Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग पंचवीस

Read Later
अलवार प्रेम... भाग पंचवीस

अलवार प्रेम...भाग पंचवीस

विषय =प्रेमकथा 


मागील भागात आपण पाहिलं...
तनुजाच बोलणं ऐकून ऋचाला वाटतं की वेद तिला फसवतोय आणि त्याचा ती स्वतःला त्रास करवून घेतेय. आता शिव तिला भेटायला गेलाय...

आता पुढे...


"हे तुम्ही विचारताय? फसवलं मला त्याने, स्वतःचं लग्न ठरलेलं असतानासुद्धा मला खोटी स्वप्न दाखवली. खरंच दुश्मनाचा पोर दुष्मनचं निघाला."
तेवढ्यात मेघा येण्याची चाहूल लागली आणि दोघेही चूप बसले. शिवला काही बोलता आलं नाही.
त्याने काही विटॅमीनच्या गोळ्या देऊन घरच्यांचं समाधान केलं आणि तिथून तडक वेदच्या घरी गेला. वेद त्याची वाटंच बघत बसला होता.
शिव त्याच्या रुममध्ये पोहोचताच वेदने प्रश्नांचा भडीमार केला.
शिवने सांगितलं ते ऐकून वेद आश्चर्यात पडला.
"शिव तुला माहितीये ना, मी कोणालाच लग्नाविषयी बोललो नाहीये. ही पोरगी कुठून काय ऐकून आलीय. कुणी सांगितलं हिला असं आणि ही स्वतःला त्रास का करुन घेतेय?"
"त्रास तर करुन घेतेय ती पण घरी काही बोलता आलं नाही मला, नक्की काय झालं आणि कधीपासून झालं कळत नाहीये." शिव विचार करत म्हणाला.
वेदने डोक्याला ताण दिला. त्याला आठवलं त्यादिवशी तनुजा आली होती, ती त्याच्या रुममध्ये पण आली होती. त्याने तिला अपमानित करुन घालवून दिलं होतं. त्यादिवशी ऋचा तर मंगळागौरीच्या प्रोग्रामला गेली होती...आणि अचानक त्याचा लाईट लागला. त्या प्रोग्राममध्ये सविता वहिनीसोबत तनुजा पण गेली होती.
त्याने शिवला सांगितलं,

"शिव नक्की तिथेच काहीतरी झालंय, तुला माहिती आहे ना, ती तनुजा किती उथळ आणि आगाऊ आहे ते, तिथेच काहीतरी झालंय?" शिवलाही ते पटत होतं.
"पण आता आपण करायचं काय?"
"शिव काहीही कर मला एकदा तिला भेटायचंय." वेद काकूळतीला येऊन म्हणाला.
"बघतो मी उमाशी बोलून, तू काळजी करु नकोस." बोलून शिव घरी गेला.

