फिर भी तुमको चाहुंगा... भाग ८

ताराने हलकीच मान डोलावली पण तरी तिच्या जखमे मुळे तिला वेदना झाली. त्याची एक लकिर तिच्या चेहेऱ्यावर उठली आणि सरळ अजिंक्यच्या काळजात गेली. ताराने तसेच परत डोळे बंद केले. औषधांमुळे तिला गुंगी येतच होती. त्यामुळे काही क्षणातच तारा परत झोपी गेली. तोपर्यंत अजिंक्य तिचा हात हातात घेऊन बसला होता.

मागील भागात आपण बघितले….



त्या नंतर काही दिवसांनी दादानी आत्महत्या केली. त्या आधी एक पत्र लिहिले होते.


" ताराच्या ह्या परिस्थितीला मी जबाबदार आहे. मी विश्वास केला त्या नराधमांवर. त्या दिवशी मला यायला उशीर झाला कारण, त्यांनीच माझी बाईक पंचर केली होती. ही गोष्ट मला नंतर आमच्या एका मित्राने सांगितली. त्यामुळे ताराचा दोषी मी आहे. म्हणून मे स्वतः ला संपवतो आहे. मला माफ करा. तारा मी तुझा गुन्हेगार आहे."




आता पुढे ..



"दादाचा काही दोष नव्हता. त्या नराधमांन मुळे दादा त्याच्या प्राणास मुकला. माझी परिस्थिती अजूनच खालावली. त्या घटने नंतर सबंध गावात बातमी वनव्या सारखी पसरली. पाटलांच्या धमक्यांनी जगणे मुश्कील झाले होते. त्यात माझी अवस्था नाजुक होती. सगळे मलाच दोष देत होते. प्रचंड मानसिक तणावातून मी सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. दैवाला मी असे करणे मंजूर नव्हते. 



आजी आजोबा मोठे आई बाबा, आई बाबा ह्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि मला घेऊन ते नागपूर ला आले. मानसोपचार तज्ज्ञडॉक्टरांकडून माझा इलाज सुरू झाला. डॉक्टरांचे प्रयत्न आणि घरच्यांची साथ ह्यामुळे काही महिन्यातच मी बरी झाले. पण मनावरचे घाव भारत नव्हते. आणि ते भरणार देखील नाही जो पर्यंत त्या राक्षसांना शिक्षा होत नाही.



आई बाबांनी, घरच्या सगळ्यांनी मला अन्याया विरुद्ध बंड करण्याची हिम्मत दिली. माझ्याकडे सगळं सिद्ध करायला खूप महत्त्वाचा पुरावा देखील होता. त्यामुळे तेव्हापासून माझी ही लढाई सुरू आहे. न्याय मिळवण्याची लढाई. न्याय फक्त मलाच नाही तर माझ्या निर्दोष भावाला सुद्धा मिळवून द्यायचा आहे. 



माझ्याकडे असलेल्या त्या महत्त्वाच्या पुरव्या मुळे ते माझ्या जीवावर उठले आहेत. कोणत्या ही परिस्थितीत हे पुरावे न्यायलायात दाखल झाले पाहिजेत."



अजिंक्य डायरी वाचत होता. ताराच्या प्रत्येक वाक्यात तिच्या संघर्षाची, वेदनेची झलक त्याला दिसत होती. तिच्या वर झालेल्या अन्यायानी त्याचे डोळे लाल झाले होते. मनात एक आग पेटली होती. 



तितक्यात तारा शुद्धीवर आली. पण तिच्यात बोलण्याचे त्राण नव्हते. तिने डोळे उघडताच अजिंक्य तिला दिसला. त्याला बघून तारा गालात हसली. मग बाजूला नजर फिरवली तर, रमाताई तिथे उभ्या होत्या. तिच्याकडे बघत होत्या. रमाताईंनी ताराच्या डोक्यावर हलकेच हात फिरवला. ती काही बोलणार तितक्यात अजिंक्यने तिचा हात हातात घेतला. 


" तू आता आराम कर फक्त. बाकी काही बोलू नको. मी इथेच आहे." अजिंक्य


" हो बाळा आराम कर. मग सांगेल सगळं तुला बरं वाटलं की." रमाताई अजिंक्यच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या.



