड्रिंक घ्यायचे आणि बस्स.. हे पुरूष वेश्या वगैरे म्हणजे पार डोक्यावरून पाणी होते. पृथा याला कशी ओळखते? हा नवीनच विचार तिचे डोके खाऊ लागला. त्याची अवस्था त्याने ओळखली.

" विचार बदलला असेल तर मी निघू?" अनिरुद्धने विचारले.

" नाही.. नको.. म्हणजे जरा थांबा.. मला विचार करू देत. आधीच ते ड्रिंक आणि
त्यात हा धक्का. माझं डोकंच चालेनासे झाले आहे." सानवी डोके धरून बसली होती. त्याच्या गंभीर चेहर्‍यावर परत एक छोटंसं हसू आलं.

" मी माझा नंबर देतो. तुमचं जेव्हा डोकं चालू लागेल तेव्हा मला फोन करा. तोपर्यंत तुम्हाला घरी सोडू का?" अनिरुद्धने विचारले.

" नननन नको.. मी जाते." सानवीचा घाबरलेला आवाज ऐकून त्याच्या चेहर्‍यावरचे हसू पुसले जाऊन परत तेच गंभीर भाव आले.

" विश्वास ठेवा. तुमच्या इच्छेविरुद्ध मी तुम्हाला हातही लावणार नाही. आणि दारू पिऊन तुमचा जर अपघात झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही." यावर काहीच न बोलता सानवीने गाडीच्या चाव्या त्याच्याकडे दिल्या.

" पत्ता?" त्याने गाडी सुरू करत विचारले.
सानवीने पत्ता सांगितल्यावर अनिरुद्ध गाडी चालू केली. गाडी चालवताना तो अधूनमधून तिच्याकडे बघत होता. ती खिडकीच्या बाहेर बघत विचारात गढली होती.

" राग येणार नसेल तर एक विचारू का?"
अनिरुद्धने विचारले.

" विचारा.."

" तुम्ही नेहमी दारू पिऊन गाडी चालवता?" सानवीला त्याच्या प्रश्नाचा राग आला पण रागावर ताबा ठेवत ती म्हणाली.

" एकतर मी नेहमी दारू पित नाही. जेव्हा खास त्यासाठी येते तेव्हा कॅब वापरते. आज मला पृथाशी फक्त बोलायचे होते म्हणून मी गाडी आणली होती. पण माझा आजचा दिवसच.." सुस्कारा सोडत सानवी परत बाहेर बघू लागली.

" तुम्ही माझ्यासोबत बाहेर आलात ते तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटले म्हणून?" त्याने परत विचारले.

" मला वाटलं तुम्ही एखादा अभिनेता वगैरे.." बोलता बोलता सानवी स्वतःवरच चिडली. आपण का उत्तरे देतो आहोत याच्या प्रश्नांची. तिचा राग बघून मग मात्र तो गप्प बसला. त्यानंतरचा प्रवास शांततेत झाला. सानवीचे घर येताच त्याने गाडी थांबवली.

" ही तुमची चावी. गाडी पार्क तर करू शकाल ना?"

" तुम्ही घरी कसे जाणार?" सानवीने विचारले.

" मी बघेन काहीतरी. डोन्ट वरी. निघतो मी." अनिरुद्ध जायला वळला.

" एक मिनिट.. जर तुम्ही माझा तात्पुरता नवरा व्हायचे कबूल केलेत तर.. तरीही तुम्ही तुमचे हे काम चालू ठेवणार?"

" तो व्यवहार आपण नंतर बघू.." चेहर्‍यावरची रेखही न हलवता तो वळला आणि चालू लागला. सानवी कितीतरी वेळ त्याच्याकडे तशीच बघत होती पण मागे वळूनही न पाहता तो निघून गेला. सानवीची तंद्री मोबाईलमुळे तुटली. तिने बघितले तर आईचा मेसेज होता, तो गेला. आतातरी वर या.. सानवीने वर बघितले. खिडकीत आई, बाबा आणि पार्थ उभे होते. डोक्यावर हात मारत ती घराकडे निघाली. वरती घराचा दरवाजा उघडाच होता.

" बघ.. मी आज तिला म्हटलं की तू आठ दिवसांत लग्नाला होकार दे नाहीतर मी अन्नत्याग करेन तर आला की नाही आज तो घराच्या खाली.." बाबा आईला आनंदाने सांगत होते.

" हो.. तुमचं बरोबर.. माझं चूक. त्याला वरती का नाही आणलंस ग? तेवढीच ओळख झाली असती." आईने उत्साहाने सानवीला विचारले.

" ताई.. मला आवडला हा .. कसला दिसतो.. बापरे.. त्याची बिल्ड तर काय दिसत होती वरून.. एक नंबर.." पार्थ बोलत होता.

" तुम्ही भलता विचार करू नका.. असं काही नाहीये. तो फक्त मला सोडायला आला होता." संधी मिळताच सानवी बोलली.

" चला म्हणजे आठ दिवसांनंतर माझा अन्नत्याग नक्की." कडवट स्वरात बाबा बोलले आणि निराश होऊन तिघेही आत निघून गेले. त्यांचे उदास चेहरे पाहून सानवीला कसेतरी वाटले.


" काय करेल सानवी आता? आणेल का ती अनिरुद्धला घरी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all