Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग तीन

Read Later
अलवार प्रेम... भाग तीन

 

 

 

अलवार प्रेम भाग तीन
विषय:प्रेमकथा


ऋचाने डोळे उघडून बघितलं,
"थँक्स शिव तुम्ही आलात."

 

 

ती गाडीवरुन उतरत म्हणाली.
"ते सोड आधी तू इकडे ये आणि वेद तू जा इथून लगेच, उगाच कुणी बोंबलत गेलं तरं प्रॉब्लेम व्हायचा."
शिव बाईकवरुन बॅग उतरवत आजूबाजूला बघत म्हणाला.

"हो."

म्हणत वेदने बाईक स्टँडला लावली. ऋचाला काय सुरु आहे? ते कळतं नव्हतं त्यात भीतीने ती समोर पाण्याकडे बघत नव्हती.
काठावर गाई चारणारे दोन चारचं लोक होते.

"हे बघ ऋचा आपल्याला आता पाण्यातून जाण्याशिवाय पर्याय नाहीये, ती रस्सी दिसतेय त्याला पकडून पकडून पलीकडे जायचं असतं."


"पण शिव असं?... मला घ्यायला कोणी का आलं नाही? आणि हा कोण?"

ऋचाने बुचकळ्यात पडत विचारलं.


"तू त्याच्यासोबत आल्याचं कुठंच बोलू नकोस आणि का? ते विचारु नकोस."
"आपण थांबलो तर चालणार नाही का?काही वेगळा पर्याय? "
ऋचा आशेने म्हणाली.
"डॅम ओव्हरफ्लो झाला आहे, त्याचं पाणी सोडलं की,दोन दिवसतरी असंच असतं. आज सकाळीच पाणी आलंय त्यामुळे गाडी पाठवता आली नाही. काका बोलले पाऊस बघून तू येणारच नाहीस आणि तिकडे स्टेशनजवळच्या मैत्रिणीकडे थांबशील,पण फोन लागेना म्हणून मला आबांनी पाठवलं.मी येतच होतो पण त्याची इमर्जन्सी होती, म्हणून आधी तो गेला."

"तो कोण आणि कसली इमर्जन्सी?"

तिने आश्चर्याने विचारलं.
"ते हॉस्पिटलचं सामान, पण तू घरी बोलू नकोस त्याच्यासोबत आल्याचं."

शिव तिची बॅग घेवून पुढे जात म्हणाला.

"पण का?"

तिने आश्चर्याने विचारलं.
"कळेल लवकरच,चल आता."
"या दोऱ्या तुटत नाहीत ना?"

तिने घाबरत विचारलं.

"नाही ग, पुलावरुन पाणी असेल की, ओळखायला येतं नाही, म्हणून बरोबर दोन दोऱ्या पकडून ये-जा करायची असते."

शिव सांगत होता.
त्याने तिथल्या एका माणसाला पैसे दिले, त्याने बॅग डोक्यावर घेतली आणि भरभर पलीकडे निघाला. ऋचा त्याच्याकडे बघतच राहिली.
"इकडे पावसाळ्यात खूप कसरत असते गं,आता बघ या चार बाईक पलीकडे आणि चार अलीकडे, पाणी चढायला लागलं की,असं आधीच ठेवावं लागतं, म्हणजे माणूस पाण्यातून पलीकडे जाऊन गाडी नेऊ शकतो, आता तू आलीस ती गाडी वेदची आणि हा माणूस गेला हे लोक पैशे घेवून लहान मुलं आणि सामान पलीकडे घेवून जाणारे. "

ऋचा हे नवीनच ऐकत होती आणि या बोलण्यात तिचं पाण्याकडे लक्ष नव्हतं. तिच्या पायाला जसं साचलेलं पाणी लागलं तशी ती जागे फिरली.

"अगं घाबरु नकोस, हे बघ या दोऱ्या पकडून पुढे चालत रहा.मी लगेच मागे तुझ्या बस थोडंच अंतर आहे."

शिव धीर देत म्हणाला.

