Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

अलवार प्रेम... भाग एकतीस

Read Later
अलवार प्रेम... भाग एकतीस

अलवार प्रेम...भाग एकतीस

विषय =प्रेमकथा 

मागील भागात आपण पाहिलं...

वेद आबांकडून चहा नाश्ता घेवून येतो आणि आईला तिथे काय घडलं ते सगळं सांगतो. हरितालिकेला रश्मी तिला घरी बोलवतात आणि वेदला तिला घरं दाखवायला सांगतात...

आता पुढे....


थोडं बाजूला येताच वेदने तिचा हात पकडला.
"काय करताय तुम्ही, कुणी बघेल ना?"
"होणाऱ्या बायकोचा हात पकडतोय आणि कुणीच नाहीये बघायला."
वेद फुंकर मारुन तिच्या चेहऱ्यावरची बट बाजूला करत म्हणाला.
तिचं सर्वांग शहारलं.
त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला "रिलॅक्स, खाणार नाहीये मी तुला, नॉनव्हेज नाही चालत मला." म्हणत मिश्किल हसला.
ऋचा बावरतेय बघून तो विषय बदलत म्हणाला,

"चल, आता लाजणे सोड आणि घर बघ आपलं."
ऋचा मुकाट त्याच्यासोबत चालत होती. आपलं घर ऐकूनच अंगावर मोरपीस फिरले होते. तो एकेक रुम दाखवत तिला स्वतःच्या रुममध्ये घेवून गेला. त्या रुममध्ये खूप सारे बुक्स ठेवले होते आणि भिंतीवर पेंटिंग्स लावलेले होते.
बाजूला एक पेंटिंग झाकून होतं.
"हे काय आहे?" ऋचाने विचारलं.
"माझी स्वप्न परी..." वेदचे शब्द ऐकून ऋचाचं हृदय धडधडू लागलं.
"आहे एक जिच्यासाठी मी वेडा आहे."
ऋचाने न राहवून धडधडत्या मनाने त्या पेंटिंगवरचं कापड बाजूला केलं.
ते तीचंच स्केच होतं.
तिने आश्चर्याने वेदकडे बघितलं
आणि वेदने तिला जवळ ओढलं.
"मन खूप आतुर आहे स्वप्नपरीला प्रत्यक्षात आणायला, असं वाटतंय सोडूच नये."
त्याच्या असं अचानक जवळ आल्याने ऋचा थंड पडली होती, काय होतंय तिला काहीच कळतं नव्हतं, हृदय आता बाहेर पडत की काय असं वाटतं होतं, तोच दारावर ठकठक झाली आणि वेद बावरुन बाजूला झाला.
'हुश्श... सुटले बाबा.' म्हणत ऋचाने मनोमन लहानग्या मनूचे आभार मानले.
"मनूच्या काकांचं बोलून झालं असेल, तर काकूला नेऊ शकतो का आम्ही." शिव मनूला घेवून आला होता.
सगळे खाली आले. थोडावेळ बसून ऋचा घरी निघाली. वेदचं जवळ येणं आठवून ती लाजून चूर होत होती.


रात्री दादासाहेब काहीतरी ठरवून आणि काहीतरी निर्णय घेवून परतले. महिलांचा जागरण कार्यक्रम सुरु होता. वेद नेहमीप्रमाणे टेरेसवर आरामाखुर्चीत बुक घेवून बसला होता. ऋचाचं रुप, तिचं बावरणं आठवून मन सुखावत होतं. डोळे बंद केले की ऋचाचं तेच रुप दिसत होतं.

