Login

मी कोणी अछुत आहे का

Always give your affection to the elders.

मी कोणी अछुत आहे का?

संध्याची सासू ,संध्याला म्हणत होती ,मला परत तिकडे पाठवू नको, माझं ताट, ग्लास ,भांडी सगळी वेगळी ठेवली जातात, तिथं असलं ,की मला असं वाटतं ,की मी कोणी अछुत आहे? की मला काही खूप मोठा रोग झाला आहे , की ज्यामुळे माझ्याशी असं वागलं जातं.

संध्या-  ठीक आहे, कुठे जाऊ नका तुम्ही, आम्हाला दोन-तीन दिवस बाहेर जायचं होतं, म्हणून आम्ही ठेवलं होतं तिकडे, पण तुम्हाला  एवढं वाईट वाटलं असेल ,असं वाटलं नव्हतं. तुम्ही अशा जाग्यावर असता, मग इतर वेळी, आम्हाला कुठे बाहेर जाता येत नाही, मुलांना सुट्टी असली, की ते तगादा लावतात, कुठेतरी चला आणि मला पण थोडा बदल हवाच असतो, मी थोड्या बदलाची अपेक्षा केली तर चुकीच आहे का काही? असही तोही तुमचा  मुलगा आहे ना ,मग राहिल्या चार-पाच दिवस त्यांच्याकडे, तर कुठे बिघडलं, असही मी तुमचं सगळे व्यवस्थित करत असते ना.

सासू- अगं, मी कधी तुला काही बोलले का, म्हणून तर मला तुला सोडून कुठे जावेसे वाटत नाही, तू सगळं माझा एखादया लहान लेकरासारखं करते ,कधी माझा दुस्वास करत नाही, मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल ,म्हणून सुनेच्या रूपात तू मला मिळाली.

संध्या -मी माझं फक्त कर्तव्य करते, माझ्या आई-वडिलांनी जे संस्कार केले, त्याचं पालन करते. तुम्हाला माहित आहे ना ,त्यांचा स्वभाव कसा आहे, मग जास्त विचार करत जाऊ नका आणि त्यांनी नाही केलं ,तरी भाऊजी तुमचं सगळं करतात ,हे मला माहित आहे.

सासू- पण खरंच मला खूप मोठा रोग झालाय का? म्हणून माझ्याशी ती अशी वागते का? तसं काही असेल तर ,तुम्ही पण तुमची काळजी घेत जा, माझ्यामुळे तुम्हाला काही झालं, तर मला चालणार नाही.

संध्या- पहिलं तुमच्या मनातून  हे काढून टाका, की तुम्हाला काही मोठा रोग झाला आहे ,तुमचा खुबा मोडला आहे ,म्हणून तुम्ही चालू शकत नाही आणि आता कुठे अछुत वगैरे असं काही राहिल आहे का?

सासू- तरी मग ती माझी भांडी अशी का बाजूला ठेवते ?तू तर असं कधी करत नाही ,तुम्ही सगळे माझ्या आजूबाजूला बसून गप्पा मारता ,मी तिथे असले, की एका रूममध्ये बेडवर झोपून असते, माझ्याशी कुणी बोलत  नाही.

संध्या- अहो ,त्यांचं घर मोठं आहे ,तिथे उलट तुम्हाला वेगळी रूम मिळते ,ते दोघेही नोकरी करतात, आल्यावर दमत असतील ,म्हणून बोलत नसतील आणि मुलांना कॉलेज असतं, ते त्यांचा अभ्यास करत असतील, तुम्ही काही गोष्टी खूपच मनाला लावून घेता.

सासू- तू काही मला बोलून देणार नाहीस,तुला प्रत्येक गोष्टीत काहीना काही चांगल दिसत असतं, तू जसा विचार करते, तसं सगळे नाही करत.

संध्या -खरं सांगू का तुम्हाला, उद्या मी सुद्धा म्हातारी होईन की आणि माझ्या मते ,कुणी कसं वागलं तरी, आपण कशाला आपला स्वभाव सोडायचा ,तो बघत असतो ,कोण कसं वागत , आपण काय त्याच्या तालावर नाचणार्‍या कठपुतली आहोत, मी जसं तुमच्याशी वागेन, तशीच माझी मुलं पुढे जाऊन माझ्याशी वागतील, तसं तर मी त्यांच्याकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. मला फक्त एकच समजतं, की माणसाने माणसाबरोबर माणसासारखं रहावं आणि असं म्हणतात,आईवडिलांची सेवा केल्याने देव मिळतो ,म्हणून मी मंदिरात न जाता, मला जे शक्य होईल ते करते, कर्म हाच देव, अशी माझी श्रद्धा आहे .चांगली कर्म करा, त्यातून तुम्हाला जो आत्मिक आनंद मिळेल ,तो अवर्णनीय असेल. शक्य होईल तेव्हा ,आई-वडिलांसोबत थोडासा वेळ व्यतीत करा.

 तुम्हाला जर ही कथा आवडली असेल, तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

 रूपाली थोरात