ऋचा ने हिम्मत केली.डोळे मिटले दोन्ही दोऱ्या पकडून ती समोर चालत होती, गुडघ्यापर्यंत पाणी होतं, शिव मागेच होता. अर्ध्यात आल्यावर त्या पाण्याच्या स्पर्शाने काहीतरी आठवायला लागलं, नजरेसमोर काहीतरी दृश्य तरळलं आणि तिने डोळे उघडले.
गावातलं पाणी बघून ती भयानक घाबरली, समोर अंधारी पसरायला लागली, पाय लटपटायला लागले आणि...

कुणीतरी धावत समोरुन आलं,त्याने तिला उचलून समोर तिरावर नेलं.
"वेद तू जा इथून, मी बघतो काय ते."
"ती घाबरुन बेशुद्ध झालीय, वर किती वेळपासून ओली आहे, शहरातील लोकांना याची सवय नसते."

म्हणत तो तिला समोर थोड्या दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये घेवून गेला.
शिव त्याच्यामागे ओरडत होता,
"अरे गावात कळेल रे, मी बघतो ना तिला, कुणाला दिसलं वा तिने कुणाला सांगितलं तर उगाच बोभाटा होईल."
"तिच्या जिवापेक्षा काही महत्वाचं आहे का?"

म्हणत त्याने तिला आपल्याला केबिनमध्ये नेलं.
"उमाला बोलाव लगेच."

म्हणत तो तिचे हात पाय चोळू लागला.
उमा आली तसं त्याने तिला काही सूचना दिल्या.
उमाने तिच्या बॅगमधून सामान काढून तिचे कपडे बदलले तिला बाजूच्या बेडवर झोपवले, वेदने बाकी तयारी केली होती.
शिव आणि तो तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होते.
काही वेळात तिने डोळे उघडले, नेमका वेद काही आणायला केबिनबाहेर गेला होता आणि त्याला आबासाहेबांची गाडी दिसली.
तो आत आला.

त्याने सरळ तिला उचलले,
"आबासाहेब आलेत हिला तुझ्या केबीनमध्ये शिफ्ट कर, त्यांना काही कळायला नको."

म्हणत तिला सोडून तो परत आला.

ऋचा जेमतेम शुद्धीवर आलेली तिला काय चाललंय काहीच कळतं नव्हतं. तोच आबासाहेब आत आले.

वेदने बाहेर नजर फिरवली, सफाई करणारा दिसत नव्हता. आता याला कुठे पकडावं यां विचारात असतानाच तो धावत येताना दिसला.

'म्हणजे यानेच बातमी नेली तर.'
कारण ते छोटंसं हॉस्पिटल होतं. नदीच्या अलीकडे दोन तीन गावं मिळून एकटा दवाखाना. वेद आणि शिव मिळून चोवीस तास चालवायचे, उमा तिथली नर्स आणि शिवची बायको.
साथीचे रोग आले की मदतीला तो आपल्याला बंगल्यातले नोकर न्यायचा.

तो मागच्या दाराने बाहेर आला आणि त्याने श्यामाला आवाज दिला. एक शंभरची नोट त्याच्या खिश्यात सरकवत म्हणाला,
"का उगाच गावात भांडणं लावतोय, जे झालं ते तू काहीच बघितलं नाहीस."
"व्हय मालक."

म्हणत श्यामाने हात जोडले.

शिव आणि वेद सोबतच शिकले. दोघांनीही गावातच राहायचं ठरवलं, पण शिवच्या घरची परिस्थिती बेताचीच आणि गावात दोन गट.
त्यामुळे वेदच्याच हॉस्पिटलचे दोन भाग झाले होते. एक गट वेदकडे यायचा आणि दुसरा गट शिवकडे.

आज हॉस्पिटलमध्ये आबासाहेब सरळ शिवच्या केबिनमध्ये गेले, सोबत त्यांचे भाऊ माधव होते.
माधवला बघताच,

"काका."

म्हणत ऋचा त्यांना बिलगली आणि आबासाहेबांचा चेहरा उतरला.


क्रमश:


काय आहे हे, का लपवत आहेत सगळे काहीतरी, ऋचासारखे तुम्हालाही प्रश्न पडलेत ना....
मग पुढला भाग वाचायला तयार रहा....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//