Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम...भाग चोवीस

Read Later
अलवार प्रेम...भाग चोवीस

 अलवार प्रेम...भाग 24

विषय =प्रेमकथा

मागील भागात आपण पाहिलं...वेद आणि दादासाहेबांचा बराच वाद झाला होता, त्यानंतर त्याने त्याच्या आईला ऋचाबाबत सांगितलं. वेदला ऋचाच्या आईबाबत ऐकून खूप वाईट वाटलं....आता पुढे...

एकेक दिवस सरकत होता.

चार-सहा दिवस असेच गेले. हॉर्न वाजला की ऋचा नक्की खिडकीत येऊन बघायची. तिचे सगळे लक्ष हॉर्नच्या आवाजाकडे एकवटलेले असायचे. वेदही येता जाता आवर्जून हॉर्न मारायचा. दोघांनाही कळत होतं हे रिस्की होतं आणि लवकरच कुणाच्या लक्षात येऊ शकत होतं.मनाला आवर घालायचा प्रयत्न करत कसंही दिवसातून दोन तीनदा तरी नजरभेट व्हायचीच त्यांची. आठ दिवसासाठी आलेली ऋचा मस्त आनंदात राहत होती, त्यामुळे घरातले सगळेच आनंदात होते. ऋचा तिथेच राहावी ही सगळ्यांची इच्छा होती. माधव काका लवकरच सेवानिवृत्त होणार होते, मग तेही गावातच येणार होते. सगळ्यांना प्रश्न होता ऋचाचा पण आता ती स्वतःहून इथे राहत होती.श्रावणाचा शेवटचा मंगळवार होता. गावातल्या एका घरुन मंगळागौरी उद्यापनाचं बोलावणं आलं.

कांता आईला बरं नव्हतं. तिथे मजा येते खूप म्हणून मेघाने ऋचाला सोबत नेलं. गावातल्या सगळ्यांना बया होत्या त्यात अशोकची बायको सविता आणि तिची मामेबहीण तनुजाही आली होती.

मंगळागौरीचे खेळ सुरु होते. ऋचासाठी हे नवीन होतं. तिथल्या एका खुर्चीवर बसून ती खेळ बघत होती.

अचानक तिच्या कानावर कुजबूज आली आणि त्यात वेदचं नावं आलं, तसं तिने कान टवकारले.

"किती दिवस वाट बघायची ग मी लग्नासाठी तुझ्या दिराची? घाई कर ना म्हणा त्याला."

एक मुलगी तिच्या बाजूच्या बाईला म्हणत होती.(तनुजा सविताला)

त्या दोघींनाही ऋचा माहिती नव्हती आणि ऋचा त्यांना ओळखत नव्हती. फक्त्त वेदचं नाव ऐकलं, म्हणून कान दिले होते तिने.

"हे बघ माझा दिर काही रस्त्यावर पडलेला नाहीये. एक मोठा डॉक्टर आहे आणि त्याचं लग्न तुझ्याशीच होणार हे ही नक्की आहे."(सविता)

"अग पण कधी?" (तनुजा )

"हे बघ सगळं ठरवलंय मी, यांच्याशी बोलले आहे, तो फक्त्त एवढ्यात लग्नाला तयार नाहीये आणि तुला उगाच नाही बीएएमएस डॉक्टर बनवलं पेमेंटशीट वर. तू शांततेत घे मी करते सगळं, मग दवाखाना आणि डॉक्टर दोघेही तुझेच."(सविता ) म्हणताच दोघीही खळाळून हसल्या.

"मी आले ना मध्ये त्याला भेटून, काहीच बोलला नाही तो असं."(तनुजा )

" पण त्याने त्याच दिवशी सासूबाईंना सांगितलं की लवकरच त्यांच्यासाठी सून आणणार तो, मी ऐकलं की. " (सविता )"वाव किती छान, लवकरच माझा वेद माझ्या नजरेसमोर असणार...लग्न झाल्यावर आम्ही दोघं मिळून दवाखाना चालवणार?"(तनुजा )

का कोण जाणे, ते ऐकून ऋचाच्या डोळ्यात नकळत पाणी तरळले.

त्यानंतर तिचं तिथे कशातच लक्ष लागेना. तिथून घरी आल्यावर थकले म्हणून ती सरळ वर गेली.

