फिर भी तुमको चाहुंगा...भाग १

तिला असं जाताना बघून अजिंक्यची फजिती व्हायची. आता पुजाशी बोलू की तारा सोबत जाऊ. कारण त्याला सुद?

लाल घागरा, डोक्यावर भरजरी ओढणी, गळ्यात कुंदन हार, नाकात मोठी नाथ, हातात चुडा, प्रेमाचा रंग चढून काळी झालेल्या मेहेंदीचे हात आणि पाय, हळदीने अजूनच खुलून दिसणारी गोरीपान कांती, नाजूक बोलके पाणीदार डोळे, गुलाबी गाल आणि त्यांना साजेसे छोटेसे लाल ओठ जणू डाळिंबाचे दाणेच. हसताना त्या दाण्यांनतून दिसणारे मोत्यासारखे दात असलेल्या प्राजक्ताला बघून अजिंक्य बघतच राहिला. त्याच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळू लागले.

" किती गोड दिसते आहे आज माझी प्राजक्ता. अगदी तिच्या आई सारखी आहे. ती पण अगदी अशीच होती." अजिंक्य मनातच बोलत होता. त्याच्या परीमध्ये तिची म्हणजे अजिंक्यचे प्रेम ताराची छवी बघत होता.

" ताराची आठवण येते आहे ना?" रमाताईंच्या आवाजाने अजिंक्यची तंद्री तुटली. 

" हो आई, अगदी तारा सारखीच दिसते आपली प्राजू. तिची खूप इच्छा होती प्राजूला असं नवरी बनून नटलेली बघायची. आज ती हवी होती. प्राजक्ताला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं असतं तिला." अजिंक्यचा कंठ दाटून आला.

" हो. पण बिचारीच्या नशिबी सुख फार कमीच होतं." रमाताई आपला हुंदका दाबत म्हणाल्या.

" डॅड, दु मम्मा सारखी दिसते आणि मी तुझ्या सारखा हँडसम, बरोबर ना?" बाजूलाच उभा असलेला पारस कुडत्याची कॉलर सरळ करत बोलला.

" अरे, आता तरी नीट दीदी किंवा ताई म्हण तिला. हे काय 'दु ' म्हणतोस? काय म्हणेल समीर?" अजिंक्य पारसला बोलत होता.

" त्यांना काय म्हणायचं म्हणू देत. मी नाही दीदी किंवा ताई म्हणणार. ती माझी 'दु ' च आहे. आणि तो, सॉरी जिजू आज आलेत तिच्या आयुष्यात. मी तर लहानपणा पासून आहे. त्यामुळे माझा हक्क जास्तं आहे तिच्यावर." पारस स्वतः ची बाजू मांडत म्हणाला.

" लब्बड, दिसतो तुझ्या डॅड सारखा पण बोलायला अगदी तुझ्या मम्मा वर गेला आहेस." रमाताई पारसचा कान खेचत बोलल्या. तसे तिघे हसायला लागले.

दुसरीकडे मंगलाष्टक सुरू होती. थोड्यावेळात लग्नं लागलं. 

वधू वरास आशीर्वाद द्यायला पाहुण्यांची गर्दी जमली. एकीकडे पाहुणे जेवणाचा आस्वाद घेत होते. 

कन्यादान, सप्तपदी, फेरे सगळं रीती रिवाजानुसार पार पडलं. वधू वराचे फोटो शूट पण झाले. शेवटी मानाची पंगत बसली. प्राजक्ता आणि समीरचा प्रेम विवाह होता. त्यात दोन भिन्न प्रदेशातील दोघे. प्राजक्ता मराठी तर समीर पंजाबी त्यामुळे सगळ्यांनी खूप धमाल केली. बघता बघता वीदाईचा क्षण आला. 

डोळ्यात प्रेम भरून वाहत होतं. छोटीशी परी आता तिचा संसार सुरू करायला जात होती. अजिंक्यचे हृदय पिळवटून निघत होते. 

प्राजू जाताना मावशी, आत्या, मामा, मामी सगळ्यांना भेटली. आजीला म्हणजे रमाताईंना बघताच प्राजू हुंदके देऊन रडत होती. पारस सुद्धा त्याच्या दु च्या गळ्यात पडून रडला. इतकावेळ शांत पणे सगळं बघणारा अजिंक्य एका कडेला उभा राहून नजर चोरत होता. त्याच्या परीला अश्रू दिसू नये हा त्याचा प्रयत्न. 

सगळ्यात शेवटी प्राजू अजिंक्य कडे गेली.

" डॅडा " म्हणत त्याच्या गळ्यात पडली. दोघांच्या डोळ्यात विरह वाहत होता. एकमेकांना समजावत दोघे सावरण्याचा प्रयत्न करत होते. अजिंक्यने प्राजक्ताच्या डोक्यावर हात ठेवला. तिचा चेहेरा दोन्ही हातात पकडून तिला तो न्याहाळत होता. 

" प्राजू, तुझ्या साठी माझ्या कडे काहीतरी आहे. खूप अनमोल अशी वस्तू. पण त्या आधी मला एक छानशी स्माईल दे बघू." अजिंक्य भाऊक होऊन बोलत होता.

प्राजक्ताने डोळे पुसले. एक स्माईल तिच्या चेहेऱ्यावर आनत नुसतेच हात पुढे केले. तिला अश्रुंच्या ओघात बोलणें कठीण झाले होते. अजिंक्यने तिच्या हातावर एक लाल रंगाची पेटी ठेवली. प्राजूने प्रश्नार्थक नजरेने अजिंक्य कडे बघितले. 

