फिर भी तुमको चाहुंगा... भाग ६

अजिंक्य हे सगळं ऐकून अजूनच विचारात पडला. त्याला समजत नव्हते की, "काय प्रकार आहे? ती माणसं कोण होत?

मागील भागात आपण बघितले…

" हो. आता तू उद्या भेट तेव्हा कळेलच तुला सगळं. त्यावर तू ठरव काय ते. आम्ही तुझ्या कोणत्याही निर्णयात तुझ्या सोबत आहोत. पण तू तिचा स्वीकार केला तर आम्हाला जास्त आनंद होईल." प्रतिभा ताईंनी अजिंक्यच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत त्याची हिम्मत वाढवली. पण त्यांच्या मनात देखील प्रश्न होताच की 'काय झालं असेल तारा सोबत?'

ती रात्र अजिंक्यने कशी बाशी काढली. नेहमी उशिरा जाणारा तो, सकाळीच तयार होऊन कॉलेजला गेला. कॉलेगच्या गेट जवळच ताराची वाट बघत बसला होता.

आता पुढे…

वाटेकडे तुझ्या नयन लागले,

 येशील तू हसशील तू,

 वाट पहावी जीव घेणी,

 सांग काय दोष माझा

 प्रेमात विरह ना सोसवे.

अजिंक्य ताराची वाट बघत होता. पहिले लेक्चर संपले. दुसरे सुरू झाले. तारा आलीच नाही. अजून कशी आली नाही? कारण इतका उशीर कधीच करत नसे. म्हणून न राहवून शेवटी अजिंक्यने ताराच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याने पटकन बाईक काढली, किक मारली आणि जायला निघाला. "तारा का आली नसेल?" ह्याचं विचारात अजिंक्य तिच्या बिल्डिंगजवळ पोहोचला. तर दुरूनच त्याला बिल्डिंग समोर खूप गर्दी दिसली. थोड जवळ गेल्यावर पोलिसांच्या गाड्या उभ्या दिसल्या. अजिंक्यच्या समोरूनाच एक ऍम्ब्युलन्स तिच्या बिल्डिंग मध्ये शिरली. सगळ्या प्रकारावरून काहीतरी घटना घडली, हे स्पष्ट जाणवत होतं. पण काय? हे अजून लक्षात येत नव्हते. अजिंक्यच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, पण इतर कोणाकडे काही प्रॉब्लेम झाला असेल असा विचार करतं, मनातील शंका झटकत तो ताराच्या घराच्या दिशेने निघाला. तो गर्दीतून वाट काढत आज जात होता. तोच त्याला तारा दिसली. रक्ताच्या थारोळ्यात भिजलेली ती, तिला स्ट्रेचर वरून ऍम्ब्युलन्स मध्ये ठेवत होते. मागोमाग रमाताई पळत आल्या. हे सगळं बघून अजिंक्यच्या पायातील त्राणच गेला. काय करावं सुचत नव्हते. 

अजिंक्य 'तारा, तारा ' आवाज देत होता. 

" मीता ती बॅग अजिंक्य जवळ दे. आणि अजिंक्य तू ती बॅग घेऊन घर बंद करून हॉस्पिटलला ये. पण ती बॅग कोणाला दिसू देऊ नकोस येताना." रमाताई शेजारच्या मीताला आणि अजिंक्यला सूचना देत ॲम्बुलंन्स मध्ये बसल्या. ऍम्ब्युलन्स निघाली पाठोपाठ पोलिसांच्या गाड्या निघाल्या. काही पोलिस तिथेच घराची पाहणी करत थांबले. 

" दादा बाईकची चावी दे. मी बॅग डिक्कित ठेवते. कोणाला दिसणार नाही मग. तू घर बंद कर." म्हणत मीताने ताराच्या घराची चावी अजिंक्यला दिली. 

