फिर भी तुमको चाहुंगा... भाग १० (अंतिम)

अजिंक्य विचारातून बाहेर आला. परत एकदा कपाट उघडलं. "सहा वर्षांचा संसार बघितला फक्त ताराने आणि अर?

मागील भागात बघितले…

अजिंक्य ताराच्या साडीला अजूनही कवटाळून बसला होता. त्या प्रेमाचा अनुभव आज सुद्धा त्याला होत होता. सकाळ कधी झाली त्याला कळलेच नाही. तितक्यात दार वाजले आणि अजिंक्य ताराच्या आठवणीतून बाहेर आला. 

त्याने दार उघडले. समोर किरण होता.

आता पुढे…

किरणला बघतच अजिंक्यने हसत त्याचे स्वागत केले. अजिंक्य आणि किरण ह्यांच्यात एक वेगळेच नाते होते. 

" अरे ये ये. काय म्हणतोस?" अजिंक्य

" जीजाजी, प्राजक्ताकडे जे सामान न्यायचं आहे ते तयार आहे. फक्त ताईची साडी राहिली आहे. मी तिला छान पॅक करून घेतो. शेवटी ती विशेष आहे. म्हणून ती साडी घ्यायला आलो मी." किरण

" हो हो. ही घे साडी." अजिंक्यने ती साडी परत एकदा जवळ घेतली. डोळे बंद केले. ताराचा अनुभव त्याला त्यात होत होता. आणि मग ती साडी किरणला दिली.

किरणने ती साडी घेतली डोळ्यांना लावली. "ताई" म्हणत एक हुंदका दिला. आणि पटकन डोळे पुसत निघून गेला.

त्याला जाताना बघून अजिंक्य परत भूतकाळात गेला. त्याला तारा चे ते शेवटचे क्षण आठवतं होते. लग्नानंतर तीन वर्षांनी प्राजक्ता झाली आणि त्यानंतर तीन वर्षांनी पारस. 

पारसच्या वेळी तारा नवव्या महिन्यात पोटावर पडली. आणि होत्याच नव्हतं झालं. तात्काळ तिला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. सीझेरियन करून पारसचा जन्म झाला पण ताराची तब्बेत मात्र खालवत गेली. अति रक्तस्त्राव झाला होता. त्यात आधीच तिला निमोनिया झाला होता. त्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट होती.

घरचे सगळे हॉस्पिटल मध्ये जमा झाले होते. अजिंक्यने किरणला आधीच बोलावून घेतले होते.

आपण आता वाचणार नाही हे तिला कळून चुकले होते. तिने अजिंक्यला इशाऱ्यानेच जवळ बोलावून घेतले.

" प्राजू आणि बाळाला जवळ दे." तारा जीव एकवटून बोलत होती.

अजिंक्यने पटकन दोघांना तिच्या जवळ दिले. ताराने दोघांचे मुके घेतले. डोळ्यातून पाणी वाहत होतं. पारसला आपली माया मिळणार नाही. ह्याचं तिला दुःख होत होते. 

" किरण." तारा फक्त इतकचं अजिंक्यला बोलली. आणि अजिंक्यने लगेच किरणला तारा समोर उभे केले.

अजिंक्यने ताराला आधार देऊन उठून बसवले होते. ताराने किरणला जवळ घेतले. घट्ट मिठी मारली.

" तुझ्यावर मी खूप अन्याय केला. मला माफ कर." इतकं म्हणून तिने बाजूलाच असलेल्या अजिंक्यच्या हातावर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला. 

तिच्या शेवटच्या क्षणात ती तिच्या मुलाला एकदा मनभर भेटली.