उमाला कळल्यावर तीही विचारात पडली. कारण आजारी असताना घरचे ऋचाला घराबाहेर येऊ देईल असं तिला तरी वाटत नव्हतं.
तरीही हिम्मत करुन ती ऋचाकडे गेली होती.
खाली सगळ्यांशी बोलून, "तिला बाहेर नेवून बघते बरं वाटेल तर..." म्हणून परवानगी घेतली आणि वर आली.
"काय सारखं बरं नाहीये, बरं नाहीये करुन झोपतेय सारखी, चल छान गावात फिरवून आणते तुला." असं बोलून उमा तिला बळजबरीने खाली घेऊन आली.
"मला कुठे जावंच वाटत नाहीय, कुठेच यावं वाटत नाहीय." ऋचा तिचा हात सोडवत म्हणाली.
तेवढ्यात आबासाहेब आलेले बघून उमा आबासाहेबांकडे गेली आणि म्हणाली,
"आबा तिला मळ्यातून फिरवून आणते. जरा बाहेरच्या वातावरणात फिरेल तर बरं वाटेल तिला आणि काळजी करु नका मी आणि शिव आहोत सोबत, थोडं मनूसोबत खेळेल तर मन रमेल तिचं."
ऋचा दोन दिवसापासून सारखी वर झोपून असल्यामुळे काळजीत पडलेल्या आबासाहेबांना उमाचं बोलणं लगेच पटलं आणि त्यांनी परवानगी दिली.
"जा ऋचा, जरा बरं वाटेल पोरी." आबांचा शब्द ती टाळू शकत नव्हती.
दोघीही गेटबाहेर येताच ऋचा तिच्यावर ओरडली.
"कशाला घेऊन आली आहेस मला बाहेर, तुझ्या दिराची बाजू सांगायला."
"हे बघ ऋचा, तुझा गैरसमज होतोय." उमा समजावत म्हणाली.
"काही गैरसमज होत नाहीये. मी माझ्या कानांनी ऐकलं आहे आणि डोळ्यांनी बघितलंही. "ऋचा चिडून म्हणाली.
"हो का, तो बोलला तुला असं? तुझं डोळ्यांनी बघितलेलं बघितलंस की दहा वर्षांनी किती खरं होतं ते, असेलच असं ना तर चल माझ्या घरी आणि सोक्षमोक्ष लाव एकदाचा, त्याचा जीव तरी का जाळतेस?"
ऋचाचा नाईलाज झाला आणि ती गुपचूप उमासोबत तिच्या घरी आली.
वेद कितीतरी आधीपासून तिथे येऊन बसला होता.
ती येताच त्याने तिचा हात पकडून आतल्या रुममध्ये नेलं आणि तिला बेडवर बसवत विचारलं,
"मी म्हटलं तुला, मी कुणाशी लग्न करतोय?"
तिने नाही मध्ये मान हलवली. त्याला बघूनच तिचं मन भरुन आलं होतं. उमाचं बोलणं ऐकून आधीच ती विचारात पडली होती.
"माझं प्रेम तुला एवढं कमी वाटलं, एवढं खोटं वाटलं की कुणी काही सांगितलं आणि तू विश्वास ठेऊन स्वतःला त्रास करून घेतलास?"
वेद जरा रागातच ओरडला.
"आता कुणी मुलगी उगाच असं कसं बोलेल, हक्क असल्यासारखं." ऋचा नाक उडवत म्हणाली.
"तू ओळखतेस का तिला, ती मुलगी कशी आहे ते माहिती आहे का तुला?"
ऋचाने नाही मध्ये मान हलवली.
" तुला एकदा माझ्याशी बोलावसं नाही वाटलं, एकदा मला विचारावं नाही वाटलं, एवढं तकलादू होतं का सगळं? घरच्यांनी आजपर्यंत कितीतरी मुलींविषयी विचारणा केली तरी मी लक्ष दिलं नाही आणि तुला बघताक्षणी तुझ्या मागे वेडा झालोय. एक नजर, दिवसातून फक्त्त एक नजर बघायला मिळाली तू, तरी माझा दिवस चांगला जातो गं, राजकारणात रस नसूनही दोन घरांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तू, तू कुणाचे दोन शब्द ऐकून असं..."
वेद निराश सुरात बोलून तिच्याकडे पाठ करुन उभा राहिला. त्याचा आवाज खरंच जड झाला होता.
ऋचाला आपली चूक समजली, आतापर्यंत तिचा तोच प्रॉब्लेम होता ती स्वतःच स्वतःची समजूत करुन घ्यायची आणि स्वतःला त्रास करुन घ्यायची. आबांच्या बाबतीतही तिने हेच केलं होतं.

"माझं चुकलं वेद, मी विश्वास ठेवायला नको होता त्यांच्यावर..." ऋचा सावरुन म्हणाली.
"नाही ठेव, तू सगळ्या गावावर विश्वास ठेव, पण माझ्यावर नको ठेवूस आणि मी वेडा बसलोय टेरेसवर तू येशील म्हणून, मी मूर्ख तू आजारी असल्याचं कळल्यावर अस्वस्थ होऊन तिथे कालपासून फेऱ्या मारणारा."
"असं नका बोलू ना वेद, चुकलं ना माझं..." ऋचा रडवेली होऊन म्हणाली.
"खूप वाईट वाटलं, जिव्हारी लागलं, तुला कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने काहीतरी सांगितलं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून तू स्वतःला त्रास करुन घेत आहेस. जाऊदे समज तुला काय समजायचं ते." म्हणत वेद निघाला. शिव काही बोलणार तोच तो हात दाखवत म्हणाला,
"कुणीही मला समजावणार नाहीये, राहूदे तिला तिच्या कोषातच राहायचंय तर?" त्याने बाहेर जाऊन गाडीला किक मारली आणि निघून गेला. त्याच्या मागेच आलेली ऋचा बेडरुमच्या दारातच मटकन खाली बसली.
क्रमश:

 

कसं होणार या दोघांचं?

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//