अजिंक्यने बाईकची चावी मीताला दिली आणि तारा च्या घरात गेला. आत दोन पोलिस घराची पाहणी करत होते. घरातील सामान अस्ताव्यस्त झाले होते. असे वाटत होते की कोणीतरी ते मुद्दाम केले आहे. जसं कोणी काहीतरी शोधत होते. हॉलमध्ये रक्त पडलेले होते. पोलिसांनी सगळ्या घराचे फोटो काढले आणि निघून गेले. मागोमाग अजिंक्य सुद्धा घर बंद करून निघाला. मीताने त्याला बाईकची चावी आणून दिली. 

" काय झालं होतं मीता?" अजिंक्यने पटकन प्रश्न केला.

" दादा ते तुला काकू सांगतील. मला माहित नाही. फक्त सहा सात माणसं आली होती आणि त्यांनी हे सगळं केलं इतकचं माहीत आहे मला." मीताने उत्तर दिले.

अजिंक्य लगेच हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. हॉस्पिटल जास्तं दूर नव्हते त्यामुळे दहा मिनिटात तो तिथे पोहोचला. बाईक पार्क केली आणि डिक्कितून त्याची कॉलेजची बॅग घेऊन आत गेला. रिसेप्शनवर तारा बद्दल विचारले. तिला ओ.टी मध्ये नेण्यात आले आहे. हे कळल्यावर तो धावतच त्या दिशेने गेला. 

रमाताई तिथे बहेच बसल्या होत्या. डोळ्यात पाणी ओठांवर देवाचे नाव घेत. जीव एकवटून तारासाठी प्रार्थना करत होत्या.

" काकू. काय झालं?" अजिंक्य त्यांच्या जवळ जात बोलला. 

" डोक्याला लागलं आहे तिच्या." रमाताई रडत रडत बोलत होत्या.

तितक्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांना बघून रमाताई आणि अजिंक्य त्यांच्याकडे गेले.

"तारा ईज आऊट ऑफ डेंजर. खरं तर जखम जास्तं खोल नव्हती त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पण रक्त स्त्राव मात्र खूप झालं आहे. इंटर्नल इन्जुरी सुद्धा नाही. आता टाके घातले आहेत. पण तिला आरामाची खूप गरज आहे. काळजी घ्या. थोड्यावेळाने तिला रूम मध्ये शिफ्ट करू. तुम्ही तिथेच थांबा." असं म्हणत डॉक्टर निघून गेले.

डॉक्टरांचे बोलणें ऐकून दोघांनी देवाला हात जोडले. दोघे हॉस्पिटलच्या रूम मध्ये जाऊन बसले.

" तू विचार करत असशील के हे सगळं काय आहे?" अजिंक्य काही बोलणार त्या आधीच रमाताईंनी बोलायला सुरुवात केली.

अजिंक्य त्यांच्या कडे बघत होता. मनातील प्रश्न डोळ्यात होते. 

" काकू कसं झालं हे सगळं?" अजिंक्यने प्रश्न केला.

" काल तू ताराला घरी सोडून निघून गेलास. तारा घरात आली. थोडावेळच झाला होता तिला येऊन की खिडकीतून एक दगड आत आला. आम्ही दोघी खूप घाबरलो. एका कागदात तो दगड गुंडाळलेला होता. ताराने तो कागद काढला. तिला हे अपेक्षितच होतं. तिने पटकन एक बॅग काढली त्यात काही कागदपत्र आणि एक डायरी ठेवली. आणि शेजारच्या मीताच्या घरी देऊन आली.

आल्यावर मला म्हणाली…

'आई मला वाटलच की, असं काही होईल. वातावरण खराब आहे. त्यात बाबा इथे नाहीत दोन दिवस. त्यामुळे आपल्याला जास्तं सतर्क रहावे लागेल. ती बॅग घरात ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे सध्या ती मीता कडे रहुदेत. बाबा आले की मग ठेऊ सुरक्षित ठिकाणी. पण दरम्यान मलाकाही झाले तर ही बॅग अजिंक्यला दे. त्यात एक डायरी आहे ती त्याच्या साठी आहे.' 

