Feb 27, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम...भाग अठ्ठावीस

Read Later
अलवार प्रेम...भाग अठ्ठावीस

 

अलवार प्रेम.... भाग अठ्ठावीस

विषय =प्रेमकथा


मागील भागात आपण बघितलं...
शिव वेदला समजावतो आणि वेद रात्री टेरेसवर जायचं ठरवतो. रात्री ऋचा खिडकीत येत नाही पण घरात काहीतरी गडबड दिसते. सुनिलने विष घेतल्याचे कळताच वेद त्याच्यावर उपचार करायला जातो.

आता पुढे....

त्याला माहीत होतं ऋचा अस्वस्थ असेल आणि तिला सगळं ठीक आहे सांगणे जरुरी होते. आधीच तो तिच्यावर रागावला होता, त्यामुळे तिची मनस्थिती ठीक नव्हती.

नेहमीप्रमाणे गेटजवळ येताच त्याने हॉर्न दिला.
वेदच्या घरचे सगळेच बाहेर निघाले.
"दुश्मनाच्या पोराला वाचवून काय मिळालं तुला?" दादासाहेब गरजले.

"दुश्मनाचा पोर मारुन तरी काय मिळालं असतं तुम्हाला? आमदार ना तुम्ही. या गावातला प्रत्येक पोरगा तुमचा, कुणाच्याही जीवाला वाचवणं हा माझा पेशा आहे आणि ते मी करणार, तुमचं राजकारण गेलं खड्ड्यात."
"वेद बापाशी बोलतोयस तू, आईच्या तब्येतीची नाही निदान बापाच्या इज्जतीचं तरी भान ठेव." दादासाहेब गरजले.
गोकुळाष्टमीला झालेल्या वादानंतर अशोक आपल्या पत्नीसोबत शहरातल्या घरात राहायला गेला होता. रवीश आधीच तिथे राहत नव्हता या सगळ्या मानसिक त्रासामुळे रश्मीचा बीपी वाढला होता.

"काय काय गमावणार आहात दादासाहेब तुम्ही खुर्चीसाठी, आईचं दुःख कळलं असतं तर असे वागलाच नसतात तुम्ही कधी. दुश्मनाचा पोर कधी जिवलग मित्राचा पोर होता. अंगाखाद्यावर खेळवलंत त्याला ते विसरलात का? ज्याचा हात पकडून मोठे झालोय त्यालाच खड्ड्यात पुरणे माझ्याने तरी शक्य नाहीये त्यामुळे मी इथूनच परत जातोय." म्हणत त्याने गाडी पलटवली. तो पलटला तसं रश्मीताई धावत आल्या गेटबाहेर.
"थांब वेद तू एकटा कुठेही जाणार नाहीयेस. सत्तेपायी लोकांच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या लोकांसोबत मलाही राहायचं नाहीये मी येते तुझ्यासोबत." रश्मी दादासाहेबांकडे बघत म्हणाल्या.
रश्मीच बोलणं ऐकून दादासाहेब हादरले. त्यांचं खूप प्रेम होतं रश्मीवर, रश्मीमुळेच त्यांना आबांची साथ मिळाली आणि राजकारण शिकून ते इथवर पोहोचले होते.

आधी ते कोरडवाहू शेती करायचे. एक एकरचा कर्जबाजारी तुकडा सोडून त्यांच्या आईबाबांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर सुरेशच्या सोबतीने ते शेती करत आबासाहेबांना मदत करायला लागले. त्यांची मेहनत आणि स्वभाव बघून कांताने आपली बहिण रश्मी त्यांना दिली आणि त्यांची प्रगती व्हायला लागली. रेखासोबत फिरत त्या राजकारण शिकल्या पुढे त्याचाच फायदा होऊन दादा आमदार बनले.