ताराने हलकीच मान डोलावली पण तरी तिच्या जखमे मुळे तिला वेदना झाली. त्याची एक लकिर तिच्या चेहेऱ्यावर उठली आणि सरळ अजिंक्यच्या काळजात गेली. ताराने तसेच परत डोळे बंद केले. औषधांमुळे तिला गुंगी येतच होती. त्यामुळे काही क्षणातच तारा परत झोपी गेली. तोपर्यंत अजिंक्य तिचा हात हातात घेऊन बसला होता.



" किती सोसले माझ्या ताराने. आणि अजून पण सहन करते आहे. तिच्या ह्या लढाईत मी तिच्या सोबत आहे. तिला आणि तिच्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे." अजिंक्य मनातच बोलत होता.



" अजिंक्य तू घरी जा. मी आहे इथे. प्रतिभाताई वाट बघत असतील." रमाताईंच्या बोलण्याने अजिंक्य विचारांच्या जाळ्यातून बाहेर आला.



" नाही काकू. मी पण इथेच थांबतो. थोड्यावेळाने आई येईल आपल्यासाठी जेवण घेऊन. हॉस्पिटल मध्ये आलो तेव्हाच मी आईला फोन करून कळवले होते. तेव्हाच ती बोलली की घरी येऊ नकोस. त्यामुळे काळजी करू नका." अजिंक्य 


" अरे कशाला उगाच त्रास तुला आणि त्यांना." रमाताई



" त्रास कसला काकू. जीव आहे माझा तारा मध्ये. तिला आणि तुम्हाला अशा अवस्थेत सोडून मी घरी शांत कसा बसू शकेल.? पण तुम्ही काकांना सांगितले का ?" अजिंक्य



"ठिक आहे. मगाशी कॉफी आणायला गेले तेव्हा कळवले मी त्यांना. रात्री उशिरा पोहोचतील ते." रमाताई.



" काकू मी नेहमी तारा सोबत राहील. तुम्ही सगळे आता एकटे नाही. मी आहे तुमच्या सोबत." अजिंक्य



" ऐकून बरं वाटलं. पण तुझा जीव आम्हाला धोक्यात घालायचा नाही. ही लढाई वाटते तितकी सोपी नाही." रमाताई



" माहीत आहे काकू. डायरी वाचून अंदाज आला मला. आणि ताराच्या नकाराचे कारण पण समजले. तरी माझ्या तारा बद्दलच्या भावना तशाच आहेत." अजिंक्य



" बाळा, तू पूर्ण वाचलीस का डायरी? नसेल तर आधी वाच आणि मग परत विचार कर. ताराचा संसार बघायची आमची पण इच्छा आहे. पण तिचा कोणी स्वीकार करणार नाही हे एक कटू सत्य आहे. जे तिने आणि आम्ही स्वीकारले आहे." बोलताना रमाताईंच्या डोळ्यात पाणी होते.



" काकू नका रडू. मी डायरी पूर्ण वाचली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा." अजिंक्यने रमाताईंना त्याचे मत सागितले.



त्यानंतर अजिंक्यने परत एकदा डायरी चाळून बघितली. त्याच्या शेवटच्या पानावर एक पत्ता होता. जिथे त्याला जायचे होते. त्याने तो पत्ता लिहून घेतला. त्यानंतर त्याने ती फाईल काढली त्यात असलेले सगळे कागद पत्र वाचून काढले. आणि परत ती फाईल बॅगेत ठेवून दिली. 



" अजिंक्य पण तुझे आई बाबा तयार होतील?" रमाताई बोलत होत्या तितक्यात प्रतिभाताई तिथे आल्या.



" आता कशी आहे तारा? शुद्धीवर आली होती का? डॉक्टर काय बोलले? आणि हो, रमाताई तुम्ही काळजी करू नका. अजिंक्यच्या निर्णयात आम्ही त्याच्या सोबत आहोत." प्रतिभाताई आत आल्या आल्या बोलू लागल्या.