असं ती रात्रीच बोलली आणि सकाळी सकाळी ही माणसं घरी आलीत. सगळं घर उलथा पलथ केलं. तारा आणि मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यातील दोघांनी आम्हाला पकडून ठेवले. खूप वेळ शोधा शोध सुरू होती. ते जे शोधत होते त्यांना ते मिळाले नाही, तर रागावून त्यानी ताराचे डोके टेबल वर आपटले आणि तारा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली. जाताना मला धमकी दिली की मी, 'ताराला समजावले नाही, तर तिला जीवंत सोडणार नाही.' 

शेजारच्यानी सगळा आवाज ऐकून पोलिसांना आधीच फोन करून बोलावले होते. पण पोलिस येईपर्यंत ती माणसं निघून गेली. आता पुढे जे काही झालं ते तू बघितलंस."

 रमाताई सांगत होत्या.

अजिंक्य हे सगळं ऐकून अजूनच विचारात पडला. त्याला समजत नव्हते की, "काय प्रकार आहे? ती माणसं कोण होती? काय शोधत होती? मीता कडे दिलेल्या बॅग मध्ये काय होतं? ती ताराच्या जीवावर का उठलीत?" असे संख्या प्रश्न मनात घोंगावत होते. 

" तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या बॅगेत आहेत." रमाताई अजिंक्यच्या चेहेऱ्यावरचा गोंधळ बघत बोलल्या.

तितक्यात ताराला रूम मध्ये आणण्यात आले. ती अजून देखील बेशुद्ध होती. डोक्यावर पट्टी बांधलेल्या ताराला बघून रमाताईंनी हंबरडा फोडला. त्यांना सावरत अजिंक्य ताराला बघत होता. रमाताई शांता झाल्या. ताराच्या डोक्यावर हात फिरवला आणि जवळच्या खुर्चीत जाऊन बसल्या.

अजिंक्य सुद्धा तारा जवळ खुर्ची घेऊन बसला. तिचा हात हातात घेऊन तिच्या कडे बघत होता. तितक्यात एक नर्स ताराला मॉनिटर करण्यासाठी आली.

" सिस्टर तारा शुद्धीत कधी येणार?" अजिंक्य

" डोक्याला मार आहे त्यामुळे थोडा वेळ लागेल." असं बोलून नर्स निघून गेली.

" काकू तुम्ही आराम करा. मी आहे इथेच काळजी करू नका." अजिंक्य

" नाही रे, तिला शुद्ध आल्याशिवाय काही चैन पडणार नाही." रमाताई

" मी कॉफी घेऊन येतो तुमच्या साठी. बरं वाटेल तुम्हाला." अजिंक्य

" नको तू बस मी घेऊन येते कॉफी आपल्यासाठी." असं म्हणत रमाताई बाहेर निघून गेल्या.

अजिंक्य ताराला एकटक बघत होता. डोक्यात विचारांचे काहूर दाटत होते. त्यानी कॉलेजची बॅग उघडली त्यात अजून एक बॅग होती जी मीता ने ठेवली होती. ती बॅग बाहेर काढली. त्यात एक फाईल होती. त्यात काही कागद पत्र होती. पण त्याला ताराची ती डायरी वचायची होती जी तिने त्याच्या साठी दिली होती. अजिंक्यने ती डायरी उघडली पहिल्याच पानावर एक कागद ठेवलेला होता. त्याने तो कागद उघडला. त्यात लिहिले होते,

" आता सुद्धा वेळ आहे, नाहीतर मरायला तयार रहा." हा तोच कागद होता. जो काल दगडा सोबत आला होता.

ते वाचून अजिंक्यच्या पाय खालची जमीन सरकली.

पुढील भागात बघू त्या डायरीत काय लिहिले आहे.

क्रमशः 

© वर्षाराज

🎭 Series Post

View all