'हा मला फसवतोय का, त्याने तिला का हो म्हटलं असतं मग? कुठली मुलगी डायरेक्ट अशी कोणाला माझा वेद कसं काय म्हणणार? ऋचाला तनुजाचं बोलणं आठवून आठवून रडायला येत होतं.

तिने हिम्मत करुन पडदा सरकवला. ती माझा वेद म्हणणारी मुलगी (तनुजा) टेरेसवरच्या झाडांचं निरीक्षण करत होती आणि वेद हसून हसून बोलत होता. ते बघून ऋचाला अजूनच रडू कोसळलं.'म्हणजे ही मुलगी याच्या रुममध्येही जाते.'

रात्री नेहमीप्रमाणे वेद वाट बघत होता, पण ऋचा काही दिसत नव्हती.'हिला काय झालय आज आजारी असेल का, कुणी असेल वरती म्हणून येत नसेल?' वेदने स्वतःला समजावलं.

एकतर आज तनुजाने त्याचं डोकं खाल्लं होतं खूप,'हे झाड कसलं आणि ते झाड कसलं, त्याला कुठली फुलं येतात, याला कुठली' असं काही.

दुसऱ्या दिवशीही ती त्याला दिसलीच नाही आता मात्र त्याची धडधड वाढली,'कुणाच्या लक्षात आलं असेल का? काय झालं असेल माझ्या नेहमी हॉर्न वाजवल्याने तिच्या घरी कळलं असेल का, आमची नजरेची भाषा कुणाच्या लक्षात आली असेल का, कोणी आग लावली असेल का?' काय झालंय काहीच कळायला मार्ग नव्हता.ऋचा दोन दिवस अशीच तळमळत होती. बरं नाहीये, बरं नाहीये करत ती जास्तीत जास्त रुममध्येच राहायची. रडून सुजलेले तिचे डोळे बघून कोणी विचारला तर सांगायची की खूप झोपल्यामुळे होत आहे.

कुणीही तिच्या रुममध्ये बघायला आलं की, ती डोक्यावरुन पांघरुण घेऊन झोपेली असायची. डॉक्टरकडे जायला नाहीच म्हणायची.

तिचा एकच घोषा होता,"मला खूप झोप येतेय."

कौशी म्हणाली,"नक्षत्रावानी पोर, पहिल्यांदा गावातल्या लोकांनी बघितली म्हणून नजर लावलीय तिला."

तिने मीठ मोहरी घेवून,

"आल्या-गेल्याची, वाटसरूची, पशू-पक्ष्यांची, गुरा-ढोरांची, भुता- खेतांची, मांत्रिकांची,दृष्ट दृष्ट पापीचंडाची, झाडामाडाची, किडामुंगीची, आल्यागेल्याची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, काळ्या लोकांची, गोर्‍या लोकांची आणि या विश्वातील कोणत्याही प्रकारच्या शक्तींची दृष्ट लागली असेल, तर ती चुलीत पडू दे." म्हणत तिच्या अंगावर ओवाळून चुलीत टाकली.शेवटी हताश होऊन आबांनी शिवला घरी बोलावले.

ऋचा आजारी आहे, हे ऐकून वेद अजूनच अस्वस्थ झाला. दोघेही सोबत आले. शिवला सोडून वेद टेरेसवर जाऊन बसला.

'काय झालं असेल तिला? मी डॉक्टर असूनही काही करु शकत नाही यार.'

त्याची जाम चिडचिड होत होती. शिवच्या वाटेकडे डोळे लावून अस्वस्थपणे तो टेरेसवर फेऱ्या मारत होता.शिव ऋचाच्या घरी आला. वर जाऊन त्याने ऋचाला तपासलं.

ती काहीच बोलत नव्हती. काहीतरी बिनसलंय याचा अंदाज लावून शिवने मेघाला थंड पाणी आणि पट्टी आणायला म्हणून खाली पाठवलं. ती जाताच त्याने रुचला,"नक्की काय झालंय?"म्हणून थोडं दरडावत विचारलं.

"मला कशाला विचारताय? विचारा की तुमच्या मित्राला." ऋचा तोंड वेडवत म्हणाली.

"काय केलं वेदने, काही बोलला का तो तुला? पण मला तर काहीच सांगितलं नाही." शिव विचारात पडला.

क्रमश:

बघू काय सांगते ऋचा  ©®पल्लवी चरपेटीम= अहमदनगर.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//