Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग वीस

Read Later
अलवार प्रेम... भाग वीस

अलवार प्रेम...भाग वीस
विषय =प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं...
ऋचा हॉस्पिटल बघायला गेली. वेद तिच्यामागे जाताना श्यामाने त्याला काहीतरी सांगितले. वेद खरंच पुरात गेला तेव्हा ऋचा वाचवायला धावली आणि त्याच्यावर चिडून तिने त्याच्या मुस्काटात मारली.

आता पुढे...

ऋचा रडतच घरी आली, पावसात चिंब भिजली होती त्यामुळे कुणाला कळणारही नव्हतं ते. ती पोहोचली का म्हणून बघायला येणाऱ्या शाम्याला कांताआईने आवाज दिला.
"काय झालं रे?"
"काही नाही ते ताईसाहेब निघाल्या आणि पाऊस सुरु झाला म्हणून उमाताईने छत्री घेवून पाठवलं होतं, पण जरा उशीर झाला मला यायला."
"बरं ठीक आहे जा तू, पोहोचलीय ती म्हणून सांग उमाला." कांताआई त्याला सांगून आत आल्या. खरंतर तिला पावसात आलेलं बघून त्यांच्या काळजात धस्स झालं होतं.
ऋचा आत आली तसं मेघा लगेच धावत आली. तिने पटकन टॉवेल घेवून तिचे केस पुसले, धावत वर जाऊन तिचे कपडे आणले, तिला बदलायला सांगून चहा बनवायला किचनमध्ये गेली. ऋचाला राहून राहून रडायला येत होतं पण तिने कंट्रोल करत कपडे बदलले. तिला नॉर्मल बघून कांताआईने आत जाऊन मेघाला विचारलं.
"नॉर्मल आहेत त्या, हळूहळू करतील सवय, मलातर वाटतं मुद्दाम आल्या त्या पावसात भिती घालवायला."
मेघाचं बोलणं ऐकून ऋचाला पॉईंट मिळाला. ती किचनमध्ये आली.
"अगं अचानक पाऊस सुरु झाला जोरात मग कुठे थांबायचं, त्यापेक्षा आले तसंच." म्हणत तिने चहाचा कप घेतला. वेलची, अद्रक आणि गवती चहाचा सुगंध घेत ऋचा चहा संपवून वर आली.
खिडकीकडे लक्ष जाताच तिला पुन्हा तिच्या भावना अनावर झाल्या,

'का केलं त्याने असं, मजा वाटली त्याला, त्याला काही झालं असतं तर? त्या पुरात एक व्यक्ती गमावलीय मी, आता त्याला...' आणि तिच्या विचारांनी तिच चमकली.
'मी त्याचा का विचार करतेय? काय झालं होतं मला अचानक, ऋचा तो आपल्या दुश्मनाचा मुलगा आहे, त्याच्या बाबांमुळे आबांना खूप त्रास झालाय.'
ऋचाने रुममध्ये स्वतःला बेडवर झोकून दिलं, ओलं झाल्यामुळे आणि विचारात रडत असल्यामुळे कधीतरी तिला झोप लागली.

रेखा नदीत उभी होती आणि वेदकडे बोट दाखवत सांगत होती.
"ऋचा हे बघ हा वेद, लहानपणी आवडायचा ना तुला, तुला कैऱ्या पाडून द्यायचा, झाडाला बांधलेल्या झोक्यावर झुलवायचा..."
ती एकदम दचकून उठली, कपाळावरचा घाम पुसला. डोक्याला ताण देत ती स्वतःचं लहानपण आठवू लागली.
तिला आठवत होतं ते सगळे सोबत खेळायचे. एकदा वेद झोका देताना ती पडली त्यानंतर तो पाडतो म्हणून ती कधी त्याच्याशी खेळत नव्हती. वेद पाचवीत गेला आणि दादासाहेबांनी त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच्या आत्याकडे पाठवलं होतं.

*************


ऋचा गेली तरी वेद तिथेच उभा होता तसाच पावसात. त्याला कळतं नव्हतं त्याच काय चुकलं, 'ती का चिडली एवढी. तिला काळजी नसती तर ती आली नसती, पाण्यात धावली नसती पण मग बाहेर आल्यावर का ओरडली ती?'
तिची बेचैनी, अधीरता हेरली होती त्याने आणि ते तिच्या तोंडून ऐकायला म्हणून त्याने हे नाटक केलं होतं पण मग असं? तिला दुखावलं म्हणून त्यालाही रडायला येत होतं. कितीतरी वेळ तसाच बसून तो घरी आला. स्वतःला शिक्षा म्हणून टेरेसवर बसून राहिला.
पुर्ण ओला झालेल्या वेदच्या डोळ्यातले अश्रू त्या पावसात वाहत होते. त्यात सुटलेला वाऱ्यामुळे थंडी भरली होती तरीही तो तिथेच आरामखुर्चीत पाय पोटाशी घेवून झोपला होता विचारातच.
तो जे ठरवायचा ते करायचाच, त्याची आजी उपचाराशिवाय गेली तेव्हाच त्याने डॉक्टर व्हायचं ठरवलं आणि आत्याकडे गेला शिक्षणाला. त्याने कधीच घरची आठवण येतेय म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही आणि आपलं ध्येय साध्य केलं.

