Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग एकवीस

Read Later
अलवार प्रेम... भाग एकवीस

अलवार प्रेम... भाग एकवीस
विषय=प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं...

ऋचा रागातच घरी येते. स्वप्नात तिची आई तिला वेदची आठवण करुन देते. वेद ऋचाच्या काळजीने अस्वस्थ होऊन टेरेसवर पावसात भिजत बसला होता.

आता पुढे...

सगळीकडे असली तरी ऋचा कुठेतरी हरवलेली होती. आज कितीदातरी तिने चुपचाप पडदा हटवून बघितलं होतं आणि प्रत्येक वेळी तिला वेद तसाच बसलेला दिसला होता. दिवसभर पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता.
'का असा करतोय हा, का मला त्रास देतोय? पाण्यातलं एक झालं आता हा पावसात बसून राहणार म्हणजे मी काय करावं असं वाटतंय याला? याला काही अक्कल आहे की नाही.'
मनात धुसफुसत ऋचा कसेबसे घरच्यांमध्ये ऍडजस्ट करत होती. रात्री पुन्हा जेवणं झाल्यावर तिने बघितलं, तेव्हा ही वेद तिथेच होता.
'हे अती होतंय याचं, याचा सोक्षमोक्ष लावायला हवा, घरी काही सांगता येणार नाही, मला उद्या उमाकडे जावंच लागेल.'

रात्री बाराला गोकुळाष्टमीची पुजा झाली, त्यानंतर ती झोपायला आली तेव्हा पाऊस थांबला होता. तिने पुन्हा एकदा डोकावून बघितलं, तो नेहमीप्रमाणे पुस्तक हातात घेऊन टेरेसवर फेर्‍या मारत होता. आजचा अख्खा दिवस त्याने टेरेसवर फेर्‍या मारण्यात किंवा आरामखुर्चीवर बसून पावसात भिजण्यात घालवला होता.

ऋचाला रात्रभर झोप आली नाही, तीनदा तिला ते स्वप्न आणि पावसात फिरणारा वेद, पुरात बसलेला वेद आठवत होते. तिने पहाटे उठून सगळं आवरलं आणि एका डब्यात करंज्या भरुन उमाकडे जात असल्याचं सांगितलं. कांताआईला थोडं वेगळं वाटलं पण कदाचित काल थोडी अस्वस्थ झाली म्हणून जात असेल असा विचार करुन त्यांनी काहीही म्हटलं नाही. ऋचाने "मनूला करंज्या खूप आवडतात आणि त्याने मला नक्की आणशील म्हणून सांगितलं होतं तर घेऊन जाते." असं कारण दिलं होतं.

"दहानंतर उमा हॉस्पिटलला जाते, म्हणून त्याआधीच जायचं आहे." असं सांगून ती सकाळी नऊला घरुन निघाली.
रात्रभर तळमळत असलेला वेद सकाळी पण तिची वाट बघत होता. सकाळीही तिने न बघितल्यामुळे तो अस्वस्थ होऊन फेर्‍या मारत होता. अशावेळी त्याचा मित्र म्हणजे त्याची पुस्तके, कसेही वाचनात मन रमवत तो ऋचाची आतुरतेने वाट पाहत होता. रात्रभर त्याला झोप लागली नव्हती त्याचा आवडता पाऊसही त्याला नकोसा वाटत होता. आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी हातातून सुटतंय असं वाटत होतं. एवढा बेचैन तो कधीच झाला नव्हता.
देशमुखांचा गेट जोरदार वाजायचं, ते गेट वाजलं तसं वेदने लक्ष पुरवलं. ऋचा काहीतरी घेऊन जाताना दिसली. त्याने लगेच गाडी काढली आणि मागेच निघाला. ती उमाकडे जात असणार हे त्याला नक्की माहिती होतं.

