Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम...भाग सत्तावीस

Read Later
अलवार प्रेम...भाग सत्तावीस

अलवार प्रेम...भाग सत्तावीस
विषय =प्रेमकथा


मागील भागात आपण बघितलं...
वेद ऋचावर रागावला होता. ऋचा त्याला मनवायचा प्रयत्न करत होती आणि शेवटी न राहवून उमा आणि शिवला त्याच्याशी बोलायला सांगते.

आता पुढे...

वातावरण अचानक बदलल्यामुळे पेशंट खूप होते. दुपारी थोडं निवांत झाल्यावर शिवने मुद्दाम विषय छेडला.
"काय वेद कुठपर्यंत आली गाडी मनवण्याची?"
"गाडी बंद पडली आहे, तुला माहीत नाही का?" वेद तिरसटपणे म्हणाला.
"अरे मग पुन्हा सुरु कर की, पटकन दुरुस्ती करुन घ्यावी गाडीची." शिव त्याचा रोख बघून म्हणाला.
"नको, मला गाडीची आवश्यकताच नाहीये आता."
ते ऐकून शिव त्याच्या जवळ बसत म्हणाला,
"अरे छोटे-मोठे वाद होत राहतात,म्हणून तेच डोक्यात घेऊन बसणार का कायम? आमची पण भांडणं होतात. ती माफी मागतेय ना आता. मस्त मजेत राहायला शिकलीय ती, घरात सगळे खुश आहेत आणि ती सुद्धा. खूप हळवी आहे रे ती. मनातलं कधीच भडभड बोलून दाखवत नाही पण मनात घुटमळत राहते. दहा वर्षे तिने आई गेल्याचे दुःख पोटात दाबून ठेवलं होतं."
वेद फक्त ऐकत होता आणि त्याला कुठेतरी वाटत होतं की, आपण खूपच ताणतोय. तो तरी कुठे राहू शकतं होता तिला बघितल्याशिवाय.
तो दुर्बिणीने रुममधून बघायचा तिला, फक्त्त समोर टेरेसवर येत नव्हता.
आज रात्री टेरेसवर जायचं ठरवून तो संध्याकाळी घरी आला. दोन पेशंट ऍडमीट होते, त्यामुळे रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये थांबावं लागणार होतं.

घरी बरीच गर्दी दिसत होती. यावेळी आमदाराचे तिकीट कुणाला मिळणार यावरची चर्चा होती. वेदला कुणीतरी आवाज दिला, त्यामुळे नाइलाजाने का होईना तो तिथे थांबला. त्यानंतर आईला बरं नव्हतं म्हणून आईजवळ आईच्या रुममध्येच थांबला बराच वेळ.
आई म्हणजे त्याचा जीव की प्राण होता. तसंही ऋचा संध्याकाळी टेरेसवर नसायची, ती रात्री सगळ्यांची जेणं झाल्यावर यायची, त्यामुळे नऊ-साडेनऊ पर्यंत अवकाश होता.

जेवण करुन तो वर आला आणि खिडकी उघडायच्या प्रतिक्षेत टेरेसवर फिरु लागला. ऋचा खिडकीत आली नाही पण देशमुखांचं गेट वाजलं. त्याने सहज लक्ष केलं गेटवर खूप गर्दी दिसत होती लोक भरभर घरात आत-बाहेर करत होते. घरातल्या सगळ्या स्त्रिया बाहेर दिसत होत्या त्यात ऋचाही होती. सगळ्यांचे चेहरे रडवेले दिसत होते.
तो लगेच खाली उतरला, नक्की काहीतरी गडबड असावी म्हणून गेटपर्यंत आला.
गेटवरच्या राजूला त्याने

"काय झालं, कसली गर्दी?" म्हणून विचारलं

"अहो दादा ते आबासाहेबांच्या धाकल्या पुतण्याने विष घेतलं म्हणे."
"काय?" म्हणत वेदने लगेच गाडी काढली आणि हॉस्पिटलकडे जायला निघाला.
देशमुखांच्या गाडया आताच हॉस्पिटलला गेल्या होत्या, गेटमध्ये सगळ्या स्त्रिया उभ्या होत्या. वेदने त्यांच्या गेटसमोरुन गाडी घेतली आणि,
"काळजी करू नका, सगळं ठीक होईल." म्हणून निघून गेला.
ऋचाला माहिती होतं की, तो तिच्यासाठी आलाय तिथे. कांता आईला आशा वाटली, आपल्या बहिणीचा लेक वाचवेल आपल्या लेकाला म्हणून.
एकतर त्यादिवशी सकाळपासून पूर आला होता. भयानक पाणी होतं.
नेहमीप्रमाणे रस्ता बंद झाला होता.