" रश्मी तुम्ही?"
"हो, मीच...तुमच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या वाईटात तुमची साथ दिली पण तुम्ही कुणाला मारायचं पाप करत असाल तर मी हे करु देणार नाही." त्या हात जोडत, रडत म्हणाल्या.
दादांनी त्यांचे हात पकडले, "आत चला रश्मी, वेद घरात ये, तुझा बाप बोलावतोय. "
ते ऐकून वेद आत आला.
"तुम्ही ठरवलंच आहे तर...मी चुकलो पण त्या चुकीसोबत आबाशी नजर मिळवायची हिम्मतही हरलो आणि पळत राहिलो सत्तेमागे. खरंय वेद तुझं, त्यादिवशी अनिलच्या जागी मागच्या वर्षी अशोक होता. आज सुनिलच्या जागी एकेकाळी रवीश होता. हे विसरुनच गेलो मी सत्तेच्या माजात."
श्यामा वेदला बोलवायला आला तसा वेद पुन्हा निघाला.
सुनिल शुद्धीवर आला होता, म्हणून शिवने वेदला बोलावले होते. वेद सरळ आत गेला आणि सगळ्यांना बाहेर पाठवून सुनिलचा हात हातात घेत म्हणाला.
"हरलं म्हणून आयुष्य असं संपवायचं नसतं रे, आपल्या आयुष्यासोबत आपले मायबाप, आपले बहिण भाऊही मरतात याचं भान ठेवायचं असतं."
ते ऐकून सुनिल रडायला लागला, "माझं चुकलं पण मी आता सगळ्यांना... "
"क्षमा माग, कुणी काही बोलणार नाही, तुझ्या जिवापेक्षा मोठं नाहीय काही घरच्यांसाठी." त्याला बोलूही न देता वेद बोलला.
"बी स्ट्रॉंग सुनिल." म्हणत वेद बाहेर आला.
सगळे आत गेले. सुनिलला सुखरुप बघून सगळ्यांना आनंद झाला होता. त्याने क्षमा मागताच सुरेशने त्याला मिठी मारली.

सुनिलचा नुकताच प्रेमाभंग झाला होता, त्यात काल प्रचारात त्याच्यामुळे राडा झाला आणि कुणीतरी आबासाहेबांचा अपमान केला. परत आल्यावर दुःखी होऊन शेतात बसला. स्वतःचा राग शांत होत नव्हता, त्याने रागाने लाथ मारली आणि शेतीतील माल झाकून ठेवलेल्या मचानाचा बांबू तुटला. सगळं धान्य अस्ताव्यस्थ झालं. आपण काहीच नीट करु शकत नाही, आपल्यामुळे सर्वांना त्रासचं होतोय हा विचार करत त्याने शेतातील कीटकनाशक प्राशन केलं.

जेवणाची वेळ झाली तरी सुनिल घरी आला नव्हता. आज प्रचारात काय झालं ते अनिलला कळलं आणि तो रागात शेतात गेल्याचं कळताच अनिल त्याला बघायला गेला. तिथे भावाची हालत बघून घाबरला. त्याने त्याला तसंच उचलून घरी आणलं आणि घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये.

लगेच लक्षात आल्यामुळे आणि वेदने लगेच योग्य उपचार केल्यामुळे आज तो बरा झाला होता.

वेद शक्य तेवढी त्याची काळजी घेत होता. दादासाहेब साथ देत नव्हते, पण विरोधही करत नव्हते. आबासाहेब फक्त्त बघत होते पण काहीच बोलत नव्हते. अनिलची चिडचिड व्हायची, पण मेघा त्याला समजावत होती. ऋचा मनोमन वेदचे आभार मानत होती. घरात वेदचं कौतुक होतं होतं आणि ऋचाच्या अंगावर मोरपीस फिरत होते.

चार दिवस ऍडमिट ठेवून सुनिलला सुट्टी दिली. सुनिल घरी आला, त्यादिवशी रात्री वेद टेरेसवर फिरत होता. ऋचाने त्याला बघून हात जोडले, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्याने एक फ्लाईंग किस फेकला. त्यांच्यात भांडण झालं तेव्हापासून आज त्यांना असा रिलॅक्स वेळ मिळालं होता. बराच वेळ दोघं एकमेकांना बघत होते.

खरंच म्हणतात ना, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात. योग आपोआप जुळतात, वेदबाबत तसंच काही झालं होतं. कुठली मुलगी आवडतं नव्हती, पण ऋचा लगेच आवडली. दोन घराचं काय करावं सुचतं नव्हतं आणि अचानक घटना अश्या घडतं गेल्या की... लवकरच सगळं ठीक होईल असं वाटायला लागलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी वेद नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमधून येत होता.
त्याचवेळी सुरेश शेतातून घरी येत होते. आबासाहेबांसोबत सुनिल आणि सुरेशसोबत अनिल असं असायचं, पण आता सुनिल नसल्याने अनिल आबांसोबत आणि सुरेश एकटे येत होते. त्यांना गाडी चालवता येत नव्हती, त्यामुळे पायदळच होते.
"चला काका सोडतो तुम्हाला." म्हणत वेदने गाडी थांबवली. तेही गाडीवर बसून आले. त्यांचा मुलगा केवळ त्याच्यामुळे वाचला होता. त्यांना सोडून वेद निघणार तसं सुरेश म्हणाले,
"चल चहा घ्यायला."
वेदला संधीच मिळाली, तो लगेच बाईक स्टँडला लावून त्यांच्यासोबत आत गेला.
'हे अनपेक्षित सरप्राईझ असेल ऋचासाठी, येईल का ती समोर? '
क्रमश:

 

चलताय ना चहा रुच्याकडे घ्यायला...

 

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//