Aug 09, 2022
नारीवादी

चुकतंय का माझं!

Read Later
चुकतंय का माझं!

चुकतंय का माझं!

मी आज बरंच बोलले अजितदादांना,अजितदादा म्हणजे माझी वन्स अस्मिचे यजमान. 

तसा तोल सुटत नाही सहसा माझा पण सुटला आज. हेही तोंडाचा आ करुन पहात राहिले. वास्तविक नेहमी मी जरा कमीजास्त बोलले तर मला अडवणारे हे पण आज बहुदा माझा स्पष्टवक्तेपणा भावला यांना. 

मी इरावती. आमच्या साफल्य बंगल्यात मी,माझे यजमान व माझी अठ्ठ्याऐंशी वर्षाची सासू रहातो. माझा लेक,त्याचं कुटुंब  परगावात रहातं. सध्या सासुबाई बेड रिडन आहेत. बऱ्याच ठिकाणी जाहिराती देऊन एक नर्स मिळालेय,त्यांचं न्हाणं,कपडे,मलमुत्रविसर्जन आवरायला. 

माझी वन्सं अस्मि आईला बघायला आली होती,तिच्या नवऱ्याला अजितदादांना घेऊन. सासुबाईंनी नेहमीची टेप चालू केली,लेकीजावयाच्या समोर. अगतिकता,असहाय्यता..असं बरंच काही. 

माझ्या म्हणे स्वैंपाकाला चवच राहिली नाही. कर्तव्य म्हणून इच्छा नसताना केवळ लोकलज्जेस्तव जेवणाचं ताट पुढे करते म्हणे मी त्यांच्या. माझ्या सासूचं हे बोलणं ऐकून वन्सं डोळ्यातून टिपं गाळू लागल्या नि अजितदादाही माझ्याकडे त्रयस्थासारखे पाहू लागले. एवढा आवडीने सांजा केला मी त्यांच्यासाठी पण सरळ खाण्याची इच्छा गेली म्हणाले. 

मग मीही विचारलं, बरं वाटत नाही का म्हणून तर म्हणे आपल्या माणसाचे हे असे हाल पाहून कोणाला बरं वाटेल!

नेहमीचंच झालंय हे. गेली पाच वर्ष सासुबाई अंथरुणाला खिळून आहेत. कुणी त्यांना बघायला आलं की माझी उणीधुणी काढतात. सुनेची सारी कर्तव्यं बजावते मी. कधी त्यांच्या तोंडावर कौतुक म्हणून नाही. 

लग्न होऊन या घरात आले,किती हौस होती मला जीन्स,स्कर्ट्स घालायची. यांनाही मी आधुनिक वेशभुषेत आवडायचे पण सासुबाईंनी मोडता घातला. हे असं काही घातलेलं चालणार नाही म्हणायच्या. ते जाऊदे अगदी पंजाबी ड्रेसही घालू देत नव्हत्या. एकदा ट्रेनमधून उतरताना साडीत घुटमळून पडले तेंव्हा डॉक्टरांनीच बजावलं,साडीत अनकम्फर्टेबल होत असेल तर पंजाबी सुट्स वापरत जा तेव्हापासून तेवढे तरी वापरायला मिळाले. नाश्त्याला काय करायचं,दुपारचं जेवण,रात्रीचं जेवण..सगळं आताआतापर्यंत त्यांनाच विचारुन करे मी. 

दिवाळीत तर ऑफिसातून आल्यावर फराळ करणं जीवावर येई पण सासुबाईंचा हट्ट,घरची चव म्हणे. पावणेरावळे,सगेसोयरे सगळं केलं. सासुबाईंच्या माहेरच्या माणसांचौ अजुनही करते अगत्याने. गेल्या आठवड्यात धाकटे बंधु येऊन गेले सासुबाईंचे. मी आदल्या दिवशी डिंकलाडू वळून ठेवले होते. त्यातले दहा लाडू दिले त्यांना घरी न्यायला पण एक फोन करुन लाडू आवडले म्हणून सांगणं नाही.

 आपण आपलं सगळ्यांसाठी झटत रहायचं. कधी म्हणून कुठे बाहेर फिरायला जाणं झालं नाही माझं. सासुबाईंना टाकून कसं जाणार! बरं आता बेड रिडन आहेत पण या आधीही मी कुठे जायचं म्हंटलं तर सासुबाईंचा नन्नाचा पाढा सुरु व्हायचा,त्यांची ढोपरंच काय दुखायची,छातीत जळजळ होऊ लागायची,डोकं चढायचं. धडधाकट असताना कधी एका वेळची भांडीही घासली नाहीत ओ.
 मी होतेच आणि अजुनही आहेच न् कायमस्वरूपी कामाला लावलेली. 

