फिर भी तूमको चाहुंगा... भाग २

ताराच्या ह्या बोलण्यावर रमाताई आणि श्रीरंगराव एकमेकांकडे बघत होते. आपली मुलगी प्रेमात पडली हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मनातून त्यांना आनंद झाला पण क्षणात तो आनंद मावळला.ताराला तिच्या प्रेमाची जाणीव करून देणे गरजेचे होते पण त्यांना भीती होती ती परिणामांची. आपली मुलगी कसं सामोरे जाईल परिस्थितीला ह्याची काळजी त्यांना सतावत होती. तरी त्यांनी तिच्याशी बोलायचं निर्णय घेतला.

मागील भागात आपण बघितले…


हल्ली तर रोजचं असं होत होतं. पूजा आली की तारा तिथे थांबत नव्हती. तिला अजिंक्य आणि पूजाला सोबत बघून का कुणास ठाऊक त्रास होत होता.



" काही दिवस आधी पर्यंत मी त्याला कोणती मुलगी आवडते का म्हणून त्याच्या मागे लागायची. आणि आता कदाचित त्याला पूजा आवडते तर मला इतका त्रास का होतो आहे.?" तारा स्वतः ला प्रश्न विचारत होती.


आता पुढे…



" तारा काय झालं? हल्ली मी बघतो आहे की. पूजा आली की तू निघून जाते." तारा आणि अजिंक्यचा मित्र चेतन ताराशी बोलत होता.


" चेतन त्यांचं अफेअर सुरू आहे का? अजिंक्यला ती आवडते का? की तिला तो आवडतो?" तारा उलट चेतनलाच प्रश्न विचारत होती.


" नाही गं. दोघे फक्त मित्र आहेत." चेतन


" तू त्याचाच मित्र तू का सांगशील मला खरं.?" तारा रागात बोलली.


"पण तुला इतका का राग येतो तिचा.? चांगली आहे ती." चेतन


" जा ना मग तू पण तिथे.मला राग येतो तिचा. तिला असं अजिंक्य सोबत बघून त्रास होती मला." तारा अजूनच चिडली.


" माहीत आहे मला. पण का त्रास होतो? ह्याचं उत्तर शोधायला हवं ना? म्हणून आलो मी तुझी मदत करायला. जसा अजिंक्य माझा मित्र आहे, तशी तू माझी मैत्रीण आहेस. त्यामुळे जे मला दिसतं आहे ते तुला किंवा त्याला कळू नये असं कसं होऊ देईल मी?" चेतनने थोड्या वेगळ्या भाषेत विषयाला हात घातला, आणि तिथून निघून गेला.



मनात पडलेले प्रश्न आणि चेतनचे वाक्य ताराच्या डोक्यात फिरत होते. 


" छे काहीतरीच. असं काही नाहीये. मी कशी अजिंक्यच्या प्रेमात पडेल? मी त्याच्याच काय कोणाच्याच प्रेमात पडू शकतं नाही. मला तसं करता येणार नाही. मुळात अजिंक्य माझा मित्र आहे म्हणून कदाचित मला तो पूजाच्या जवळ जातो ते आवडत नसेल." असं म्हणत तारा ने स्वतः ची समजूत घातली.




ताराच्या आठवणीत अजिंक्यच्या डोळ्यातून पाणी झरत होते त्यातील दोन थेंब त्याच्या हातावर पडले आणि तो भूतकाळातून बाहेर आला. त्यानी कपाटातून ताराची लग्नाची साडी बाहेर काढली. अजिंक्यने ती साडी हातात घेतली आणि त्याच्या आराम खुर्चीत जाऊन बसला. 


" तारा आज तू हवी होतीस. प्राजक्ता तुला खूप मिस करतं होती. खूप मोठा दिवस होता तिच्या आयुष्यातला. का गं असं आम्हाला पोरक करून गेलीस? मुलांचा एकदा सुद्धा विचार नाही का आला तुझ्या मनात?" अजिंक्य त्या साडीत वसलेल्या ताराशी गप्पा मारत होता. तितक्यात थंड हवेची एक झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून गेली. जणू ताराच तिथे असल्याचा इशारा देत होती..


"अशीच वाऱ्याची झुळूक तिच्या केसात झोका घ्यायची. किती सुंदर दिसतं असे माझी तारा तेव्हा. तिचे ते उडणारे केस गालावर यायचे आणि ती हळूच ते कानामागे करायची. घायाळ व्हायचो तेव्हा मी."


