Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग तेहतीस

Read Later
अलवार प्रेम... भाग तेहतीस

अलवार प्रेम...भाग तेहतीस

विषय =प्रेमकथा 


मागील भागात आपण पाहिलं,

दादासाहेब, रश्मी आणि वेद ऋचाकडे येवून ऋचाला मागणी घालतात. वेद निर्णय घेण्याआधी ऋचाचा विचार करायला सांगतो. सगळे होकार देतात, पण आबासाहेब काहीच बोलत नाहीत.

आता पुढे...

आबा उठून त्यांच्या खोलीत निघून गेले. संध्याकाळच्या आरतीसाठी मेघा ऋचाला उठवायला गेली. ऋचाने उठताच तिला खाली "काय झाले विचारले?"
मेघा "आरतीला चला, बरीच आवराआवर करायचीय." म्हणत प्रश्न टाळला.

सगळे आरतीला जमले, ऋचाही खाली आली. तिचा रडवेला चेहरा बघून सगळ्यांनाच तिची दया आली. आरती झाली आणि तिने आबांकडे बघितलं.
"या घरात सगळं होईल पण नसते हट्ट पूर्ण होणार नाही."म्हणत आबा रुममध्ये जायला वळले आणि माधव चिडले,
"हो ज्या मुलीसाठी दहा वर्षे मनात तळमळ होती. ती मिळाल्यावर स्वार्थ मोठा झालाय का या घरातल्या लोकांचा, काय कमी आहे त्या मुलात? सत्तेचा मोह तर नव्हताच ना तुम्हाला मग आज अचानक कुठून उफाळून आलाय आबासाहेब."
"माझ्यामुळे घरात भांडणं नको. तुम्ही योग्य समजाल ते मला मान्य असेल." म्हणत ऋचा रडत वर निघून गेली.
सुरेश तिच्या मागे गेले, त्यांना बघताच ऋचाने डोळे पुसले. "तुला काय हवंय? काय आहे तुझ्या मनात?" त्यांनी प्रेमाने विचारलं.
ऋचा त्यांना बिलगली आणि बोलायला लागली, "बाबा तुम्हीच सांगा मी कधी गावात आलेय का? मी कधी त्याला बघितलंय का? मी पावसात भिजल्यावर कधी नॉर्मल असते का? पण मी त्याच्यासोबत आले पावसात, काहीच झालं नाही मला, पुरात बसलेल्या त्याला बघून वाचवायला धावले मी माझ्याही नकळत, आईसारखा तो ही...तरी काहीच झाले नाही.
स्वप्नात आईने सांगितलं मला, आठवून दिलं मला की, लहानपणी आम्ही सोबत खेळायचो, मला तर आठवतं पण नव्हतं. मी इथे आलेय तेव्हापासून एकदाही पॅनिक अटॅक आलेला नाहीये मला की आईची आठवण आली नाही. हे काय आहे मलाच कळतं नाहीये बाबा, खरचं कळत नाहीये."
सुरेशच्या मागे आलेले सगळे दारातून सगळं ऐकत होते आणि मागून येणाऱ्या आबासाहेबांच्या हाताने चुकून खिडकीचा पडदा सरकला.
वेद टेरेसवर अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता, ते बघून आबासाहेब आल्या पावली परतले.

सगळे आत जाऊन ऋचाला धीर देत होते आणि ती एकच वाक्य बोलत होती,

"मला त्यांना अजून दुखवायचं नाहीये."

आबा रुममध्ये आले, त्यांना एकेक गोष्ट आठवत होती. रेखाच जाणं, दादाचं पाठीत खंजीर खुपसणं, ऋचाचं त्यांचा रागराग करणं आणि या सगळ्यात आठवलं त्यांना रेखाचं एक वाक्य, 'हे दोघं भातुकली खेळतात तेव्हा मला खरंच वाटतं वेदला मोठं झाल्यावर जावई करुन घ्यावं.'
त्या वाक्यासोबत त्यांना त्यांचं उत्तर मिळालं. ऋचा गावात आल्यापासून घरचे सगळे आनंदी होते, तिचं लग्न कसं होणार? हा मोठा प्रश्न होता. उपचार करुनही तिचे पॅनिक अटॅक बंद होतं नव्हते आणि आता तिने जे सांगितलं ते...
त्यांना सगळी उत्तरे सापडली होती, आपल्या मुलीसाठी ते सगळं करायला तयार होते.