आता तुम्ही म्हणाल, बाई ठेवायची. अहो,बाया टिकत नैत आमच्याकडे. ही म्हातारी एक बाई टिकू देत नाही. आता पलंगाला चिकटून आहेत खऱ्या पण तोंडाची वटवट थांबेल तर शपथ. सतत काहीतरी कुजकं काढून टोमणे मारणं,अंगलट येतयसं दिसलं की डोळ्यातनं टिपं गाळणं. सगळ्या तर्हा जाणून आहे मी त्यांच्या. 

लेकीचं सदा कौतुक. त्याच्या पावपटीने माझं कौतुक करावसं वाटत नै. माझ्याबद्द्ल बोलताना सदा मेलं कारलं चोळलेलं जीभेला. तरी यांना बरेचदा अंघोळपांघोळ मीच घालते हो. केसही मीच धुते. परवा पाणी जरा गरम होतं तर कसल्या अंगावर आल्या माझ्या. म्हणतात,भाजतेस की काय मला. मी मेले की झालीस मोकळी उंडरायला. आता काय बोलणार यांना! मदतनीस आठेक वाजेपर्यंत येते. तोवर यांचे केस विंचरुन वेणी घालायची,चहा पाजायचा,रात्री अंथरुण घाण केलं असेल तर ते सगळं आवरायचं. एवढं सगळं केलं तरी म्हणे मी मरणाची वाट बघतेय ह्यांच्या. 

बरं जरा पथ्याचं खावं तर नाही. नुसतं तिखट झणझणीत खायला हवं. नाही दिलं तर रागे भरणार. खाल्लेलं पचायला तरी हवं ना. मग अपचन झालं की बसतात ओरडत,अरे कुणीतरी डॉक्टराला बोलवा रे करत ओरडत रहातात. 

वन्सं नि अजितदादा जवळजवळ चारेक महिन्याने आले आणि मी किती निष्काळजीपणाने सासूची देखभाल करते असा लुक देत होते. मलाही राग आला मग.

 म्हंटलं,एवढंच वाटतं तर चारेक दिवस येऊन रहा इथे नि करा आईची सेवा. रोज उठल्यावर प्यायला गरम पाणी द्या,चहा भरवा,वेणीफणी करा,बाईला यायला उशीर झाला तर अंघोळ घाला,यांचा ओरडा खा,चवीढवीचं बनवून घाला,अति खाणं झालं की घाण करतात,त्या वासात रहा. बघा एकतरी घास जातो का घशाखाली.

 म्हंटलं,दुसऱ्यांना उपदेश देणं सोप्पंच असतं पण आपल्यावर जेंव्हा बेततं तेंव्हा कळतं. माझा लेक बँगलोरला नोकरीला आहे. सुन प्रोफेसर आहे. चांगला ऐसपैस बंगला बांधलाय तिथे त्यांनी. किती आर्जवं करत होती,आई आमच्याकडे या म्हणून. 

माझी नात,श्रेया बाळंत झालेय. माझ्या पणतुला न्हाऊमाखू घालावं,नातीला चांगलंचुंगलं करुन खाऊ घालावसं येत हो मनात.आम्ही तिथे गेलो असतो तर किती आनंद झाला असता त्या साऱ्यांना! मला खूप वाटतं,जावं लेकाकडे,आजीपण,पणजीपण अनुभवावं पण मग सासुबाईंना कोण बघणार! सासुबाईंची अवस्था पाहून देवाला सांगते,मला तू धडधाकट अवस्थेतच उचल. हे असं सासुबाईंसारखं कंटाळत,वैतागत एकेक दिवस ढकलणं नकोच.

इतकी वर्ष सासुबाईची सेवा केली. पुढेही करेनच म्हंटलं पण हे कोणीही यावे टपली मारुन जावे नाही सहन करणार,सरळ सांगितलं अजितदादांना. त्यांनाही पटलं बहुतेक. 

आज सकाळी वन्संचा फोन आला होता. तुझ्याच्याने होत नाही तर व्रुद्धाश्रमात ठेव म्हणे. असं व्रुद्धाश्रमात ठेवायचं असतं तर कधीचं ठेवलं असतं. इतकी वर्ष सेवा का केली असती! 

हे मात्र दर संध्याकाळी हिरव्या पानांत बांधलेली चाफ्याची फुलं घेऊन येतात माझ्यासाठी. त्या सुगंधाने का होईना,घरातली मरगळ नाहीशी होते. मला तसं ओझं वगैरे नाही ओ वाटत सासुबाईंचं पण त्यांनीही कधी मायेनं बोलावं माझ्याशी असं वाटतं. वन्संनी निदान वहिनी तू किती करतेस  गं असं बोलावसं वाटतं. चुकतंय का माझं!

------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now