" आता बरी आहे. थोड्यावेळ आधी शुद्धीत आली. आता झोपली आहे. जास्त खोल जखम नाही. पण आराम सांगितला आहे डॉक्टरांनी. प्रतिभाताई तुम्हाला परिस्थिती माहीत नाही म्हणून तुम्ही असं बोलत आहात." रमाताई



" तुम्ही दोघे आधी खाऊन घ्या मग बोलू आपण." असं म्हणत प्रतिभा ताईंनी, रमाताई आणि अजिंक्यला जेवणाचे ताट वाढून दिले. प्रेमाने दोघांना जेवू घातले.



" रमाताई मला सगळं माहीत आहे. आज सकाळी अजिंक्यच्या बाबांशी बोलत होते. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं." प्रतिभाताई



प्रतिभाताईंच्या बोलण्याने रमाताई आणि अजिंक्य आश्चर्याने त्यांच्या कडे बघतच राहिले. प्रतिभाताई पुढे बोलू लागल्या.



" परवा तारा वकिलांकडे गेली होती ना. तेव्हा अजिंक्यचे बाबा सुद्धा तिथे होते. अर्थात ताराने त्यांना बघितले नाही. कारण ती तिथून निघत होती आणि ते आत जात होते. तेव्हा त्यांनी ताराला बघितले. तिला तिथे बघून त्यांना आश्चर्य वाटले. म्हणून त्यांनी वकिलांना विचारले. तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं. अर्थात असं कोणाला सांगत नाहीत वकील पण ते वकील दुसरे कोणी नाहीत अजिंक्यचे काकाच आहेत. त्यात तारा अजिंक्यची मैत्रीण म्हणून त्यांनी सांगितले. त्यामुळे मला आज सकाळी सगळं समजलं. जे झालं त्यात ताराचा काहीच दोष नाही. त्यामुळे आम्ही ताराला मनापासून स्वीकारतो. तारा मला माझी सून म्हणून पसंत आहे. 



केस आता शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्ही निश्चिंत रहा निकाल आपल्या बाजूने लागणार ह्याची खात्री वकिलांनी दिली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्याची कोर्टाची तारीख झाली की लगेच साखरपुडा करून घेऊ.



अजिंक्य तू त्यांचा पत्ता विचार आणि त्याला जाऊन भेट. स्वीकार करायचं म्हणजे पूर्ण करायचा. अर्धवट नाही." प्रतिभाताई



प्रतिभाताईंच्या बोलण्याने रमाताई आणि अजिंक्यचा चेहेरा एकदम खुलला. तितक्यात तारा सुद्धा उठली होती. तिच्याशी बोलून प्रतिभाताई निघून गेल्या. अजिंक्य तिथेच थांबला. श्रीरंगराव रात्री उशिरा आले. तेव्हा तारा झोपलेली होती. रमाताईंनी इती वृत्तांत त्यांना सांगितला. सगळं ऐकून श्रीरंगरावांना सुद्धा आनंद झाला. त्यानी अजिंक्यला एक घट्ट मिठी मारली. आज पर्यंत अनेक संकटांना तोंड देणारे पहाडा सारखे, खंबीर श्रीरंगराव लहान मुला सारखे अजिंक्यच्या गळ्यात पडून रडत होते. इतक्या वर्षांचे साठवून ठेवलेले दुःख, वेदना सगळ्यांना आज त्यानी वाट मोकळी करून दिली होती. अजिंक्यच्या रुपात त्यांना मुलगा मिळाला होता आणि सोबतच विश्वास की, तारा त्याच्या सोबत खुश राहील. त्यानी अजिंक्यचे आभार मानले. 



अजिंक्य सकाळी फाईल घेऊन घरी निघून गेला. दोन दिवसांनी ताराला देखील हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली. आता प्रतीक्षा होती कोर्टाच्या तारखेची. शेवटी तो दिवस उजाडला. अजिंक्य खूप सावध पणे ती फाईल घेऊन कोर्टात आला. कार्यवाही सुरू झाली. आरोपी म्हणून संजू आणि विजू उभे होते. त्यांना बघून ताराच काय तर, अजिंक्यच्या सुद्धा तळ पायाची आग मस्तकात गेली. दोन्ही पक्षाच्या वकिलांचे आरोप प्रत्यारोप सुरू होते. 



पुढील बघत बघू कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल. आणि प्रतिभा ताईंनी कोणाला भेटण्यासाठी अजिंक्यला सांगितले होते.



क्रमशः


© वर्षाराज



🎭 Series Post

View all