Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग तीस

Read Later
अलवार प्रेम... भाग तीस

 

 

अलवार प्रेम...भाग तीस

विषय =प्रेमकथा


मागील भागात आपण पाहिलं...
सुरेश वेदला घरी चहाला बोलावतात, त्याला बघून ऋचा शॉक होते, कांताआई त्यांचं आणि वेदच्या आईचं नातं सांगते. वेद नॉर्मल चर्चा करुन घरी जातो.

आता पुढे...

तो आबासाहेबांकडे गेल्याची बातमी घरात पोहोचली होती आणि म्हणूनच रश्मी त्याला भेटायला आल्या.
वेदने आनंदाने त्यांना उचलून घेतलं आणि गोलगोल फिरवत खाली ठेवत म्हणाला,
"आई, अर्धी लढाई जिंकली ग मी...आणि तुझी बहीण तुला विसरलेली नाहीये. खरंच तू म्हणते ना त्यापेक्षाही गोड आहे ती."
त्यानंतर वेदने आईला तिथे काय काय झालं ते सगळं सांगितलं. त्याची आई खूप खुश झाली. आता त्यांनाही ऋचाला बघण्याचे वेध लागले होते.

दोन दिवसांनी पोळा झाला. यावेळी गावात शांतता होती. दादासाहेब कशातच सहभाग घेत नव्हते आणि आबासाहेब अजूनही सुनिलच्या धक्क्यातून सावरले नव्हते.

तान्हा पोळ्याला उमा मनूला घेऊन ऋचाकडे आली आणि तिथून वेदकडे गेली भेटायला. नातू म्हणून मनूचे दोन्ही घरी मस्त लाड होत होते.
रश्मीने उमाकडे ऋचाला बघायची इच्छा बोलून दाखवली. दोन दिवसांनी काजळतीचं हळदीकुंकू होतं. ऋचाला घरी बोलवायचा हा चांगला बहाणा होता.


काजळतीच्या दिवशी दादासाहेबांकडून रीतसर आबासाहेबांकडे हळदी-कुंकवाचे आमंत्रण गेले.
त्यादिवशी ऋचा एकदम मराठमोळा साज शृंगार करुन नटली होती. वरवर कोणाला कळत नसलं, तरी ती सगळं वेदसाठी करत होती. तिने उपासही धरला होता. आज वेदला घायाळ करायचंच असं तिने मनाशी ठरवलं होतं.
दादासाहेब दुपारी तीनला बाहेरगावी जाणार होते. वेदने उमाला तीन नंतर ऋचाला घेवून ये म्हणून सांगितलं.
ऋचाला भेटायला तो खूप अधीर झाला होता आणि आज ऋचा खिडकीतही आलीच नव्हती.

मेघाची पहिली काजळती होती आणि त्यासोबत ऋचाचीही मनातल्या मनात पहिली काजळती साजरी होत होती.
उमा दुपारी दोनला ऋचाकडे गेली. तिथलं हळदीकुंकू झाल्यावर ऋचाला घेऊन उमा निघाली. घरी कुणीही विरोध केला नव्हता. कांताआईने मेघा आणि मी नंतर येऊ म्हणून टाळलं होतं. त्यांना आबासाहेबांची भिती वाटत होती. ऋचाला ते ओरडणार नाहीत म्हणून त्यांनी ऋचाला बिनधास्त पाठवून दिलं.