किरण ही तिच व्यक्ती होता ज्याच्याकडे लग्नाच्या वेळेस तारा आणि अजिंक्य दोघांनी बघितले होते. तो पत्ता ज्यावर अजिंक्य जात होता तो पत्ता किरणचा होता. अजिंक्यच्या डोळ्या समोर तो दिवस फिरत होता, जेव्हा अजिंक्य किरणच्या घरी गेला. किरण नागपूरला रहात असे ताराच्या मोठ्या आई बाबां सोबत. त्या दिवशी म्हणजे लग्नाच्या काही दिवस आधी अजिंक्य त्यांच्या भेटी साठी गेला. किरण तेव्हा जेमतेम सात आठ वर्षाचा असेल.

" काका काकू. मी किरणला न्यायला आलो आहे. मी आणि तारा लग्नं करतो आहे. मी ताराचा स्वीकार केला ते मनापासून. आणि आता किरण त्याच्या आई सोबत राहील. तारा सोबत राहील. तिच्या प्रेमावर त्याचा हक्क आहे. वडिलांचे प्रेम आणि कर्तव्य मी पार पाडेल." अजिंक्य हात जोडून ताराच्या मोठ्या आई बाबांना विनंती करत होता.

" नाही अजिंक्य. किरणला आम्ही आमच्या स्वखुशीने दत्तक घेतले आहे. तारावर बलात्कार झाला त्यात तिला दिवस गेले. खरं तर तेव्हाच आम्हाला समजले की तारावर बलात्कार झाला आहे. ॲबॉर्शन करता येणार नव्हते. कारण चार महिने होऊन गेले होते. त्यामुळे जन्म देण्याखेरीज काही पर्याय नव्हता. तारा इतकी लहान त्यात हे सगळं त्यामुळे मानसिक स्थिती बिघडली तिची. तरी त्यातून सावरत ताराने त्याला जन्म दिला. ताराला अशा अवस्थेत पाहून आमच्या किरणने आत्महत्या केली आणि आमची दुनिया उजाड झाली. म्हणून आम्ही ताराच्या बाळाला दत्तक घेतले. जेणे करून ताराच्या समस्या कमी होतील आणि आम्हाला आधार मिळेल. जे झालं त्यात ह्या चिमुकल्याचा काय दोष होता? त्याच्यात आम्ही आमचा मुलगा बघतो. म्हणून आम्ही त्यांचं नाव किरण ठेवलं आहे. तो आमचा आधार आहे. त्याला आमच्या पासून दूर नका करू." मोठे बाबा अजिंक्यला विनंती करत होते.

त्यांचं दुःख त्याला समजत होतं. शेवटी त्यांच्या कडे बघून त्यानी त्यांच्या विनंतीला मान दिला. पण एक वचन घेतलं.

" काका शेवटी तारा त्याची आई आहे. तिला त्याच्या बद्दल प्रेम आहेच. म्हणून तिच्या समाधानासाठी तुम्ही दार सुट्टीत त्याला आमच्याकडे पाठवत जा. तितकंच आम्हाला बरं वाटेल. तुमचा आधार मला हिरावून घ्यायचा नाही. फक्त हे एक वचन दया." अजिंक्य

अजिंक्यला दिलेल्या वचनानुसार किरण दर सुट्टीत अजिंक्य आणि तारा सोबत राहतं असे. तारा आणि अजिंक्य किरण चे खूप लाड करत. सुट्टीत ते किरणची चातका सारखी वाट बघत. तारा गेल्या नंतर सुद्धा अजिंक्यने हा नियम मोडला नाही. किरण दर सुट्टीत यायचं. प्राजू आणि पारस सोबत मनसोक्त खेळायचा. पण त्याला हे सत्य माहीत नव्हते की, जिला तो ताई म्हणतो ती त्याची आई आहे. पुढे काही वर्षांनी जेव्हा तो समजदार झाला तेव्हा त्याला सत्य सांगितले. आईवर झालेल्या अन्यायमुळे तो हवालदिल झाला. पण आपली आई एक लढावू वृत्तीची महिला होती ह्याचा त्याला अभिमान वाटला. तरी देखील त्याच्यासाठी ती ताईच राहिली. कारण ताराच्या मोठ्या आई बाबांनी त्याला सख्या मुलासारखे वाढवले होते. त्याला कणभर देखील शंका आली नाही की, तो त्यांचा मुलगा नाही. 