वेद तडक हॉस्पिटलमध्ये गेला. समोर आबासाहेबांच्या गटाचे लोक बसले होते त्यात सुरेश, अनिल आणि आबासाहेबही होते.
वेद आत जाणार तोच अनिल म्हणाला, "शिव करतोय उपचार."
वेदला माहिती होतं की, शिव अश्या सिच्युएशनला घाबरुन जातो. त्यात अनिल-सुनील त्याच्यासोबत शिकलेले आणि आबासाहेबांच्या उपकाराच्या ओझ्याखाली तो दबला होता. चुकून काही झालं तर या टेन्शनमध्ये तो उपचार करु शकणार नाही याची वेदला खात्री होती.
गावात मोजकी सोय होती आणि सुनीलला लवकरात लवकर वाचवणे जरुरी होतं. शरीरात विष पसरण्याआधी ते बाहेर काढलं तरच तो वाचणार होता. गावातून शहराकडे जाणारा रस्ता बंद असल्यामुळे त्याला शहरात नेवून वाचवता येणारच नव्हतं. उशीर करण्यात अर्थ नव्हता. अनिल आयसीयूच्या दाराला आडवा उभा होता.
"कुणाच्या जिवापेक्षा काही महत्वाचं नाहीये, मी एक डॉक्टर आहे आणि जीव वाचवणे माझं काम आहे. तुमचं राजकारण कुणाच्या जीवापेक्षा मोठं नाहीये." वेद जोरातच ओरडला.
बाकीचे सगळे विरोध करायला उठून उभे राहणार तोच सुरेश उठले,
"जा तू पोरा."
वेदने त्यांच्या खांद्यावर हात ठेवत दिलासा दिला आणि तडक आत गेला.
आयसीयूची एकच रुम होती तिथे त्यातही मोजक्या सुविधा, आतमध्ये उमा आणि शिव दोघेही टेन्शनमध्ये होते.
सुनील तडफडत होता.
वेदने काय झालं विचारत भरभर त्याला चेक केलं आणि सरळ सुनीलच्या तोंडात हात घातला. विष पसरायच्या आत त्याला उलट्या होऊन विष बाहेर काढणे जरुरी होतं आणि एवढा एकच उपाय होता त्याच्याकडे.
थोड्या वेळातच सुनील त्यात तोंडून फवारा बाहेर निघाला त्या तशाच अवस्थेत त्याच्यावर उपचार करुन वेद फ्रेश व्हायला गेला.
धोका टळला होता आणि त्याच्या जीवात जीव आला होता.
अशी रिस्क सहसा डॉक्टर घेत नव्हते, पण त्याला त्यावेळी तेच सुचलं होतं.
बाहेरच्या काचेतून आबासाहेब आणि सुरेश सगळं बघत होते.
श्यामा आणि दुसरी एका बाईने मिळून सुनीलला स्वच्छ केलं आणि दुसऱ्या बेडवर ठेवलं.
शिव आणि उमाने बाकी उपचार केले.
वेद चेंज करून आल्यावर आयसीयूचं दार उघडून बाहेर आला.
सगळे त्याच्या तोंडाकडे बघत होते.
त्याने सुरेशच्या खांद्यावर हात ठेवून थोपटलं,
"काळजी करु नका धोक्याबाहेर आहे तो." सुरेश त्याला मिठी मारुन रडायला लागले. त्याने त्यांना शांत केलं,
"काही होणार नाही त्याला, माझा शब्द आहे."
"तुला नाही माहिती तू किती उपकार केलेस माझ्यावर ते." सुरेश म्हणाले तसं वेद त्यांच्या पायाला हात लावत म्हणाला, "मोठ्यांनी लहानांचे उपकार मानू नये."
आबा आणि अनिल ते दृश्य बघत होते.
सुरेश बाजूला झाल्यावर त्याने बाजूलाच उभ्या असलेल्या अनिलच्या खांद्यावर हात ठेवला,
"विष पिणारा मुलगा कोणत्याही गटाचा नसतो, कुणा एकाचा नसतो तर तो एका गावचा मुलगा असतो."
त्याची प्रतिक्रियाही न बघता त्याने आत जाऊन शिवला इन्स्ट्रक्शन दिल्या आणि घरी निघाला.


क्रमश:

काय होईल तो घरी आल्यावर?

 

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//