रात्री सगळेच टेन्शनमध्ये झोपले. आतापर्यंत आबासाहेबचं सगळे निर्णय घ्यायचे आणि सगळे त्याला होकार द्यायचे पण यावेळी सगळ्यांना ऋचाला गमवायचं नव्हतं, एकटीच मुलगी होती ती त्या घरातली जी एवढ्या वर्षानंतर परत आली होती.

आबासाहेब रात्री उशिरा तिच्या रुममध्ये गेले. ती पाय पोटाशी घेवून झोपली होती. कदाचित रडतच झोपली असावी. त्यांनी तिच्या अंगावर पांघरुण घातलं, तिचे पाय सरळ केले आणि डोक्यावरून हात फिरवला.
"ते म्हणतील तेच करेल मी..." ऋचा झोपेतच स्फुंदत म्हणाली. आबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी बाहेर पडलं. स्वतःला सावरत ते बाहेर आले आणि त्यांनी पडदा हटवला. वेद अजूनही तिथेच अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. ते आपल्या रुममध्ये जाऊन रेखाच्या फोटोशी बोलत शांत झोपले.


वेद रात्रभर तळमळत होता.
'तिच्या घरचे नकार तर देणार नाहीत, ती रडत वर गेली होती, आताही रडतच असेल का? मी घाई केली खूप... पण कधीतरी हिम्मत करावी लागणारच होती. उद्या दुपारपर्यंत वाट बघतो नाहीच काही कळलं तर उद्या उमाला तिच्याकडे पाठवतो.'
असं शेवटी मनाशी ठरवून कंटाळून तो हॉस्पिटलमध्ये निघून गेला.


******


सकाळी वेद आला, हॉर्न दिला तरी ऋचा खिडकीत आली नाही. ती रुममध्ये एकटीच होती. पण खाली खूप गडबड सुरु होती.
ऋचा खिडकीत न आल्यामुळे अस्वस्थ असलेला वेद आता उमाकडे जाऊन तिला ऋचाची विचारपूस करायला पाठवणार तोच गेटमधून सुरेश, आबा, अनिल आणि माधव आत येतांना दिसले.
तो तसंच माघारी फिरला. ते लोक आत आले, रश्मीने त्यांना आत यायला सांगून त्यांच्यासाठी पाणी आणले. दादासाहेब आणि वेद समोर अस्वस्थपणे चुळबुळत होते. होकार असता तर तसा आनंद यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता त्यामुळे वेदचा चेहरा पडला.
"तुमच्या मागणीवर योग्य विचार केला आम्ही, ऋचा म्हणतेय ती मी म्हणेल तेच करणार?" आबा वेदचे एक्सप्रेशन बघत म्हणाले.
"आणि तुमचं काय उत्तर आहे?" वेदने अधीरतेने विचारले.
"नाही."
"ठीक आहे मग, तुम्ही जे कराल ते तिच्यासाठी योग्यच असेल. बाप कधी मुलांचं वाईट चिंतीत नाही." वेद शक्य तेवढा नॉर्मल आवाज ठेवत म्हणाला.

"तिचा होकार असता आणि माझा नकार असता तर?" आबांनी पुन्हा विचारले.
"मोठ्यांच्या आशीर्वादाविना काहीच शक्य नसतं आणि मुलीवर पहिला हक्क तिच्या बापाचा असतो."
वेद वरवर जरी बोलत असला, तरी आतून तुटला होता. रश्मीही मुलाकडे केविलवाण्या नजरेने बघत होत्या.
वेदच्या नशिबात सुख नव्हतंचं जास्त, लहाणपणापासून दूरच राहिला घराच्या, घरात आई व्यतिरिक्त त्याचे विचार कुणाला पटत नव्हते. दोन्ही मोठ्या भावांना कर्तृत्ववान लहान भाऊ खुपत होता आणि आता इकडून तिकडून त्याला कुणी मुलगी आवडली तर हे असं...

"ठीक आहे तर मग..." आबासाहेब म्हणाले.
"आपल्या विरोधाची झळ आपल्या पोरांना बसू देऊ नये एव्हढंच वाटतं." म्हणत दादासाहेबांनी हात जोडले.क्रमश:


आता कसं होणार लग्न?

 

©®पल्लवी चरपे,

टीम =अहमदनगर 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//