ती खरंच उमा कडे गेली होती, तिचा अवतार बघून ती रात्रभर रडली असावी हे कळत होतं, डोळे सुजलेले दिसत होते, चेहरा पूर्ण उतरलेला दिसत होता आणि ते बघून वेदचा जीव तीळतीळ तुटत होता. शिव घरी नाहीये बघून तिला हायसं वाटलं. ती सरळ आत गेली, उमा स्वयंपाकाच्या गडबडीत होती. ऋचाला बघून तिला आश्चर्य वाटलं. "काय गं सकाळीच आणि अवतार का असा दिसतोय?"
तिथलाच एक पाट घेऊन त्यावर बसून ऋचा जरा ठसक्यात म्हणाली, "उमा, तू तुझ्या दिराला सांगून दे." उमा चमकली, तिच्याच मागे आलेला वेद आणि वेदला बघून शेजारीच मनूला आणायला गेलेला शिवही आला. तिचं वाक्य ऐकून शिव आश्चर्यात पडला. वेद हॉलमध्ये मुद्दाम आतलं ऐकू येईल असं भिंतीच्या कडेने खुर्ची टाकून बसला होता. त्याला तसं बसलेलं बघून शिवने "काय" म्हणून इशारा केला. वेद त्याला "थांब आणि ऐक" असा इशारा करुन चूप बसवले.
"कायsss काय म्हणालीस, कुठला दीर?"उमा आश्चर्याने म्हणाली.
"तो तुझा लाडका दिर. " म्हणत ऋचाने नाक मुरडले.

"अच्छा! वेद होय, त्याने काय केलं?"उमा नकळून म्हणाली.
"काय केलं म्हणजे, वेड्यासारखा कालपासून पावसात बसलेला आहे, काल त्या पुरात जाऊन बसला होता." ऋचा रडत म्हणाली.
उमाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला, सोबत हसायला येत होतं, तरीही सावरत,
"जाऊ दे ना, करु दे काहीही, दुश्मनाच्या पोराकडे आपण कशाला लक्ष द्यायचं." उमा समजावत म्हणाली.

"लक्षच द्यायचं नाहीय मला, पण काय करणार तो सारखा तिथे बसून असतो. काल तो पुरात गेला होता. तुला माहितीये ना त्या पुराला मी किती घाबरते तरी त्या मूर्खासाठी पुरात गेले मी, सांग ना त्याला समजावून." ऋचा रडवेली होत म्हणाली.

उमाला आश्चर्य वाटलं, "काय तू पुरात गेली तरी तुला काही झालं नाही?"
या वाक्यासोबत ऋचा चमकली. वैताग वैताग करण्याच्या नादात तिच्या लक्षातच आलं नव्हतं की काल ती पुरात जाऊन आली तरी ती नॉर्मल होती तिला पॅनिक अटॅक आलेला नव्हता.
"तू समजावून सांग ना ग त्याला, नको ना असा त्रास करुन घेऊ म्हणा, काल दिवसरात्र पावसात भिजलाय तो." म्हणत ऋचा रडायला लागली.
वेद सरळ उठला आणि आत गेला. ऋचा दोन्ही गुडघ्यात मान घालून रडत होती. वेदने उमाला इशारा केला तसं उमा बाहेर निघून गेली आणि वेदने तिचा हात पकडला.
"का त्रास करुन घेतेस स्वतःला, मी जेवढा बेचैन आहे तेवढीच तू ही बेचैन आहेस मग मान्य कर ना."
पहिले तर त्याच्या आवाजाने आणि स्पर्शाने ऋचा दचकली पण तरी हिम्मत करुन म्हणाली,
"काय मान्य करु? आपल्या दोन घरांच्या मध्ये किती अंतर आहे. ज्याचं भविष्यच नाही ते कसं मान्य करु?" बोलताना ऋचा पुन्हा रडायला लागली.
वेदने तिचा हात आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये घेतला, दोन्ही हातांनी तो हात दाबत दिलासा देत म्हणाला,
" माझ्यावर विश्वास ठेव दोन्ही घरे एक होतील, आपण करु. तू फक्त माझी साथ दे. "


क्रमश:

 

कसं वाटलं वेदचं प्रपोझल... आवडतंय ना?स्वीकारेल का ऋचा त्याला 

 

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//