Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग बारा

Read Later
अलवार प्रेम... भाग बारा


अलवार प्रेम... भाग बारा

विषय= प्रेमकथा "ती एक मोठी कथा आहे सांगेल कधीतरी."

म्हणत माधवकाका उठले. ऋचा त्यांच्याकडे बघत होती, तिच्या चेहऱ्याकडे बघून काका म्हणाले,
"अगं गुरुजींना भेटायला जायचंय जरा, सामानाची यादी आणायची आहे. फक्त्त आज रात्री सगळ्यांनी एकत्र जेवावं वाटलं म्हणून तुझ्याशी बोलायला आलो. कुणी एकटं जेवेल तर मी समजेल माझं प्रेम कमी पडलं." म्हणत काका मागे न पलटता निघून गेले.

ऋचा बघतच राहिली. आज कळलं ते खरं की एवढे वर्षे ती मानतेय ते खरं या विचाराने ती सैरभैर झाली होती. तोच काकांच्या मागे रूमच्या दारापर्यंत आलेल्या तिचं लक्ष खिडकीकडे गेलं. पून्हा विचारांच्या गर्तेतून ती वेदकडे वळली.
"हा असेल का इथेच की गेला असेल? तिने पडदा हटवला सगळीकडे अंधार होता. समोर एक टीमटीमता झिरो लाईट दिसत होता. तो बघून तिची निराशा झाली,

नजरेस का लागे अलवार हुरहूर
जरी राहतोस तू माझ्या दूर
ना दिसता झलक एक तुझी
उतरतो माझ्या चेहऱ्याचा नूर


ऋचाची अवस्था अशी काहीशी झाली. आपल्याच घरात आपण पाहुण्यासारखे का राहतोय हा विचार करुन ती खाली उतरली.
किचनमध्ये खूप गडबड सुरु होती. ती स्वतःला समजावत होती.

'हे माझं घरं आहे, मी पाहुणी नाही, या सगळ्यांमध्ये मी ही असायला हवे, हो असायलाच हवे.'

मनाला समजावत ती किचनमध्ये आली.
तिला बघून सगळे चूप बसले. कांता आई उठून तिच्याकडे आल्या,
"काही हवंय का बाळा तुला, भूक लागलीय?"

त्या आपल्या मधाळ आवाजात म्हणाल्या. तसं ऋचाने त्यांना घट्ट मिठी मारली.
"हवंय ना, मला माझी कांताआई हवीय, माझ्या दोन वेण्या खेचून मला दादांनी रडवलं की आपल्या बाजूला बसवून कणिक खेळायला देणारी, पोळी बनवायला शिकवणारी, डाळ निवडताना त्यातील खड्यांना बाहेर काढायला परातीत रस्ता बनवून देणारी, काही बनवल की आधी मला चव बघायला सांगणारी, माझे खूप लाड करणारी, माझी कांता आई हवीय मला." ऋचाचा आवाज जड झाला होता आणि कांता आईच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. देवघरातून दिवा लावून आलेल्या मेघाला ते दृश्य बघून खूप आनंद झाला. तिने धावत जाऊन फोन आणला आणि फोनमध्ये ते दृश्य टिपलं.

कांताआईने पदराने डोळे पुसले, आपल्या डोळ्यातलं काजळ बोटावर घेवून ऋचाच्या कानामागे तीट लावत म्हणाली.
"बेसन लाडू बनवलेत तुझ्यासाठी, हे खाऊन बघ."

सगळे लाडू वळत होते. ऋचाही तिथे बसून लाडू वळायला लागली आणि मेघाला लहानपणी लाडू वळताना केलेल्या गमती सांगत होती.
सगळ्या आवाजात ऋचाचा एक आवाज अजून मिसळला होता. हसत खेळत लाडू झाले आणि काहीतरी आठवून ऋचा म्हणाली,
" करंजी कधी करणार, मला बेडमध्ये घुसून खायचीय."
मेघा तिच्याकडे आश्चर्याने बघत होती. आईने ऋचाच्या लहानपणीचा किस्सा सांगितला.
"ऋचाला गोड खूप आवडायचे, एकदा आजीने तिला आता अजून गोड नाही म्हणून रागावले. तेव्हा ऋचाने दोन करंज्या चोरून नेल्या आणि तोंडावर पांघरूण घेवून आत खात होती.
अनिलला आवाज गेला तसं त्याने तिचं पांघरूणं ओढलं आणि ती दचकल्यामुळे तिच्या तोंडात भरलेली सगळी पिठ्ठी (करंजीतलं पिठीसाखर आणि गव्हाच्या पिठाचे सारण ) बाहेर उडाली. त्यानंतर अनिल सुनील तिला नेहमी पिठ्ठी म्हणून चिडवायचे."
किस्सा सांगताना कांता आईने हसतहसत डोळे पुसले.