आताही वेदला काहीच सुचतं नव्हतं, ती पावसात निघून गेल्यापासून त्याला तिची एक झलकही दिसली नव्हती, 'ती ठीक असेल की नाही, राग शांत झाला असेल की नाही, स्वतःला त्रास करवून घेत असेल का, रडत असेल का?' त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं.
काल त्याने ठरवलं होतं की, आज तिचा होकार कळला की तो दोन घरांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात लागणार होता. त्यातच सकाळी श्यामाने त्याला एक बातमी दिली होती, जी चांगली संधी होती वाद मिटवायला.


*******

ऋचाला जाग आल्यावर पुन्हा वेद आठवला. तिने खिडकीतून बघितलं डोकावून, तो आरामखुर्चीवर भर पावसात डोळे मिटून बसला होता. आता ती सावधपणे पडदा हटवायची की त्याला काहीच दिसणार नाही. त्याला पावसात बसलेलं बघून ती खोलीत परत आली थोड्यावेळाने मेघा जेवणाचं ताट घेवून आली वर. तिला शून्यात हरवलेलं बघून काळजीने म्हणाली.
"वन्स तुम्ही ठीक आहात ना, बरं वाटत नाहीये का तुम्हाला?"
"नाही गं... मला आई स्वप्नात कसलीतरी आठवण करुन देतेय, कळत नाहीय काय तर?" ऋचा रडवेली होत म्हणाली.
मेघाने तिला प्रेमाने थोपटलं, "वाटेल तेव्हा सांगा, पण आई आठवण करुन देतेय म्हणजे ती गोष्ट तुमची आहे सांगू बघतेय."
मेघाच्या बोलण्यावर ऋचा एकदम चमकली आणि मेघाच्या पोटाला विळखा घालून घट्ट बिलगली. मेघा तिला प्रेमाने थोपटत म्हणाली,

"तुम्ही खूप विचार करताय वन्स, आपण ना स्वतःला जीवनाच्या प्रवाहात झोकून द्यावं, आपल्यासाठी जे चांगल असतं तेच घडतं आपल्यासोबत, विचार करत बसल्याने त्रास होतो त्याचा, भूतकाळ आठवावा चांगल्या गोष्टींसाठी, वर्तमानात जगाव आनंदासाठी आणि भविष्यात डोकवावं पुढे काय योग्य असेल यासाठी. जरुरी नसतं आपल्याला जे योग्य वाटतं तेच आपल्यासाठी योग्य असेल."

ऋचा शांतपणे ऐकत होती,

'कसं सांगू गं तुला, आई त्याला खुणावतेय, मी बेचैन झालीय त्याच्यामुळे पण तो दुश्मनाचा पोर आहे त्याला कोण स्वीकारेल आणि त्याच्या घरी मला कोण?' मनातल्या विचाराने तिला पुन्हा भरुन आलं.
कांताआई वर आल्या, तिला असं बघून त्यांच्याही काळजात धस्स झालं, तिला पुन्हा पॅनिक अटॅक येतो की काय म्हणून, कारण पुरुषांपैकी घरी कुणी नव्हतं.
"ऋचा, बाळा का भिजलीस रे पावसात?" त्यांच्या काळजीने ऋचाने स्वतःला सावरलं आणि डोळे पुसत म्हणाली,

"किती दिवस भ्यायचं मी त्या पावसाला म्हणून भिजले आणि आईची आठवण आली असं वाटलं ती खुश झाली मला असं बघून."
ऋचाच्या बोलण्याने दोघींनाही हायसं वाटलं.
"चल जेवून घे आता." म्हणत त्यांनी तिला भरवून दिलं. ऋचाही शांतपणे जेवली.
तिला आराम करायला सांगून दोघीही खाली गेल्यावर ऋचाने हिमतीने खिडकी उघडली तो पावसातचं बसून होता तसाच.
ती आत आली, मन रमवायला म्हणून खाली गप्पा मारायला गेली. आज गोकुळाष्टमी होती आणि उद्या रात्री दहीहंडी असल्याने धामधूम सुरु होती.क्रमश:

काय बातमी दिली असेल श्यामाने?... ऋचा स्विकारेल का वेदला?

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//