" हे खूप अनमोल आहे प्राजू. हा तुझ्या आईचा हार आहे. तिची शेवटची इच्छा होती की तुला तुझ्या लग्नात मी हा हार द्यावा." अजिंक्यने ती पेटी उघडत त्यातील हार काढून प्रजूच्या गळ्यात घातला. दोघे ही अजूनच भावूक झाले होते. 

" डॅडा, मला बेस्ट गिफ्ट दिलं तू. पण अजून एक करशील माझ्यासाठी?" प्राजू अजिंक्यला विचारत होती.

" बोल ना अजून काय हवंय तुला?" अजिंक्य त्याच्या परीचे हट्ट पुरवण्यासाठी तयार होता.

" मला आईची ती साडी हवी आहे जी तिने तुमच्या लग्नात घातली होती. मला माहित आहे तू ती खूप जतन करून ठेवली आहेस. पण प्लिज मला ती दे ना. माझी आई आणि वडील दोन्ही तूच आहेस डॅडा. पण आता आईची ऊब सोबत घेऊन जाऊ दे ना." प्राजक्ता 

" ठिक आहे. मी रिसेप्शनला येताना घेऊन येईल." असं म्हणत अजिंक्यने प्राजक्ताचा हा सुद्धा हट्ट मान्य केला. 

जड अंःकरणाने प्राजक्ताला निरोप देऊन सगळे घरी परतले. प्राजक्ताची कमी घरात जाणवत होती. पाहुण्यांच्या गदारोळात सुद्धा एकटे पण जाणवत होतं. रमाताई, पारस अजिंक्य एक मेकांना बघून स्वतः ला सावरत होते.

" आई किती कठीण असतं ना हे सगळं. मुलींना लहानाचं मोठं करा. प्रेमाने वढवा. त्यांना आपण तळहाताच्या फोडा प्रमाणे जपतो आणि एक दिवस कोणी अनोळखी येतो आणि आपल्या परीला घेऊन जातो. एका क्षणात परकी होते ती. आपल्या पेक्षा त्याचा हक्क जास्तं होतो तिच्यावर. तुमच्या साठी सुद्धा खूप कठीण झालं असेल ना?" अजिंक्य बोलत होता.

" ही व्यथा प्रत्येक आई वडिलांची असते. जगाची रीतच आहे ती. पण खरंच कठीण असतं हे. माझी तारा ज्यावेळेस तुझ्या प्रेमात पडली तेव्हा माझी अवस्था सुद्धा अशीच झाली होती." रमाताई असं बोलून निघून गेल्या. 

अजिंक्य मात्र ताराच्या आठवणीत व्याकूळ होत होता. तो उठला आणि ताराच्या कपाटा जवळ गेला. त्यात त्यानी ताराच्या सगळ्या आठवणी जतन करून ठेवल्या होत्या.

कपाट उघडताच ताराच्या एक एक वस्तूंवर नाराज फिरवत तो भूतकाळात गेला. 

" काय रे सारखं ती पूजा तुझ्या मागे मागे काय करत असते?" तारा जरा रागातच अजिंक्यला विचारत होती.

" काही नाही. मी हँडसम आहे, त्यात माझा स्वभाव असा मोकळा. मी खूप हसवतो तिला. त्यामुळे तिला माझ्याशी बोलायला आवडत." अजिंक्य ताराला सांगत होता.

" तुला आवडते का ती? तुमचं काही अफेअर सुरू आहे का? आणि मला सांगत नाहीस तू? माझा बेस्ट फ्रेंड ना तू." तारा अजून सुद्धा रागात होती.

" नाही गं. असं काहीच नाही. ती फक्त बोलते माझ्याशी. फक्त मैत्रीण आहे बाकी काही नाही." अजिंक्य

" हो का? मग माझ्या समोर का नाही बोलत बाजूला का बोलावते तुला?" ताराचे प्रश्न काही संपत नव्हते.

" ते मला माहित नाही. मी तर मैत्रीण म्हणून बोलतो." अजिंक्य बोलत होता. तितक्यात पूजाने त्याला आवाज दिला आणि तो तिच्याशी बोलायला निघून गेला.

ताराला मात्र तिचं असं वागणं खटकत होतं. असे बरेच दिवस गेले. अजिंक्य आणि पूजाच्या मैत्रीचा ताराला त्रास होत होता. त्यांची जवळीक तिच्या मनात वादळ उठवत होती. 

" जा आली तुझी मैत्रीण. मी जाते लेक्चरला तुम्ही करा टाईम पास." पूजा दिसली की असं म्हणत तारा रागात निघून जायची. 

तिला असं जाताना बघून अजिंक्यची फजिती व्हायची. आता पुजाशी बोलू की तारा सोबत जाऊ. कारण त्याला सुद्धा तारा दूर जाताना त्रास होत होता. कसतरी पूजाशी बोलून तो पळत तारच्या मागे जायचा. पण मॅडम बोलल्या लगेच तर नावाची ताराच काय.?

हल्ली तर रोजचं असं होत होतं. पूजा आली की तारा तिथे थांबत नव्हती. तिला अजिंक्य आणि पूजाला सोबत बघून का कुणास ठाऊक त्रास होत होता.

" काही दिवस आधी पर्यंत मी त्याला कोणती मुलगी आवडते का? म्हणून त्याच्या मागे लागायची. आणि आता कदाचित त्याला पूजा आवडते तर मला इतका त्रास का होतो आहे.? पूजा चांगली मुलगी आहे. हरकत काय आहे जर तो तिच्या प्रेमात पडला तर? मुळात त्यानी मला विचारून प्रेमात का पडावं?" तारा स्वतःला प्रश्न विचारत होती.

पुढील भगात बघू ताराच्या मनात काय असेल? आणि अजिंक्यच्या मनात कोण असेल? पूजा की अजून कोणी?

क्रमशः

©वर्षाराज

🎭 Series Post

View all