Feb 22, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग एकोणवीस

Read Later
अलवार प्रेम... भाग एकोणवीस

अलवार प्रेम... भाग एकोणवीस

विषय =प्रेमकथा 

मागील भागात आपण पाहिलं...

उमाने ऋचाला ती गेल्यावर गावात कसे दोन गट पडले ते सांगितलं, वेदच्या बाबांमुळे आबाला त्रास झाल्याचं ऐकून तिला वेदचा राग आला.

आता पुढे...


वेद मात्र रात्रभर तळमळत होता, सांगूनही ती खिडकीत आली नव्हती. आज त्याने तिचे हावभाव जवळून बघितले होते. त्याच्या जवळ येण्याने बावरलेली ती आठवून त्याला हसायला येत होतं, त्याने लिहिलेलं घाबरुन पुसताना तिला घाम फुटला होता हे आठवून त्याला तिची अजून फिरकी घ्यावी वाटत होती.
पण ती खिडकीतच आली नव्हती. ती बेचैन होती पहिल्या दिवशी, बघतही होती मग अचानक काय झाले ते त्याला कळेना. तो रात्रभर हॉस्पिटलमध्ये जाऊन बसला. आधीही तो असायचा पण हल्ली रोजची रात्र त्याला खायला उठायची.


त्याला वाटलं ती पाण्याला घाबरते म्हणून त्याने पुरात जाईल ही धमकी दिली होती तिला. खरंतर तो बाहेर होता शिकायला, गावात एका दुर्घटनेत आबासाहेबांची पत्नी गेली एवढंच त्याला माहिती होतं, कधी डिटेलमध्ये जाऊन बघावंही वाटत नव्हतं त्याला. तिच्यामुळे तो बेचैन झाला होता एवढंच त्याला कळतं होतं.

सकाळी पुन्हा घरी आला, ती दिसलीच नाही. त्याने दहापर्यंत वाट बघितली टेरेसवर बसून. घरी कमीच राहत असल्यामुळे त्याला कुणी जास्त डिस्टर्ब करत नव्हतं.


******

ऋचा सकाळी खाली गेली काकूंचा निरोप घेतला. मीराकाकू आणि अनिल गेले. मेघा आणि कांताआई कामं आवरत होते. आबा आणि सुनील कुठल्यातरी पक्षाच्या प्रचारात गेले होते बाहेरगावी. आज सकाळपासून ऊन खूप होतं, आदल्या रात्री मात्र खूप पाऊस झाला होता. सकाळी नदीला पूर नव्हता आला पण पाण्याची पातळी वाढली होती. जाताना अनिल बोलला की तो आता उद्याचं येणार.


सगळे इकडे तिकडे गेल्यावर ऋचानेही आवरलं. उमाने सांगितलं होतं की, सकाळी दहाला वेद घरी जातो, म्हणजे हिच वेळ हॉस्पिटल बघायला चांगली हा विचार करुन ऋचा कांताआईला सांगून निघाली. ती गावात रुळतेय बघून कांता आईला बरं वाटत होतं आणि उमा तिचं मन वळवू शकते, तिला गावात थांबवू शकते म्हणून त्याही तिला जाऊ देत होत्या. सोबत कुणी पाठवणे म्हणजे आपल्यावर वॉच ठेवलय असं वाटायला नको म्हणून त्या एकटीला जावू देत होत्या.
ऋचा निघाली, निघताना तिने एकदा वर जाऊन हळूच पडदा हटवून तो आहे का तिथे म्हणून बघितलं. तो शॉर्ट्सवर पुस्तकं घेवून फेऱ्या मारत होता. शरीराने तसा भारदस्त होता, शर्ट नसल्यामुळे एकदम सिक्स पॅकवाल्या कॅप्सूल स्पष्ट दिसत होत्या.
'चला म्हणजे हा घरी आहे, आता पटकन जाऊन येता येईल, काय पण निर्लज्ज आहे असंच फिरतोय बाहेर.' म्हणत ऋचा नाक मुरडून निघाली.
वेदला बरोबर भास झाला पडदा हलल्याचा पण कुणी नव्हतं, 'हे असं वाट बघत घरी बसण्यापेक्षा ते हॉस्पिटल बरं, ती नाही येणार वाटतंय, घरच्यांना दिसली असेल का ती बघतांना?' हा विचार करत त्याने शर्ट घातलं आणि खाली आला. तो गाडी काढून निघायला आणि ऋचा तिथून जायला योगायोगाने एकच गाठ पडली. तिला बघून तो थबकला. ऋचा आपल्याच तालात जात होती. वेद थोड्यावेळाने तिच्या मागोमाग गेला. तोच श्यामा त्याच्याकडे धावत येतांना दिसला.
"मालक बातमी हाय पण..." तो बोटांनी पैसे हवेत, असा इशारा करत म्हणाला.
वेदने एक नोट काढून त्याच्या खिश्यात टाकली आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून शॉक झाला. अजून एक नोट त्याच्या खिश्यात ठेवत म्हणाला,

"यातलं कुणाला काहीच कळायला नको."
तेवढ्या वेळात ऋचा दिसेनाशी झाली होती.