पुढे ताराच्या मोठ्या आई बाबांना सुद्धा देवज्ञा झाली. त्यानंतर किरण रमाताई आणि श्रीरंगरावांसोबत राहू लागला. वर्षां मागून वर्ष सरत होती. किरण ने लग्न केले ती सुध्दा एक पीडित मुलगी होती. 

अजिंक्य विचारातून बाहेर आला. परत एकदा कपाट उघडलं. "सहा वर्षांचा संसार बघितला फक्त ताराने आणि अर्ध्यावर डाव मोडून निघून गेली. आई म्हणतात ते खरंच आहे. सुखच कमी होतं तिच्या आयुष्यात." मनाशी बोलत अजिंक्यने डोळे पुसले. 

ताराचा अंश असलेली त्याची परी त्याची वाट बघत होती. तिच्या भेटीला त्याला जायचे होते. त्याने कपाट बंद केले. 

तयारी केली. रमाताई, श्रीरंगराव, प्रतिभाताई, अजिंक्यचे बाबा, किरण त्याची पत्नी आणि मुलगा, पारस सगळे तयार झाले होते. अजिंक्यने एकदा सगळं सामान बरोबर आहे ना ह्याची शहानिशा करून घेतली. 

किरण ने एका छान बॉक्स मध्ये साडी पॅक केली होती. त्याला छान सजवले होते. प्राजक्ता साठी ती विशेष भेट होती. 

सगळे प्राजक्ताच्या सासरी निघाले. तिथे लग्नानंतरचे विधी सुरू होते. प्राजू सगळ्यांना बघून पळतच आली. आधी अजिंक्यला मिठी मारत म्हणाली.

" काय रे डॅडा, आज तरी शेविंग करायची होतीस. तुला माहित आहे ना की, मला आवडत नाही असं." प्राजू लाडात बोलत होती.

" सॉरी माय प्रिन्सेस. अजून कार्यक्रमाला वेळ आहे. मी बाहेर जाऊन करून येतो शेविंग. पण खरं सांगू मी मुद्दाम नव्हती केली. कारण तू अशी रागवतेस ना तेव्हा खूप गोड दिसतेस." अजिंक्य त्याच्या लाडक्या लेकीला जवळ घेत बोलला. तसे सगळे हसले. 

प्राजक्ता पारस आणि किरणला भेटत होती. पण अजिंक्यला ताराची परत आठवण आली. ती सुद्धा अशीच बोलायची अजिंक्यला जेव्हा तो शेविंग न करता तिला भेटायला जायचा. आणि तो सुद्धा तिने असे बोलावे म्हणून मुद्दाम असाच जायचा. 

" तारा तू ह्या जगात नाहीस तरी माझं प्रेम तुझ्यावर कायम आहे. फिर भी तुमको चाहुंगा." अजिंक्य मनाशीच बोलला.

पुढे अजिंक्यने 'तारा' नावाची एक सेवाभावी संस्था काढली. ज्यात त्या मुलींची मदत केली जात असे ज्यांच्यावर तारा सारखा अन्याय झालेला होता. अशा मुलींना स्वतः च्या पायावर उभे राहण्यास मदत केली जायची. त्यांना ही संस्था आसरा देत. किरण आणि त्याची पत्नी ह्या संस्थेत जातीने लक्ष घालत होते.

धन्यवाद.

© वर्षाराज

समाजात अशा अनेक मुली आहेत ज्यांच्यावर बलात्कार होतो. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. काही मुली कमी वयात माता बनतात. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की मुली वयाच्या निव्वळ तेराव्या वर्षी मातृत्वाला सामोरे जातात. तारा नशीब वान होती की तिला अजिंक्य सारखं प्रेम करणारा जोडीदार मिळाला. तिला नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी मिळाली. पण ही संधी सगळ्यांनाच मिळत नाही. 

🎭 Series Post

View all