त्यांना सिरिअस होताना बघून ऋचा हसत मेघाला म्हणाली,
" अगं मी खूप बालिश होते लहानपणी, एकदा तर मी झोपेत माझी चादर घेवून न्हाणीघरात जाऊन झोपलेले, काही वेळाने ओलं लागल्यावर कळलं आपण कुठे आहोत ते."  ऋचा मेघाला टाळी देत हसायला लागली.
"आणि एकदा ऋचाने आंब्याची कोय साबण सारखी सगळ्या अंगाला लावली होती, सगळं अंग चिकटचिकट आंब्याच्या रसाने." कांता आई म्हणाल्या आणि तिघीही खळाळून हसल्या. बाहेरून आलेले आबासाहेब त्या आवाजाने सुखावले पण सरळ रूममध्ये निघून गेले.

त्यांना त्यांच्यामुळे ऋचाच्या आनंदात विरजण नको होतं. इकडे जेवणाची तयारी झाली पण रात्री आबासाहेब नव्हते जेवताना, ऋचाला विचारायचं होतं की ते खरंच खोलीत जेवले का? पण हिम्मत होत नव्हती. ती कसबसं जेवण करुन वर आली. आज तसंही पोट हसून हसून भरलं होतं, कितीतरी दिवसांनी आज तिने कांता आईला मिठी मारली होती.

आपण आपल्याच कोषात आपल्याच माणसांना कसं काय विसरून जातो ना...
ऋचा गावात येत नव्हती पण सगळे ऋचाला भेटायला शहरात जायचे. सुनील,अनिल तर नेहमीच. कांता आई आठवण आली की यायची, तिच्या वाढदिवसाला पण आवर्जून हजेरी लावायची. सुरेश बाबा कधीतरी यायचे, ते तसेही मितभाषी, शेत आणि शेतीतलं काम याव्यतिरिक्त ते कशातच लक्ष घालत नव्हते.

अनिलच लग्न झाल्यापासून अनिल मेघाला घेवून आला नव्हता आणि तिला कुणी मेघाचा फोटोही दाखवला नव्हता. त्या काळात ती ट्रेनिंगसाठी बाहेरगावी होती. नंतर तिने विचारल्यावर सगळे सांगायचे प्रत्यक्षच भेट. फक्त्त ती भेटली नव्हती आबासाहेबांना. अजूनही ती त्यांच्याकडे मान वर करुन बघत नव्हती. ती विचारातच होती की कौशी आली प्यायचे पाणी घेवून वर.
"सगळे झोपलेत का?" तिने विचारलं.
"नाही जी, ते आबासाहेब यायचेत नव्ह, त्यांची वाट बघत थांबल्याय बाईसाहेब." कौशी म्हणाली.
'म्हणजे ते बाहेर गेलेत तर.' कौशी बाजूच्याच रूममध्ये आहे म्हणून सांगून झोपायला गेली.


**********


वेद बहुदा रात्री घरी नसायचा. शिवचं लग्न झाल्यापासून तो त्याला रात्री घरी पाठवायचा. उमा सकाळपासून रात्रीपर्यंत असायची हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर मदत म्हणून एक विधवा बाई थांबायची. नर्सिंग नव्हतं केलेलं पण धीट होती. वेदचं घरी तसं पटत नव्हतं त्यामुळे तो घराच्या जास्तीत जास्त दूरच असायचा. हॉस्पिटलच त्याचं घर होतं जणू.
वेद तिथेच झोपायचा पण आज त्याला घरी राहावं वाटत होतं, शिवला तो काही म्हणू शकत नव्हता कारण त्याचा मुलगा लहान होता पण ऋचाची एक झलक तर मिळायलाच हवी होती नाहीतर झोप लागली नसती त्याला रात्री. त्याला खात्री होती ती ही बेचैन होईल तो न दिसल्यावर.

'काहीतरी करावं लागेल?' तो मनाशीच विचार करत होता.क्रमश:


वेदला काही चैन पडेना बाबा...बघूया पुढल्या भागात काय करतो वेद तर... तोपर्यंत मेरे सामनेवाली खिडकी एन्जॉय करा आणि सांगा कशी वाटतेय?©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//