यावर्षीचा रात्री जागरणाचा कार्यक्रम दोन्ही घरांच्या मधल्या जागेत ठेवला होता एकत्र. त्यामुळे यावेळी लोकांना कुठे जावं कुठे नाही हा प्रश्न नव्हता.
ऋचा धडधडत्या मनाने वेदकडे जायला निघाली होती. सकाळपासून ती मुद्दाम खिडकीत गेली नव्हती. तिलाही आज त्याला सरप्राईज द्यायचं होतं.
उमा आणि ऋचा हॉलमध्ये आल्या आणि रश्मी बघतच राहिल्या.
यांची चाहूल लागून आलेला वेद आतल्या रुममध्ये हॉलमधलं सगळ दिसेल असं दाराआड खुर्ची टाकुन बसला होता.
ऋचा सुंदर अशा निळ्या रंगाच्या आणि सोनेरी काठाच्या नऊवारीत उठून दिसत होती. नाकात नथ,पूर्ण अंगावर मोत्यांचा साज आणि केसांच्या अंबाड्यावर माळलेला जुईचा गजरा, हातभर मॅचिंग बांगड्या जणू काही लक्ष्मीचं साक्षात रुप भासत होती.
तिला बघताच रश्मीने कानाजवळ बोटे नेऊन कडाकडा मोडली. ऋचा त्यांच्या पायाजवळ वाकणार तसं त्यांनी तिला दोन्ही खांदे पकडून उठवलं आणि मिठी मारली.
"अगदी रेखालाच भेटल्यासारखं वाटलं बघ." म्हणत त्यांनी आपल्या डोळ्यातील काजळाचा तिट तिच्या कानामागे लावला.
"मला तर वाटतं माझीच नजर लागेल की काय?"
"काहीही काय आई..." नकळत ऋचाच्या तोंडून निघून गेलं आणि उमाने तिला धक्का दिला. तसं सावरत,
"ते तुम्हाला काय म्हणू कळेना, आईसारख्या म्हणून आई म्हणाले." ऋचा खाली मान घालून म्हणाली.
"आईचं म्हण." म्हणत त्या हसल्या.
त्याचवेळी दादासाहेब काहीतरी विसरले म्हणून घरी परत आले आणि ऋचाला बघून बघतच राहिले.
ज्या रेखाताई त्यांना मोठ्या भावाचा मान द्यायच्या, त्यांना अगदी लहान बहिणीसारख्या होत्या, तिचं प्रतिरुप त्यांना समोर दिसत होतं.
त्यांना बघताच ऋचा घाबरुन उठली आणि त्यांच्या पाया पडली.

आता काही तरी राडा होणार म्हणून वेद तयारीत होता, पण दादासाहेबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून "सुखी रहा." असा आशीर्वाद दिला आणि तिची जुजबी विचारपूस करत ते आत आले.

या रुममधून जाऊन दुसऱ्या रुममधून येताना वेद त्यांना दाराआड बसलेला दिसला.
ते जवळ येताच वेद पटकन उठून बाजूला झाला.
त्याला असं दचकलेलं बघून दादासाहेबांच्या डोक्यात लाईट लागला.

घरुन जाताना ते विचार करत होते.

'ऋचाचं गावात येणं आणि वेदचं बदललेलं वागणं, या दोन घरांना जोडण्याचं कारण ही मुलगी का नसावी?" त्यांच्या डोक्यात एकदम विचार चमकला.
त्यांचा जो मुलगा मुलींकडे ढुंकूनही पाहत नव्हता तो आज एका मुलीसाठी दारामागे बसलेला त्यांनी पाहिला होता.

अशोक, रवीशचं त्यांच्या दूर असणं त्यात वेदचंही निघून जातो म्हणणं आणि रश्मीचं त्याच्यासोबत असणं त्यांना विचार करायला भाग पाडत होतं. रश्मीने आतापर्यंत त्यांच्याकडे कधीच काही मागितलं नव्हतं आणि म्हणूनच त्यांचा विरोध थोडा मावळला होता. आज ते पक्षाच्या आमदारकीच्या तिकिटासाठी जात होते.

रश्मीने वेदला आवाज दिला. वेद लगेच हजर झाला.
"वेद ऋचाला आपलं घर दाखव."
"तसं वेद साळसूदपणे तिला "चला" म्हणाला.
ऋचाने घाबरुन उमाकडे बघितलं. वेदसोबत एकटं जायला तिला भिती वाटतं होती, त्याने सर्वांसमोर केलेली हिम्मत आठवून तिला आधीच अंगात कापरं भरत होतं.
तसं रश्मी म्हणाल्या,
"माझ्या मुलाने माझ्या होणाऱ्या सुनेला तिचं घर दाखवायला नको."
त्यांचं बोलणं ऐकून ऋचा लाजली.

'काय करावं याचं, याने काय सगळ्यांना सांगून टाकलंय की काय?'
ऋचा मनात म्हणाली.

"उमा तिला घर बघू दे, तू जरा माझी मदत कर." म्हणत उमाचा हात पकडून रश्मी किचनमध्ये निघून गेल्या.
आता वेदसोबत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तिलाही जायचं होतं, पण हृदय खूप जोरात धडधडत होतं, मनाला गुदगुल्या होत होत्या. त्याची तिरपी रोखलेली नजर तिच्या गालावरची लाली वाढवत होती.


क्रमश:


कसं होणार आपल्या ऋचाचं?

 

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//