Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम...भाग बत्तीस

Read Later
अलवार प्रेम...भाग बत्तीस

अलवार प्रेम ​​​​​​... भाग बत्तीस

विषय =प्रेमकथा 

मागील भागात आपण पाहिलं...
दादासाहेब ऋचाचं स्केच बघून तिला मागणी घालायची म्हणतात. त्यांचा भूतकाळ सांगून वेदची आणि रश्मीची माफीही मागतात.


आता पुढे...


देशमुखांकडे नुकतीच गणपती स्थापना झाली होती आणि तिन्ही भाऊ, अनिल व सुनिल सोफ्यावर बसले होते. दारात तीन लोक आलेले दिसले, दादासाहेबांना बघून सुरेशरावांनी समोर होऊन त्यांना आत बसायला सांगितले.
नुकतंच सगळं आटोपून वर जात असलेली ऋचा पायऱ्यांवरच थबकली.
वेदची नजर तिलाच शोधत होती.
तिघेही आत आले त्यांनी गणपतीची मनोभावे पुजा केली आणि ते सोफ्यावर येऊन बसले.
"सॉरी आम्ही न कळवता आलो... आम्हाला जरा महत्वाचं बोलायचं होतं." दादासाहेब म्हणाले तसं सगळे शॉक होऊन बघत होते, अनिलचा रागराग होत होता. त्यांनी एक कागद आबासाहेबांकडे सरकवला. आबासाहेबांनी मान फिरवली. सुरेशने डोळ्यांनी इशारा केला तसं अनिलने तो कागद उघडला.
कांता आणि मीराही बाहेर आल्या होत्या. ऋचा किचनमध्ये मेघाला मदत करायची म्हणून गेली. रश्मी आणि वेद शांतच होते.
अनिलच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"याचं कारण आणि आपलं इथे येण्याचं कारण जरा स्पष्ट होईल का?" अनिल जरा त्रासिकपणे म्हणाला.
"तेच कसं बोलावं कळतं नाहीये, मी यावेळी आमदार होण्याऐवजी आमदाराचा व्याही व्हायचं म्हणतोय." दादासाहेबांचं बोलणं कुणालाच कळलं नाही. पाणी देऊन वापस जाणाऱ्या मेघाने वेदकडे बघितलं आणि तिचा लाईट लागला. ती लगेच आत आली आणि ऋचाची नजर उतरवत म्हणाली,

"डॉक्टर साहेब फ्लॅट झालेले दिसतात तुमच्यावर?"
ऋचाच्या तोंडचं पाणीच पळालं. इकडे सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे बघून दादासाहेबांनी रश्मीकडे बघितलं.
"आबासाहेब आम्ही वेदसाठी ऋचाचा हात मागायला आलोय."
"दादाsss..." आबासाहेब मुठी आवळत उभे राहत म्हणाले. ऋचा धावतच बाहेर आली आणि तिच्या मागेच मेघा.
सुरेशने त्यांचा हात पकडून खाली बसायला सांगितले. मोठा भाऊ पहिल्यांदा हक्क गाजवत होता त्यांच्यावर, त्यामुळे ते राग आवरत खाली बसले.
वेद हात जोडून म्हणाला, "जे झालं ते चूक होतंच पण या दोन घरांना जोडायला..."
"डॉक्टर यासाठीच सगळा अट्टाहास केला होतात का?" आबासाहेब गरजले.
"जे झालं ते सगळं चूक होतं, गैरसमजातून होतं... गैरसमज वाढत गेले आणि सत्तेच्या माजात माझ्या हातून चुका होत गेल्या. त्या सर्वांसाठी मी हात जोडून माफी मागतो, मोठ्या मनाने माफ करा." दादासाहेब हात जोडून म्हणाले.
"नेहमीच खोटं वागत आलास तू, तुझ्या रक्ताकडून तरी काय अपेक्षा करावी?"आबासाहेब म्हणाले तसं 
ऋचाचे डोळे पाणावले होते आणि ते बघून वेद उठला.
"अट्टाहास होता की नव्हता, नाही माहिती. गावाप्रती कर्तव्य होतं माझं ते, अनिल, सुनिलला मी तसंही कर्तव्य म्हणून वाचवलंच असतं, पण मागणी घालताना पूर्ण विचार करुन मागणी घातलीय. तेव्हा निर्णय घेताना तुम्ही दुसरी बाजूही लक्षात घ्या." म्हणत त्याने ऋचाकडे नजर फिरवली. सगळे ऋचाकडे पलटले तसं ऋचा रडत वर निघून गेली.
माधवराव काय समजायचं ते समजले.
सुरेश हात जोडत म्हणाले,
"तुमच्या मागणीचा आम्ही शांततेत विचार करुन कळवतो, तूर्तास तुम्ही निघावे ही विनंती."
तिघेही जायला उठले, दारापर्यंत गेल्यावर वेद पलटून अनिलकडे आला, अनिलच्या बाजूलाच मेघाही उभी होती.
"दोन घरांची तेढ मिटवायची इच्छा असेल नसेल पण भावासाठी बहिणीचं सुख महत्वाचं असतं, म्हणून विचार कर."
म्हणत वेद तडक निघून गेला. मेघा लगेच धावत वर गेली.
ऋचा रडत होती. मेघाला बघून तिला मिठी मारुन ती हमसून हमसून रडू लागली.
"वन्स, शांत व्हा वन्स... काही होणार नाही... मी आहे ना तुमच्यासोबत, सगळं ठीक होईल." मेघा तिला सावरत होती, नक्की काय झालंय? ते तिलाही माहिती नव्हतं. मेघाने त्याची मागणी आली सांगितलं, तेव्हाचे ऋचाचे भाव बघून मेघाने अंदाज लावला होता.