त्याला कॉलेजचे ते दिवस आठवत होते. 




तितक्यात रमाताई आल्या आणि त्याची तंद्रि तुटली.


" अजिंक्य उद्याची तयारी झाली का सगळी.?" असं बोलत असताना त्यांचं लक्ष ताराच्या त्या साडी कडे गेले. त्या पटकन साडी जवळ गेल्या तिला हृदयाशी कवटाळून घेतले जणू तारालाच कवटाळले होते. काही वेळ त्या तशाच उभ्या होत्या. डोळे बंद करून. ताराचा गंध अजूनही त्या साडीत त्यांना जाणवत होता. माय लेकीची अशी भेट होईल असा त्यांनी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. अजिंक्य त्यांना बघत होता. काही न बोलता तो रमाताईंना ताराच्या स्पर्शाचा, तिच्या नसून आलेल्या अस्तित्वाचा अनुभव घेऊ देत होता. मुलगी दूर गेल्याचं दुःख काय असतं हे त्याला सुद्धा माहीत होतं. रामाताईंची तर मुलगी इतकी दूर गेली होती की तिथून परत येणं शक्य नव्हते. 



" तारा च्या लग्नाची स्वप्नं बघणं आम्ही तर सोडून दिलं होतं." रमाताई भूतकाळातील तो प्रसंग आठवला.



" काय गं हल्ली चीड चीड का करते आहेस इतकी?" रमाताई ताराला विचारत होत्या.


" आई हल्ली अजिंक्य आणि पूजा जास्तं वेळ सोबत असतात. त्याला विचारलं तर म्हणतो नुसती मैत्रीण आहे." तारा


 रमाताई आणि श्रीरंगराव म्हणजे ताराचे आई वडील जरी असले तरी तिचे मित्र होते. ती त्यांच्या पासून काहीच लपवत नसे.


" अगं पण तू का इतकी चिडते आहेस?" श्रीरंगराव


" मलाच कळत नाहीये बाबा. दोघांना असं सोबत बघून मला फार त्रास होतो. खरं तर त्याची मैत्रीण म्हणून मी खुश व्हायला पाहिजे पण तसं होत नाहीये. म्हणून जास्तं चीड चीड होते आहे माझी." तारा इतकं बोलून तिच्या खोलीत निघून गेली.


ताराच्या ह्या बोलण्यावर रमाताई आणि श्रीरंगराव एकमेकांकडे बघत होते. आपली मुलगी प्रेमात पडली हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. मनातून त्यांना आनंद झाला पण क्षणात तो आनंद मावळला.

ताराला तिच्या प्रेमाची जाणीव करून देणे गरजेचे होते पण त्यांना भीती होती ती परिणामांची. आपली मुलगी कसं सामोरे जाईल परिस्थितीला ह्याची काळजी त्यांना सतावत होती. तरी त्यांनी तिच्याशी बोलायचं निर्णय घेतला.


रात्री जेवणानंतर दोघांनी ताराशी बोलायचे ठरवले. जेवणं आटोपली. ताराचा मूड अजून पण चांगला नव्हता. ती उठून आत जाणार तितक्यात श्रीरंगरावांनी तिला आवाज दिला. 


" तारा अगं थांब जरा आईसक्रीम आणलं आहे. सोबत खाऊ सगळे." श्रीरंगराव



" तू बस मी येते घेऊन." असा म्हणत रमाताई आत निघून गेल्या.



" अरे वाह. आई लवकर आण." आईसक्रीम म्हणजे ताराचा आवडता पदार्थ. नुसतं नाव जरी घेतलं तरी ताराचा चेहेरा खुलून जायचा. आज सुद्धा तसच झालं.


तिघांनी मिळून आईसक्रीम वर मस्त ताव मारला.


" चला आता बोला काय बोलायचं आहे तुम्हा दोघांना. मला माहित आहे तुम्हाला काहितरी महत्वाचं बोलायचं आहे." तारा 


" हे बघ तारा तुला असं अस्वथ आम्ही या आधी कधीच बघितले नाही. किती तरी संकटं तुझ्या आयुष्यात आलीत तरी तू मोठ्या धीराने त्याचा सामना केला." श्रीरंगराव जरा गंभीर होऊन बोलत होते.