'आता ही कुठे गायब झाली यार. खरंच मला पुरात जायला लावते की काय आता ही? चला वेद महाराज कुठेतरी जुळायला गेलं आणि फुस्स झालं तुमचं.' म्हणत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आतून हसण्याचा आवाज येत होता त्या आवाजानेचं त्याच मन डोलायला लागलं. घाईघाईत तो शिवच्या केबिनमध्ये पोहोचला. त्याला बघून तिघेही गप्प झाले. शिव त्याला घेवून बाहेर आला, "तू आत्ताच गेला होतास ना घरी?"
"हो पण श्यामाने दिलेली बातमी ऐकून आलो परत." त्याने शिवला सांगितल्यावर शिव काळजीने म्हणाला, "आता काय करायचं?"
"नाही, यावेळी मी मध्ये पडणार एवढे स्वस्त नाहीयेत लोकांचे जीव."
"म्हणजे काय करणार तू?"शिवने घाबरुन विचारले.
"यावेळी मी चूप बसणार नाही, कुणाला काही भनक लागू देऊ नकोस मी करेल मॅनेज."
"ओके, पण जरा जपून."
शिव आत आला आणि नॉर्मल चर्चा सुरु झाली होती. ऋचा मात्र 'हा इथे का आला?' म्हणून मनात वेदला शिव्या घालत होती.
सगळं हॉस्पिटल फिरुन होईपर्यंत तिला वेद दिसला नाही. तिच्याही नकळत तिची नजर त्याला शोधत होती. उमाने सांगितलं की, "इथले लोक घरगुती उपाय करुन थकत नाहीत तोवर हॉस्पिटलमध्ये येत नाही, त्यामुळे हॉस्पिटल असं ओस पडतं." शेवटी ती त्या दोघांचा निरोप घेवून ऋचा निघाली, ते दोघेही तिला हॉस्पिटलच्या गेटजवळ सोडून आत गेले.
ती हॉस्पिटलबाहेर आली, सगळीकडे शांतता होती. ती थोडं पुढं येताचं कुणीतरी तिच्या अंगावर कागदाचा बोळा फेकला. तिने दुर्लक्ष केलं तसं दुसरा, मग तिसरा... आता तिचं हृदय धडधडू लागलं, तिने काल वेदची हिम्मत बघितली होती. तिने वाकून इकडेतिकडे बघत तो बोळा उचलला तसं वेद तिच्याबाजूने आधीचे दोन्ही कागदाचे बोळे उचलून निघून गेला.

तिने धडधडत कागद उघडला, "नाही आलीस ना खिडकीत, आता पुरात जातोय वाटलं तर ये नाहीतर..."
ते वाचून तिला दरदरुन घाम फुटला,

'हा खरंच जाणार की काय, जाऊदे गेला तर गेला दुष्मनाचा पोर तो, पण खरंच पुरात?' तिने इकडे तिकडे बघितलं, गावाबाहेर हॉस्पिटल असल्यामुळे कुणी नव्हतंच. नदीला पाणी वाढलं होतं.
वेद पुलाच्या दूर नदीच्या कडेकडेने जाताना दिसला. पाऊस अचानक सुरु झाला होता. त्या पावसातही ती हिम्मत करुन त्याच्या मागे जात होती. तो तिच्या नजरेच्या टप्प्यात येताच त्याने पाण्यात जायला सुरुवात केली. आधी तर ऋचा फक्त्त बघत होती, पण जसा तो आत जात होता, तसं तिने हातातलं सामान सोडलं आणि धावली. "वेद नको वेद... पाण्यात जावू नका वेद..." म्हणत ती धावत पाण्यात उतरली. वेद जिथे उभा होता तो नदीचा उथळ भाग होता. वेद तिथल्या खडकावर बसल्यामुळे ऋचाला वाटलं तो चेहऱ्यापर्यंत पाण्यात बुडाला आणि ती धावली. ऋचाच्या पायाला पाणी लागलं, पाय लटपटायला लागले तरी ती वेदपर्यंत पोहोचली आणि ती कोसळणार तोच वेदने तिला उचलून बाहेर आणले.
तो तिला हळुवार आवाज देत उठवत होता, "ऋचा, ऋचाsss..."
वेदला खात्री होती, तिच्याही मनात तार छेडली गेलीय आणि ती वाचवायला नक्की येणार, त्यासाठीच तर तो हे सगळं करत होता. त्याला मनातून खूप आनंद झाला होता, त्यात त्याच्या आवडत्या पावसाचा जोर वाढला होता आणि त्याची ती त्याच्या जवळ होती. तो पहिल्यांदा तिला अश्याच पावसात भेटला होता आणि आज तिचा होकारही पावसात भेटला होता.
ऋचाने घाबरुन गच्च मिटलेले डोळे उघडले, ती उठली तसा वेद बाजूला झाला. ऋचा उभी राहिली आणि वेदचा हसरा चेहरा बघून तिने ताडकन त्याच्या गालावर मारली.
"आर यू आऊट ऑफ युवर माईंड?" ती जोरात ओरडली. वेद तिच्या आवाजाने दचकला.
"हे बघ ऋचा..."
"स्टे अवे फ्रॉम मी, स्टे अवे." म्हणत तिने आपलं सामान उचललं आणि चालायला लागली.
"ऋचा एकदा ऐकून तर घे."
म्हणत वेदने तिचा हात पकडला.
तिने हाताला जबरदस्त हिसका दिला, ती रागाने लालबुंद झाली होती. डोळ्यात अंगार फुलत होते.
"एकदा सांगितलेलं कळतं नाही का? माझ्यापासून दूर रहा." म्हणत ती भर पावसात जवळपास धावतच घराच्या दिशेने पळाली. त्या धो धो पावसात दोघांचेही अश्रू वाहत होते.
क्रमश:


अरे ये काय इथे दोघांचं तर कडाडून भांडण झालंय... आता पुढे काय होणार?
कॉमेंटचा पाऊस पडला तर लगेच सांगेल.

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//