ऋचाला समजावून शांत करत मेघाने तिला बळजबरीने झोपवलं. तिला पुन्हा पॅनिक अटॅक येऊ नये एवढीच तिची इच्छा होती.
ऋचा झोपल्याची खात्री झाल्यावर ती खाली आली.

खाली सगळे सुन्न बसले होते, कुणीच काही बोलत नव्हतं. मागणीच अशी होती की काय बोलावं कुणालाच कळतं नव्हतं. मेघा उतरली आणि आबासाहेबांसमोर जात म्हणाली.
"मी या घरात आले तेव्हा तुम्हीच म्हणालात ना, मी सून नसून मुलगी म्हणून आलेय या घरात, मग आज त्या हक्काने काहीतरी मागतेय, तुम्ही वन्सच्या मनाचा..."
"मेघा मोठ्यांमध्ये बोलायची रीत नाही आपल्या घरात."

अनिल तिला बोलूही न देता ओरडला.
"मग कसली रीत आहे. आताच जी सावरलीय धक्क्यातून तिला पुन्हा त्याच धक्क्यात लोटायची?" माधवकाका म्हणाले.
"माझा या मागणीला होकार आहे." सुरेश म्हणाले तसं सुनिल उठून म्हणाला,
"जो दुसऱ्याचं आयुष्य सावरतो तो ऋचाला नक्की सुखात ठेवेल, माझाही पूर्ण होकार आहे."
" एवढे वर्षांचे संबंध आज सुधारायची संधी आहे, किती दिवस तेच ते वाद आणि अढ्या मनात जपून ठेवणार?" कांता म्हणाल्या.
"माझ्या ऋचाच्या सुखापुढे मला दुसरं काहीच दिसणार नाही, ती खुश राहणार असेल तर मी काहीही करेल." मीरा म्हणाल्या.
अनिल आणि आबाच चूप होते. मेघा अनिलकडे जात म्हणाली,
"तुम्ही मला सांगितलं होतं की, माझ्या बहिणीच्या सरबराईत काही कमी करायचं नाही, आज त्यांच्याच सुखासाठी बोलतेय हॊ."
एवढा वेळ शांत बसलेले आणि नेहमीच शांत असणारे, कमी बोलणारे सुरेश म्हणाले,
"अन्वयची मागणी आली तेव्हा मी स्वतः तिला सांगून आलो होतो, तिच्या मनाविरुद्ध काहीही होणार नाही. तिने नकार दिला तेव्हा आबाच म्हणाला, तू म्हणशील तर घरजावई आणायलाही तयार आहे मी. मग आता तिची इच्छा असेल तर... त्यादिवशी ज्या वेदची सगळे तारीफ करत होते, तो आज अचानक वाईट कसा झाला? अनिलला वाचवायला का गेला तो, सगळ्या गावाला माहिती आहे की, आज दादा एकटा पडलाय. आज तो स्वतः आमदारकीचं तिकीट नाकारुन आलाय माफी मागायला, एवढं सगळं होतंय ते फक्त्त ऋचासाठीच ना?"

सुरेशच्या बोलण्यावर सगळे विचारात पडले. सगळ्यांचं लक्ष आबांकडे लागलं होतं आणि आबा...

क्रमश:


काय असेल आबांचा निर्णय?

©®पल्लवी चरपे

टीम =अहमदनगर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//