" तारा अजिंक्य साठी तुला जे वाटतं ती फक्त मैत्री नाही. त्या पलीकडे आहे. ह्याची जाणीव तुला झाली नसेल पण आम्हाला ते स्पष्ट दिसतं आहे." रमाताई बोलत होत्या.



" तारा ह्यात काही वावगं नाही. अजिंक्य चांगला मुलगा आहे. तुला खुश ठेवेल तो. पण तू त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत का?" श्रीरंगराव



" आई बाबा मला हेच समजत नव्हतं की, ही फक्त मैत्री की त्या पलीकडे काही आहे. चेतन सुद्धा मला हेच बोलला जे तुम्ही बोलत आहात. पण त्याच्याकडे मी इतकं लक्ष दिलं नाही . पण आता लक्षात येतं आहे. ही फक्त मैत्री नाही. मुळात त्याला माझ्या बद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यात काही अर्थच नाहीये. कारण आमच्या नात्याच काही भविष्य नाही. जो विचार तुम्ही करत आहात ते कधीच होऊ शकत नाही. मला माझ्या भावनांना आवर घालावा लागेल. मला त्याच्या आयुष्यातून जावं लागले. 


त्याला माझ्या पेक्षा चांगली मुलगी भेटेल. त्याला मी सत्य सांगू शकत नाही. त्याचं आयुष्य खराब नाही करायचं मला.


आई बाबा बरं झालं तुम्ही वेळीच मला जाणीव करून दिली नाहीतर मला खूप त्रास झाला असता. पण आता मी त्याच्या पासून दूर जाणार. हेच योग्य आहे." तारा खंबीर पणे जरी बोलत असली तरी तिच्या मनात असंख्य वेदना होत होत्या. त्याची कल्पना रमाताई आणि श्रीरंगराव ह्या दोघांना पण होती.


" तारा अजिंक्य सुद्धा जर तुझ्यावर प्रेम करत असेल तर काय हरकत आहे बोलायला?" रमाताई 


" हे तू नाही तुझ्यातली आई बोलते आहे. आई मला त्याचं आयुष्य खराब करायचं नाही. सत्य सांगून काही उपयोग नाही. मी त्याच्या आयुष्यातून जाणं हेच योग्य आहे. आई बाबा मी कधीच लग्नं करणार नाही हे आधीच ठरलं आहे माझं. तुम्हाला पण माहीत आहे. माझा भूतकाळ माझा पिच्छा कधीच सोडणार नाही. त्याचे पडसाद कोणावरच पडायला नको अजिंक्य वर तर नाहीच नाही." तारा डोळ्यातील पाणी अडवत बोलत होती.


थोडावेळ सगळे शांत बसले. 

" काळजी करू नका. सावरेल मी स्वतःला." असं बोलून तारा तिच्या खोलीत निघून गेली. 


रमाताई आणि श्रीरंगराव एक मेकांना पकडुन रडत होते.


" कधी मिळेल आपल्या मुलीला सुख? एक घटना आणि तिचं आयुष्य बदलून गेलं. सगळ्या संकटांना धीराने सामोरी गेली. पण ह्यावेळी मनातून किती खचली असेल ती!" रमाताई डोळे पुसत बोलत होत्या.


तारा तिच्या खोलीत गेल्यावर तिने दार बंद करून घेतलं आणि इतक्या वेळ अडवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आई बाबा आणि चेतनचे शब्द तिच्या कानात घुमत होते. तिने स्वतः शी काहीतरी निर्धार केला.


रामाताई सगळं आठवून भावूक झाल्या होत्या.


 " आई सावरा स्वतःला. मी समजू शकतो तुमची व्यथा. पण तारा आपल्या जवळच आहे कुठेही गेलेली नाही." थोड्यावेळाने अजिंक्यने रमाताईंना समजावत होता.


रामाताईंनी डोळे पुसले. एकदा परत साडीला कवटाळले.

तितक्यात पारस त्यांना जेवणासाठी बोलवायला आला. तसे दोघे पारस सोबत जेवायला निघून गेले. पण जेवण कोणाला गोड लागत नव्हते. प्राजक्ताची कमी सगळ्यांना जाणवत होती. कसं बसं जेवण करून पाहुण्यांची झोपायची व्यवस्था लावून पारस, अजिंक्य आणि रमाताई आपआपल्या खोलीत निघून गेले. 




पुढील भागात बघू तारा ने काय निर्धार केला आणि त्याचा परिमाण काय झाला.




क्रमशः



© वर्षाराज


🎭 Series Post

View all