दादासाहेब आज पहिल्यांदा त्याच्या रुममध्ये आले. दुपारी ऋचाने बघितलेलं स्केच न झाकता तसंच होतं. आज दुपारपासून कितीदातरी त्याने ते बघितलं होतं.
रुममध्ये कुणीतरी आल्याची चाहुल लागताच त्याने पलटून बघितलं. आई आणि शिवशिवाय त्याच्या रुममध्ये कुणीही असं तडक येत नव्हतं. दादासाहेबांना बघून तो विचारात पडला.
"चित्रात जे आहे ते प्रत्यक्षात कधी येणार?" त्यांच्या प्रश्नावर वेद चमकला. त्यांच्या हातात ऋचाचं स्केच होतं. हिच संधी आहे बोलायची म्हणून तो लगेच म्हणाला, "सगळ्यांचा आशीर्वाद मिळाल्यावर."
"शुभस्य शीघ्रम, चल उद्या रीतसर मागणी घालू." त्यांचं वाक्य ऐकून वेदला क्षणभर स्वप्नात असल्यासारखं वाटलं. वेदचा चेहरा बघत दादासाहेब तिथे आरामाखुर्चीवर बसले.
"आश्चर्य वाटतंय?"
"नाही दादा तसं नाही पण..."
वेद अडखळला,
" तुला माहितीय वेद एका कर्जबाजारी, अनाथ आणि दोन वेळ जेवणाची सोय न लागणाऱ्या व्यक्तीने एक दिवस मोठं पद मिळवलं. सगळे सलाम ठोकायला लागले. सगळ्या गावातला दाद्या, दादासाहेब झाला एका रात्रीत आणि चढला सत्तेचा माज. आबा उभा राहू शकत नाही, म्हणून मी उभा झाला होतो. मी पाठीत वार नव्हता केला. तो पर्याय त्याच लोकांनी दिला मला पण आबाला कळल्यावर तो नको नको ते बोलला, त्याच्या लोकांनी माझी लायकी काढली, तो शिरप्या माझ्यासमोर म्हणाला,

'पायातली वहाण पायातच ठेवावी, आबासाहेब.' तेच जिव्हारी लागलं. श्रीकांत, गणपत, म्हाद्या या लोकांनी माझे कान भरले. मी जिंकून आलो आणि आकाश ठेंगणं झालं. तुझ्या आईने कधीच विरोध केला नाही. त्यानंतर बरेचदा वाटलं जावं तिथे बोलावं त्याच्याशी पण... त्यात तीन मुले आहेत मला हा अभिमान होता. पण अशोकचं व्यसन करणं, रविशचं घरजावई होणं...या सगळ्यात मला तू बोलल्यावर जाणवलं, 'खरंच काय मिळवलं मी?' आज हा राजकीय वारसा चालवणारं कुणीच नाहीय. मग काय करायचं जिंकून? "

वेद त्यांचं असं बोलणं ऐकून दुखावला. त्याने पहिल्यांदा त्यांचा हात पकडून त्यांच्या मांडीवर डोक ठेवलं. दादांनी त्याच्या केसातून हात फिरवला,
" खरंच माझी पोरं कधी मोठी झाली कळलंच नाही रे."
त्यानंतर बापलेक बराच वेळ गप्पा मारत होते. वेद मनाशी विचार करत होता,

'खरंच व्यक्ती वाईट असते का?... नाही त्या व्यक्तीची त्यावेळची परिस्थिती वाईट असते असंच म्हणावं लागेल.'

"उद्या सकाळी आपण ऋचाला मागणी घालायला जाऊ." सांगून ते खाली गेले.
पहाटे रश्मी घरी आल्या तसं दादासाहेबांनी त्यांना जवळ ओढत सॉरी म्हटलं. वेदसोबत जायला निघाल्या तेव्हापासून त्या त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हत्या.
त्यामुळे रश्मीला कळेना नेमकं आता त्यांनी सॉरी का म्हटलं?
दादासाहेबांनी तिला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाले,
"तुला कधीच वाटलं नाही का ग मला थांब म्हणून सांगावं?"
"वाटलं खूपदा वाटलं, पण पतीच्या विरोधात बोलण्यापेक्षा पतीला साथ देणं माझं कर्तव्य होतं, तरी आता ज्यावेळी तुम्ही वाईट विचार करायला लागले, त्यावेळी तुमच्या हातून पाप घडू द्यावं असं मला कधीच वाटलं नाही."
त्यांना खरंच रश्मीचा अभिमान वाटला आणि त्यांनी रश्मीला आनंदाची बातमी दिली. रश्मी त्यांना त्यांच्या आवडीची सून मिळणार म्हणून खुश झाल्या. दोन गट एक झाले तर गावाचं चांगलं होणार होतं पण आता प्रश्न होता आबासाहेबांचा, ते मानतील की नाही याचा, कारण आमदारकीचा फॉर्म जसा दादासाहेबांनी भरला होता तसाच आबासाहेबांनीही भरला होता.

रश्मीने लवकरात लवकर नैवेद्य करुन हरतालिका विसर्जन केलं आणि नोकरांना सूचना देऊन तयार व्हायला गेल्या. त्यांच्याकडे गणपती नसायचा, पण आधी आवर्जून सगळे आबासाहेबांकडच्या गणपतीची सेवा करायचे.
तिघेही आपलं आवरुन निघायला सज्ज झाले.क्रमश:

काय होणार पुढे.चलताय ना ऋचाला मागणी घालायला?


©®पल्लवी चरपे
टीम
अहमदनगर.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help

//